नवीन लेखन...

दशमान कालमापन आणि घड्याळे

कालमापन हे पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिभ्रमणावर आधारलेले आहे तर कालगणन हे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणांच्या काळावर आधारलेले आहे.

ग्रीकांनी काटकोनाचे 90 अंश आणि सरळ रेषेचे 180 अंश मानले त्यामुळे कोणत्याही बिंदूभोवती एका प्रतलात 360 अंशाची जागा व्यापली जाते आणि अवकाशाचा विचार केला तर सर्व बाजूंनेही 360 अंशाचे अवकाश व्यापले जाते. हा संकेत झाला. दशमान पद्धतीत काटकोनाचे 10 किंवा 100 भागाचाही संकेत करता येईल. गवंडी आपला ओळंबा मोकळा सोडून त्याला समांतर अशी भिंत बांधतो. ती पृथ्वीच्या आकर्षणामुळे कोलमडून पडत नाही. पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे काटकोन हे वास्तव आहे. मग त्याचे 90 भाग करावे की 100 भाग करावे हा सोयीनुसार संकेताचा भाग आहे.

पृथ्वीगोलाचेही असेच अवकाशात 360 अंश कल्पिले आहेत. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या एका परिभ्रमणाला लागाणाऱ्या काळाचे म्हणजे एका दिवसाचे 24 भाग पाडून त्या प्रत्येकास एक तास म्हणण्याचा संकेत केला गेला आणि 24 तासांचा एक दिवस हे कोष्टक निर्माण झाले. एक दिवस हे एकक मात्र पृथ्वीच्या एका परिभ्रमणाशी निगडीत असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही संकेत मानण्याची आवश्यकता भासत नाही. एका दिवसाचे किती भाग करावयाचे हे मात्र संकेताने ठरविता येते. 24 ऐवजी 10 भाग केल तर 10 तासांचा एक दिवस होईल. दिवसाच्या 24 तासापैकी एका तासाची 60 मिनिटे आणि एका मिनिटाचे 60 सेकंद करण्याने 1 तासाचे 3600 सेकंद होतात. ही 360 अंशाची 10 पट आहे. अशारितीने अवकाशाचे विभाजन आणि काळाचे (वेळेचे) विभाजन ह्यंचा मेळ बसतो.

सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास लागणाऱ्या काळात पृथ्वीच्या स्वतःभोवती 365 परिभ्रमणे होतात. म्हणून 365 पूर्ण दिवसांचे 1 वर्ष होते. हे वास्तव आहे, संकेत नाही. त्याच काळात चंद्राच्या 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या होतात. म्हणजे पृथ्वीच्या एका वर्षात 12 Months (Month हा शब्द Moonth ह्या शब्दापासून आला असा तर्क आहे.) म्हणजे 12 महिने होतात. हाही संकेत नव्हे वास्तव आहे. म्हणूनच 1 पूर्ण दिवस, 30 दिवसांचे 12 महिने आणि 12 महिन्यांचे किंवा 365 पूर्ण दिवसांचे 1 वर्ष हे कोष्टक दशमान पद्धतीत बसणे अशक्य आहे.

दशमान कालमापन पद्धतीनुसार पूर्ण दिवसाचे (दिवस आणि रात्र मिळून 1 पूर्ण दिवस) 10 तास, 1 तासाची 100 मिनिटे आणि 1 मिनिटाचे 100 सेकंद असा संकेत न केला तर कोणते परिणाम होतील ते पाहू या.

घड्याळ्याच्या तबकडीवर 1 ते 12 ऐवजी 1 ते 10 आकडे असतील. प्रत्येक भागाला 1 नवा तास असे म्हणावे लागेल.दिवसाची सुरूवात मध्यरात्री म्हणजे 00.00 वाजता सुरू होईल. दिवसाचे चार प्रमुख भाग म्हणजे 4 चरण केले तर प्रत्येक चरण 2 नवे तास आणि 50 नव्या मिनिटांचा होईल ह्याचा अर्थ 00.00 वाजता मध्यरात्र, 2 वाजून 50 मिनिटांनी सकाळ, 5 वाजता मध्यान्ह आणि 7 वाजून 50 मिनिटांनी संध्याकाळ होईल.

10 नवे तास म्हणजे पूर्वीचे 24 तास होतात म्हणून नव्या वेळेचे जुन्या वेळेत रूपांतर करतांना, नव्या वेळेला 24:10 म्हणजे 2.4 ने गुणावे लागेल. आणि जुन्या ब्द वेळेचे नव्या वेळेत रूपांतर करावयाचे झाल्यास 10+24 म्हणजे 0.4167 ह्या अपूर्णांकाने गुणावे लागेल.

उदा. 1: :

नवी वेळ सकाळी 3 वाजून 25 मिनिटे म्हणजे जुन्या वेळेनुसार किती वाजले असतील?

नवी वेळ दशमान पद्धतीत असल्यामुळे 3 वाजून 25 मिनिटे म्हणजे मध्यरात्रीनंतर 3.25 तास झाले आहेत.

जुनी वेळ = नवी वेळ x 2.4 = 3.25 × 2. 4 = 7.80 तास.

म्हणजे सकाळचे 7 वाजून गेले आहेत. जुना 1 तास म्हणजे जुनी 60 मिनिटे होतात. म्हणून जुने 0.80 तास = 0.8 x 60 = 48 जुनी मिनिटे. नवी वेळ 3 वाजून 25 मिनिटे म्हणजे जुनी वेळ 7 वाजून 48 मिनिटे.

उदा. 2: :

जुन्या वेळेनुसार 7 वाजून 48 मिनिटे म्हणजे नवी वेळ कोणती?

जुनी वेळ 5 = 7 पूर्ण जुने तास + 48: 60 अपूर्ण जुने तास

( 7 × 0.4167 + 48: 60×0.4167 ) नवे तास = 2.917 + 0.333

म्हणजे नवीन वेळेनुसार सकाळचे 3 वाजून 25 मिनिटे.

जुना सेकंद सीझीयम- 133 च्या अणूतील स्पंदनांशी निगडीत केला आहे. त्यानुसार 1 नवा सेकंदही नव्या व्याख्येनुसार प्रमाणित करता येईल.

कोणतीही चाकोरी बदलवून नवा मार्ग स्वीकारणे ही सोपी बाब नाही. त्यामुळे वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक बाबतीतही परीणाम  होऊ शकतात. म्हणूनच असे बदल जनतेच्या कितपत हितावह आहेत हे जोखूनच समाज ते स्वीकारतो. सरकारी आदेशही असमर्थ  ठरतात. म्हणूनच भारतीय सौर दिनदर्शिका आणि दशमान घड्याळ समाजाने स्वीकारणे सध्यातरी अशक्य वाटते.

– गजानन वामनाचार्य
मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकाच्या मार्च 2003 च्या अंकातून साभार..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..