समीरचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. तो शहरातील एका मोठ्या प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला होता. घरात आई, वडील आणि हे दोघं असं चार जणांचं कुटुंब. त्याच्या पाच वर्षांच्या कामाच्या कौशल्यावर खुष होऊन प्रेसचे मालकांनी त्याला सिनीयर ऑपरेटरची पोस्ट दिली होती.
समीर सकाळी नऊ वाजता घरुन निघायचा. दिवसभर उभं राहून काम केल्याने दमून संध्याकाळी सहा वाजता परतायचा. कधी रात्रपाळी असेल तर जागरण व्हायचं. गुरुवारी मात्र हक्काची सुटी असल्याने तो सुनीताला घेऊन फिरायला जात असे.
शहरातील रोजच्या वाढत्या खर्चामुळे त्याला मिळणारा पगार महिनाअखेर पर्यंत कसाबसा पुरवावा लागायचा. सुनीता देखील काटकसर करून संसार चालवत होती. त्यातूनही कधी वडिलांसाठी अचानक आजारखर्च उद्भवायचा.
मे महिन्याचे दिवस होते. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. समीरला जेवणाऐवजी पाणीच सतत प्यावे असे वाटायचे. पहिल्याच आठवड्यात झालेला पगार नेहमीची देणी दिल्यावर निम्माच राहिला. त्याने सुनीताला जपून खर्च करायला बजावलं.
महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला. आता मोजकेच पैसे शिल्लक राहिले होते. समीरने स्वतः एक नियम पाळला होता, कितीही अडचण आली तरी कुणाकडेही उसने पैसे मागायचे नाहीत. महिना संपायला चारच दिवस बाकी असताना सुनीताने समीरला पैसे संपल्याचे सांगितले.
आज अठ्ठावीस तारीख होती. समीर प्रेसवर गेल्यावर त्याच्या सहकारी मित्राने दोन महिन्यांपूर्वी उसने घेतलेले पाचशे रुपये समीरच्या हातावर ठेवले व उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. संध्याकाळी घरी गेल्यावर त्याने ते पैसे सुनीताकडे दिले. सुनीताला पैसे हवेच होते, कारण बाबांचे औषध संपले होते.
एकोणतीस तारीख. आज नोंदविलेला गॅस येण्याची शक्यता होती. समीरला आठवले, त्याने एका पुस्तकात त्याला कामावर भेट मिळालेल्या रोख रकमेचे पाकीट तसेच ठेवलेले होते. शोधाशोध केल्यावर ते हाती लागले. त्यातील एक हजार रुपये त्याने सुनीताला दिले.
तीस तारीख उजाडली. समीरच्या गावाशेजारी असलेल्या जमिनीचा व्यवहार खूप दिवस रखडलेला होता, ती व्यक्ती सकाळीच चेक घेऊन आली. समीर सर्व रितसर काम आटोपून कामावर गेला. जाताना त्याने तो चेक बँकेत भरला.
आज महिनाअखेर. एकतीस तारीख. त्याला प्रिंटीग मशिनरीची बऱ्यापैकी दुरुस्ती करता येत असल्याने मागे फावल्या वेळात त्याने गावातील एका मशिनची दुरुस्ती केली होती. त्या प्रेसच्या मालकाने त्याला दोन हजार रुपये गुगल पे वरुन पाठविले. त्याने एटीएम मध्ये जाऊन पैसे काढले व सुनीताला देऊन कामावर गेला.
रात्री जेवण झाल्यानंतर तो निवांतपणे मनाशी विचार करू लागला. इतक्या वर्षात महिनाअखेर इतकी अडचणीची कधीच गेली नव्हती. तरीदेखील प्रत्येक दिवशी माझी अडचण सुटत गेली. सुनीता घरातील आवराआवर करुन समीर जवळ आली. समीरने आपल्या मनातील विचार तिच्या समोर बोलून दाखवला आणि पुढे विचारले, ‘सुनीता, गेल्या चार दिवसांत तू काही नेहमीपेक्षा वेगळं केलं आहेस का?’
सुनीताने उत्तर दिले, ‘काही विशेष नाही, माझ्या मनात खूप दिवसांपासून एक गोष्ट करायची राहिली होती. आपल्या टेरेसवर पक्ष्यांसाठी बाजरी आणि पाणी ठेवायचं होतं. ते मी चार दिवसांपासून सुरू केलंय’……
‘सौ लफ्जों की कहानियाॅ’ वर आधारित
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
३-७-२०.
Leave a Reply