रिझर्व बँक ऑफ इंडियाने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे. नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले.
पैशाचा इतिहास हा मानवी इतिहासाइतका जुना आहे. फक्त शिकार करून उदरनिर्वाह करण्याची माणसाची पद्धत होती, त्याकाळी पैशाची आवश्यकता नव्हती. मात्र माणसाने शेती करायला सुरुवात केली, पशुपालन करायला सुरुवात केली आणि तिथून पैसा या संकल्पनेचा जन्म झाला. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू किंवा अर्थशास्त्रात ज्याला वस्तू विनिमय असे म्हटले जाते अशा पद्धतीने ही व्यवहार केले जात असत, मात्र त्यात अडचणी आल्यानंतर विनिमयाचे काहीतरी माध्यम असावे या हेतूने पैशाची निर्मिती झाली. सुरुवातीला हत्तीचे दात ,कवड्या किंवा काही पशु यांचा पैसा म्हणून वापर झाला. प्रगतीनंतर पैसा हा नाण्यांच्या स्वरूपात अस्तित्वात आला. सुरुवातीच्या काळात सोन्याची नाणी, चांदीची नाणी ही पैशाचे काम करीत असत. या नाण्यांना राजमान्यता असे आणि त्याच्या किमतीबाबत राज्याने हमी घेतलेली असे. पुढे धातूंची नाणी आली आणि इंग्रजांच्या कालावधीमध्ये नाण्याच्या ऐवजी नोटा चा वापर सुरू झाला. या नोटा वेगवेगळ्या रकमेच्या असत आणि यावर किमतीची हमी घेतलेली असे. नोटांपासून डिजिटल रुपयांपर्यंतचा 1990 नंतरचा प्रवास हा अतिशय मनोरंजक आहे.
तत्पूर्वी पैशाच्या कार्यांबद्दल थोडेसे!
पैशाची कार्ये : पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे, पैसा हे मूल्यमापनाचे साधन आहे, एखाद्या वस्तू किंवा सेवेचे मूल्य ठरवताना पैशामुळे ते सहज शक्य होते, पैसा हा विलंबित देणे देण्याचे उत्तम साधन आहे. पैशामुळे संपत्तीचा साठा करता येऊ शकतो आणि संपत्तीचे हस्तांतरणही करता येते. पैशांच्या अंगभूत असलेल्या या कार्यामुळे मागील काही वर्षात पैशाच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. नाणे आणि नोटांच्या स्वरूपात असलेला पैसा हळूहळू चेकच्या स्वरूपात व्यवहारांमध्ये येऊ लागला. नोटा आणि नाण्या ऐवजी चेकने व्यवहार करणे सोयीचे ठरले. चेक मध्ये सुरुवातीला साधे चेक, नंतर एमआयसीआर (MICR) चेक आणि आताचे सिटीएस पद्धतीचे चेक्स असा चेक्स चा प्रवास सुरू झाला. दरम्यान नव्वदच्या काळात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या पैशाच्या नव्या स्वरूपाने आर्थिक क्षेत्रात पाऊल टाकले.
डेबिट कार्ड म्हणजे आपल्या खात्यात शिल्लक असलेले पैसे मिळण्या साठीचे कार्ड तर क्रेडिट कार्ड मध्ये कर्जाची विशिष्ट मर्यादा देऊन खर्चासाठी वापरता येणारे कार्ड. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने भारतामधील पैशाच्या आधुनिकीकरणाला सर्वात मोठा हातभार लावलेला आहे.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) या दोन संगणकीकृत सुविधांमुळे रोख पैशा ऐवजी सरसकट कार्डाचा वापर करता येणे शक्य झाले. दुकानांमधील खरेदी,ऑनलाईन खरेदी, एटीएम मधून अहोरात्र (24×7) मिळणारे पैसे ही सारी या दोन सुविधांचीच कृपा आहे. पैशा ऐवजी कार्डाचा वापर हे या कार्डाचे वैशिष्ट्य आहे, काही बँका तर आंतरराष्ट्रीय खरेदीसाठी देखील कार्ड देतात. डेबिट क्रेडिट कार्डमुळे नाणी आणि नोटा यांचे अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. आता याच्या पुढील टप्प्या बाबत भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विचार करत असून नजीकच्या काळात डिजिटल रुपया हा भारतात अस्तित्वात येईल. डिजिटल रुपयाबाबत सन 2022 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली असून त्याबाबत तयारी करण्यात येत आहे.
