१९८४ सालातील गोष्ट आहे. अजय सरपोतदार या माझ्या काॅलेजमधील मित्रामुळे त्याच्या वडिलांशी, बाळासाहेब सरपोतदाराशी माझा संपर्क आला. त्यांनी ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटाची निर्मिती करुन तो ‘प्रभात’ टाॅकीजला प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या पेपरमधील जाहिराती व प्रिमियर शो चे निमंत्रण कार्ड आम्ही केलेले होते.
चित्रपटाच्या जाहिराती त्यांच्याच त्रिमूर्ती पब्लिसिटीकडून पेपरला जात होत्या. बाळासाहेबांकडे बारभाई नावाचे गृहस्थ जाहिरातींचे काम सांभाळायचे. या चित्रपटाच्या जाहिराती बारभाईंनी दर आठवड्याला बदलत्या ठेवल्या. रोज जाहिरातीला नवीन कॅप्शन काय द्यायची? यावर उपाय म्हणून त्यांनी देवीच्या स्तोत्रांच्या छोट्या पुस्तिका अप्पा बळवंत चौकातून खरेदी केल्या व त्यातील काही निवडक ओळी घेऊन रोजच्या बदलत्या जाहिराती आमच्याकडून करुन घेतल्या.
साहजिकच चित्रपटाला स्त्री प्रेक्षकांची तुफान गर्दी वाढली. नवरात्राच्या दिवसांत तिन्ही शो हाऊसफुल्ल होऊ लागले. चित्रपट रौप्यमहोत्सवी झाला. बाळासाहेबांनी चित्रपटातून झालेल्या मिळकतीतून मुंबईत दादर परिसरात नवा फ्लॅट खरेदी केला.
या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी बाळासाहेबांनी अनंत माने या ज्येष्ठ दिग्दर्शकावर पूर्णपणे सोपवलेली होती. त्यावेळी अशी पद्धत होती की, चित्रपट निर्मितीचा प्रिंट होईपर्यंतचा सर्व खर्च लक्षात घेऊन अनंत माने एक विशिष्ट रक्कम निर्मात्याकडून घेत असत. एकदा चित्रपटाचा मुहूर्त झाला की, प्रिंट हातात पडेपर्यंत निर्माता बिनधास्त राही. मात्र बाळासाहेब त्यातले नव्हते. ते नेहमीच सेटवर हजर रहायचे.
या चित्रपटात ‘चांगभलं रे चांगभलं, देवा जोतिबा चांगभलं’ हे प्रत्यक्ष जोतिबाच्या तीर्थस्थानी चित्रीकरण केलेलं ‘क्लायमॅक्सचं’ अप्रतिम गाणं आहे. भालचंद्र कुलकर्णी हा कलाकार जोतिबाची काठी खांद्यावर घेऊन हे गाणं सादर करताना दाखवला आहे. सोबत आशा काळे व कुलदीप पवार हे दोघेही डोंगर चढताना दाखवले आहेत. हे गाणं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आहे. संगीत विश्वनाथ मोरे यांचं व कॅमेरामन होते वसंत शिंदे.
आज जोतिबाच्या यात्रेचा दिवस. सहजच यु ट्युबवर ‘चांगभलं’ टाईप केलं तर ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ चित्रपटातील हे गाणं समोर आलं. आज छत्तीस वर्षांनंतरही ते जुनं वाटत नाही, कारण तो काळच तसा होता. प्रत्येक कौटुंबिक मराठी चित्रपटातून एका तरी तीर्थक्षेत्राचं दर्शन घडायचं. माणसं भक्तीभावानं चित्रपट पहायची. पडद्यावर देव दिसला की, नकळत हात जोडायची.
अशा चित्रपटांमधून अष्टविनायक, देवीची साडेतीन शक्तिपीठे, बारा ज्योतिर्लिंग, दत्तस्थानं, काळुबाई, नाथ म्हस्कोबा, वणीची देवी, इत्यादी तीर्थक्षेत्रांची दर्शनं झाली. हे चित्रपट साकारणाऱ्या आशा काळे, अलका कुबल, ऐश्वर्या नारकर अशा अनेक अभिनेत्री चिरकाल स्मरणात राहिल्या. कालांतराने मराठी चित्रपटाचं स्वरुपच बदलून गेलं. नवीन चित्रपटांच्या या लाटेमध्ये देवादिकांना स्थान अभावानेच दिसू लागलं. पिढीनुसार अभिरुचीही बदलून गेली आहे.
माझ्या पिढीने ‘सतीचं वाण’ पासून दहा वीस वर्षे जे मराठी चित्रपट पाहिले आहेत, ते अविस्मरणीय असेच होते. आज जोतिबाच्या यात्रेमुळे त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…
आज ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ चित्रपटातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते या जगात नाहीत, मात्र त्यांनी साकारलेलं हे गाणं रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात नक्कीच राहील….
© – सुरेश नावडकर २६-४-२१
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply