फेसबुकवर आज एक पोस्ट वाचनात आली. निवृत्तीला आलेल्या एका गृहस्थांनी, निवृत्तीनंतर पत्नीसह स्वतंत्र राहण्यासाठी एक छोटा फ्लॅट घेऊन ठेवला होता. मुलाचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न लावून दिल्यावर ते दोघे पती-पत्नी दोन्ही वेळच्या जेवणासाठी एकत्र येऊन नंतर आपल्या फ्लॅटमध्ये राहू लागले. त्यावर सुनेने विचारले, ‘मला सर्वजण नावं ठेवतील, माझ्या त्रासामुळे तुम्ही स्वतंत्र राहू लागलात म्हणून. त्यावेळी मी काय सांगू?’ सासरे बुवा म्हणाले, ‘तुम्ही नवीन जीवनाला सुरुवात केलेली आहे, आम्ही इथे असताना तुम्हा दोघांवरही दडपण राहू नये, आमची मतं तुमच्यावर लादली जाऊ नये, यासाठी आम्ही जवळच स्वतंत्र रहायचे ठरविले आहे.’ माणसानं ठरवलं तर असं तो आयुष्यात वागू शकतो. म्हणजे कसं? तर चिकूच्या ‘बी’ सारखं….
आपण फळं अनेक पाहिलेली आहेत. उदाहरणार्थ, आंबा. पिकलेला आंबा खाताना त्याचा गर हा कोयीला चिकटून असतो. आपण ती कोय चोखून कोरडी करतो, किंवा आमरस करताना पिळून काढतो. तसेच रामफळ, सिताफळाचा गर देखील बियांना चिकटून असतो. फणसाची बी गरापासून वेगळी करावी लागते. कलिंगडाच्या बिया चमच्याने वेगळ्या कराव्या लागतात. या सर्व फळांत चिकू हे असे एकमेव फळ आहे की, ज्यामधील काळी उभट स्वच्छ तुकतुकीत ‘बी’ सहजपणे बाजूला होते. माणसानं देखील स्वतःला कशातही जास्त गुरफटून घेऊ नये. आपलं काम झालं की आपणहून बाजूला व्हावं. असं केल्याने अपेक्षाभंगाचे दुःख कधीही पदरी पडत नाही.
शाळेतील, काॅलेजमधील शिक्षक हा चिकूच्या ‘बी’ सारखाच असतो. तो समोर आलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतो. शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांसाठी जे काही तास आपल्या वाट्याला आलेले असतील त्या तासांमध्ये त्याला शिकवून ज्ञानी करतो व तो पुढच्या वर्गात गेला की, स्वतःहून बाजूला होतो. दरम्यान अनेक वर्षे जातात. पस्तीस चाळीस वर्षांच्या नोकरीत हजारों विद्यार्थी हाताखालून जातात. सर्वांची नावं लक्षात राहणं शक्यच नसतं. कधी भेट झाल्यावर, विद्यार्थ्याने स्वतःहून सांगितले तरच ओळख पटते व त्या चिकूच्या ‘बी’ला आपण खतपाणी घातलेला विशाल वृक्ष पाहून आकाश ठेंगणे होते.
आपल्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर अशीच चिकूच्या ‘बी’ सारखी माणसं भेटतात व त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडली की, ती बाजूला होतात.
१९८७ साली गोष्ट आहे. माझं नुकतंच लग्न झालं होतं. आम्ही सदाशिव पेठ सोडून बालाजीनगरला रहायला गेलो होतो. त्यावेळी माझ्याकडे टीव्हीएस फिफ्टी ही दुचाकी होती. आमच्या बिल्डरला एक शेवटचा हप्ता द्यायचा राहिला होता. आम्ही दोघांनी ती रक्कम घेऊन बालाजीनगरहून मार्केट यार्डला गाडीवरुन निघालो. मी गाडी चालवत होतो व रमेश मागे काळी बॅग घेऊन बसला होता.
मार्केट यार्डकडे जाण्यासाठी मी उत्सव हाॅटेलच्या चौकात वळलो. गाडीला स्पीड तसा काही जास्त नव्हता. तेवढ्यात एक साधारण बारा वर्षाचा मुलगा तिरपा रस्ता ओलांडत अचानक समोर आला. मी ब्रेक दाबेपर्यंत गाडीच पुढील चाक त्याच्या पायाला लागून तो पडला. मी गाडी थांबवली. त्याला उठवलं. रमेशने रागावून त्याला दोन धपाटे घातले. एव्हाना चार पाच माणसं गोळा झाली होती. मुका मार लागलेला असावा, असा समज करुन आम्ही गाडी चालू करुन बिल्डरकडे निघून गेलो.
आठ दिवस झाल्यावर घरी एक साधल्या वेषातील पोलीस आला. त्याने महर्षी नगर पोलीस चौकीत यायला सांगितले. झालं होतं असं की, त्यावेळी जमलेल्या माणसांपैकी एकाने गाडीचा नंबर टिपून घेतला होता. तो त्या मुलाच्या वडिलांना दिला. साहजिकच मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांनी पोलीस चौकीत तक्रार दिली. ती गाडी मोठ्या भावाच्या मित्राच्या नावावर होती. त्यामुळे आरटीओतून पत्ता काढून त्या मित्राकडे पोलीस गेले. तिथून माझा पत्ता घेऊन ते माझ्या घरी आले.
मी चौकीत गेलो. तेथील इन्स्पेक्टरने माझी हजेरी घेतली. साळुंखे नावाच्या हवालदाराकडे हे प्रकरण सोपविले होते. तो रहात असे स्वारगेट पोलीस वसाहतीत. मला रोज बोलविले जाऊ लागले. गेल्यावर तासंतास बसून ठेवायचे. आम्ही दोघांनी नगरसेवकांना भेटून हे प्रकरण कसे मिटवता येईल, याचा प्रयत्न केला. ओळखीच्या पोलीस खात्यातील माणसांना भेटलो, मात्र काहीही उपयोग झाला नाही.
त्या मुलाच्या घरी गेलो, माफी मागितली. त्याच्या वडिलांनी मुलाला मारल्याबद्दल गाडी चालविणाऱ्याला शिक्षा व्हावी, असे पोलीसांना बजावले होते. साहजिकच पोलीसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले.
त्या काळात आमच्याकडून लग्न पत्रिकेची डिझाईन करुन घेण्यासाठी बारामतीहून तात्या बिचकर नावाचे साठीचे गृहस्थ यायचे. सकाळी दहा वाजता आले की, चार वाजेपर्यंत आमच्याकडून काम करुन घेऊन, त्याच्या निगेटिव्ह पाॅझिटीव्ह करुन बारामतीला परतायचे. त्यांना आम्ही ही अपघाताची गोष्ट सांगितली होती. जेव्हा पोलीसांनी मला कोर्टात यायला सांगितले, त्या दिवशी मला जामीन रहाणाऱ्या माणसाची आवश्यकता होती. तात्यांनी स्वारगेट बस स्थानकावरील एका स्टाॅलचे मालकांना माझ्यासाठी शाॅप अॅक्टचे लायसन्स घेऊन कोर्टात येण्याची विनंती केली. त्या माणसाने देखील तात्यांच्या शब्दाला मान देऊन मदत करण्याचे मान्य केले. मी कोर्टात गेलो. त्या सद्गृहस्थामुळे मी वाचलो.
तीन वर्षे मी कोर्टात हेलपाटे घालून प्रत्येक वेळी पुढची तारीख घेत होतो. शेवटी एकदाची केस उभी राहिली. मला दंड करुन ते प्रकरण निकालात निघाले.
तीन वर्षे तात्या बिचकर मला धीर देत असत. त्या संकटात मोलाची मदत करणाऱ्या त्या गृहस्थाच्या घरी जाऊन त्यांचे मी आभार मानले. त्या मुलाच्या वडिलांचे उत्सव हाॅटेलच्या चौकातच ‘पार्वती भुवन’ नावाचं हाॅटेल होतं. जाता येता तिकडे नजर गेल्यावर मला तो सर्व भूतकाळ आठवत असे.
नव्वद सालानंतर तात्या बिचकरांचे वृद्धापकाळामुळे येणे कमी होऊ लागले. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा काम घेऊन येऊ लागला. काही वर्षांनंतर त्याने त्याचा व्यवसाय बदलला.
आज तीस वर्षांनंतर तात्या बिचकर या जगात नाहीत. त्यांच्या मुलाचीही परत भेट नाही. स्वारगेट बस स्थानकावरील त्या स्टाॅलवर त्या गृहस्थांचा मुलगा बसलेला दिसतो. ही सर्व माणसं माझ्यावरील संकटाचे वेळी निरपेक्षपणे मदतीला धावून आली. मी त्या संकटातून मुक्त झालो आणि ही माणसं चिकूच्या ‘बी’ सारखी वेगळी झाली. त्यांनी मला त्यावेळी दिलेली ‘साथ’ मी कदापिही विसरणार नाही….
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
Leave a Reply