दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच कवी अज्ञातवासी यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी करंजे पश्चिम महाराष्ट्र येथे झाला. दिनकरराव हे कवी , काव्यसंग्रह संपादक , तत्वज्ञानाचे अभ्यासक , म्हणून ओळखले जात असत. त्यांचे शिक्षण बेळगाव आणि पुणे येथे झाले . ते पुण्यात रहात होते. १९५० पासून ‘ अज्ञातवासी ‘ या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन सुरु केले. त्यांनी आणि कवी अनंततनय यांच्या प्रयत्नामुळे ‘ श्री महाराष्ट्र्र शारदामंदिर , पुणे ‘ ही संस्था सुरु झाली. दोन वर्षे या संस्थेत काव्य-साहित्यनिर्मिती आणि चर्चाविषयक कार्य त्यांनी केले परंतु सभासदांमध्ये मतभेद झाल्यामुळे अज्ञातवासी त्या संस्थेतून बाहेर पडले.
शारदामंदिरातर्फे दिनकर केळकर यांनी १९२३ साली ‘ महाराष्ट्रशारदा : भाग १ ‘ या संग्रहाचे संपादन केले . या संग्रहात परशुरामपंततात्या गोडबोले , कृष्णस्वामी चिपळूणकर यांच्यापासून ते त्यावेळच्या नव्या पिढीतील केशवकुमार , कवी अनिल यांच्यापर्यंत कवींची निवडक कविता समाविष्ट केली. याशिवाय १९२६ साली ‘ कविवर्य तांबे यांची कविता भाग २ ‘ , १९२५ साली ‘ झेंडूची फुले ‘ ह्याचे संपादनही त्यांचेच होते. त्याचप्रमाणे ह . स . गोखले यांच्या १९२७ साली आलेल्या ‘ काहीतरी ‘ या कवितांचे संग्राहकही तेच होते.
अज्ञातवासी यांची कविता महाराष्ट्राचे गतवैभव , मराठ्यांचे सामर्थ्य यांची उठावदार चित्रे रेखाटणारी , वर्तमानकालीन दुःस्थितीविषयी खंत व्यक्त करणारी ऐतिहासिक कविता , काव्य आणि रसिक , निसर्ग , वात्सल्य , प्रेम इत्यादी विषयी , जीवंचितांपरी , गूढगुंजनात्मक अशी रचना त्यांनी केली . त्यांच्या कवितेवर तांबे यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कवितेमधील शेवटच्या भागातील कविता १९८० नंतरच्या आहेत. अज्ञातवासी यांनी १९२४ साली ‘ अज्ञातवास ‘ तर १९३३ साली ‘ अज्ञातवासींची कविता भाग : १ ‘ प्रकाशित केली . तर १९८५ साली ‘ अज्ञातवासींची कविता भाग : २ ‘ प्रकशित केली , ह्याचे संपादन गोपीनाथ तळवलकर यांनी केले.
केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली मात्र मधल्या काळात म्हणजे १९२२ पासून त्यांनी एका खोलीत त्यांनी वस्तू संग्रहालय सुरु केले. दिनकर केळकर यांनी ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे काम हाती घेतले . अत्यंत टोकाच्या इतिहासप्रेमाच्या ध्यासामधून त्यांनी त्यांचा पुराणवस्तुसंग्रह केला आणि पुण्यातील बाजीराव रस्त्यावर सरस्वतीमंदिर आहे. त्याच्या शेजारच्या गल्लीमध्ये केळकर यांचे संग्रहालय आहे . त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे नाव राजा होते. त्याचे आकस्मिक निधन झाले. त्याची स्मृती म्हणून त्या संग्रहालयाला ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव त्यांनी दिले. यासाठी केळकर पती-पत्नींनी सतत भ्रमंती केली अल्पावधीतच त्यांची अडकित्तेवाले-दिवेवाले केळकर अशी ओळख तयार झाली. पत्नी कमलाबाई यांच्यासह त्यांचा वस्तुसंग्रहालयाचा संसारही रूप घेऊ लागला होता.
दिनकर केळकर ह्यांना संग्रहालयासाठी एखादी वस्तू मिळत आहे असे माहीत झाले, की कसलेही भान न ठेवता ती वस्तू मिळवण्यासाठी झटायचे. कमलाबाई यांनीही त्यांना त्यांच्या अशा धडपडीत मोलाची साथ दिली. त्यांनी प्रसंगी त्यांचे स्वत:चे दागिने विकून त्या बदल्यात तांब्या-पितळ्याची जुनी भांडी विकत घेण्यास केळकर यांना सहकार्य केले. छंद जपण्याच्या वेडेपणात साथ देणाऱ्या कमलाबार्इंमुळे केळकर यांनी संसाराची, तब्येतीची तमा न बाळगता शारीरिक , आर्थिक झीज सोसून , सुदंर ऐतिहासिक कालावस्तूंचा संग्रह केला आयुष्यभरासाठी संग्रहालयाचा ध्यास जपला. त्यातूनच एकवीस हजारांहून अधिक वस्तूंचा ठेवा असलेले केळकर संग्रहालय उभे राहिले. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर दिनकर केळकर यांनी ‘ वनिता वस्तुसंग्रहालयाची ‘ योजना कार्यान्वित केली. हा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्यशासनाच्या ताब्यात दिला . ह्या संग्रहालयात अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील अनेक प्रकारच्या चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या असा केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न होऊ लागला. कोथरुड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.
१९७९ साली हा अमोल ठेवा त्यांनी राज्यशासनाच्या ताब्यात दिला . ह्या त्यांच्या दातृत्वाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल पुणे विद्यापीठाने त्यांना ‘ डॉक्टरेट ‘ देऊन त्यांचा सन्मान केला. मला आठवतंय ते जिवंत असताना मी तेथे गेलो होतो कारण माझ्या आईचे मामा गोपाळ कारुळकर त्या काळात उत्तम रांगोळी , चित्रे काढायचे , त्यांनी त्यावेळी लोकमान्य टिळकांची धान्याने मोठी रांगोळी एका पुठ्ठयावर चिटकवून काढली होती , ती रांगोळी त्या संग्रहालयात त्या वेळी मी बघीतली होती. अर्थात त्यावेळी आईचे मामा जिवंत नव्हते परंतु केळकर यांना मी त्यावेळी तेथे जवळून बघीतले होते.
केळकर यांना संग्रहालयाच्या कामी त्यांची मुलगी रेखा हरी रानडे, ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब केळकर आणि कुटुंबीयांची विशेष साथ लाभली. केळकर यांनी त्यांचे स्वत:चे आयुष्य संग्रहालय कसे वाढेल, बहरेल, त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू कशा मिळतील यासाठीच व्यतित केले. त्यांचा मृत्यू १७ एप्रिल १९९० रोजी झाला.
Leave a Reply