भागवत सुब्रम्हण्यम चंद्रशेखर म्हणजेच चंद्रा यांचा जन्म १७ मे १९४५ रोजी म्हैसूर येथे झाला. चंद्रशेखर पाच वर्षाचे असताना त्यांना पोलिओ आजार झाला आणि त्यामध्ये त्यांचा उजवा हात विकल झाला. त्यावेळी त्यांचे कुटूंब बंगलोरला स्थायिक झालेले होते. तिथे त्यांना ‘ सिटी क्रिकेटपटू ‘ म्हणून खेळण्याची संधी मिळाली. ‘ नॅशनल स्कुल ‘ मध्ये आल्यापासून त्यांना क्रिकेट या खेळामध्ये आवड निर्माण झाली. शाळेत खेळताना लहानपानापासून म्हणजे ५ व्या वर्षांपासून ते विकल झालेल्या उजव्या हाताने चेंडू टाकू लागले. खरे तर चेंडू अडवताना ते डाव्या हाताचा वापर जास्त करायचे. उजवा इतका हात अशक्त होता की उचलणेही शक्य होत नसे. लहानपणी बंगलोरच्या रस्त्यावर खेळताना ते रबरी चेंडूने खेळायचे परंतु क्लब मध्ये खेळायचे ठरवल्यानंतर त्यांनी १९६३ मध्ये लेग स्पिन गोलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. आपल्या असेलल्या व्यंगाचा त्यांनी परिश्रमपूर्वक फायदा करून घेतला.
चंद्रशेखर त्यांचा पहिला कसोटी सामना २१ जानेवारी १९६४ रोजी इंग्लंड विरुद्ध खेळले मुंबईमध्ये खेळले. तो त्या दौऱ्यामधील दुसरा सामना होता. त्याने ६७ धावा देऊन इंग्लंडचे चार खेळाडू बाद केले तर दुसऱ्या डावांमध्ये ४० धावा देऊन एक खेळाडू बाद केला. त्याच वर्षी चंद्रशेखर यांना ‘ इंडियन क्रिकेट क्रिकेटिअर ऑफ द इयर ‘ असे संबोधले गेले. तसे पाहिले तर चंद्रशेखर हा फारसा उंच किंवा फारसा बुटका खेळाडू नव्हता आणि थोडा काटकुळा होता. परंतु त्यांच्या उजव्या हाताने जी कमाल दाखवली त्याचा अभ्यास अनेकांना करावा लागला. परदेशी तर त्याचा हात फिरतो कसा ह्याचे चित्रीकरण बघून अभ्यास केला गेला असे म्हणतात. तो गोलंदाजी करताना फारच थोड्या पावलांचा स्टार्ट घेतो परंतु त्याचा चेंडू येतो अगदी वरच्या कोनामधून आणि तिथूनच तो हात उंचावून चेंडू सोडतो.
१९६६-६७ साली जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ जबरदस्त होता , त्या संघाचा क्रिकेट जगतात दबदबा आणि धाकही होता. परंतु त्यांच्या संघाविरुद्ध मुंबईमध्ये चंद्रशेखर यांनी त्या कसोटी सामन्यांमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली . जगामधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांविरुद्ध केलेली ती जबरदस्त खेळी होती. पहिल्याच इनिंगमध्ये चंद्रशेखर यांनी वेस्ट इंडिजचे १५७ धावा देऊन ७ खेळाडू तंबूत पाठवले. ज्यांना तंबूत पाठवले त्यांची नावे बुचर , रोहन कन्हाय , लॉईड , हॉलफोर्ड हेन्ड्रिक्स , ग्रिफिथ अशी होती. तर दुसऱ्या इनिंग मध्ये चंद्रशेखर यांनी हंट , बुचर , गिब्स अशा सारख्याना बाद केले. त्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या १४ विकेट्स पडल्या त्यातील ११ विकेट्स चंद्रशेखर यांनी घेतल्या परंतु भारतीय संघ ६ विकेट्स ने हरला. कारण पहिल्या इनींगमध्ये वेस्ट इंडिजने ४२१ धावा केल्या होत्या , हंट ने शतक मारले होते तर लॉईड ८२ आणि हॉलफर्डने ८० धावा ठोकल्या होत्या.
१९६७ साली चंदशेखर इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते तेथे त्यांनी तीन कसोटी सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या परंतु ते ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर फारसी कामगिरी करू शकले नाहीत त्यामुळे ते संघातून बाहेर फेकल्यासारखे झाले होते , त्यानंतर मोठा पराक्रम चंद्रशेखर यांनी १९७१ साली ओव्हलवर झालेल्या इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये केला. इंग्लंडचा संघ अवघ्या १०१ धावांमध्ये बाद झाला त्याला कारणीभूत चंद्रशेखर यांची गोलंदाजी ठरली त्यांनी ३५ धावांमध्ये इंग्लंडचे ६ खेळाडू बाद केले त्यामध्ये इंग्लंडचे लखर्स्ट , कीथ फ्लेचर, एड्रीच , रे इलिंगवर्थ , जॉन स्नो , जेस प्राइस हे होते , आणि त्यांच्या साथीला वेकरराघवन आणि बिशनसिग बेदी होते आणि एकनाथ सोलकर यांच्यासारखा जबरदस्त क्षेत्ररक्षकही होता. चंद्रशेखर यांनी स्वतःच्याच गोलंदाजीवर जे झेल घेतले आहेत ते बघून आपण चकित होतो. त्यावेळी भारतीय संघाच्या विजयाचा तो खरा शिल्पकार होता असे म्हटले गेले. अजित वाडेकर यांनी सांगितले की , ‘ चंद्रशेखर तर आमच्या सामन्यातील महत्वाचा मनुष्य .’
चंद्रशेखरच्या बाबतीत नेहमी म्हटले जाते एक तर तो ‘ सतत विकेट घेतो नाही , तर धावा देत असतो.’ फलंदाजाला तो धावा काढण्यापासून रोखून ठेवू शकत नाही तर कधीकधी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक न ठेवता गोलंदाजी करतो . परंतु तो नेहमी तसे करत नाही तीन क्षेत्ररक्षक ऑन बाजूला जवळ जवळ उभे असतात. कारण त्यांचे चेंडू पुष्कळदा गुगली वळतात.9 त्यांच्या चेंडूची गती रिची बेनॉ किंवा सुभाष गुप्तेपेक्षा तीव्र आहे असेही म्हटले जाते. चंद्रशेखर त्यांचा शेवटचा कसोटी सामना १२ जुलै १९७९ रोजी इंग्लंड विरुद्ध खेळले.
चंद्रशेखर यांची चेंडू फेकण्याची विशिष्ट पद्धत म्हणजे एक चमत्कार लोक मानत असत. मी काही वर्षांपूर्वी त्यांना एक कार्यक्रमामध्ये भेटलो होतो तेव्हा त्यांच्या हाताकडे बघितल्यावर लक्षात आले की त्यांच्या त्या हातात फारशी ताकद जाणवली नाही , त्यांच्या सर्व गोलंदाजीची कमाल त्यांच्या मनगटामध्ये होती. दुर्देवाने त्यावेळी ते व्हील चेअरवर होते कारण एक अपघातामुळे त्यांच्या पायांमधील ताकदही गेली होती.
चंद्रशेखर यांनी ५८ कसोटी सामन्यांमध्ये २४२ विकेट्स घेतल्या त्या २९.७४ या सरासरीने . त्यामध्ये त्यांनी १६ वेळा ५ खेळाडू एका इनिंगमध्ये बाद केले तर २ वेळा एकेका सामन्यामध्ये १०-१० खेळाडू बाद केले. त्यांनी एका इनिंगमध्ये ७९ धावांमध्ये ८ खेळाडू बाद केले. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २४६ सामान्यांमधून १०६३ खेळाडू बाद केले. ते २४.०३ च्या सरासरीने . फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी एका इनिंगमध्ये असे ७५ वेळा ५ खेळाडू बाद केले. चंद्रशेखर यांनी अत्यंत कमी धावा केल्या कारण ते त्यांच्या हाताच्या व्यंगामुळे ते नीट फलंदाजी करू शकत नव्हते . ते कसोटी क्रिकेटमध्ये २३ वेळा शून्यावर बाद झाले. त्यांनी फक्त १ एकदिवसीय सामना खेळाला आहे.
चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले.
– सतीश चाफेकर.
Leave a Reply