ए तंबी..कितना हुवा सेठ का?
एक इडली सांबार..दो कटींग..तीस रुपया..
तंबी..टेबल साफ कर ना यार..ये इधर कुर्सी पर भी..
अरे साब..ऐसा क्या ..अभी करता..ये लो कर दिया..
तंबी फ्रेश क्या मिलेगा रे अभी?
साब..उपमा अभी ताजा बनाया..गरम गरम..लावूं क्या ..?
तंबी तेरा पढाई कैसा चल रहा है..तू दसवी का परिक्षा देगा ना?
हां..साब..परिक्षा अभी मार्च मे है..बाकी सब ठीक..वो इंग्लीश से थोडा डरता है मै.. आप सिखायेगा क्या मेरको?
तंबी..
उडप्याच्या त्या हॉटेलात काम करणारं ते चटपटीत पोरगं.
अतिशय मेहनती..सुस्वभावी..आणि हुशार.
गाव त्याचं तामीळ नाडू कर्नाटक बॉर्डर वरचं..
पण इकडे महाराष्ट्रात आलाय पोटा पाण्यासाठी..
अण्णाच्या या हॉटेलात दोन वर्ष झाली कामाला आहे..
सगळ्याच कस्टमर लोकांचा आवडता झालाय आता तंबी..
माझाही खास दोस्त आहे तंबी..
माझी हॉटेल मधे रोजची यायची साडे अकराची वेळ..
त्या वेळी गर्दी कमी असते.. हाॕटेश शांत असते..
मी आलो की तंबी ‘नमस्ते साहेब’ अशी आरोळी देणार..
माझ्याशी मोडके तोडके मराठी बोलतो तो..
माझा रोजचा फिक्स मेनू त्याला आता पाठ झालाय..
न विचारता तो माझा फेवरेट ईडली वडा सांबार मिक्स आणतो..
माझ्या हातातला टाइम्स मी त्याला देतो..
तो माझ्या समोर बसून थोडासा चाळतो..
एखादा शब्द अडला तर त्याचा अर्थ विचारतो..
माझा ईडली वडा झाला की किचन मधे जातो..
आणि दोन स्पेशल कटींग घेउन येतो..
त्याने स्वतः बनवलेला..त्याच्या साउथ स्टाईलचा..
गप्पा मारत आम्ही तो चहा पितो.
दहा मिनीटे इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो..
अभ्यासातल्या काही शंका असेल तर विचारतो..
मग मी उठतो..
तो हसतो..
‘उद्या और परसो सुट्टी ना साब कंपनीला..आता सोमवारको?’
मी हसतो ‘हो..आता सोमवारको भेटूया..’
गल्ल्यावर पैसे द्यायला गेलो की मालक सवयीने फक्त इडली वड्याचे पैसे घेतो. चहाचे पैसे घेतच नाही.
तंबीने मालकाला तशी तंबीच देउन ठेवलीय.
काय माझे आणि या तंबीचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत कोण जाणे? महिन्याला सहा आकडी पगार कमविणा-या आयटी वाल्या माणसाला हा रोजंदारीवर काम करणारा पोरगा रोज स्वतःच्या हाताने बनवून कटींग चहा पाजतो…तेही फुकट..
मला तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस वाटतो..
आणि…त्याचा तो कटींग चहा… अमृत!!
— सुनिल गोबुरे
Leave a Reply