मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते. सर्व जगातील महानगरी समाजांमध्ये स्थानिक आणि भाषिक अस्मिता दिसतात आणि त्यांचा हिंसक उद्रेक काही ना काही निमित्ताने होत असतो. वैयक्तिक भावनांप्रमाणेच अनियंत्रित संघटित भावनांचा असा सामाजिक उद्रेक मानवी बुद्धीची कवाडे बंद करतो. तसे झाले की त्याचा राजकीय लाभ मतलबी राजकारण्यांना सहजपणे उठवता येतो. मुंबईमध्ये अशी चळवळ जोर धरत असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेला मुंबईवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला हा भारताला हादरा देणारा ठरला. अशा घटना न्यूयॉर्क आणि लंडनमध्येही घडलेल्या आहेत. अशा या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केव्हिन रॅबिन्सन यांनी 1995 साली लिहिलेला Collective emotion and urban culture हा निबंध वाचनात आला.
Managing cities : The new Urban Context या ग्रंथामध्ये हा निबंध समाविष्ट केलेला आहे. हा शोधनिबंध जेव्हा या ब्रिटिश लेखकाने लिहिला तेव्हा लंडनमध्ये परकीय, आणि विशेषत: आशियामधून स्थलांतर करून गेलेल्या लोकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर ऊग्र आणि हिंसक घटना घडत होत्या. महानगरे आणि तेथील संघर्ष, तसेच अशा हिंसक चळवळींमागे असलेले लोकांचे वैयक्तिक अनुभव, समजुती आणि संघटित लोकभावना काय असतात, त्या कशामुळे तयार होतात याची चर्चा लेखकाने केली आहे. ह्या समजुतींचे (beliefs) स्वरूप कसे असते? त्यामधून काय काय घडामोडी घडतात ह्याची चर्चा या लेखात आहे. आजच्या सुधारकच्या मराठी वाचकांसाठी ती उदबोधक ठरावी.
आधुनिक महानगरांची संस्कृती हीच एक महत्त्वाची जागतिक घटना आहे असे लेखकाला वाटते. या घटनेचे, म्हणजेच आधुनिक महानगरांचे स्वरूप हे अफाट, बेशिस्त, अस्ताव्यस्त, नियंत्रण-नियोजन-नियमन नसलेले आहे हा अनुभव आज जगभरांतील असंख्य महानगरांतील लोकांना नेहमीच येतो. अशा अनुभवांचे स्वरूप काही ठिकाणी अतिशय तीव्र असते. प्रसार माध्यमांच्या मध्यस्थीमुळ अस अनुभव जागतिक, सार्वत्रिक बनले आहेत. त्यामुळे स्थलांतरितांच्या संदर्भात घडणार्या घटनांमध्ये आणि त्यातून निर्माण होणार्या लोकभावनांमध्ये बर्याच प्रमाणात साम्य दिसते.
महानगरे गोंधळलेली आणि संकटग्रस्त झाली आहेत असे जाणवून देणार्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळे महानगरे क्रूर असतात असा समज लोकमानसात तयार होतो. लोकांच्या मनात महानगरांबद्दल एक प्रकारची भीती निर्माण होते. अनाकलनीय वाटणार्या अशा महानगरांबद्दल सतत एक चिंता, काळजी, भीती व्यक्त होत असते. जगातील कोणत्याही महानगरांत जेव्हा अनपेक्षित घटना घडतात तेव्हा त्याचे बरे वाईट परिणाम सर्व जगावर होतात. त्यामधूनच महानगरांबाबत सार्वत्रिक, जागतिक भीतीची भावना तयार होते आणि त्या भीतीपोटी लोकांकडून काही कृती होतात. महानगरांबाबत तीन प्रकारच्या समजुतींमधून (beliefs) तीन प्रकारच्या कृती घडत आहेत असे लेखकाचे निरिक्षण आहे. विविध उदाहरणांचे संदर्भ देऊन त्याचा उहापोह निबंध लेखकाने केला आहे. इंग्लंडमधील प्रिन्स चार्ल्सची मते ही एका प्रकारच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकतात.
पाश्चात्य संस्कृतीची अबाधित अशी काही मूल्येच आजच्या महानगरातून लोप पावली आहेत. आपल्या नगरांचा र्हास होतो आहे आणि हा र्हास थांबवण्यासाठी आपल्या महानगरांना जुने पारंपारिक वैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. तसे झाले तरच येथे शांतता प्रस्थापित होईल आणि मानवी जीवनाला प्रतिष्ठा मिळेल. नागरिकांना नगरांबदल आपुलकी वाटेल. संघटित सामाजिक भावना पुन्हा निर्माण होईल आणि नगरांना वाढायला मोकळा अवकाश मिळेल.
प्रिन्स चार्ल्सच्या या समजुतीमागे इतिहासाबद्दलच्या स्मृतिकातरतेची (नोस्टाल्जियाची) भावना दिसते. इतिहासातील नगरे(च) आदर्श होती, सौंदर्यपूर्ण होती आणि मानवी सुसंस्कृतीची प्रतीके होती. आजची नगरे विकृत झाल्यानेच समाजाची अधोगती झाली आहे. हा झाला नागरी संस्कृतीच्या इतिहासाबद्दलचा स्वप्नवादी दृष्टिकोन. ह्या प्रकारच्या आदर्शवादी दृष्टिकोनातून कठोरता वा आक्रमकता दिसत नसली तरी वास्तवातील नगरांबद्दलचे अज्ञान मात्र त्यामधून व्यक्त होते. यांत मानवतावादी दृष्टिकोन असतो तसेच मानवी भावनांचा हळवेपणा, भाबडेपणाही दिसतो असे लेखकाला वाटते.
दुसर्या प्रकारच्या, क्रांतिकारी नागरी समजुतीनुसार आधुनिक नगरांची पुनर्रचना आवश्यक आहे आणि ही पुर्नरचना करताना अतिशय रॅशनल, गणिती, वैज्ञानिक दृष्टीकोन असला पाहिजे असे मानले जाते. येथेही अस्तित्वात नसलेली पण भविष्यासाठी आदर्श समाज आणि नागरी संस्कृती प्रस्थापित करणे अपेक्षित आहे पण त्यासाठी भावनारहित, कठोर कृती करण्याची शिफारस केली जाते. येथे जुन्या नगरांबद्दल नॉस्टालजिया नाही तर भविष्यातील मानवी समाजांसाठी अतिशय सुरळीत, यांत्रिकी पद्धतीने चालणारी, सुविहित, शिस्तीने रचलेली नगरे तयार करण्याचा विचार आहे. हे करीत असताना सर्वसामान्य लोकांच्या मताचा विचार नाही. असे करण्यासाठी केवळ व्यावसायिक, तज्ज्ञ लोकांची आवश्यकता प्रतिपादन केली जाते. दीडशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये विकसित झालेले नगररचना शास्त्र या प्रकारच्या विचारधारेचा पुरस्कार करणारे होते. आकर्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरीसमध्ये तर जुन्या, बेशिस्त, दाटीवाटीने घडलेल्या नगरावर शासनाने कठोरपणे वरवंटा फिरवून, आदर्श सिद्धांताच्या आधारे नियोजन आराखड्यांप्रमाणे, पुर्नरचनाही केली. एकोणिसाव्या शतकांतही लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या राहत्या वस्त्यांवरून नांगर फिरवून नव्याने काही नगरे उभारली गेली आणि आजही असे प्रकार जगामध्ये होत असतात. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी बुलडोझर फिरवून झोपडपट्या नष्ट करण्याचे प्रयत्न काहीसे याच प्रकारचे होते.
या दोन्ही वैचारिक समजुती असणारे विचारवंत नगरांच्या भौत्तिक, डोळ्यांना खुपणार्या कुरूपतेबाबत, अस्ताव्यस्त स्वरूपाबद्दल अतिशय नाराज असतात. तांत्रिक कसोट्या वापरून, नियोजन करून, रस्ते, इमारती, उद्याने, घरे, कारखाने यांच्या बांधकामांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. या पद्धतीच्या नियोजनात नियमबद्ध, सौंदर्यपूर्ण उभारणी करण्यावर भर दिला जातो. परंतु ह्या दोन्ही विचारधारा नगरांना समजून घेण्यात, त्यांच्या गोंधळाच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अपुर्या आहेत असे दिसते. या प्रकारच्या विचारधारा नगरांबद्दलच्या अपुर्या ज्ञानावर आधारलेल्या आहेत तसेच त्या केवळ सत्तेवर असणार्या लोकांच्याच मतांवर आधारीत आहेत. आधुनिक लोकशाही राजकीय व्यवस्थेसाठी, माहिती तंत्रज्ञान आणि ज्ञानाधिष्टित समाज व्यवस्था घडविण्यासाठी त्या अत्यंत अपुर्या आहेत. म्हणूनच नगरांकडे बघण्यासाठी आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी तिसर्या प्रकारच्या दृष्टिकोनाची आवश्यकता लेखकाने प्रतिपादन केली आहे.
तिसर्या प्रकारच्या नागरी विचारधारेच्या समर्थनार्थ लुई मंफर्ड यांच्या लिखाणाकडे निर्देश केला आहे. दि सिटी इन हिस्टरी या 1961 साली लिहिलेल्या पुस्तकात मंफर्ड यांनी नगरांबद्दलची काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदलेली आहेत. ते म्हणतात की ऐतिहासिक काळापासून शहरांची रचना ही मुख्यत: वस्ती आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी केली जात असे. शहरांभोवती तटबंदी बांधून नागरी वस्त्या सुरक्षित केल्या जात. तटबंदीच्या आंत लोकांचे सर्व व्यवहार सुरळीत, सुरक्षितपणे होत असत. त्यामधून समाजाला स्थैर्य प्राप्त होत असे. परक्या लोकांना तेथे प्रवेश करणे सुलभ नसे. अशा सुरक्षित ठिकाणी सहाजिकपणे संपत्ती संचय करणे, जतन करणे शक्य होत असे. समाजाची एकसंघता, संस्कृती, सामाजिक रचनेचे सातत्य टिकवणे तेथे सोपे असे. नगरांत येऊन स्थिरावण्यासाठी, तसेच नागरी लोकसंख्या नियंत्तित करण्यासाठी नियम केले जात. परंतु स्थैर्य असणार्या या नगरांना प्रमाणाबाहेर स्वस्थता मिळाल्यामुळे सांचलेपणा येण्याचाही धोका असे. यामुळे काही प्रमाणात तरी नगरबाह्य लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी नगरांमध्ये प्रयत्न करावे लागत आणि आवश्यकही ठरत. तेव्हाही परदेशी लोक, प्रवासी, व्यापारी, तसेच काही संकंटग्रस्त शरणार्थी, गुलाम यांना नगरांमध्ये प्रवेश दिला जात असे. याशिवाय नगरबाह्य शत्रूंच्या आक्रमणांचा आणि अंतर्गत भांडणाचाही धोका नेहमी असे. किंबहुना नगरांच्या विकासात अशा स्थैर्य आणि सुरक्षा देणार्या, तसेच आक्रमण करणार्या अंतर्गत-बाह्य शत्रूंच्या विरोधी ताणांचा सामना करावा लागत असे. एकाचवेळी नगरे सुरक्षा आणि स्थैर्य देतात आणि त्याचवेळी ती नवीन अनपेक्षित संकटांना आमंत्रण देतात हा नगरांचा विशेष गुणधर्म असतो. अशा दुहेरी, विरोधी ताणामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची पॅरनॉईड मानसिकता निर्माण होते आणि नागरी रचनेतही ह्या ताणांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. भीती आणि आक्रमणाची चिंता या भावना नागरी संस्कृतीमध्ये अंगभूतपणे असलेल्या दिसतात. आजच्या नगरांमध्येही त्या अस्तित्वात असतात. नगरांकडे बघण्याचा मंफर्ड यांचा हा दृष्टीकोन अतिशय रॅशनल, वास्तववादी असून तो समाजात रूजणे आवश्यक आहे. पण असा रॅशनल पद्धतीने बघण्याचा दृष्टीकोन नागरिकांमध्ये आपोआप येणार नाही तर त्यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे, त्यांना नगरांचा इतिहास ज्ञात होणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने बघितले तरच नगरांबाबतची आदिम भीतीची भावना दूर करता येईल.
