आज एक जुलै, जागतिक ‘डाॅक्टर डे’! माणसाला आजारपणातून, अपघातातून वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा एकच ‘देवदूत’ असतो, तो म्हणजे डाॅक्टर! आपण पेशंटला विश्वासाने त्याच्या हवाली करुन उपचार करायला सांगतो आणि तो डाॅक्टर आपला अनुभव आणि वैद्यकीय शास्त्राच्या आधारे पेशंटला बरं करतो.
पूर्वी राजे महाराजे आपल्या पदरी राजवैद्य ठेवायचे. ते नाडी परीक्षा करुन, जडीबुटीची औषध देऊन उपचार करायचे. कालांतराने आजारांवर नवीन औषधे निघाली. इंजेक्शन देऊन उपचार होऊ लागले.
पूर्वी खेडेगावातील कित्येकांनी कधी आजारासाठी इंजेक्शनं किंवा गोळीही घेतलेली नव्हती. इतके ते आयुष्यभर धडधाकट राहिले. नंतर कसदार अन्न राहिलं नाही, त्यामुळे जन्मापासूनच माणसाला आजार कायमचे चिकटले.
पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करुन आता लहान बाळांनाही कृत्रिम प्रोटीन पावडरचे डबे दिले जातात. फसव्या जाहिरातीतील बाळासारखं बाळ होईल, या खोट्या आशेने त्यांना चुकीचा आहार दिला जातो.
सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांसाठी डाॅक्टर अॅलोपॅथीची भरमसाठ औषधं लिहून देतात. काही डाॅक्टर अनुभवाने इतके हुशार असतात की, लहान मुलांना पाहूनच त्यांचे आजार ओळखतात.
पूर्वी प्रत्येक कुटुंबाचे एकच फॅमिली डाॅक्टर असायचे. त्यांना घरातील प्रत्येकाची जीवनशैली माहीत असायची. वंशपरंपरागत आजार माहिती असायचे. त्यामुळे त्यांनी केलेले निदान सहसा चुकायचे नाही. त्यांनी डाॅक्टरी हा व्यवसाय म्हणून न करता, रुग्णसेवावृत्ती जोपासली.
आम्ही सदाशिव पेठेत असताना डाॅ. पुराणिक यांनी माझ्या वडिलांच्या पायाच्या आजारावर सायकलवरुन घरी येऊन उपचार केले. काही महिन्यांनंतर त्या आजारातून ते पूर्ण बरे झाले. त्यांचा दवाखाना लक्ष्मी रोडला होता. काही वर्षांनंतर आईला वातविकार असताना त्याच पुराणिक डाॅक्टरांनी तीन महिन्यांचा इंजेक्शनचा कोर्स देऊन, तिला बरे केले.
त्या डाॅक्टरानंतर मंडई शेजारील रामेश्वर चौकातील डाॅ. शि. न. साठे आमचे फॅमिली डाॅक्टर होते. मला तापाने फणफणलेला असताना आई रिक्षाने त्यांच्याकडे घेऊन जायची. त्यांनी इंजेक्शन दिल्यावर आम्ही दोघेही घरी चालत येत असू, इतका त्यांचा उपचार रामबाण असे.
काही काळानंतर अशा डाॅक्टरांची पिढी नामशेष झाली. बालाजी नगरला रहायला गेल्यानंतर डाॅ. भागवत फॅमिली डॉक्टर झाले. त्यांनी वेळोवेळी उपचार करुन आजारातून कुटुंबातील सर्वांना बरे केले. डाॅ. जैन यांनी देखील माझ्या आजारांना गोळ्या, औषधांनी पळवून लावले.
समाजात असेही देवदूतरुपी उपचार करणारे असतात, ज्यांना नाव, प्रतिष्ठा, पैसा असं काहीही नको असतं. मला जेव्हा कावीळ झालेली होती, तेव्हा ऐकीव माहितीवरुन रमेशसह मी लोणावळ्याला गेलो होतो. सकाळी आठ वाजता तिथे उतरल्यावर, कावीळीवर औषध देणाऱ्यांची चौकशी केली असता तेथील नागरिकांनी ते ठिकाण दाखवले. आम्ही तिथे पोहोचण्याआधीच माणसांची भली मोठी रांग लागलेली होती. मी रांगेत उभा राहिलो. नऊ वाजता ते दुकान उघडले. त्या दुकानदाराने एकेका पेशंटच्या नाकात ड्राॅपरने ते आयुर्वेदिक औषध सोडण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासात सर्वांना औषध देऊन त्या दुकानदाराने आपला रोजचा व्यवसाय सुरु केला. काही दिवसांतच मी खडखडीत बरा झालो. त्या देवदूत दुकानदारास अशा लाखों रुग्णांचे आशीर्वाद नक्कीच लाभले असतील..
लातूर मधील एका खेडेगावात जन्मलेल्या डाॅ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या देवदूताने आजपर्यंत १,३५,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. कित्येक गरजू रुग्णांच्या डोळ्यांचे मोफत आॅपरेशन करुन त्यांना नवी दृष्टी दिलेली आहे.
याउलट शहरातील काही डाॅक्टरांच्या चुकीच्या उपचारांमुळे माझे मित्र प्रभाकर निलेगावकर यांना पोटाचे विनाकारण आॅपरेशन करावे लागले. सांगलीतील एका मित्राची चुकीच्या उपचारांमुळे कायमची दृष्टी गेली. कोथरुडमधील एका दातांच्या डाॅक्टरने लहान मुलीला, भूलीचा जादा डोस दिल्यामुळे तिला आपले प्राण गमवावे लागले.
सदानंद प्रकाशनचे सदानंद खाडिलकर जेव्हा अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांनी तिकडच्या डाॅक्टरांसंबंधीचे किस्से सांगितले. तिथे उपचारासाठी डाॅक्टरकडे गेल्यावर पेशंटला ज्या गोळ्या देतो, त्यातील एक गोळी स्वतःकडे पेशंटच्या नावानिशी ठेवतो. कधीकाळी, त्या उपचाराने पेशंटची समस्या उद्भवली तर त्याच्यापाशी तो पुरावा राहतो.
आता इंटरनेटमुळे कोणत्याही औषधांचे गुगलवर नाव टाकल्यावर त्या औषधासंबंधी संपूर्ण माहिती मिळते. त्या औषधांचे साईड इफेक्टही कळतात. त्यामुळे पेशंट अंधारात रहात नाही.
अलीकडे खेड्यातील बोगस डाॅक्टर, आलेल्या रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी आवश्यकता नसतानाही सलाईन लावतातच. चुकीचे सलाईन लावून पेशंटच्या जीवाशी खेळतात. त्यांच्याबद्दल कोणी तक्रार करीत नाही, त्यामुळे तुटपुंज्या ज्ञानावर हे बोगस डाॅक्टर स्वतःचे बंगले बांधतात.
सातारा शहरामधील काही हाॅस्पिटल ही उपचारासाठी येणाऱ्या पेशंटला कंगाल करुन सोडतात. रोज भरमसाठ औषधं लिहून द्यायची, ती त्यांच्याच मेडिकल शाॅपमधून पेशंटच्या नातेवाईकांनी खरेदी करायची. ती डाॅक्टरांच्या हवाली केल्यावर त्यांच्या स्टाॅकमध्ये ती जमा केली जायची. प्रत्यक्षात पेशंटला काय दिले जाते, हे कदापिही कळत नाही. यांचे ठराविक पॅथाॅलाॅजी लॅबवाल्यांशी संगनमत असते. कधी या डाॅक्टरांचे घरातील कोणी आजारी पडले तर ते स्वतःच्या हाॅस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी कधीही आणत नाहीत.
गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने जगाची उलथापालथ झालेली आहे. जे दवाखाने बंद पडण्याच्या मार्गावर होते, त्यांना या कोरोनामुळे संजीवनीच मिळाली आहे. काही डाॅक्टरांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णांना बरे केलेही, मात्र बहुतांशी रुग्णालयांनी व्यवसायच पाहिला. रुग्णांचा गैरफायदा घेतला. काही काळानंतर ही कोरोनाची लाट निघून जाईल, मात्र देवदूतरुपी डाॅक्टरांनी दिलेली साथ, समाज कधीही विसरणार नाही..
आजचा ‘डाॅक्टर डे’ ज्या डाॅक्टरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गौरवला जातो, ते भारतरत्न डाॅ. बी. सी. राॅय हे निष्णात डाॅक्टर तर होतेच, शिवाय प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, महात्मा गांधींचे निकटवर्ती होते. त्यांच्या तारखेचा योगायोग असा की, जन्म तारीख व मृत्यू तारीख ही १ जुलैच होती..साल होते, १८८२ व १९६२! या आदरणीय डाॅक्टरांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
१-७-२१.
Leave a Reply