दत्ता आता वयात आला. तो नियमित पूजा सांगायला जात असे. त्याचे लक्ष आता जेवायला वाढणाऱ्या वहिनींकडे जाऊ लागले. एरव्ही खाली मान घालून जेवणारा दत्ता वहिनींच्या बांगड्या, साडी वगैरेंची स्तुती करू लागला. दत्तालाही स्वतःवर ताबा ठेवणे कठीण जाऊ लागले.
हळूहळू नानांची कामं कमी होऊ लागली . त्यांना रक्तदाबाच्या विकाराने घेरले. एका ठिकाणी जेवणावरच चक्कर आल्यासारखे वाटल्याने, घाईघाईने जेवण उरकून नानांना घरी याबे लागले. दत्ता बरोबर होता , म्हणून बरं. हृदयरोगाचा हलकासा झटका असल्याचे डाक्टर म्हणाले. अर्थातच नानांचे बाहेर जाणे बंद झाले. तरीही नानांना भेटायला येणारे येतच असत व काही काही भटजी त्यांची कामे इमानेइतबारे करून त्यांचा भाग त्यांना आणून देऊ लागले.
असो. दत्त्ता आता चोरून चोरून अंत्येष्टीही करू लागला व श्राद्ध पक्षाला जेवायलाही जाऊ लागला. एक दिवस फारच तमाशा झाला. रात्री एक बाजता अंत्येष्टीहून दत्ता परत आला. पैसेही बरेच मिळाले. पण घरात पाऊल टाकले आणि काळोखातच नानांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. “दत्ता थांब तिथेच, बरेच दिवस मी ऐकून होतो , ते खरं आहे तर. अरे, तुला घरी गिळायला कमी मिळतं का? की तू श्राद्ध पक्षांना जेवायला लागलास. आणी आत्ता तर तू खाडीवरच्या मसणवटीतून आलायस. अरे, पैसे चांगले मिळतात म्हणून तुझ्यासारखे भटजी स्मशानात सुद्धा जेवतील. ” दत्ता धीर करून प्रथमच म्हणाला, “पण नाना चौधरीकाकांना मागेपुढे कोणीच नाही म्हणून गेलो. तुम्हीच नाही का म्हणायचे की ज्यांचे कोणी नाही त्यांची अंत्येष्टी केली तर पुंण्य लागते. ”
नानांचा देह थरथरू लागला. ते म्हणाले, “नको ते बरोबर लक्षात ठेवलयस. मला जोगभटजी मागेच म्हणाले, हल्ली दत्ताची लक्षणं काही ठीक नाहीत. अरे स्मशानात जाऊन आल्यावर आपल्याला प्रायश्चित्त घेतल्याशिवाय चालत नाही. आणि हि काही तुझी पहिलीच वेळ आहे असे वाटत नाही. दत्ता चांगलाच घाबरला. तरीही तो त्यांना ओलांडून पुढे धावला . नाना किंचाळले, “शिंच्या, बाजूला हो, विटाळ चांडाळाच तुला काहीच नाही आणि आता अंघोळ केल्याशिवाय घरात शिरतोस? बाहेर हो. ‘ मग बायकोला हाक मारून म्हणाले, ‘ठेवा जरा गरम पाणी . स्नान करवून घ्या तुमच्या चिरंजिवांकडून. दिग्विजय करून आल्येत ते. ‘ दत्ताला चोरट्यासारखे झाले. आतल्या दारात उभ्या असलेल्या आपल्या आईला खुणेने विचारीत तो बाहेर आला. मग त्याला विहिरीवर अंघोळ घालून घरात घेतले.
जवळजवळ तीनचार दिवस झाले. नानांनी दत्ताशी बोलणंच टाकलं. ते आलेल्या माणसांशी बोलत . पण तो जसा काही अस्तित्वातच नाही असे वागत. नंतर मात्र एक दिवस विचित्र बातमी नानांच्या कानावर आली . दत्ता श्राद्धाला जेवायला बसला कि त्याच्या शरिरात म्रुतात्मा शिरतो व नातेवाईकांशी बोलतो.
एक दिवस दत्ता जोशी वकिलांच्या वडिलांच्या श्राद्धाला जेवत होता. सदाभटजी श्राद्ध चालवायला होते. श्राद्धाचे विधी चालू होते. वर्ष श्राद्ध होतं . दत्तानी त्यांना पाहिलं होतं. त्यांचा आवाजही ऐकला होता. सदाभटजी त्याला सारखे विचारीत होते. नानांची परवानगी घेतलीस कां? श्राद्धाला जेवायला बसतोयस . कोणी समोर नाही असे पाहून त्याला म्हणाले, ‘श्राद्धाला नानांच्या मुलाने जेवणे मला पटत नाही, आणि वर्षश्राद्धाला तर मुळीच नाही. पण तुझा आग्रह होता म्हणून तुला बरोबर घेतला. बघ , अजून विचार कर. केवळ अकरा रुपयांसाठी तू जेवणार कां?
पाहिजे तर मी अकरा रुपये देतो आणि विष्णू वैद्याला जेबायला बसवतो. त्याला नाहीतरी कशाचाही विधिनिषेध नाही. तरीही दत्ता ठांम होता. तो काहीच बोलला नाही . तो जेवायला बसला व दुसरे दोघे मंत्र म्हणू लागले. इतक्यात त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. बघू या जोशांच्या वडिलांचा आवाज काढून.
मग त्यानी जेवता जेवता यशवंतरावांचा आवाज काढून जोशांना म्हंटलं, ‘अरे गोविंदा, बघतोस काय नुसता. काकडीच्या कोशिबिरित तिखट जाळ मिरची आणून घाल. ‘ आणि आश्चर्य म्हणजे, वाढणाऱ्या जोशी काकू दचकल्या, म्हणाल्या, ‘मामंजी माफ करा, पण आज मिरची मिळालीच नाही. आणते कुठून तरी’. डोळे मोठे करीत तो मोठ्याने म्हणाला, गोविंदा, परसात्ल्या नाग्वेलीच्या पानांचा विडा तरी कर माझ्यासाठी. ‘. त्यानी दोन्ही गोष्टी अशाच ठोकून दिल्या होत्या. पण त्या बरोबर निघाल्या. आणि गोविंदरावानी नमस्कार करून म्हंटले, ‘आत्ताच तयार करतो बघा. ‘ सगळेच आवाक होऊन पाहात राहीले. दिवाणखान्यात शांतता पसरली . सदाभटजी थरथरू लागले. म्हणाले, “दत्ता , अरे भानावर ये. दत्ता, दत्ता , आता नाही बाबा तुला असा जेवायला बसवणार.. ” थोड्यावेळाने दत्ताने संचार आवरता घेतला. चुपचाप जेवला. जाताना अकरारुपये कसले, जोशांनी एक कोट टोपी आणि नवीन धोतरही दिलं व पुन्हा पुन्हा पाया पडून क्षमा मागितली. झालं . घटनेचा बभ्रा झाला. गावभर सदाभटजी सांगत सुटले. मग काय जेवण्याची बोलावण्यावर बोलावणी येऊ लागली. लोकांना श्राद्धाला जेवायला दत्ताच लागू लागला. तोही तोंडाला येईल ती दक्षिणा मागू लागला̮ लोक देऊ लागले आणि कुजबुजू लागले, “नानांच्या मुलात पैशाचिक शक्ती आहे. “खबर नानांपर्यंत जायला वेळ लागला नाही.
एकदा मी रजा घेऊन गावी आलो . गावातल्या किराणा दुकानदाराकडे हे सर्व समजलं. पण दत्ता काही भेटला नाही. त्याच्या घरी गेलो तर नाना आणि त्यांचा ग्रुप गप्पा मारीत बसलेला दिसला. मला पाहून नाना म्हणाले, ‘काय म्हणते मुंबई? आता इथेच राहणार आहेस का जाणार आहेस? मी पुढे होऊन त्यांच्या पायावर डोके ठेवले. नंतर नाना म्हणाले, ‘लग्नाचा विचार असेल तर सांग बरं. म्हणजे स्थळंपाहायला हरकत नाही. मी मला सध्या लग्न न करण्याचे सांगितले. पण दत्ता बद्दल मुद्दामच विचारले नाही. नानाच म्हणाले, ‘त्याला भेटायला आलायस वाटत ? मग तर तुला रात्रीच यावे लागेल.. आजकाल आपल्या भटजी लोकांची डोकी बिघडल्येत. काय समजलास. मी काय समजायच ते समजलो . घरी गेलो. दत्ता भेटला नाही याचे वाईट वाटलं. मी परत जाण्यासाठी बसस्टोप वर आलो . बस लागायला उशीर होता. एक्टाच बसलो होतो. तेवढ्यात एका माणसामागे लोकांचा घोळका लागलेला दिसला. बघतो तर काय , दत्ता पुढे आणि लोक त्याच्यामागे दगड घेउन धावतायत. दत्ताने असं काय केलं, की लोक मारायला उठावेत. मी घाईघाईने तसाच उठलो . जाऊन लोकांना अडवले आणि दत्ताला म्हणालो, ‘माझ आजचं जाणं मी रद्द करतोय. मला येऊन भेट.
रात्री नवाच्या सुमाराला कडी वाजली . दार उघडून दत्ताला आत घेतले. तो नुसताच बसून राहिला जरा वेळ तो काहीच बोलला नाही. मग तोच म्हणाला, ‘तुला आजच्या प्रकाराबद्दल सांगतो. अरे, मला चांगली भिक्षुकी येत नाही , पाठ केलेले आठवत नाही , तर मी काय करणार रे ? ‘ त्याला पुढे बोलवेना, त्याचे डोळे भरून आले. मग म्हणाला, ‘तुला दातारांचा मनीष माहीत असेलच (मी मान हलवली)मुंबईला कुठे नोकरीला असतो. अधून मधून येतो आणि इतका भाव खातो की बस. आमचे नानांना तर निमित्तच मिळत तुलना करायला. मला नाही रे काही जमत . मला पण मिळेल कां एखादी नोकरी, मुंबईसारख्या ठिकाणी ? त्याने माझ्याकडे अपेक्षेने पाहिले. मला आता गावात नाही राहायचे. बदल झाला तर सुधारेल की सगळ. ” ‘अरे , पण तू आजच्या प्रकाराबद्दल बोल ना. मी म्हंटले.
‘ आजचा प्रकार जरा वाईटच होता. तू कोणालाही सांगू नकोस. म्रुतात्मा शरिरात शिरतो वगैरे सर्व खोटं आहे रे. ते मीच निर्माण केलय. माझी कीर्ती ऐकून मला सदा पाटलाकडेही जेवायला बोलावलं होतं. पण तिथेही रावसाहेबांच्या घरच्याप्रमाणे संचार झाला नाही. म्हणून तर पाटलाची माणसं दगड घेऊन माझ्या मागे लागली. रावसाहेबांच्या घरी पण असाच प्रसंग आला. त्या दिवशी मला रावसाहेबांच्या वाड्यावर श्राद्ध होतं म्हणून जेवायला बोलावलं होतं. पण त्या दिवशी नेमके कोणीही भटजी नव्हते. रावसाहेबांच्या थोरल्या बंधूंची तीथ होती. अर्थातच माझी कीर्ती त्यांच्या घरापर्यंत पोचली होती . जेवायचा बेतही चांगला होता. सुकामेवा घातलेली तांदुळाची खीर फारच छान होती. मला जेवायला वेगळे पान होते. रावसाहेब समोरच सिंहासनवजा खुर्चीवर बसले होते. घरातले माझ्या पंक्तीला कोणीच नव्हते. मला जरा विचित्र वाटले. पण रावसाहेबांपुढे बोलणार कसा ? तुला तर माहीतच आहे , मी तुझ्या वडिलांपुढे सुद्धा बोललो नाही.
मी जेवायला सुरुवात केली . रावसाहेब वगैरे सार्वच अपेक्षेने बधत होते. मला कसतरीच वाटलं. जणूकाही एखादा एकपात्री शो असतो तसे. बराच वेळ मी जेवत राहीलो. तेव्हा रावसाहेबांची बायलो म्हणाली, “हे काय गुरुजी आज अगदी तोंड बंद ठेवू न जेवताय ? आप्पा भावजी तुमच्या अंगात कसे आले नाहीत? कमाल आहे , ऐकलेलं सगळ खोटं की काय ? “. मला ऐन वेळेवर उत्तर सुचले.
“काकू , अहो मंत्रोच्चार झाल्याशिवाय संचार होत नाही. बारावा असेल तर या गोष्टी लगेच होतात. “.. हो, का ? काकू जरा उपरोधिक पणे म्हणाल्या ” सबंध गाव काय नेहेमी बारावे तेरावे करतो की काय ?, का नानांनी दम दिलाय तुम्हाला. ” . मी म्हाटले “तसं नाही काकू. “.
“मग कसं रे शिंच्या ? रावसाहेब एकदम कडाडले, ” का आमचं जेवण कमी प्रतीचं वाटतय ? अरे त्यांना आणखीन वाढा, बोलवा सुनबाईंना वाढून पाहू त्यांच्या हातून. ”
आणि रंजना वहिनी वाढायला आल्या. पाचसहा वर्ष लग्नाला झाली होती . पण अजून अपत्य योग नव्हता. राव साहेबांना कोणीतरी सल्ला दिला होता की पितरांना त्रुप्त करा. म्हणजे संतती प्राप्ती होईल. म्हणून रावसाहेबांनी मला जेवायला बोलावले होते. पण श्राद्ध अथवा पक्ष केला नव्हता. माझी कीर्ती माहित असल्यामुळे असेल किंवा नानांचा मुलगा म्हणून असेल. रंजना वहिनी पुढे झाल्या. भाताची खीर वाढू लागल्या. मी खीर सोडून वहिनींच्या नाजुक हातांकडे आणि ब्लाउजमधील घळीकडे पाहिले. मग त्यांनी नाजुक आवाजात म्हंटले. “गुरुजी खिरीची वाटी तरी रिकामी करा. म्हणजे आण्खीन खीर वाढता येईल. “. माझे पोट खरं तर भरत आलेलं होतं. तरीही मी ती वाटी रिकामी करून वहिनींच्या आग्रहाखातर म्हणण्यापेक्षा त्यांच्या जवळू न दिसणाऱ्या सौंदर्याखातर पुन्हा खीर घेतली. त्यांच गोड हासणं , नाजुरितीने हातातली सोन्याची कांकण वाजवणं, यांत मी इतका अडकून गेलो , की मलाजेवायला बोलावलय , हे विसरलोच. रावसाहेबांच्या तीक्ष्ण नजरेने हे टिपलं असावं. त्यांच्या तोंडावर नापसंतीची एक सूक्ष्म छटा येऊन गेली असावी असे मला वाटले. अर्थातच रंजनावहिनी आत गेल्या असाव्यात.
थोड्या वेळाने मी जेवण आटोपून बाहेर आलो . विडा चघळीत बसलो होतो. रावसाहेब सोडून सर्वानी मला नमस्कार केला. घरातील महिलावर्गाला यथाशक्ति आशीर्वाद दिले. रंजनावहिनींनी मला नमस्कार केला तेव्हा मात्र त्यांच्या हाताची बोटं माझ्या पायाला लागली. आणि माझ्या सर्वांगातून विजेची लहर गेली. आतापर्यंत कोणत्याही स्त्री कडे मी अशा रितीने पाहिले नव्हते. आणि प्रथमच स्त्री आली ती नेमकी रंजनावहिनी होती. रावसाहेबांची एकूण मुद्रा पाहून मी पुढील सर्व आवरते घेतले व जागेवरून उठलो. नाहीतर माझा कार्यक्रम फार मोठा असायचा. मी चुपचाप निरोप घेलून जवळजवळ पळालोच. घरी येईपर्यंत मी मागे वळून पाहिलेही नाही.
चालता चालता मी विचार केला. आपली आणि रंजनावहिनींची काय बरोबरी. आपण एक कुप्रसिद्ध भिक्षुक(श्राद्ध पक्षाला जेवणारे) आणि ती एका संस्थानिकाची सून. आप्ल्याला ना कोणतीही उत्पन्नाची कला ना आपल्याजवळ इतर काही गूण . पण रंजनावहिनी मनात जरळत राहिल्या.नंतर चारपाच दिवस असेच गेले. वहिनींनी मला पूर्ण पछाडलेले होते. मध्ये एक्दोन श्राद्ध पक्षांची बोलावणी आली. मी शो बरोबर केला. पण माझ मन त्यात नव्हत. घरात रोज नाना वाटेल तसे बोलायचे. मला घरात राहावेसे वाटेना. दुसराउपायही नव्हता. एक दिवस वाड्यावरून एक नोकर आला. त्याने मला नावाने हाक मारली. मी विचारले , काय रे काय काम आहे ? ‘ माझ्या छातीत धस्स झाले. रावसाहेबांना माझाशी रात्री काय काम आहे . क्ळेना. मग तोच म्हणाला, “जी मी तुकाराम , वहिनीसाहेबांनी वाड्यावर बोलवलय, चला बिगी बिगि. “. आत नाना बरे नसल्याने झोपले होते. मला हल्ली घरात , मी कुठे जातो , केव्हा येतो, हे विचारीतच नसत. मी तुकारामच्या मागे लगबगीने निघालो. वाड्यात शिरताच वहिनी स्वागतासाठी समोर आल्या. मी दबकत दबकत खालच्या मानेने आत गेलो. न जाणो रावसाहेब कडाडायचे. वहिनी दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसल्या. त्यांच्या समोरच्या चौरंगावर मी बसलो.” सध्या घरी कोणीही नाही. रावसाहेब उद्या सकाळी येतील. एरव्ही मला तुम्हाला बोलावण शक्य नाही. “असे म्हणून त्यांनी त्यांची पत्रिका आणि हात पुढे केला.
” गुरुजी मला सांगा , माझ्या हातावर आणि पत्रिकेत संतती योग नाहीच आहे का? ” मी म्हणालो , ‘ वहिनी मला यातलं अगदी जुजबी ज्ञान आहे. तुम्ही नानांना दाखवा. ‘ हे काय गुरुजी तुम्ही एवढ्या मोठ्या विद्वान ब्राह्मणाचे पुत्र, तुम्हाला क्ळणार नाही असं होईल का ? निदान हात तरी बघा. ‘ असे म्हणून पुढे वाकून आपला डावा हात पुढे केला. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी त्यांचा हात हातात घेऊन पाहावा की नाही या विचारात होतो. तेव्हा त्याच म्हणाल्या”अहो हात हातात घेऊन पाहिलात तरी चालेल. ” मी हात हातात घेऊन पाहिला आणि मला जरा शॉक च बसला. मला फारसे काही कळत नसले तरी नानांकडून ओझरते काही हातांच्या रेषांबद्दल ऐकले होते. त्यावरून म्हंटले, “वहिनी , पुढील आठवडा अतिशय वाईट आहे. “. तशीही मला वेळ मारून न्यायची होतीचं . नाजुक हासून गोड आवाजात त्या म्हणाल्या, “अहो , असं काय अगदी विपरित घडणार आहे? सांगा , आता सगळ्याची सवय झाली आहे. हे इथे नसतातच . मामंजींचा स्वभाव तुम्हाला माहीत आहेच. मरण येणार का? फार बरं होईल. तसही आयुष्यात काय आहे आता. एवढ्या मोठ्या वाड्यात माझा जीव गुदमरतो. ”
“म्हणजे नक्की काय होतं? मीविचारलं. “तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही म्हणा. या वाड्यातून बाहेर जाता येत नाही . घरातच राहण्याची सक्ती आहे माझ्यावर. मी आपलं गावही अजून पाहिलेलं नाही. रावसाहेब. सासुबाई आणि इतर चुगलखोर नोकर यांच्या भीतिने मला बाहेर जाण्याचं धाडसच होत नाही . आपलं माणूसच जर इथे नाही तर काय उपयोग ? ” खिन्नपणे त्या म्हणाल्या.
“म्हणजे तुम्ही अजून व्यंकटेश्वर, मोहम्मद साहेबांचा दर्गा, तलाव , त्यालगतचं जंगल. तुमच्या वाड्याच्या मागूनच तर जाता येत. छोट्या रावसाहेबांनी तुम्हाला कधी बाहेर नेलच नाही का?
” नाही. ते येतात तेव्हा रावसाहेबांशी सारखे धंद्यातल्या व्यवहाराचेच बोलत बसतात. रात्र रात्र वाट पाहून निघून जाते. पण आपल्याला बायको आहे, तिलाही थोडा वेळ द्यायला हवा, असं त्यांना वाटत नाही. ”
“मग तुम्ही त्यांना बोलला नाहीत का कधी ” मी विचारले.
“बोलले की. पण ते एवढच म्हणायचे , की आपल्याला सबंध आयुष्य पडलय. धंदा चांगला पक्का झाला की तुला घेऊनच जाईन मी तिथे. ” पण असं नुसतच बोलण व्हायच. त्यांच तर लग्न झालं तरी , आई वडीलांना विचारतात, म्हणून कौतुक होतं. पण माझ काय? खरं सांगते गुरुजी , तुम्ही घरी आलात आणि मी , लग्नानंतरच्या आयुष्यात प्रथमच एवढी बोलले. ”
मीही जरा विचारमग्न झालो. वहिनींनी माझ्यावर चांगलीच जादू केली होती. मला तेथून हालावेसेच वाटेना. दिवाणखान्यातील घड्याळात नवाचे ठोके पडले. मी भानावर आलो . आपण निघावं हे बरं, असं मला सारखं वाटायला लागलं. पण पाय हालेनात . वहिनींकडे सारखे पाहातच राहावसं वाटत होतं. प्रत्यक्षात माझे डोळे जमिनीकडेच होते. चुकून रावसाहेब आले तर तर तर…..? असा विचार मनात येताच मानेवरून घामाचा थंड थेंब सरकत गेल्याची जाणीव झाली.. मी घाबरून तो विचार झटकून टाकला. वहिनींच्या प्रश्नानी माझी तंद्री भंग पावली. “गुरुजी दुधाचा पेला अजून तसाच आहे. फार बाई घाबरता तुम्ही. ” मानेला एक लाडिक झटका देऊन तोंडावर आलेली केसांची बट मागे सारत वहिनी म्हणाल्या.
मी पेला रिकामा करीत म्हंटले, ‘मला निघायला हवं. नाना ओरडतील. ‘ जणू काही नानांच्या ओरडण्याला भी क घालणार होतो. “ठीक आहे”. त्या म्हणाल्या. मी उठणार , तोच खाली बग्गी थांबल्याचा आवाज आला. माझ्या अंगावरून सरसरून काटा गेला. पाठोपाठ दिंडी दरवाज्यातून रावसाहेबांचा खडा आवाज आला. “अरे, तुकाराम , घनश्याम उचला की सामान लवकर. रोज जेवताना रे. ताडताड चालत रावसाहेब समोर उभे ठाकले. मी वहिनींकडे पाहिले. त्यांची मुद्रा पांढरी फटक पडली होती. मला पाहून रावसाहेबांची मुद्रा कठोर झाली.
“तू ? तू तर ताबडतोब नीघ. नाहीतर चाबकानं फोडून काढीन. मी भिंतीच्या बाजूने दरवाज्याकडे सरकू लागलो. त्यांच्या हाताच्या टप्प्यातही असणं मला नको वाटू लागलं. न जाणो मुंडीच मुरगळायचे. हळूहळू दिवाणखान्याबाहेर पडलो. त्यांच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. “आणि काय ग सटवे , लाज नाही वाटत दुसऱ्या पुरुषाला घरात घेऊन गप्पा छाटायला. मी ऐकलं होतं, ते खरच होतं म्हणायचं. लग्नापूर्वी तुझे कुणाशीतरी संबंध होते म्हणे. आम्ही दुर्लक्ष करून तुला सून करून घेतली. पण तुझ्या वागण्यात काहीही बदल नाही. श्रीधरला काय वाटेल याचा विचार केलास ?
मी एवढे ऐकत दिंडी दरवाजा ओलांडला. आणि एकदाचा रस्त्यावर आलो̮ मागे वळूनही न पाहता मी घराकडे पळत सुटलो.
“दिनू, मी कसातरी तुझ्यासमोर जिवंत उभा आहे. पण मला रावसाहेबांची फार भीती वाटते. पुढे रंजना वहिनींचं काय झालं असेल , हेच काही कळत नाही.”तो बराच घाबरलेला दिसला. मी म्हंटले, “तिचं काय व्हायचे ते होऊ दे. तू तुझं बघ. पुढे तू काय करणार आहेस? माझी रजा फार तर एक आठवडा वाढवू शकतो. माझ्याबरोबर मुंबईला आलास तरी हरकत नाही. माझी जागा आहेच. तिथे राहू शकतोस. मी लग्न न करण्याचं ठरवलं आहे. तिकडे तू भिक्षुकी कर. तिथे तुझा इतिहास कोणीही विचारणार नाही आणि कोणालाही वेळही नाही. तू काही गुन्हा केला नाहीस. दैवयोगाने तुझ्याबाबतीत जे घडलं ते घडलं. येणार असलास तर लवकर सांग. त्या रंजनावहिनीला डोक्यातून काढून टाक. दुसऱ्याची बायको आहे ती. असल्या गोष्टी डोक्यात ठेऊन आयुष्य फुकट जाईल. ” नंतर अकराच्या सुमारास दत्ता घरी गेला. नाना झोपलेले होते. तो दबकत दबकत जाऊन अंथरूणावर लवंडला.
दोन दिवस असेच गेले. आणि एक वेगळीच बातमी पसरली. वहिनीवाड्यातून नाहीशा झाल्या होत्या. रावसाहेब तिच्या नावाने शंख करीत होते. मधून मधून दतालाही शिव्या शाप देत होते. पण वहिनी काही सापडत नव्हत्या. मीपण जरा अस्वस्थच होतो. अजून तरी दत्ताचा माझ्याबरोबर येण्याचा निरोप नव्हता. गावात नक्की काय चालू होते , कोणालाच कळत नव्हतं. अचानक एक दिवस नानांच्या घरी तुकाराम आला. नानांपुढे लोटांगण घालून म्हणाला, ‘तुमास्नी रावसायबानी वाड्यावर बलिवलय. ‘ नाना जरा चमकलेच. पण येतो म्हणाले. रावसाहेबांच्या हल्ली मुंबईला फेऱ्या होत असल्याने बरेच दिवसात काही कार्यही झालेले नव्हते. म्हणून बोलवले असेल असे नानांना वाटले. नेहेमींप्रमाणे नानांनी सदरा टोपी घालून अंगावर उपरणं घेतलं व जोडा घालून निघाले. नाना आल्याची वर्दी दिली. नाना दिवाणखान्यात शिरले. रावसाहेब सिंहासनवजा खुर्ची वर बसले होते.
रावसाहेब म्हणजे एक सत्तरीच्या पुढे झुकलेले सडसडीत बांध्याचे सापासारखे बारिक डोळे व उंच कपाळ असलेले ताम्रवर्णी ग्रुहस्त्य होते. बोलताना त्यांचे दोनी बाजूचे सुळे नकळत पुढे येत. त्यामुळे त्यांच्या साध्या बोलण्यालाही एक प्रकारची धार चढे. त्यांचं हासणंहीभयकारी वाटे. रावसाहेबांनी नानांना समोरील चौरंगावर बसण्याची खूण केली.
नानांपुढे झुकून नमस्कार करीत ते म्हणाले, “नाना, आपल्याला मी त्रास देऊ इच्छित नाही. आपल्याही कानावर आपल्या चिरंजिवांच्या काही गोष्टी आल्या असतील्च. पण केवळ आपण मध्ये आहात म्हणूनच मी सामोपचाराने बोलत आहे. आमच्या सुनबाई गेले दोन दिवस बेपत्ता आहेत. पोलिसात तक्रार केलीच आहे. यात आपल्या मुलाचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी दुरान्वये संबंध आहे असं मला वाटतं. मी आपल्याला यासाठी इथे बोलावलय की आपण मुलाला योग्य ती ताकीद द्यावी आणि खरं काय आहे ते सांगण्यास भाग पाडावं. आणखी एक आपण ज्योतिषी आहात, त र मला हे सांगा की आमची सून केव्हा परत येईल. नानांना काही सुचेना. ते म्हणाले, ” दत्ताचं वागणं मला पटत नाहीच, पण मी त्याला अशी समज देईन मी तो जन्मभर लक्षात ठेवील. ” रावसाहेब म्हणाले, ” आपण एकदम आतताईपणाने कारवाई करू नये. आपली तब्बेत आजकाल बरी नसते , हे समजलय मला. प्रश्नाचं उत्तर सांगता येईल का? ” नानांनी काही आकडेमोड केली आणि म्हणाले, “रावसाहेब , तुमच्या सुनबाई परत येणार नाहीत. ”
हे ऐकल्यावर रावसाहेबांचा पारा चढला. ते ओरडले, “नाना शुद्धीवर आहात का ?, काय बोलताय काय? इतका वेळ मी आपला मान राखून बोलतोय. नीट बघा, पाहिजे तर घरी बसून बघा. पण उत्तर देण्याची घाई करू नका. आणी हेच जर तुमचं उत्तर असेल ना तर तुमच्या मुलाला वाचवायच काम करा. नानांना राग आणि अपमान वाटून चक्कर येते की काय असं वाटू लागलं. ते नमस्कार करून कसेबसे उठले व निघाले. घरी आले तर दत्ता बाहेर गेला होता. नानांनी गोळ्या घेतल्या, जेवले आणि पडले. पण त्यांची अस्वस्थता कमी होईना. नाना रावसाहेबांकडे गेले आणि तालुक्याच्या गावाकडून दत्ताला अंत्येष्टी साठी मामलेदारांकडून निरोप आला. त्यांचे वडील गेले होते.दत्ताची कीर्ती पण त्यांच्या कानावर गेली होती. दत्ताने जेऊन घेतले व तो निघाला. दत्ता घरातून बाहेर पडला आणि त्याला लांबून येणारे नाना दिसले. त्याने रस्ताच बदलला. थोड्या लांबच्या रस्त्याने तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर आला.
बराग वेळ थांवूनही वस न आल्याने त्याने पायी जायचे ठरवले. अर्ध्या रस्त्यात मिळाली बस तर पकडू अशा हेतूने तो निघाला. तालुक्याचा गाव फार जवळही नव्हता व फार लांबही नव्हता. तसही सांगणाऱ्याने चारपाच वाजेपर्यत या असे सांगितले होते. पाच सहा किलोमिटर अंतर चालणे दत्ताला कठीण नव्हते. रावसाहेबांच्या वाड्याच्या मागच्या बाजूने ढोरवाडी लागायची. ती ओलांडली की एक रस्ता मोहम्मद शहा बाबांच्या टेकडीवर असलेल्या दर्ग्याकडे जायचा. दुसऱ्या रस्त्याने माळ रान ओलांडलं की तालुक्याचा गाव चालू व्हायचा. दरग्याला जाण्याच्या रस्त्यातच एक मोठा तलाव व तलावाकाठी स्मशान लागायचे. दुपारचे साडेबारा वाजत होते. ऊन हळूहळू तापू लागले. दत्ता डोक्यावर उपरणं घेउन पायातल्या वाहणांचा आवाज करीत शक्यतोवर भराभर चालत होता. रस्ता खडीचा असून मध्येच चढ लागायचा. निदान संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तरी पोचायला हवचं होतं.
तो मुद्दामच मुख्य रस्ता धरून चालला होता. आलीच बस तर मिळेल तरी. जेवण झाल्यावर त्याला थोड फार पेंगण्याची सवय होतीच. एखाद दीड कि. मी. अंतर चालल्यावर तो दमला. त्याने घड्याळाकडे पाहिले. जवळजवळ दोन वाजत होते. एक डेरेदार वडाचं झाड पाहून त्याच्या बुंध्याशी उपरण्याची चुंबळ करून तो आडवा झाला. आत्ता कुठे त्याने ढोरवाडी ओलांडली होती. डावा रस्ता दर्ग्याकडे जात होता. जवळ जवळ वीस एक मिनिट त्याला डुलकी लागली. अचानक थंडगार वाऱ्याची झुळुक आली आणि त्याची झोप चाळवली गेली. तो उठून बसला. वारा वाहतच होता. अहेतुक पणे त्याची नजर वडाच्या डोलाऱ्याकडे गेली. त्याच्या मनात आलं , इतका प्रचंड वड क्वचितच सापडला असता. आपल्याच गावातला वड आहे हे पाहून त्याला जरा अभिमानही वाटला. मागच्या वर्षीचे गुंडाळलेले वटपौर्णिमेचे दोरे तसेच होते. हळूहळू त्याची नजर सबंध व्रुक्षभर फिरली. वडाची पाने वाऱ्यामुळे सळसळू लागली. वाऱ्याचा वेगही वाढला् हवेत एकदम गारवा आला. बाजूला तलाव असेल अशी त्याने समजूत करून घेतली. जरा वेळ विचार केल्यावर त्याच्या बुद्धिला ते पटलं. मग पुन्हा तो थोडा आडवा झाला. सहज म्हणून त्याने एकदा डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. आजूवाजूला भिरभिरले. तो अर्धवट बसता झाला. पंधरावीस फुटावर त्याला एका पाठमोऱ्या स्त्रीची आकृती दिसली. आपण रस्त्याने जाताना एकटेच होतो आणि आपण आत्ताही एकटेच आहोत . या जाणिवेने तो विचलीत झाला. त्याने परत डोळे चोळले. समोर पाहिले. ती स्त्री तशीच उभी होती. फक्त तिचा पदर वाऱ्यावर उडत होता. हीच एकमेव हालचाल . एकदम अशा निर्मनुष्य ठिकाणी हे काहीतरी पाहून घाम सुटू लागला. आपण स्वप्नात आहोत की हा भास आहे ठरवण्याच्या आतच ती आकृती हळूहळू डावीकडे फिरली आणि तिचा चेहरा व पुढची बाजू दिसली. तिच्या अंगावर मळकट गुलाबी साडी व ब्लाऊज होता. चेहरा निर्विकार होता. प्राण कंठाशी आलेल्या दत्ताला आपल्या समोर रंजना वहिनी उभी असल्याचे दिसले. ही इथे कशी ? असं वाटून तो काही बोलणार होता. पण तोंडातून फक्त हबा बाहेर पडली. त्याचा घसा सुकला. काळीज थांबले. श्वास अनियमीत झाला. तो भारल्यासारखा पाहात राहिला.. तेवढ्यात समोरील स्त्री वळली आणि आपल्या हाताने दर्ग्याच्या रस्त्याकडे बोट दाखवून चालू लागली. दत्ताचा ताबा केव्हाच सुटला होता. तो नकळत दर्ग्याच्या रस्त्याने चालू लागला. तलावाजवळ थोडीफार झाडी होती. रंजनाबहिनी त्याच्यापुढे जात होती. तो तिच्यामागे यंत्रवत चालत होता. चालता चालता तिने दिशा बदलली आणि समोरील पडक्या वाड्याच्या दाराच्या चौकटीशी ती पाठमोरीच उभी राहिली. पुन्हा तिने दत्ताकडे पाहिलं आणि तिची आकृती हळूहळू अंधुक होत होत विरळ होऊन अद्रुश्य झाली. थंड वारा आस्ते आस्ते कमी झाला. दत्ता वाड्यापासून थोड्याच अंतरावर उभा होता. सर्वच प्रकार मेंदूच्या आकलना पलिकडील असल्याने त्याला भानावर यायला आणखी काही वेळ लागला.
हळूहळू दत्ता भानावर आला. घामाने चांगलाच डबडबला होता. आता त्याची भारलेली अवस्था कमी झाली. आपण इथे का आलो हेच समजेना. मग रंजनावहिनी ची आठवण झाल्यावर मात्र तो घाबरला. आता त्याला आपण काय पाहिलं आणि आपण त्यावर काय करणार आहोत हा विचार सुचू लागला. कसातरी धडपडत तो मागे चालत आला. त्याला त्याच्या वर्गातल्या डोळे या मित्राची आठवण झाली . तो सांगत असे की भूत पाहिचे असेल तर दुपारी वैराण ठिकाणी वारा वाहतो तिथे जाऊन पाहा. त्या वाड्यात नक्कीच काहीतरी असले पाहिजे. त्याला आपले अंग तापल्यासारखे वाटू लागले आणि जोरात ओरडून कोणाला तरी बोलवावं असं वाटू लागलं. एकूण सगळाच विचार मनात आल्यावर त्याने त्यातून वेड्यासारखी घूम ठोकली. तालुक्याच्या गावाच्या विरुद्ध दिशेला तो धावत सुटला. त्याच्या वाहणा केव्हाच पायातून निघाल्या होत्या. तो खडीच्या रस्त्यावरून ठेचकाळत कसातरी घरी पोचला.त्याला आपल्याला चांगलाच ताप भरल्याची जाणीव झाली. नाना घरी नव्हते. त्याने आईला विचारलेही नाही की ते कुठे गेले. धापा टाकीत दत्ता आहे त्याच अवस्थेत अंथ्रुणावर पडला. आईने एका शब्दानेही विचारले नाही की काय झालं. पण कसातरी का होईना तिनं दत्ताच्या सांगण्यावरून दिनू कडे निरोप पाठवला. आणि डॉक्टरांनाही बोलावले होते.
नाना संध्याकाळी विमनस्क स्थितीत परत आले. त्यांना काहीही सुचत नव्हते. महादेवाच्या मंदिरात बसून त्यांनी दुपार घालवली होती. नानांनी घरात पाय ठेवला. पण त्यांचा कडकपणा ,ताठा नाहीसा झाला होता. रावसाहेबांचं बोलण त्यांनी मनाला फारच लावून घेतलं होतं. दत्ता झोपलेला पाहून त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एरव्ही त्यांनी शिव्याशाप दिले असते. साधारण दोन तीन तासांनी औषधामुळे दत्ताचा ताप उतरला. रात्र अशीच काळजीत गेली. दत्ताला तर या बिक्षिप्त अनुभवाचा काही छडाच लागेना. रंजना वहिनीचं नक्की काय झालं असावं, हा प्रश्न त्याला सतावीत होता. आपल्याला ती काय दाखवणार होती . यातच त्याला झोप लागली. तेवढ्यात रात्री दरवाज्यावर थाप पडली.. तालुक्याहून माणूस आला होता. दत्ता भटजींना बोलावलय म्हणाला. पण दत्ताच्या आईने तो आजारी असल्याचे सांगितल्याने त्याच जाणे टळले होते.
कशीतरी आळसातच सकाळ उजाडलीं . नानांनी आन्हिकं तशीच सोडली. दत्ता पडूनच होता. थोड्या वेळाने दिनू आला. नानांना नमस्कार केला. पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी काल आल्यापासून बोलणं बंद केलं होतं. दिनूला पाहून दत्ताला रडू कोसळले. दिनू म्हणाला, ‘मी उद्या जाईन म्हणतो. ‘ यापेक्षा जास्त रजा मला नाही वाढवता येणार. तो जायला निघाला. तेवढ्यात दाराशी पोलीस हवालदार आला व दत्ताला स्टेशनला बोलावल्याचे सांगितले. दिनू आवाक झाला. तो पण बरोबर आला. काही मदत लागली तर. पो. स्टेशनला त्यांच्या आधीच रावसाहेब बसलेले दिसले. दत्ता घाबरला. काय झालं असावं….? तोच इन्स्पे. साहेब म्हणाले, ‘दाखवा त्याला ती बॉडी. दत्ता , केवळ तू नानांचा मुलगा , म्हणून मी तुला बेड्या घालून आणला नाही. , जा घेऊन त्याला. ‘ हवालदाराने बाजूचाच एका कळकट मळकट खोलीत नेले. तिथे एक म्रुत देह पांढरी चादर घालून ठेवला होता. देहाच्या तोंडावरची चादर काढून विचारले, “ओळखतोस ना यांना? ” तिथे , तीच गुलाबी साडी घातलेली रंजनाबहिनी पडलेली होती. तिचा चेहरा काळानिळा पडलेला होता. दत्ताला काल दुपारची आठवण झाली. दत्ता थरथरतच हो म्हणाला.
“रावसाहेबांच्या सुनबाई आहेत ह्या. ह्यानि गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. माहिती आहे कुठे ते ? स्मशाना समोर पडका वाडा आहे ना . तिथे. त्यांच्या हातात ही चिठ्ठी मिळाली. ” असे म्हणून ती त्यांनी दत्ताला वाचायला दिली. त्यात लिहिलं होतं , “मी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. याला कोणीही जबाबदार नाही. ” पण रावसाहेब बोंबलत होते. , “तुम्ही पहिल्यांदा त्याला ताब्यात घ्या. खोटारडा. लोकांना नादी लावतो. ” पण रावसाहेब इथे बाईंनी लिहिलेली चिठ्ठी आहे. पुराव्याअभावी मी काहीही करू शकत नाही. ” इन्स्पे. म्हणाले. रावसाहेबांना काही पटल नाही. ते दत्ताकडे पाहून तुच्छतेने म्हणाले, ” कायद्याच्या कचाट्यातून सुटलास. पण माझ्या कचाट्यातून सुटणार नाहीस. ” पण रावसाहेब , माझं ऐकावं आपण, ” समजुतीच्या सुरात इन्स्पे. म्हणाले. “तुमच्या पद्धती आणि कायदा तुमच्या जवळच ठेवा. आता मीच पाहून घेईन. बॉडी लवकर ताब्यात द्या. ” रावसाहेब चिडून म्हणाले. दत्ताकडे जळजळीत कटाक्ष टाकीत ते निघून गेले. नंतर इन्स्पे. म्हणाले. “जा दत्ता, केवळ तिच्या चिठ्ठीमुळे तू सुटलास. नाहीतर तुला केव्हाच पोचवला असता. ” आम्ही दोघेही तेथून निघालो . “मुद्दामच बरोबर होतो. जामीन वगैरे लागला असता. ” ते ऐकून दत्ताला हुंदका फुटला आणि म्हणाला, “माझ्यामुळे केवढा त्रास तुला. ” दिनू म्हणाला, ‘अरे त्रास कसला, आता तू मित्र राहिला नाहिस. माझा पाठचा भाऊच आहेस. आता तू कोणताही विचार न करता माझ्याकडे ये. . पण दत्ताला रावसाहेबांची भीती वाटतच होती. तो दिवस असाच गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी दत्ताचया घरी आणि गावातल्या घरोघरी निरोप आला की महादेवाच्या मंदिरात दत्तारामाबद्दल पंचायत काय ते ठरवणार आहे. सर्वांनी यावं. दुपारी चारच्या सुमारास जोग भटजी आले. ते बोलत होते. पण नानांनी हूं की चूं केलं नाही. भटजी म्हणाले, ‘नाना अस मनात ठेवू नका. प्रकृतीवर परिणाम होईल. ‘. मग दोघेही पंचायतीच्या सभेला गेले. तिथे सदा पाटील , रावसाहेब , मंदिराचे ट्र्स्टी आणि काही गावकरीही होते. दत्ताला रितसर आरोप सांगितले गेले. मग रावसाहेब ओरडले, ” याला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी. हा लोकांच्या भावनांशी खेळलाय. अंगात म्रुतात्मा येतो काय ? असे म्हणून ते दत्ताला मारायला धावले. पण जोगभटजी मध्ये पडून म्हणाले. ” रावसाहेब , पंचायतीला ठरवू द्या काय ते. “. मग रावसाहेब जागेवर बसले. पंचायतीने एकमताने निर्णय दिला , की रावसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे शिक्षा करावी. पण जोग भटजी तापून म्हणाले, “बघू , कोण हात लावतोय ते. अरे जरा विचार करा काय बिघडवलय या पोरानं तुमचं. चोरी केली का खून केला ? तुम्ही कोण कायदा हातात घेणारे? आणि दगड मारून तो मेला तर तुमच्यावर खुनाची केस् होईल. . आणखी एक , याला मारायच असेल , तर मला आधी मारावं लागेल. काय समजलात? ह्या रावसाहेबाला काय लागतय ? आणि ते एकदम रडू लागले “लहानपणापासून मी त्याला शिकवलाय रे. तुम्हाला काय लागतय मारून टाकायला ? फार तर तो गाव सोडून जाईल.” “मी त्याला घेऊन जाईन पण तुम्हाला कोणालाही त्याच्या अंगाला हात लावू देणार नाही. ” दिनू पण म्हणाला. पंचायत संपली. निर्णय फिरला. दत्ताने गाव सोडावे असे ठरले.
दिनू म्हणाला” आता कशाला वाट पाहायची ? आजच रात्रीच्या गाडीने जाऊ. जोग काकांना दत्ताने नमस्कार केला. त्यांनी त्याला मिठी मारली . ते म्हणाले, “दैवयोग असतात एकेकाचे, तुझ्या दैवाने तुला दिनू सारखा तुला मित्र मिळाला. काळजी घे. “. दत्ता घरी गेला. त्याने आईला समजावले व मधून मधून येण्याचे वचन दिले. त्याने जाताना नानांनाही नमस्कार केला. त्यानी कधी नव्हे तो हात वर करून आशीर्वाद दिला. . त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. कदाचित त्यांनी सांगोपांग विचार केला असावा.
आज दत्ता आणि दिनू यांचा ब्रह्मचाऱ्यांचा संसार नीट चालू आहे. दिनूच्या भावाची मुले येतात. त्यांना दत्ता काका फार आवडतात. ते मुलांना गोष्टी सांगतात् पण भुतांच्या नाही. मुले त्यांना दत्ता काका म्हणून खूप मानतात.
(संपूर्ण )
— अरुण गंगाधर कोर्डे
Leave a Reply