मंफर्ड यांनी नोंदलेला शहरांचा दसरा महत्त्वाचा गुणधर्मही असा विरोधात्मक आहे. शहरांमध्ये लोकांना संकटात टाकणार्या, आव्हान देणार्या अनेक घटना घडत असतात. त्याचबरोबर मानवी मनाला उद्दिपीत करणार्या, सृजनशील बनवणार्या असंख्य गोष्टीही नगरांमध्ये घडत असतात. संकटे येतात तसेच संकटांवर मात करण्याची प्रेरणाही प्रबळ बनते ती नागरी परासिरातच. किंबहुना मानवी सृजनशीलतेला प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे काम नगरे करीत असतात. परंतु हे समजून घेण्यासाठी नगरांमुळे मानवी मनांमध्ये उमटणार्या तीव्र भावनांचा स्वीकार करणे आवश्यक ठरते. अशा तीव्र भावनांच्या आधारे ज्या कृती घडतात त्यामधून एकतर नवनिर्माण तरी होते किंवा नगरांचा र्हास घडतो. भावना आणि बुद्धी यांच्यात नवनवे समन्वय साधण्याचे आव्हान नगरांमधील लोकांना टाळता येत नाही. नगरांबाबत असलेल्या ह्या तीन प्रकारच्या समजांमधून (बिलीफ) विविध नागरी परिणाम घडले आहेत आणि आजही घडताना दिसतात. अशा परिणामांचा परामर्श निबंधकाराने घेतला आहे.
पहिल्या दोन विचारधारा भीती या भावनेच्या पायावर आधारलेले आहेत. या भीतीचे स्वरूप निबंध लेखकाने विषद केले आहे. बाह्य किंवा अंतर्गत संकटांमुळे नागरिकांना विस्कळीत होण्याची, एकसंधपणा नाहिसा होण्याची, उध्वस्थ होण्याची भीती वाटते. नगरांमुळे नागरिकांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व (आयडेंटिटी) प्राप्त होत असते आणि दुसरीकडे संकटांमुळे नगरे नष्ट होण्याचा धोका वाटतो. त्यातच आधुनिक महानगरे ही आकाराने, लोकसंख्येने प्रचंड वाढलेली आहेत. त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विविधता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशा या महानगरांचे स्वरूप सहजपणे समजून घेण सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे बनले आहे. नगरांमधील गुंतागुंतीच्या प्रक्रिया जाणणे त्यांना अशक्य बनले आहे. त्यातच वेगवेगळ्या सांस्कृतिक स्थलांतरितांचे प्रमाण वाढते तेंव्हा स्थानिक समूहांना परकीय लोंढ्यांच्या लाटेत स्वत:चे अस्तित्व हरवून जाण्याचा धोका वाटतो. अशा या महानगरांना काही एक नियंत्रण केंद्र असल्याचे लोकांच्या अनुभवाला येत नाही. असे शक्तीशाली केंद्र असते तर नगरांमध्ये शिस्त आणि सुव्यवस्था आणता येईल अशी भावना बळावते. म्हणूनच असे शक्तीशाली केंद्र निर्माण करण्याचे प्रयत्न काहीजण करतात तेंव्हा त्यांना सामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसतो. प्राचीन काळी अश शिस्तशीर व्यवस्था निर्माण करणे आणि राखणे हे राजाचे कर्तव्य असे. जुन्या काळी राज्यकर्त्यांच्या हातात अमर्याद सत्ता असे. तेव्हा राजे राजधानीवर आपला ठसा उमटवण्यासाठी धडपडत. नगरांचे परिसर सौंदर्यपूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड असे. अलिकडल्या काळातील सुंदर नगरांची चळवळ ही बहुतेक वेळेला नगरांतील उच्चभ्रूं लोकगटांकडून व्यक्त होत असते. प्रिन्स चार्ल्स हा या उच्चभ्रूंच्या नागरी संकल्पनांचे प्रतिनिधित्व करतो. (राज ठाकरे यांचे राजकीय डावपेच अशाच प्रकारच्या सत्ताकांक्षी वृत्तीमधून घडलेले आहेत)
पुर्नरचना करू बघणार्या दुसर्या प्रकारच्या विचारवंतांची दृष्टी भूतकाळाचे उदात्तीकरण न करता भविष्यकाळासाठी असते हे वर आपण फाहिले. भविष्यातील आदर्श नगरे निर्माणाचे असे स्वप्न पाहणार्याचे प्रतिनिधी म्हणून ली कार्बुझिए या वास्तु आणि नगररचनाकाराचा उल्लेख निबंध लेखकाने केला आहे. सरळ, रूंद, काटकोनात आखलेले भव्य रस्ते, शिस्तबद्ध इमारती, उद्योग आणि वापरानुसार नागरी विभागांची रचना त्याने जगापुढे मांडली. कलाकुसर विरहित पण भव्य आणि प्रमाणबद्ध वास्तु या सर्वांचा गणिती प्रमाणांतून विचार करणारे नगररचना तंत्र त्याने प्रथम जगाला सादर केले आणि सत्तर वर्षांपूर्वी त्या पद्धतीचा बोलबाला होऊन अनेक ठिकाणी नगरे निर्माण करण्याचे प्रयोग झाले. सोव्हिएत युनियनमध्येही या रचनाकाराला आमंत्रित करण्यात आले होते. भारतामधील नवनिर्मित चंदीगढ या नगराची रचना या रचनाकाराने त्याच्या पद्धतीने केली आहे. या पद्धतीला हिरॉइक युटोपिअनिझम असे म्हणून वास्तवात मात्र तो अथॉरिटेरिअन रॅशनॅलिझम ठरतो. वास्तवात बेशिस्तपणे वाढलेल्या नगरांमध्ये शिस्तबद्ध व्यवस्था आणि भौतिक नगररचना करणे हे केवळ हुकुमशाही देशांतच शक्य आहे. आज चीनमध्ये जी नागरी पुनर्निर्माणाची लाट आलेली आहे ती या हिरॉईक युटोपियनिझमचाच आविष्कार आहे. दुसरा एक विचारवंत म्हणतो की नगर रचनेचे उद्दीष्ट हे लोकांच्या गर्दीचा जोर, दबाव कमी करण्याचे असले पाहिजे. अनपेक्षित घटनांचे नियंत्रण करण्यासाठी महानगरे अतिशय शिस्तबद्ध असली पाहिजेत. सर्वसामान्य लोकांना नगरे सोपी आणि समजणारी, सहज वाचता येणारी असली पाहिजेत. त्यांत गुंतागुंत असता कामा नये. अशी नगरे बांधली तर लोकांना ती भीतीदायक वाटणार नाहीत. असे हे धोरण टिकाऊ ठरेल का आणि त्याचे सामाजिक, पर्यावरणविषयक परिणाम काय होतील याची काळजी अनेक विचारवंतांनी व्यक्त केलेली आहे.
नगरांतील गर्दी कमी करणे हा भावनिक अस्वस्थेवरचा महत्त्वाचा उतारा आहे असे आजही अनेकांना वाटते. या उलट काहींना गर्दीवर सत्ता गाजवणे वा गर्दी जमवून दहशत प्रस्थापित करणे महत्त्वाचे वाटते. गुंतागुंतीच्या समस्येवर पुरूषी बळ वापरून जसे वर्चस्व मिळवले जाते तसेच हे उपाय असल्याची टीका अनेक स्त्रीवादी टीकाकारांनी केली आहे. त्यांच्यामते गुंतागुंतीच्या समस्या गणिती पद्धतीने नव्हे तर मानवी पद्धतीने सोडविल्या पाहिजेत. नागरी संस्कृती अतिशय पॅशनेट आणि इरॉटिक असते आणि त्यामुळे भीती आणि तणाव निर्माण होतात. बळ हा त्यावरचा उपाय नाही. महानगरांच्या गुंतागुंतीच्या स्वरूपातच त्यांचे देखणेपण आहे, आकर्षकता आहे असे या स्त्रीवादी विचारवंतांना वाटते. त्यासाठी नगरांचे विक्षिप्त स्वरूप आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे एका स्त्रीवादी नगररचनाकाराचे मत निबंध लेखकाने महत्त्वाचे म्हणून नोंदले आहे. नगरांचा इतिहास आणि वास्तव जाणून घेणे हे तिसर्या प्रकारच्या दृष्टिकोनासाठी मूलभूत मानले जाते. वास्तव समजण्यासाठी नगरांशी संबंधित अनेक विषयांची चर्चा समाजात होणे आवश्यक ठरते. नागरी तणावाच्या मूलभूत कारणांचा शोध घ्यावा लागतो. स्थानिक आणि स्थलांतरीत हा एक मूलभूत नागरी वाद आहे. नगरे ही नेहमीच परकीय लोकांमुळे भरभराटीला येतात. कोणत्याही नगराच्या उभारणीसाठी परकीय लोक आवश्यक असतात. मुंबई, कोलकाता ही नगरे आधुनिक काळात ब्रिटिशांनी वसवली आणि भरभराटीला आणली! अगोदरच्या काळात मोगलांनी उत्तर भारतामधील अनेक नगरे अशीच वसवून भरभराटीला आणली होती हे याच नियमाला अनुसरून होते! नागरी संस्कृतीच्या विकासासाठी स्थानिक लोकांचा परकीयांशी संबंध येणे आवश्यक असते. परंतु परकीय लोकांच्या उपस्थितीमुळे स्थानिकांमध्ये एक प्रकारची भीतीही निर्माण होते. भांडणे होऊ लागतात. परकीय स्थलांतरीत लोकांना स्थानिक लोकसंस्कृतीची बंधने नसतात. त्यांच्या या वेगळेपणामुळे काही स्थानिकांच्या मनात असूया निर्माण होते तर काहींना त्यांच्या या वेगळेपणाचे आकर्षणही वाटते. एकीकडे स्थानिकांची स्थलांतरितांबरोबर स्पर्धा सुरू होते त्याचबरोबर त्यांच्यावर स्थानिक संस्कृती स्वीकारण्यासाठ दबावही येत असतो. स्थानिक आणि स्थलांतरीत या संघर्षामध्ये आकर्षण आणि स्पर्धा या दोन विरोधी भावनांचे मिश्रण दिसते. नगरे जर सुसंस्कृत असली तर त्यांना परकीय लोकांची भीती वाटत नाही आणि विविध सामाजिक-आर्थिक उपायांच्याद्वारे परकीयांची संख्याही त्यांना मर्यादित करता येते. राष्ट्रांनी परकीय देशवासीयांना व्हिसा देण्याची आधुनिक पद्धत अशाच प्रकारे तयार झाली आहे. मर्यादित प्रमाणातील निवडक परकीय लोकांची, स्थलांतरितांची ऊर्जा नगरांच्या संस्कृतीमध्ये भर घालते, नगरांना चैतन्य देते. परकीय लोकांच्या सहवासाने प्रत्येक शहराचे वेगळेपण अधोरेखित होते. परकीय लोकसंस्कृतीमुळे स्थानिकांना स्वत:च्या संस्कृतीचेही तुलनात्मक अवलोकन करता येते. स्थानिक संस्कृतीमध्ये त्यातून बदल घडतात, घडवण्याचे प्रयत्न सुरू होतात. परंतु काहीं लोकांना या बदलांची भीती वाटते. स्थलांतरीतांचे लोंढे हे पुराच्या लाटांप्रमाणेच आपल्याला गिळंकृत करतील याची भीती वाटते. सुसंस्कृत नगरांत स्थानिकांबरोबरची स्पर्धा मर्यादित राखून परकीयांना, स्थलांतरितांना सामावून घेण्यासाठी धोरणे आखली जातात. त्यामुळे परकीयांचा सहानुभूतीपूर्वक स्वीकार करता येतो. अशाच प्रकारे इतरही अनेक प्रकारच्या नागरी तणावांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. नगरांमध्ये उदभवणार्या दुविधांमधील (डायलेक्टिकल घटकांमधील) संघर्ष काबूत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ठरते.
त्यातही महानगरांच्या अर्थव्यवहारात नेहमीच एक विकृतीकरण होण्याची भीती असते. अर्थव्यवहारातून युद्धसदृष्य सामाजिक तणाव निर्माण होत असतात. नागरी जमीनीचे वाद हे आर्थिक तणावाचे एक महत्त्वाचे कारण असते. जोपर्यंत महानगरांचे मुख्य आर्थिक काम, उदाहरणार्थ व्यापार, उत्पादन वगैरे सुरळीत होत असते तोपर्यंत नागरी सामाजिक युद्ध मर्यादित राहते. मंफर्ड यांच्या प्रतिपादनानुसार परकीय लोक नगरांच्या संपत्तीमध्ये भर घालत असतात. परंतु काही जणांना मात्र परकीय लोक शहरे लुटत असतात असे वाटते. ही समजूतच परकीयांशी होणार्या संघर्षाचे कारण बनते. महानगरांतील ताणतणाव हे चक्राकार पद्धतीने घडतात. ही चक्राकार प्रक्रिया खालील आकृतीवरून समजून घेता येते. परंतु ही साखळी प्रक्रिया नियंत्रणाबाहेर गेली तर महानगरांसाठी ते घातचक्रच ठरते.
नगरांमधील संघर्षमय वातावरणामध्ये असंख्य लोकांचे आर्थिक नुकसान होत असते. दंगलींमुळे वेळ, श्रम आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. लोकांचा रोजगार बुडतो. कारखाने-कार्यालयांमधील व्यवहारांवर विपरीत परिणाम होतात. सातत्याने असे झाले तर नवीन उद्योग येण्याचे, रोजगार निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. काही प्रस्थापित उद्योग स्वत:ला सुरक्षा मिळावी म्हणून संघर्षमय महानगरांच्या बाहेर जाण्याचे धोरण आखतात. काही लबाड उद्योजक या घटनांचे निमित्त करून उद्योग बंद करतात. महानगरांतील आर्थिक व्यवहारांवर विपरित परिणाम झाले की स्थलांतरितांचे प्रमाण कमी होते पण स्थानिक लोकांच्या आर्थिक समस्या कमी न होता जास्तच वाढतात. स्थानिकांच्या उत्कर्षासाठी लढणारे लोक आणि त्यांच्या सामाजिक-राजकीय संघटना परकीय आणि स्थलांतरितांविरूद्ध चळवळी करतात. मुंबई आणि इतर नगरांमध्ये होत असलेले स्थानिक-स्थलांतररितांमधील संघर्ष हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. परंतु जेव्हा असे संघर्ष वाढतात, सततचे होतात, तेव्हा महानगरांचा नकळतपणे विनाश घडतो.
आज जगातील पन्नास टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. या शतकात हे प्रमाण वाढत जाणार आहे. त्याचबरोबर नागरी संघर्ष वाढत जाण्याचा धोका मोठा आहे. नागरीकरणाबद्दलच्या आकलनात, अभ्यासात आणि उपाय योजना निर्माण करण्यात भारत आज बराच मागे आहे. नागरीकरणाबद्दल माहिती, ज्ञान, जागरूकता आणि विवेकवादी मानसिकता निर्माण करण्यासाठी येणार्या काळात आपल्याला खूप परिश्रम करावे लागणार आहेत.
— सुलक्षणा महाजन
8, संकेत अपार्टमेंटस, उदय नगर पांचपाखाडी, ठाणे. 400602
Leave a Reply