काव्यसंग्राहक संपादक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुराणवस्तू संग्राहक असलेले दिनकर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी हे नाव ‘राजा दिनकर केळकर म्युझियम’ या संस्थेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेच. त्यांचे संपूर्ण शिक्षण बेळगाव व पुणे येथे झाले. ते वास्तव्याला पुण्यातच होते. राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरू होते.
दिनकर केळकर यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणूने ख्यातनाम झाले. १९१५ पासून ‘अज्ञातवासी’ या टोपणनावाने ते काव्यलेखन करत असत.
श्री महाराष्ट्र शारदा मंदिर, पुणे या संस्थेचे ते संस्थापक होते. शारदामंदिर तर्फे केळकरांनी महाराष्ट्र शारदा भाग १ या ग्रंथाचे संपादन केले. परशुरामपंत, तात्यासाहेब गोडबोले, चिपळूणकर, केशवकुमार ते कवी अनिल यांच्यापर्यंत कवींच्या निवडक कविता त्यात समाविष्ट आहेत. भा. रा. तांबे यांची कविता, ह. स. गोखले यांच्या ‘काहीतरी’ काव्यसंग्रहातील कवितांचेही ते संग्राहक होते. अज्ञातवासींची कविता ‘अज्ञातवास’, ‘अज्ञातवासींची कविता भाग १, भाग २’ या काव्य संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. निसर्ग, प्रेमविषयक, वात्सल्याने भारावलेल्या, जीवन चितनपर, गुढात्मक अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
केळकर यांचे काव्यसंग्रह त्यांच्या काळातील बी.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट होते. त्याचबरोबर त्यांनी अ.स. गोखले यांचा ‘काहीतरी’ काव्यसंग्रह, भास्करराव तांबे यांची कविता भाग २ चे संकलन, प्र. के. अत्रे लिखित ‘झेंडुची फुले’ या काव्यसंग्रहाचे संपादन-संकलन केले. त्यांनी आधुनिक कवींचा ‘महाराष्ट्र शारदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तो त्या काळी गाजला होता. केळकर यांनी त्यांच्या काही कवितांमधून त्यांना वस्तू देणाऱ्या दानशूर आणि अज्ञात व्यक्तींचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे.
नंतर पराकोटीच्या इतिहास प्रेमातून त्यांनी पुराणवस्तुंचा संग्रह जमविला व आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘राजा केळकर’ ह्या पुराण वस्तुसंग्रहालायाची निर्मिती केली. यासाठी दिनकर केळकरांनी व त्यांच्या पत्नीनी सतत भ्रमंती करून, आर्थिक झीज सोसून या ऐतिहासिक सुंदर अशा कलावस्तुंचा संग्रह केला. हा पुराण वस्तुंचा अमोल ठेवा त्यांनी १९७९ साली राज्य शासनाच्या ताब्यात दिला. आज मितीला केळकर संग्रहालय पाहण्यासाठी दिवसाला सरासरी तीनशेजण येतात. वर्षाला सव्वा ते दीड लाख लोक त्या संग्रहालयाला भेट देतात. संग्रहालयाची पूर्णवेळ देखभाल केळकर यांचे नातू सुध्नवा रानडे पाहत आहेत. संग्रहालयातील वस्तूंच्या जतनासाठी, विशेष लक्ष पुरवले जाते. केळकर यांनी तो अमूल्य संग्रह राष्ट्राची संपत्ती असून, राष्ट्रास अर्पण करावा या भावनेने १९७५ साली महाराष्ट्र शासनास भेट दिला.
दिनकर केळकर यांच्या इतिहास व संस्कृती संवर्धनातील भरीव योगदानाबद्दल त्यांना भारत शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. त्याचबरोबर संग्रहालय क्षेत्रातील विशेष कामगिरीकरता हैदराबादच्या ‘सालारजंग म्युझियम’च्यावतीने दिलेले पहिले सुवर्णपदक, इचलकरंजीच्या ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार, ‘इंडियन असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स’तर्फे करण्यात आलेला सन्मान, पुणे महानगरपालिकेतर्फे झालेला सत्कार, पश्चिम जर्मनीचा ‘इंडियन सेंटर फॉर एन्करेजिंग एक्सलन्स’ पुरस्कार असे विविध सन्मान त्यांना मिळाले. इतिहास क्षेत्रातील त्यांच्या या अपूर्व कार्याबद्दल १९७८ साली पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘डॉक्टरेट’ पदवी घेऊन त्यांचा गौरव केला.
दिनकर केळकर यांचे १७ एप्रिल १९९० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply