सध्या व्याधिक्षमत्व हा परवलीचा शब्द आहे . कोविड १९ च्या काळात तर याला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . दिवाळीच्या आनंदाच्या काळात मधुमेहावर बोलणे जरा अवघडच ! पण तरीही ‘ आरोग्यं धनसंपदा ‘ हा मंत्र जपत आपणाला काही काळजी तर घ्यावीच लागणार .
व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती आपण म्हणू शकतो . एखादा आजार होऊ नये म्हणून शरीर स्वाभाविकपणे नैसर्गिक तत्त्वांनुसार स्वतःची काळजी घेत असते . तरीही एखादा आजार झालाच तर त्यापासून सुटका करण्याची शरीरातील पेशींची धडपड सुरू असते . या सर्वांचा अंतर्भाव व्याधिक्षमत्व या संकल्पनेत होतो .
गंमत अशी आहे की हे व्याधिक्षमत्व मोजता येत नाही . म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वजन साठ किलो आहे , हिमोग्लोबीन १२ ग्रॅम आहे तसे एखाद्याचे व्याधिक्षमत्व सांगता येत नाही . त्यामुळे संख्याशास्त्राप्रमाणे ते मांडता येत नाही . त्याचे सूत्र किंवा सुसंगत समीकरण सांगता येत नाही . अशा अनेक संकल्पना आहेत ज्यांना प्रत्यक्ष प्रमाण वा statistics मधे बसवता येत नाही . त्यामुळे एखाद्या संशोधनाने त्याची सत्यासत्यता मांडणेही कठीण जाते . म्हणूनच व्याधिक्षमत्वावर अनेक मतमतांतरे आपल्याला पहायला मिळतात .
पुस्तक वाचून पोहता येत नाही . त्यासाठी कधी ना कधी पाण्यात उतरावेच लागते . तुमचे व्याधिक्षमत्व कसे आहे याचा पडताळा आजार झाला किंवा आजाराचे संक्रमण आले तरच घेता येतो . अन्यथा आपल्याला अनुमानाने ते ठरवावे लागते .
माणसाच्या जन्मजात प्रकृतीपासून ते त्याने आहार – व्यायाम यांच्या जोरावर कमावलेल्या शरीरसंपदेपर्यंत सर्व गोष्टी याला कारणीभूत ठरतात . आधुनिक विज्ञानाप्रमाणे
१. Natural immunity आणि
२. Acquired immunity
असे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात .
Natural Immunity मध्ये जन्मजात प्रकृती , आहार , विहार आणि आचार यातून निर्माण झालेली नैसर्गिक प्रकृती या सर्वांचा समावेश होतो .
Acquired Immunity मधे लसीकरण , औषधे यातून मिळालेले व्याधिक्षमत्व आणि एखादा आजार होऊन गेल्यानंतर शरीरात निर्माण झालेल्या antigen antibodies यामुळे मिळणारे व्याधिक्षमत्व यांचा समावेश होतो .
या सर्वांसाठी कोणतेच statistics मांडता येत नाही . सर्वच निरनिराळया गोष्टींच्या परिपाकातून एकंदर परिणामस्वरूप ही घटना घडत असते . अगदी सर्वसमावेशक दृष्टीने पाहिले तर खालील पाचही मुद्यांचा यात अंतर्भाव व्हायला हवा :
१. शारीरिक
२. मानसिक
३. आध्यात्मिक
४. आर्थिक
५. सामाजिक
या पाचही दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला योग्य उत्तर शोधावे लागेल . म्हणून ते प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच वेगवेगळे असणार आहे . आज आधुनिक विज्ञान Personalised medicine व्यक्तिसापेक्ष औषधप्रणालीचा विचार करू लागले आहे . यासाठी देखील व्याधिक्षमत्वाचा वेगळ्या पातळीवर कार्यकारणभाव पहावा लागेल .
कोविड १ ९ च्या बाबतही लस आली म्हणजे सर्व प्रश्न सुटतील अशा भ्रमात कुणी राहून चालणार नाही . लसीकरण हा अनेक उपायातील एक उपाय आहे . त्यातही अनेक धोके , आर्थिक गणिते आणि आंतरराष्ट्रीय वाद आहेतच . आपल्या पारंपरिक आहाराला आणि आचार पद्धतीला चिकटून रहाणे आपल्याला जास्त सोपे आहे . त्याला औषधी आणि आयुर्वेदातील रसायन चिकित्सा यांची जोड देऊन आपल्याला लढण्यासाठी सक्षम बनविणे हा राजमार्ग आहे पुन्हा एकदा विनंती , वैद्यकीय उपचार हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत . व्हॉटस्ऍप युनिव्हर्सिटी किंवा अमक्या तमक्याच्या सांगण्यावरून उपचार करू नयेत .
असा व्याधिक्षमत्वाला खीळ घालणारा आणि तुमच्या कामावर पाणी फिरवणारा एक आजार म्हणजे डायबेटिस . साध्या शब्दात डायबेटिस म्हणजे रक्तात वाढलेली शुगर !
प्रोटीन्स- फॅट- कार्बोहायड्रेट आपल्याला आपल्या आहारातून मिळतात . शरीर आपल्या चयापचय क्रियेतून आपल्या पेशींना पाहिजे त्या स्वरूपात आणून त्यांचे नियोजन करते . या कामी शरीरातील वेगवेगळे enzymes Harmones यांना मेंदू सूचना देतो आणि बरोब्बर काम करवून घेतो . जोपर्यंत ह्या सर्वांमध्ये सुसंवाद असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असतं , आपण निरोगी असतो . परंतु एकदा बिघाड झाला की आजारपण आलेच समजा !
आपल्याला सर्व कामात जी ऊर्जा लागते ती प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात प्राप्त होते ज्या ज्या वेळी जास्त ऊर्जेची गरज निर्माण होते , त्या त्या वेळी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वेगवेगळ्या प्रक्रियेतून वाढविले जाते . हा ताण सतत येत राहिला आणि रक्तातली शर्करा सतत वाढत राहिली तर मात्र त्याचा परिणाम वाईट घडू लागतो . तो टाळण्यासाठी इन्सुलिन नामक स्राव रक्तात येऊन त्याचे नियंत्रण करू लागतो . त्याच्याही मर्यादेबाहेर जेव्हा हे काम जाते किंवा त्याच्या कामात काही बिघाड होतो त्यावेळी ग्लुकोजचे प्रमाण अवाजवी स्वरूपात रक्तात वाढत जाते . यालाच मग डायबेटीस असे म्हणतात.
अर्थातच हे वाढलेले ग्लुकोज अनेक जीवाणू आणि विषाणूंचे आयते खाद्य असते . मग त्यांच्या टोळ्या तुमच्या शरीरात स्थलांतर करून येथेच मुक्काम ठोकतात . ही मंडळी तुमचे संविधान मानत नाहीत . ते तुमच्या अंतर्गत कारभारात बंडाळी करतात . मग एकामागून एक तुमची सगळी आरोग्य व्यवस्था आजारी पडते . येथे आहे ना लक्षात ? वाढलेले ग्लुकोज शरीरातील संस्थांना आपले काम व्यवस्थित करू देत नाही . या सर्वांचा पुन्हा एकदा अतिरिक्त ताण शरीरावर पडतो .
मधुमेहाच्या उपचारातही काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजे . त्यातील प्रमुख औषधे ही रक्तातील शर्करेचे प्रमाण अवश्य कमी करतात परंतु शरीरावरील ताण किंवा इन्सुलिनचे स्रवण यात योग्य बदल करू शकत नाहीत . एका तऱ्हेने शरीराला आवश्यक असणारे ग्लुकोज फक्त कमी करतात . शरीरातील ग्लुकोज कमी होण्याची घटना वारंवार घडली की मेंदू या औषधींचा अंतर्भाव शत्रुपक्षात करतो . या शत्रुपक्षाचे सिग्नल्स सर्व पेशींना दिले जातात . बरेचदा रक्तात शर्करा वाढली तरी त्या व्यक्तीला त्याची जाणीव होत नाही . मात्र हायपोग्लायसेमिया झाला म्हणजेच शर्करा कमी झाली की लगेच कळते . ती लक्षणे पटापट निर्माण होतात .
रक्तातील शर्करा सतत कमी होत राहिली तर जिथे सातत्याने तिची गरज असते असे अवयव म्हणजे मेंदू , हृदय , यकृत आणि किडनी यांना आपल्या कामात ताण जाणवू लागतो . तसेच ज्यांना आपल्या पेशी पुन्हा तयार करता येत नाहीत अशा पेशी असणारे अवयव म्हणजे डोळ्यातील दृष्टिपटल , किडनीतील नेफ्रॉन मज्जासंस्थेतील न्युरॉन्स यांचे अपरिमित नुकसान होते .
ज्यांना इन्सुलीन बाहेरून पुरवले जाते त्यांना वेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागते . इन्सुलिन आयतेच मिळत असल्यामुळे त्यांच्या स्वादुपिंडातील संलग्न सिस्टीम आळशी बनत जातात . रक्तात इन्सुलिन आले की मेंदूला नेहमी वाटते की ग्लूकोज पुरेसे आहे आणि तो तसे सिग्नल शरीराला विशेषतः यकृताला देतो . यानंतर पूर्णच पचन संस्था आळसावते . जर यावर नियंत्रण आणता आले नाही तर मात्र हळूहळू व्याधिक्षमत्व फारच कमी होत जाते .
एकंदरीत डायबेटिसच्या बाबतीत स्वतः आजार आणि त्याचे औषधोपचार दोघेही व्याधिक्षमतांचे खच्चीकरण करण्यास कारणीभूत ठरतात . यासाठी डायबेटिस मध्ये शुगर एका ठराविक मर्यादित ठेवणे फार आवश्यक आहे . त्याचबरोबर कमीत कमी औषधांचा योग्य मात्रेत , योग्य प्रमाणात वापर करणेही महत्त्वाचे आहे .
औषधांची मात्रा कमी करण्यासाठी शरीर आणि मनावरचा अतिरिक्त ताण कमी करणे फार गरजेचे आहे . मनावरील ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी काही नियम घालून घेणे , ध्यानधारणा करणे , ठराविक आसनांचा अभ्यास करणे आणि त्यानंतर प्राणायाम या सर्वांचा अतिशय चांगला उपयोग होतो . सद्वृत्त पालन हे यासाठी फार आवश्यक आहे .
शरीरावर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी आहार प्रामुख्याने पारंपरिक आणि आपल्या प्रकृतीनुसार घ्यावा . जिभेच्या आवडीने खाणे टाळावे . खाण्याच्या वेळा पाळणे खूप आवश्यक आहे . बरेचदा आपले काम व्यवसाय यांचे कारण यासाठी दिले जाते . पण आपली सर्व धडपड सुखी जीवनासाठी आहे . त्यामध्ये आरोग्य हा फार महत्त्वाचा स्तंभ आहे . त्याच्यासाठी जेवणाची वेळ पाळणे वा सुधारणे नितांत आवश्यक आहे .
जेवणाच्या वेळी अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे ध्यानात ठेवून पूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करावे . जेवताना पहिला घास सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना सुखावेल अशा पद्धतीने खावा . म्हणजे जेवणातील तृप्ती लवकर होते आणि पुढील चयापचय क्रिया सुलभतेने होतात . जेवतानाच पुरेसे पाणी प्यावे . जेवणापूर्वी व नंतर अति पाणी पिऊ नये . जेवणाव्यतिरिक्त आपल्याला तहान लागल्याशिवाय पाणी पिऊ नये . डायबेटिसच्या पेशंटस् ना तहान जास्त लागते . जेव्हा तहान लागेल तेव्हा आचमन केल्यासारखे दोन ते चार घोट पाणी प्यावे .
शरीरावरील ताण कमी करण्यासाठी आहाराबरोबरच योग्य व्यायामाचीही गरज आहे . व्यायामामुळे शरीराला स्थैर्य येते . शरीरातील सर्व सिस्टिम्स उत्तम काम करतात . महत्त्वाचे म्हणजे शरीरावरील Oxidative load ताण कमी व्हायला मदत होते . आहार आणि व्यायाम यांचा समतोल ठेवला तर सर्वच पेशी उत्तम कार्य करू लागतात . मग मधुमेहच काय कोणताही आजार तुमच्या शरीरातून लवकरच पळ काढतो किंवा तुमच्या निरोगी शरीराकडे वळूनही पाहत नाही .
ही दीपावली आनंदाने आणि मजेत साजरी करा . मात्र तीन चार दिवस मजेत घालवताना महिन्याचे इतर सर्व दिवस सर्व नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे . व्याधिक्षमत्व किंवा निरोगी शरीर ही थोड्या काळात मिळणारी गोष्ट नाही . यासाठी सतत अभ्यास आणि सराव यांची गरज आहे .
आरोग्यं धनसंपदा ! शुभ दीपावली !!
वैद्य . श्रीराम शरद खाडिलकर ,
श्रीराम पंचकर्म ,
कट्टा , मालवण
९८६०८११४०९
Leave a Reply