डिजिटल रुपयाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य
1) या डिजिटल रुपयाला भारत सरकारची आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाची मान्यता असल्यामुळे CBDC (सेंट्रल बँक बॅकड डिजिटल करन्सी) असे या रुपयाचे नाव असेल.
2) हा रुपया पूर्वापर नाणी किंवा नोटांच्या स्वरूपात नसेल, तर आभासी स्वरूपात (Digital Virtual) असेल. आपल्या खात्यामध्ये किंवा वॅलेट मध्ये हा दिसेल मात्र त्याला स्पर्श करता येणार नाही तो अदृश्य, अमूर्त स्वरूपात असेल.
3) या रुपयाच्या साहाय्याने भौतिक रुपया सारखी सर्व कामे करता येतील, खरेदी ऑनलाईन खरेदी सर्व प्रकारच्या पेमेंटसाठी या रुपयाच्या माध्यमातून खर्च करता येईल.
4) डिजिटल रुपयामुळे वेळेच्या बंधना शिवाय व्यवहार करता येतील सारे व्यवहार अहोरात्र (24×7)करता येऊ शकतील.
5) डिजिटल रुपया हा आभासी स्वरूपात असल्यामुळे या रुपयाच्या साठवणुकीसाठी बँकेच्या खात्यासोबत, अन्यवॅलेट्सचा सहजपणे उपयोग करता येईल.
6) बँकांना सध्या रोख पैशाच्या साठवणुकीसाठी आणि त्याच्या उपलब्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो हा खर्च डिजिटल रुपयामुळे पूर्णपणे वाचेल.
7) डिजिटल रुपयामुळे परदेशी चलनांचे व्यवहार अधिक गतिमान होऊ शकतील.
8) डिजिटल रुपया सोबतच सध्या अस्तित्वात असलेले चलन म्हणजे नोटा, नाणी तसेच चेक्स या साऱ्याच्या माध्यमातून व्यवहार करता येऊ शकतील.
9) डिजिटल रुपया आभासी स्वरूपात असल्यामुळे चोरीची भीती अजिबात राहणार नाही आणि पैशांच्या सुरक्षेततेसाठीचा खर्च वाचू शकेल.
10) डिजिटल रुपयाच्या माध्यमातून होणारे सारे व्यवहार हे डिजिटल स्वरूपात असतील आणि त्यामुळे त्यांची कायदेशीर नोंद असेल परिणामी काळ्या पैशांचे व्यवहार अजिबात होणार नाहीत.
पूर्व तयारी
डिजिटल चलनाची संकल्पना जगासाठी नवीन आहे. त्यामुळे जगातील मोजक्या देशांमध्ये सध्या डिजिटल चलनाद्वारे व्यवहार सुरू आहेत. अन्य देशांमध्ये यावर अजूनही संशोधन सुरू आहे.
भारतामध्ये हा डिजिटल रुपया सुरू करण्यापूर्वी त्याच्या व्यवहाराचे नियम ठरवावे लागतील, केवायसी बाबतचे नियम तसेच चलनाबाबतचे कायदे यामध्ये बदल करावे लागतील. बँकांच्या कोअर बँकिंग प्रणालीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करावे लागतील तसेच पेमेंटचे व्यवहार करणाऱ्या बँकेतर वित्त कंपन्या (नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीज) यांना देखील त्यांच्या व्यवहारात बदल करावे लागतील. त्यांच्या संदर्भातील काही कायदेही बदलावे लागतील.
ग्रामीण भागामध्ये डिजिटल रुपया ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील. डिजिटल रुपया हे भारतासाठी आर्थिक क्षेत्रातील महत्त्वाची क्रांती ठरेल.
(लेखक बँकिंग विषयाचे अभ्यासक आहेत.)
–डॉ. अभय मंडलिक
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply