रात्री दीड वाजता मोबाईलची रिंग वाजायला लागल्यावर डॉक्टर फोन करणाऱ्याला बडबडत उठला. कोणाला पोटदुखी झाली यावेळी असा विचार करत मोबाईलवर दिसणारा अननोन नंबर चा कॉल रिसिव्ह केला. बंगळुरु वरून पोलिसांचा फोन होता. डॉक्टर बातमी ऐकून एकदम घाबरून गेला, त्याला दरदरून घाम फुटला, फोनची रिंग ऐकून सनीची आई उठली होती. डॉक्टरला फोन वर तशा प्रकारे बोलताना पाहून तीसुद्धा दचकली होती. डॉक्टरने तिला सांगितलं सनीचा ऍक्सीडेन्ट झाला आहे, ते ऐकताच तिने किंकाळी फोडली पण डॉक्टरने तिला सावरले आणि सांगितले की सनी आणि त्याचे मित्र गाडी चालवत होते, त्यांच्या कारने रात्रीचा शो संपल्यानंतर बाईकवरून घरी जाणाऱ्या एका जोडप्याला आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला उडवले होते. ऍक्सीडेन्ट एवढा भयंकर होता की त्यात बाईकवरील तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला होता.
सनीला त्याचे दोन मित्र आणि एका मैत्रिणीला पोलिसांनी ऍक्सीडेन्टची बातमी मिळताच नाकाबंदी केली आणि पाठलाग करून पकडलं होतं. त्यांना अटक केली असता चौघेही ड्रग्सच्या नशेत आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताबडतोब सरकारी हॉस्पिटल मध्ये मेडिकल साठी नेले होते. गाडीची तपासणी केली असता पाच पाच ग्रॅम कोकेन ची पाच पाकिटं सापडली. ही सगळी माहिती पोलिसांनी डॉक्टरला थोडक्यात सांगितली आणि त्याला मुंबईहुन बंगळुरुला यायला सांगितले.
डॉक्टर ला सुरुवातीला काहीच सुचले नाही, पण नंतर त्याने विचार केला आणि भाच्याला बंगळुरुला जाणाऱ्या पहिल्या फ्लाईटचे तिकिट बुक करायला फोन केला, भाच्याने एवढ्या रात्री तिकिट बुक करण्याविषयी विचारले तर डॉक्टर म्हणाला आता काही विचारू नकोस, नंतर सर्व सांगेन.
सकाळी सहा वाजताची फ्लाईट पकडूण्या साठी डॉक्टर निघाला आणि पाच वाजताच विमानतळावर जाऊन पोचला. फ्लाईटला अजून एक तास होता. डॉक्टर च्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. पोलीस अधिकाऱ्याचे डॉक्टर साब आपका लडकाही सबसे ज्यादा नशे मे था और वोही गाडी चला रहा था, या वाक्याने डॉक्टरला काही सुचत नव्हते.
वर्षभरापूर्वी डॉक्टरने सनीला मार्क कमी असूनही एम बी बी एस साठी बंगळुरू जवळील कॉलेजला एक कोटी पेक्षा जास्त डोनेशन देऊन ऍडमिशन घेऊन दिली होती.
त्याला राहण्यासाठी महिन्याला पंचवीस हजार भाडे असलेला पॉश फ्लॅट घेऊन दिला होता, सनीला खर्चासाठी पैसे मागायला लागू नयेत म्हणून महिन्याला पंचवीस हजार अकॉउंट ला ऑटो ट्रान्सफर होतील अशी व्यवस्था केली होती. त्याला नुकतेच अठरा वर्ष पूर्ण होऊन ड्रायविंग लायसन्स मिळाल्याने एक फोर व्हिलर सुद्धा घेऊन दिली होती.
डॉक्टर स्वतः गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे आला होता, पेशंट सोबत नम्र आणि आदरयुक्त बोलणे असल्याने हळूहळू त्याच्या प्रॅक्टिसने जोर धरला. महिन्याकाठी हजारो कमवता कमवता लाखो रुपये कमवायला लागला. गरजेपेक्षा आणि अपेक्षे पेक्षा जास्त पैसे मिळू लागले.
पण भरपूर पैसे मिळून सुद्धा स्वतःलाच त्याचे मन खात होते. साधा सर्दी ताप खोकला असला तरी तो पेशंटला गरज नसताना हजारो रुपयांच्या चाचण्या लिहून देत होता, शहरातल्या कोणत्याही लॅब मध्ये पेशंट गेला तरी लॅब कडून त्याला प्रत्येक चाचणी मागे कमीत कमी तीस टक्के कट मिळत होता. एक्स रे, सोनोग्राफी, रक्त, लघवी याच्या सगळ्यातून त्याला महिन्याला अमाप पैसा कमिशन म्हणून मिळत होता.
औषध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या कंपनीचे औषधं लिहून देण्याच्या बदल्यात परदेश वाऱ्या आणि पैशांची पाकीटे कमिशन च्या रूपात आणून देत होते.
शहरातील मोठं मोठ्या हॉस्पिटल मधील जनसंपर्क अधिकारी त्याला हॉस्पिटल मध्ये पेशंट पाठवण्यासाठी, हॉस्पिटल मध्ये आलेल्या पेशंटच्या बिलातील तब्बल पंचवीस टक्के कमिशन देऊ करत होते.
घरात येणारा पैसा बघून सनीच्या आईला सुरवातीला आनंद व्हायचा पण जेव्हा तिला डॉक्टर कडून त्याला मिळणाऱ्या कमिशन बद्द्ल माहिती मिळाली तेव्हापासून तिला त्या पैशाची घृणा वाटायला लागली. आपल्या नवऱ्याला मिळणारा पैसा हा त्याच्या कर्तृत्वाचा नसून गैरमार्गाने गोर गरीब लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या कडून एकप्रकारे फसवणूक करून मिळालेला आहे या विचाराने ती अस्वस्थ व्हायची. ती डॉक्टरला नेहमी म्हणायची आपल्याला या पैशाची गरज नाहीये, असा कोणाला फसवून आणि लुबाडून कमावलेला पैसा आपल्याला पचणार नाही. एक ना एक दिवस देव या पैशाचा हिशोब नक्कीच चुकता करेल.
सनीच्या आईचे बोलणे ऐकून आणि तिची अस्वस्थता बघून डॉक्टरचे मन विचलित व्हायचे कधी कधी त्याला कमिशन मधून मिळणारा पैसा घेऊच नये असं वाटायचं.
एक ना एक दिवस देव या पैशाचा हिशोब नक्कीच चुकता करेल या सनीच्या आईचे शब्द त्याला आता खरे वाटू लागले होते.
विशीच्या आत असलेल्या आपल्या मुलाला ड्रग्सचे व्यसन कधी आणि कसे लागले असेल, एवढ्या रात्री अशी बेदरकारपणे गाडी चालवून त्याने तिघांना उडवले. तिघांना उडवून सुद्धा ते तिघे जिवंत आहेत की मेलेत हे बघण्याचे सुद्धा भान आणि मानसिकता नसावी एवढा निर्ढावलेपणा आणि विकृती आणि तीसुद्धा या वयात कुठून आणि कशी आली या विचारांनी डॉक्टरचे मन सुन्न झाले.
पैसे कमवण्याच्या नादात आपले मुलाकडे दुर्लक्ष झाले की गैरमार्गाने कमावलेला पैसाच त्याच्या अशा कृत्याला कारणीभूत ठरला, तिघांच्या मृत्यूस जवाबदार, गुन्हा करून पळून जाणे, ड्रग्स बाळगणे आणि त्याचे सेवन करणे असे एक ना अनेक गुन्हे एव्हाना सनीवर दाखल झाले असतील या कल्पनेने डॉक्टर मनातून खचून गेला. त्याच्याकडे एखादा पेशंट आल्यावर औषधोपचार आणि हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या संभाव्य खर्चाचे आकडे ऐकून जसे पेशंट खचून जायचे त्याच्यापेक्षा भयंकर अवस्था डॉक्टर स्वतः अनुभवत होता, त्याहीपेक्षा पेशंट आणि नातेवाईकांना औषधं आणि हॉस्पिटलच्या भरमसाठ खर्च आपण टाळू शकत होतो निदान कमी तरी करू शकत होतो, पण कमिशनच्या अमिषाला बळी पडून तसं केले नाही याचा डॉक्टरला पश्चाताप होऊ लागला. दुखण्याने अस्वस्थ आणि त्रासलेल्या पेशंट आणि रुग्णांना आपण एकप्रकारे फसवले त्यांच्या खिशात त्यांच्या नकळत हात घालून त्यांना एकप्रकारे लुबाडले याचे डॉक्टरला वाईट वाटू लागले. असं करूनसुद्धा पेशंट बरे झाल्यावर स्वतः येऊन किंवा फोन करून डॉक्टर तुम्ही मला वाचवले, मला बरे केलेत असं सांगून देवाची उपमा देऊ करत होते. त्यांच्या भाबडेपणाचा आणि निरागस वागण्याचा अनुभव घेतल्याने डॉक्टरला आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती.
फ्लाईट ची अनाउन्समेंट झाल्यावर डॉक्टर भानावर आला, मुलाचा जामीन करायचा की त्याच्या कर्माची फळं त्याला भोगू द्यायची, की आपल्या कर्मामुळे आपल्या ऐवजी त्याला फळं भोगायला लागणार या विचारांनी शून्य नजरेने तो बोर्डिंग गेट कडे चालू लागला.
(लेख पूर्णपणे काल्पनिक आहे. कट प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणावर चालते परंतु त्याचा पुरावा किंवा सिद्ध करणे मोठमोठ्या यंत्रणांना शक्य नाही तसेच तशी न करणारेही खूप जण आहेत त्यांच्याप्रती खूप आदर. )
— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply