वेळ साधारण रात्री अकरा साडेअकराची असावी, मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा फोन म्हणून माझ्या कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि मनात भीती अशा संमिश्र भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. मात्र स्क्रीनवर जेडींचं नाव दिसलं आणि काही क्षणातच या सगळ्या भावना उडण छु झाल्या. जेडींचा आवाज कानावर पडला ….
झोपली होतीस का गं?
छे छे! देवासमोर बसून पहाटेची भक्तीगीतं गात होते.
हे काय उत्तर झालं?
मग हा काय प्रश्न झाला? जे डी रात्रीची वेळ ही नॉर्मल माणसांची झोपण्याची वेळ असते असं मला वाटतं.
हो का? मग झोपलेली ही नॉर्मल माणसं दुसऱ्या रिंगलाच फोन कसा काय उचलतात बुवा! हे काही कळलं नाही?
भावना पोहोचल्या, मुद्द्याचं बोला.
मुद्द्याचं हेच की, रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि तरी तू जागी कशी?
आज पिल्लुने हट्टच धरला, म्हणाला की गोष्ट ऐकल्याशिवाय झोपणार नाही. मग ऐकवली त्याला गोष्ट. आताच डोळा लागलाय त्याचा.
कोणती गोष्ट सांगितलीस?
कोणती सांगणार जे डी? मी काही तुमच्यासारखी हुशार नाही. खूप विचार केला, काहीच आठवेना. म्हणून मग शेवटी ‘चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड’… ती गोष्ट सांगितली.
अरे व्वा! छानच की. मग पुढे?
पुढे काय? निद्रादेवीची आराधना.
असं का, चल मग तुझी निद्रादेवी प्रसन्न होईपर्यंत मी तुला चिमणीची ‘उरलेली पूर्ण गोष्ट’ सांगतो.
जे. डी. बरे आहात ना? गोष्ट काय सांगताय? मी काय लहान आहे का?
गोष्ट लहान मुलांनीच ऐकायची असते हे तुला कोणी सांगितलं?
आणि माझी चिमणीची गोष्ट अर्धी आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं?
हे तुला तेव्हाच कळेल नं जेव्हा तू माझी गोष्ट पूर्ण ऐकशील?
आता ऐकण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच राहिला नाही मला…. सांगा… ‘आलिया भोगाशी असावे सादर’… (मी जेडींना असं उपहासाने म्हंटल असलं तरी मला मात्र जाम उत्सुकता लागून राहिली होती … चिमणीच्या त्या अधुऱ्या गोष्टीबद्दल. मी कानात प्राण आणून ऐकायला लागले…)
जेडींचा धीर गंभीर आवाज आला… ‘ऐक मग….”
चिमणीचे सगळे काम आटोपले, ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. तिला विलक्षण अपराधी वाटलं. तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. ‘गेला असेल कुठेतरी… येईल परत’ …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… अनेक दिवस उलटली…. चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, ‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?’ कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
‘तुला राग नाही आला माझा?’
का यावा?
मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?
छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती रादर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी ‘अतिक्रमणा सारख्याच’ घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.
मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.
चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’
चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –
चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.
चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं….
मी सुन्न ! इतक्यात जेडींचा आवाज आला ……
-बाईसाहेब गोष्ट संपली.
जे डी मला संदर्भ सांगा.
मला वाटलंच की तू आता संदर्भ विचारणार… ऐक …. आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.
म्हणजे ?
म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं अगं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात… त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो …’थांब मला जर करिअर करुदे…. थांब जरा मला आता घर घ्यायचय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.
त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो…. !!
आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?
वेळीच ‘टकटक ‘ ऐकायला शिका-
जे डी, यु आर रिअली ग्रेट यार-
जेडींचा फोन बंद झाला. घरातही सगळे झोपलेले होते. रात्रीच्या निरव शांततेत फक्त घड्याळाची ‘टिकटिक’ तेवढी ऐकू येत होती… ती ‘टिकटिक’ जनु जाणीव करून देत होती की कोणीतरी आहे ‘आपलं’ जे तिष्ठत उभं आहे दाराबाहेर …. दारावर ‘टकटक’ करत …. आपल्या एका सादेसाठी….!!
Leave a Reply