भाताचा इतिहास सांगितला होता तेंव्हा माझ्या एका जवळच्या मैत्रीणीने कमेंट्स मध्ये लिहिले आहे की पोळ्या बद्दल माहिती लिहा मी लगेचच हो म्हणून मोकळी झाले. आणि वर शहाणपणा केलाय तो म्हणजे पोळी बरोबर भाकरी पण हवीच ना. आता दिलेला शब्द मोडणे हे मात्र मला मान्य नाही म्हणून लिहिणार आहे. कारण आजारी पडण्यापूर्वी मी रोज सकाळी अर्धा तास लेख लिहून पाठवला की दिवस पुरायचा नाही लाईक कमेंट्स मध्ये पण आता मला दोन दिवस लागतात हळूहळू उठत बसत लिहित असते म्हणून..
भाजी पहावी देठात पोळी पहावी काठात असे म्हणतात. खरय अगदी पोळीचे काठ जर जाड असतील तर पोळी वातड होते खावी वाटत नाही म्हणून. पूर्वी पोळी त्रिकोणी लाटली जायची. आतून तेल लावून घड्या घालून आणि वरुन डालडा तूप लावून वाढले जाई. गोलमाल सुरू झाले तसे पोळी गोलाकार लाटली जाऊ लागली.
गव्हाचे अनेक प्रकार आहेत. जोड गहू. खपली गहू. बन्सीगहू. कल्याण सोना गुजराथी गहू. म्हणून गव्हाची सडून केलेली खीर. शेवया यासाठी. गव्हाच्या चिकासाठी वेगळा गहू वापरला जाई. गहू कोवळा असताना लोंब्या भाजून खातात. गिरणीत इतर काही दळणावर गहू दळला की पोळ्या बिघडतात. कणिक तिंबून कमीत कमी अर्धा तास तरी ठेवली तर पोळ्या मऊ होतात. पुरणपोळी करताना कणीक तिंबून नंतर पाण्याचा हात लावून दोन्ही हाताच्या मुठीने दाबून दाबून मग तेल लावून थोडा वेळ ठेवायचे म्हणजे पोळी लुसलुशीत होते. पण हल्ली मैदा घालतात ते यासाठीच ना. आणि पुरणपोळी. तीळगुळ पोळी. सांज्याची पोळी. खव्याची पोळी. प्रवासात शेंगदाणे गुळाची पोळी असे अनेक प्रकार आहेत पण सगळ्यात एकच नियम आहे तो म्हणजे पोळी काठात जाड नको. आणि आतील सारण सगळीकडे एक सारखे असायला हवे.यात अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे घरातील मुख्य करत्या बाईने सगळ्यांना सारखेच वागवले पाहिजे तरच सगळीकडे सारखाच गोडवा मिळेल. पुरणपोळी पोळपाटा वर तसेच एक प्रकारचा पत्रा असतो त्यावर तेल लावून हळुवार हाताने पोळी लाटून अलगदपणे तव्यावर सोडली की ती पातळ आणि लुसलुशीत होते. तर गुळाची किंवा खव्याची पोळी भाजताना फार काळजी घ्यावी लागते. नाहीतर पोळी कडवट लागते.
पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात. आता जमाना पोळी भाजीचा आहे मुलांना भाकरी भात तूप वगैरे आवडत नाही. मलाही रोजच्या जेवणात भाकरीच खूप आवडते. गोड असेल तर पोळी नाही तर नाही. शिळ्या पोळीचा लाडू फोडणीचा कुट्टा. . पराठे. तंदुरी रोटी. ठेपला.
आणि आपल्या मनांत श्रद्धा आहे असं एक म्हणजे मांडे. रुखवतात तर सगळेच गहू वापरावे लागतात. शिकवतांनाच मन लावून शिकले तर नकाशे होत नाहीत. आणि यंत्राचा वापर केला तर चव लागत नाही कारण हाताने पोळी करताना आई. आज्जी. बायको. बहिण अशा अनेक नात्याने प्रेम व मायेचीच चव असते. त्यामुळे पोळीला अनेक पदर सुटले पाहिजेत. हलके फुलके मात्र नको.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply