दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला असेलच ना की दिल्लीला दिल्ली हे नाव कसं पडलं असावं. नक्कीच हे एका शहराच नाव आहे पण त्यामागेही काही ना काही कथा, तथ्य तर असेलच ना. हो आहे ना… चला तर मग दिल्लीच्या नावामागचा इतिहास पाहू.
महाभारतातील संबंध :- दिल्लीचा सर्वात पहिला उल्लेख महाभारतात ‘इंद्रप्रस्थ ‘ या नावाने आढळतो. पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून भस्म करण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला पण तेथून पांडव सुखरूप वाचले आणि पुढे काही काळ अज्ञातवासात राहिले. याच कालावधीत अर्जुनने द्रौपदी स्वयंवर जिंकले. अर्जुन द्रौपदी विवाहबद्ध वाटत असतांनी माता कुंतीच्या शब्दामूळे पाचही पांडवांनी द्रौपदीशी विवाह केला हे सर्वांना ठाऊक असेलच. यानंतर पांडव पून्हा हस्तींनापूरला परतले. तेव्हा कौरावांनी या विवाहाच्या गोष्टीवरून पांडवांवर बरीच चिखलफेक केली. पितामह भीष्माने तेव्हाच समग्र हस्तींनापूरचा गृहकलहात विध्वंस नको म्हणून पांडवांना पाच गावाचे राज्य देण्यात यावे अशी विनंती महाराज धृतराष्ट्राकडे केली. गृहकलह नको म्हणून पांडवांना पाच गावाचे राज्य देण्यात आले. त्यात स्थळपत,सोनपत, पांडूप्रस्थ, बाघपत आणि इंद्रप्रस्थ ही गावे होती. पुढे इंद्राच्या कृपेने विश्वकर्माने पांडवांना महाल बांधून दिला आणि तेव्हा इंद्रप्रस्थ हे नाव रूढ झाले.
ऐतिहासिक :- दिल्लीचा प्राचीन ऐतिहासिक उल्लेख यानंतर गौतमी वंशात आढळतो. इसवी सन 800 मध्ये कन्नोज प्रांतातील गौतमी वंशातील राजा धील्लू हा दिल्लीवर राज्य करीत होता. याच्याच नावामुळे पुढे दिल्ली असं नाव पडलं असावं अशी शक्यता वर्तविली जाते. इतिहासाची पाने पलटवीत असतांना इसवी सन 1052 या कालखंडात तोमर वंशातील राजा अनंतपाल हा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या चलनाचे नाव ‘धेलीवाल’ असे होते. समोर याच धेलीवालचे धील्लू नंतर धील्ली आणि मग धील्लीका असे नामकरण झाले. इतिहासाचे प्रमाण म्हणजेच शिलालेख यामध्ये सुद्धा दिल्लीचे पूर्वी नाव धील्लू, धील्लीका असेच होते.
स्तंभाची रोचक कथा :- राजा अनंतपाल याची दिल्लीबद्दल स्तंभाची अख्यायिका फार प्रसिद्ध आहे. कदाचित यामुळेच दिल्लीला दिल्ली हे नाव मिळालं असं लोकांचं मत आहे. राजाच्या किल्यामध्ये एक वज्र स्तंभ उभा होता. तिथल्या ज्योतिष्याने हा स्तंभ जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत हे राज्य राहील अशी भविष्यावाणी केली. यामुळेच राजा अनंतपाल याला त्या खांबाबद्दल अधिक आकर्षण वाटू लागलं. आपल्या राज्याची कीर्ती, आपल्या राज्याचे अस्तित्व याच स्तंभावर अवलंबून आहे असे वाटू लागले. आपले राज्य म्हणजेच हा स्तंभ असा त्याचा समज झाला. म्हणून त्याने हा स्तंभ जमिनीत किती खोल आहे हे पाहण्यासाठी खोदकाम सुरु केले. हे खोदकाम बरेच दिवस चालू राहिले. या खोदकामामुळे तो स्तंभ पडणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. बरंच आत खोदल्यावर राजा अनंतपाल याला विचित्रच प्रकार दिसून आला. आत रक्त वाहत होते. तिथे अनेक नाग मरून पडले होते. राजा अनंतपालने त्या खड्यात अधिक भर टाकून तो स्तंभ मजबूत करण्यात कसलाही हलगर्जीपणा केला नाही पण आता तो खांब ढिल्ला झाला होता. या ढिलेपणामुळेच ढील्ली आणि पुढे दिल्ली असं नाव मिळालं. ही अख्यायिका जरी असली तरी याचा उल्लेख चंद बरदाई लिखित पृथ्वीराज रासोतही आढळतो. तो खांब अजूनही कुतूबमिनार शेजारी आजही उभा आहे.
इतिहासकार :- बरेच इतिहासकार याबद्दल वेगळी मते मांडतात. त्यांच्यानुसार देहलिज हा पारशी शब्द आहे. देहलिज म्हणजेच प्रवेशद्वाराचा उंबरठा.. दिल्ली हा अनेक नद्या, भौगोलिक सीमेच प्रवेशद्वार आहे. तो ओलांडल्याशिवाय देशात प्रवेशच मिळत नाही. म्हूणन देहलीजवरून दिल्ली असा युक्तिवाद दिला जातो. दिल्ली नावाबद्दल अधिक सांगायचे झाल्यास स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश पुस्तकात याची माहिती दिली आहे. त्यांच्या मते ढील्लू या नावाच पुढे ढिली, देहली, दिल्ली आणि अखेर देल्ही असं नामांतर झालं.
नवी दिल्ली :- इतिहासकरात दिल्ली नावाबद्दल जरी एकमत नसले तरी दिल्लीची नवी दिल्ली कशी झाली याबाबत एकमत आहे. 12 डिसेंबर 1911 मध्ये ब्रिटिश काळात राजे पंचम जॉर्ज यांनी दिल्ली दरबारात राजधानी कोलकत्यावरून दिल्लीला हलवण्याचा प्रस्ताव मांडला. 1911 मध्ये राजधानी कोलकत्यावरून दिल्लीला हलविण्यात आली. त्यानंतर ब्रिटिश आर्किटेक सर हरबर्ट बेकर आणि सर एडवीन लुटीयंस यांनी नव शहराची योजना आखली. ही योजना पूर्ण करण्यास वीस वर्ष लागले. 1926 मध्ये अधिकृतरित्या नवी दिल्ली असे एका भागाचे नामकरण करण्यात आले. ज्यानंतर 13 फेब्रुवारी 1931 मध्ये अधिकारिक रूपात दिल्ली देशाची राजधानी झाली.
निखील देवरे
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply