ऑक्टोबर २००७ मध्ये माझी एक मोठी इच्छा अचानक पूर्ण झाली. निर्मात्या मेधा मेहेंदळे यांच्या तन्वी प्रॉडक्शनच्या ‘डॉटर’ या हिंदी चित्रपटासाठी मी एक गाणे रेकॉर्ड केले. संगीतकार सलील अमृते होते. माझी पत्रकार विद्यार्थिनी तृप्ती दोंदेच्या मार्फत प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण कुलकर्णी मला भेटले. लोकसत्ता आणि दिशा डायरेक्टरसाठी कार्तिकी एकादशीनिमित्त ‘मुखी नाम हाती टाळ’ हा अभंगाचा कार्यक्रम ते करणार होते. पण एका कलाकाराने आयत्या वेळी माघार घेतली आणि ते अडचणीत आले होते. कार्यक्रम अवघा चार दिवसावर आला होता. झी सारेगमपचा महागायक अभिजीत कोसंबीही या कार्यक्रमात गाणार होता. “काहीही करा. पण आमच्या कार्यक्रमात गाण्याची आणि संगीत संयोजनाची जबाबदारी घ्या.” किरण कुलकर्णी म्हणाले.
“अहो, असे काहीच मनात आणू नका. या कारणामुळेच मलाही इतक्या मोठ्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंदच आहे.” मी म्हणालो.
माझ्यासाठी तर येणारा प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा होता. माझ्या वादक कलाकारांबरोबर रिहल्सल्स झाल्या. अभिजीत कोसंबी आणि प्रसन्नजीत कोसंबीही यात भाग घेण्यासाठी अगोदरच ठाण्याला आले. लोकसत्ता या कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याने कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. २१ नोव्हेंबर २००७ रोजी प्रेक्षकांच्या भरघोस उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अभिजीत कोसंबी आणि अनिरुद्ध जोशी या कार्यक्रमाचे प्रमुख गायक होते. अभिजीतच्या गाण्याइतकाच त्याचा मोकळा स्वभाव मला आवडला. या कार्यक्रमामुळेच किरण कुलकर्णी हा नवीन मित्र मला मिळाला. यानंतर डिसेंबरमध्ये संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या रचनांचा एक दीर्घ कार्यक्रम इंद्रधनूसाठी केला. आयोजक संजय जोशी यांच्या ‘संत संग देई सदा’ ह्या अभंगांच्या कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मांडगाव, वसई आणि अंधेरी येथे केले. यानंतर २५ डिसेंबर रोजी एक कार्यक्रम लातूर येथे केला. एकूण २००७ हे वर्ष बऱ्याच धामधूमीत गेले. माझा ७५० वा जाहीर कार्यक्रम. इंग्लंडचा दौरा. एका हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन आणि इतर अनेक कार्यक्रम यामुळे या वर्षीची डायरी अत्यंत व्यस्त होती. यात एक फार महत्त्वाची गोष्ट घडली होती. मी आता ८००व्या कार्यक्रमापर्यंत पोहोचलो होतो.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply