जवळपास दीड दशकांपूर्वी सॉफ्ट ड्रींक्स चा विस्तार झपाट्याने होत होता; वेगवेगळ्या फ्लेवर्सची आणि नामांकित ब्रॅण्ड्सची शीतपेय लोकांना आवडू लागली होती आणि त्यांच्यासाठी अशा कोल्ड्रींक्स् म्हणजे काहीतरी खास असंच होतं. पण त्यापूर्वी,आणखीन एक “सॉलीड ड्रींक” विद्यार्थ्यांसोबतच तरुणाई मध्ये फेमस होतं ते म्हणजे पेप्सीकोला. प्लास्टीकच्या लांबट ट्युबमध्ये रंगबिरंगी असे हे “पेप्सी” २५ पैश्यापासून २-३ रुपयांपर्यंत मिळत असत. पेप्सी चे फ्लेव्हर सुद्धा तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचे कधी ऑरेंज, चीकु, लाइम तर कधी कालाखट्टा. फ्लेव्हर आणि आकाराप्रमाणे त्याची किंमत ठरत असे. सुरुवातीला २५ पैश्यांनी मिळणारा पेप्सीकोला कालांतरानी ६० पैसे व त्यापुढे १ रुपया असा मिळू लागल. अर्थात १५ वर्षांपूर्वी ६० पैशांना बरंच मोल होतं. मग कधी मित्रांबरोबर गप्पा मारत तर शतपाऊले करता करता या पेप्सीचा आस्वाद घेतला जात असे. अगदी पुढची १०-१५ मिनिटे सहज चोखता येईल असे हे पेप्सी बर्फ आणि कलर्ड फ्लेव्हर ज्युस यांचं रसाळ मिश्रण असायचं. मग “डीप फ्रीजर्स” मध्ये ठेवून त्यास ठणकता येतं. त्यामुळे ते दिर्घकाळ टिकतं. कित्येकदा तर या पेप्सीचा वापर पिचकारीसारखा एकमेकांच्या अंगावर उडवण्यासाठी करत, त्यामुळे अगदी मस्तीचा माहोल तयार होत.आपल्याला माहितच आहे की बर्फाचे गोळे आणि त्याचा आस्वाद प्रत्येकालाच हवाहवासा वाटत असतो; पण ज्यांना ते परवडणं शक्य नसायचं ते पेप्सीकोला वर आपली तहान भागवत. अगदी गोळा खाल्ल्याचं समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसे.पुढे कधीतरी हाच पेप्सीकोला “जम्बो” पॅक मध्ये सुद्धा उपलब्ध होऊ लागला. अगदी २-३ रुपयांपर्यंत त्याचा आकार काहीसा जाड व मोठा असल्यामुळे, त्याची लज्जत तेवढीच निराळी; पेप्सीचं “रसग्रहण” झाल्यावर अनेकांच या जीभेवर अणि हातावर पेप्सीकोल्याची छाप त्या दिवसांपूर्ती उमटवून ठेवायच्या.घरातल्या वडिलधार्यांनी किंवा शिक्षकांनी जर कधी पेप्सीचा आस्वाद घेताना आपल्याला पाहिलचं तर “अरे हे पेप्सी वगैरे खात जाऊ नका, कोणत्या पाण्यापासून बनवतात तुम्हाला माहित आहे का? या निरुपयोगी खाण्या, पिण्यामुळे हल्ली साथीच्या रोगांची संख्या वाढत चालली आहे, फेकुन द्या ते आधी.” असे खडे बोल ही या पेप्सीकोलाच्या निमित्ताने आपल्यापैकी कित्येकांना ऐकावे लागले असतील. पण मोठ्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा करत पुन्हा गाडी पेप्सीच्या दिशेनं वळे. कधी मित्रांच्या संगतीमध्ये तर कधी घोळक्यात असताना सुद्धा गप्पांच्या फडाला या पेप्सीची अगदी सर्रास साथ असायचीच. त्याशिवाय कट्ट्यावरच्या गप्पांनाही मिळत नसे. काही अवधीनंतर लस्सी सुद्धा अशाच पॅकमध्ये मिळू लागल्या पण पेप्सीची मधाळ व लोकप्रियता लस्सीच्या पॅकला कधीच मिळाली नाही किंवा तो ट्रेंड कधीच रुळला नाही. काही वर्षांनी “सॉफ्ट ड्रिंक्स” च्या किंमती उतरल्या, त्यामुळे घराघरात ती दिसू लागली. आणि “पेप्सीकोला” ची जागा स्वस्त “डिलिशियश” आईस्क्रीम व “कोल्ड्रींक्स” नी कधी घेतली तेच कळलं नाही. आता तर “पेप्सीकोलाचं उत्पादन हे जवळपास बंदच झालय, कारण म्हणजे परवडणारी “पॅकबंद सॉफ्ट ड्रिंक्स” व “ज्युसेस”, त्याशिवाय पिढी बदलली, याचा परिणाम सहाजिकच “पेप्सीकोलाच्या़” निर्मिती प्रक्रियेवर होत राहिला, यामुळे ट्युब बंद मिळणारा “पेप्सी” हद्दपार होऊन बसला आहे.
“कोला कोला – पेप्सीकोला”
केव्हातरी आज ही ज्यावेळी आईस्क्रीम कॅण्डी वाल्याची हाक ऐकू येते, किंवा “गोळ्याची” गाडी नजरेस पडते,त्या वेळी “पेप्सीकोला” चा विचार आपल्यापैकी बर्याच जणांच्या मनांना स्पर्शुन जातो, एवढं मात्र नक्की.
Leave a Reply