कायस्थ विकासच्या दिवाळी अंक 2023 मध्ये प्रकाशित झालेला आशा दोंदे यांचा हा लेख.
जे. जे.स्कुल ऑफ आर्ट. ही वास्तु म्हणजे सर्व कलाप्रेमीचं माहेरघर. किती कलाकार त्या वास्तुने घडवले याची गणतीच नाही ! तिथे बसून चित्र काढावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते कारण तेथील वातावरणच तसे होते. भरपूर हिरवळ होती. त्या प्रसन्न वातावरणातील शांतता मनाला मोहवीत असे. माझेही तेच स्वप्न होते.ते स्वप्न माझ्या मनात रुजवले माझ्या शाळेने.
मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे. त्याकाळी आम्हाला रंग, कागद शाळाच पुरवत असे. परंतु घरी चित्र काढताना आईवडील दोघेही म्हणायचे की काय रेघोट्या मारत बसतेस, त्यांना मी असं चित्र काढत बसलेलं आवडायचं नाही, कारण अभ्यासात मार्क जास्त मिळाले पाहिजेत असेच त्यांना वाटत असे. पण माझे काका मला कागद पुरवत असत, त्यांच्या ऑफिसमधील जुन्या कागदाच्या मागच्या बाजूला मी चित्रे काढायची. ते कागद मात्र मला भरपूर मिळत असत. किंवा बरेच वेळा काळ्या लादीवर मी चित्रे काढीत असे. तो मला छंदच लागला होता. मला आठवतंय एकदा मी मीनाकुमारी पाच सहा वेळा काढली, आई प्रत्येक वेळी छान म्हणत होती पण माझे समाधान होत नव्हते.चिकाटी ठेवल्यामुळे मीना कुमारीचे चित्र चांगले आले.
एखादे काम सातत्याने केले तर त्याचा फायदा कधीतरी आपल्याला होतोच. चित्रकलेचेही तसेच आहे. कायम सराव ठेवायला हवा त्यामुळे सराव चांगला होत असे.पारंपारिक मानल्या गेलेल्या 64 कला आहेत. फोटोग्राफी, ॲनिमेशन आर्ट स्कूलमध्ये आता हे विषय शिकवायला हवेत पण अलीकडच्या काळातील मुलांना हे आधीच माहीत असते. त्यांच्या सेवेला गुगल आहे. प्रशिक्षणात हे शिकवत नाहीत पण एखादे चित्र पाहताना चित्रकाराच्या हाताला किती व कशी दाद द्यायची हे अनुभवाने समजते. एखाद्या गाण्याला आपण पटकन दाद देतो, पण तसे चित्रांना देत नाही. प्रत्येक चित्र हे सुंदरच असते आपल्याला ते छानच दिसते पण नुसते वा ! सुंदर! असे म्हणूनही चालत नाही, कला ही सर्वसमावेशक आहे. आपण निसर्गाकडे जागरुकतेने पाहिले तर आपल्याला कितीतरी गोष्टींमध्ये सौंदर्य सापडते. निसर्ग बारकाईने पाहण्याची सवय लागली पाहिजे, एक झाड घेतलं तर त्याचे आकार, त्याच्या पानांचा रंग, आकार, झाडाच्या खोडाचा रंग, झाडाची कमनीयता, त्यावर बसलेले पक्षी, फुलपाखरू, किती तरी पाहण्यासारखे असते, इथूनच सुरुवात होते कलेची. विचारांची प्रगल्भता चित्रांमध्ये असायला हवी. त्या काळात मॉडर्न आर्टची नुकती सुरुवात झाली होती. त्यावेळेस त्याचा अर्थ समजत नसे, हळूहळू तो समजायला लागला. तसेच मोठे चित्र काढणे हे सुद्धा जमायला लागते त्यासाठी घरातून भरपूर मोठे कॅनव्हास घेणे परवडायला हवे, तेच आम्हाला जमत नव्हते म्हणून त्या काळात मोठी चित्र काढणे, हे एक स्वप्नच होते. जहांगीर आर्ट गॅलरी किंवा नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे जाऊन चित्रे पाहताना जाणवले की हे तर आपणही काढू शकतो, परंतु एवढा मोठा कॅनवास आणायचा कुठून ? पैसे कसे जमायचे, त्यावेळेस एक अफलातून कल्पना सुचली आणि मी ती ताबडतोब अमलात आणली त्यावेळी झालेला परमानंद अजूनही आठवतो. रस्त्यावर लावलेले जाहिरातींचे फलक काढून आणायचे आणि त्याच्या मागच्या बाजूला ऑइल पेंटने चित्रे काढायची. परिणाम तोच यायचा. सराव चांगला झाला पण ती चित्र कोण घेणार, हा प्रश्न पुढे आ वासून उभा असायचाच. अलीकडे चित्र स्पर्धा बऱ्याच घेतल्या जातात. त्याचा फायदा मुलांना होतोच. अनेक चित्र पाहिली जातात आणि आपल्या कलेत सुधारणा होते. चित्र चांगले काढले असले तर बक्षीसही मिळते आणि हुरूप येतो. त्या काळात अशी स्पर्धा नसायची.
चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि पुढे जर का सराव ठेवला नाही तर ती चित्रकला चांगली असून नंतर चित्रे चांगली काढायला जमत नाही. वायाच जाते बरेच वेळा नोकरीच्या ठिकाणी वरची पोस्ट मिळाल्यानंतर किंवा दुसऱ्या क्षेत्रात गेल्यानंतर हे होऊ शकते.
एकदा मी परदेशात गेले असताना पाहिले आहे की तिथे रस्त्यावर बसून एक चित्रकार तुमची चित्र काढून देतात किंवा इतर वेगवेगळी चित्र काढतात व ती विकायला ठेवतात. परदेशात मात्र चित्रकलेला चांगला मान आहे. आम्ही बघितले की एक माणूस रस्त्यावर बसला होता. तो आलेल्या- गेलेल्यांची चित्र काढत होता. तुमचे व्यक्तीचित्र त्याच्यासमोर बसल्यावर दहा मिनिटात काढत असे. त्याच्या बाजूला गुलाबाची फुले ठेवली होती, त्याने बाजूला चित्रांचा गठ्ठाही ठेवला होता. लोकं येत होती आणि त्या गठ्ठ्यातलं एक चित्र आणि गुलाबाचे फूल विकत घेऊन जात होती. बहुधा ती कोणाच्या वाढदिवसाला बक्षीस देण्यासाठी घेतली असतील. बरोबर एक फूल देणे हे त्याची कल्पनाशक्ती येथे कामाला आली. मला आठवते बऱ्याच वर्षांपूर्वी मी कोवाडला रणजीत देसाई यांच्याकडे गेले होते तेव्हा त्यांच्या घराखाली तळघरात अनेक चित्रकारांची चित्रे होती. ती चित्रे पाहून मी भारावून गेले होते. मला चित्र प्रदर्शन पाहण्याचा शौक होता. मी जहांगीर आर्ट, सीमरोझा आर्ट गॅलरी, येथे प्रदर्शन पाहायला नेहमी जात होते. अलीकडे मात्र मुलांना युट्युब किंवा पिंटरेस्ट मधून चित्र पाहायला मिळतात आणि मुले त्याची कॉपी करतात. इथे मुलांना स्वतःचे विचार मांडता येत नाहीत याची खंत वाटते.
जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, किंवा बांद्रा स्कूल ऑफ आर्ट येथे ऍडमिशन घेतली जाते परंतु फाईन आर्टला जायचे की कमर्शियल आर्टला जायचे हे मुलांना माहीत नसल्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते आपली दिशा बदलतात हा अनुभव मला बऱ्याच जणांचा आलेला आहे.
जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिकवायला कदम सर होते. ते कॉलेजचे डीन होते. त्यांना मुलांच्या चित्रकलेच्या ज्ञानात भर टाकण्याची आवड होती. ते मुलांना सांगायचे की तुम्ही स्वतःहून चित्र काढा. स्वतःचे विचार चित्रात दिसले पाहिजेत. तसेच मला आठवते की शिरगावकर, खानविलकर, पुजारी यांची चित्रे आम्हाला पाहायला सांगत तसेच स्कल्पचर डिपार्टमेंट मध्ये जाऊन त्यांचे काम पाहता येत असे. कोलगेट जाहिरातीचे मूळ आर्टिस्ट भैय्यासाहेब चौधरी यांचे आख्खे पुस्तक आम्हाला पाहायला मिळाले होते. खूप छान होते, त्यावेळी अशी पुस्तके पाहायला सुद्धा मिळणे कठीण होते. त्यात त्यांच्या अनेक जाहिराती होत्या.नंतर त्यांना एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल अजून आठवतात. कॅमल कंपनीतर्फे रजनी दांडेकर यांनी एकदा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरवले होते. ते फॅब्रिक पेंटिंगचे होते. ते प्रदर्शन पाहिल्यावर आपणही तसेच साड्यांवर रंगवावे असे मला वाटले घरी येऊन मी कापडावर रंगवले. ते चांगले झाल्यानंतर सराव झाल्यानंतर कॅमल कंपनीतर्फे फॅब्रिक पेंटिंगचे क्लास घेऊ लागले.त्यानंतर नवीनच आलेले स्टेन ग्लास पेंटिंग सुरू केले व त्याच्या ऑर्डर्स घेतल्या. तुमचा जर चित्रकलेचा चांगला हात असेल तर कुठल्याही माध्यमातून तुम्ही चित्रे काढू शकता आणि त्याचे मार्केटिंगसुद्धा अतिशय महत्त्वाचे असते, मी परदेशात गेले असताना एक गोष्ट मी पाहिली. कला दालनामध्ये शाळेचे मास्तर मुलांना घेऊन आले होते व मुलांना तेथील कुठल्याही चित्रासमोर बसवून त्यांनी मुलांना कागदावर चित्र काढायला सांगितले. असे आपणही करायला हवे असे मला जाणवले.
आपल्या मनात नेहमी असतं की पावसाचा रंग कुठला आहे त्यामुळे अशा चित्रांवर चर्चा बरीच झाली. मी एकदा जहांगीरला गेले असताना, सुरुवातीला मॉडर्न आर्टची चित्रे होती ती बघत बघत पुढे गेल्यानंतर दुसऱ्या दालनात आणि तिसऱ्या दालनात भारतीय चित्र (इंडियन आर्ट) होती ही चित्र बघताना ही कशी बरं इतकी छान काढली असतील हे जाणवलं आणि तिथे जास्त वेळ उभे राहावंसं वाटलं म्हणजे भारतीय कलेचा नंबर पहिला लावला आपोआपच.
आपल्या ठाण्यात दोन कलादालने सुद्धा सुरू झाली आहेत. त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. तिथे आपल्या चित्रकारांची प्रदर्शने भरवण्यात यावीत व अर्थात त्याला मार्केटिंग मिळेल अशी व्यवस्था करायला हवी.
ठाण्याचे श्री. अरविंद सुळे हे नखचित्र काढीत असत, त्यांचे अलीकडेच निधन झाले. पेन्सिल, रंग, ब्रश काहीही न वापरता फक्त कागद घेऊन कागदावर नखचित्रे काढणे ही सोपी गोष्ट नाही, त्यांनी नेहरू, इंदिरा गांधी, अशी अनेकांची चित्रे काढली होती अर्थात त्यांची चित्रकला चांगली असणारच म्हणूनच ते नखचित्र काढू शकले. त्यांना कल्पनाच नव्हती की ते इतके मौल्यवान काम करत आहेत. अशी अनेक उदाहरणे असतील त्यांना शोधून काढणे हे आपले काम आहे.
आशा दोंदे
98205 77986
ashadonde@gmail.com
Leave a Reply