सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त होतो.
असो. आपल्या देशात सर्वच पातळीवर प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. काही स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या बाबतीत देशातील राज्या-राज्यात त्या दृष्टीने प्रचार आणि प्रसार होताना दिसतो पण प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे अनुभवास मिळत नाही. कदाचित मुंबईची किंवा एकंदरीतच देशातील लोकसंख्येच्या प्रमाणत त्यांच्या मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त असल्याने सरकारला स्वच्छतेच्या मुलभूत गरजा भागवता येत नाहीत असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. कारण याचा अनुभव मुंबईतील सर्व मार्गाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रोज येत असतो.
रेल्वे रुळांच्या दुतर्फा काही माणसे त्यांचे प्रातर्विधी उघड्यावर उरकतांना दिसतात यातून रोगराईला आमंत्रण देऊन साथीचे आजार वाढण्याची शक्यता बळावते. याला रेल्वे प्रशासनाकडून निर्बंध घातले जात असतील पण काही नागरिकांना याबद्दलच्या सोई-सुविधा मिळत नसतील किंवा कमी पडत असतील किंवा आळसापोटी अश्या कृती घडत असतील त्याला जबाबदार कोण?
लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये शौचालयाची सोय करून सर्व प्रवाश्यांच्या हिताचेच कार्य रेल्वे प्रशासनाने केले आहे त्याबद्दल धन्यवाद. रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार गाडीतील शौचालयाचा वापर मल/मुत्र विसर्जनासाठी शक्यतो गाडी चालू असतांना करण्यात यावा याचा अर्थ मल-मुत्र वाटेत कुठही पडले तरी चालेल असाच होतो ना? म्हणजे गाडी स्टेशनात थांबली असतांना होऊ नये. मग देशातील काही माणसांनी उघडयावर प्रातर्विधी केले की त्यांच्यावर दोषारोप केले जातात (उघडयावर प्रातर्विधी करणे हे अनैसर्गिक आणि चुकीचेच आहे). मग चालत्या किंवा थांबलेल्या गाडीतील मल-मूत्राचा उघडयावरील निचरा साथीच्या रोगास आमंत्रण देणार नाही का?
परंतू असे नैसर्गिक विधी माणसांच्या हातात नसतात. हेही मान्य की प्रवाश्यांनी त्याची काळजी घेणे जरुरीचे आहे. बऱ्याच वेळा असे पाहण्यात येतं की अश्या गोष्टी रात्री किंवा पहाटे गाडी स्टेशनात थांबली असतांना होताना दिसतात. हे ही खरं आहे की नैसर्गिक विधींवर कंट्रोल ठेवणे कठीण असतं.
मध्यंतरी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये टॉईलेटची व्यवस्था असावी अशी सूचना काही प्रवाश्यांनी केली होती. सूचना रास्त आहे पण त्यासाठी पुढे केलेल्या सूचना अमलात आणल्या तर नागरिकांच्या आरोग्याचा आणि त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होईल असे वाटते.
मुंबईतील सर्व रेल्वे प्रवासी रोज सकाळी रेल्वेस्थानकांवर मोठ्या संख्येने आपआपली गाडी पकडण्यासाठी उभे असतात त्यात पुरुष, स्त्रिया, विद्यार्थी, लहानमुले अनुक्रमे ऑफिस, शाळा/कॉलेजला गाठण्यासाठी स्टेशनांवरून थांबलेली असतात अश्या प्रवाश्यांना नाकावर रुमाल धरून उभे राहावे लागते. ही बाबा तर निषेधार्य आहेच पण याने आरोग्याचा आणि साथीच्या रोगांचा फैलाव होऊन नागरिकांचे स्वाथ बिघडण्यास कारण ठरू शकते. आपण एकीकडे हागणदारीमुक्त गावे निमार्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मुंबई सारख्या आर्थिक राजधानी आणि स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या मुंबईची अशी अवस्था पाहून मान शरमेने खाली झुकते. कारण याचा अनुभव परदेशीय पर्यटकांनाही येत असेल. याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तो सोडविण्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत. तसेच हा आपल्या देशाच्या अस्मितेचे प्रश्न आहे.
वरील गोष्टींना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाला काही सूचना कराव्याश्या वाटतात.
- प्रत्यके लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयाच्या खाली मल-मुत्र साठविण्यासाठी एक सेफ्टिक टाकीचा उपयोग करावा आणि ट्रेन जेंव्हा इंजिन बदलण्यासाठी, पाणी भरण्यासाठी, अन्य कारणांनी थांबतात किंवा अश्या टाक्या साफ करण्यासाठी थांबवून टाक्यांतील मल-मुत्र वेगळ्या सक्शन पंपाने काढून टाकी साफ करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांकडून निचरा केले गेलेले मल-मुत्र ट्रेन थांबलेल्या जागी किंवा चालत्या ट्रेनमधून दोन रुळात किंवा ट्रॅकमध्ये पडणार नाही. ज्यामुळे साथीच्या आणि संसर्गजन्य रोगराईला आळा बसेल.
- विमानाच्या स्वच्छतागृहात मानवी विष्ठा गोठवून त्याची बर्फाच्या गोळ्यात रुपांतरीत करण्याची यंत्रणा असते. हवाई उड्डाण क्षेत्रात या विष्ठेच्या गोळ्याला ‘ब्लू आईस’ असं संबोधलं जातं. विमानतळावर विमान उतरल्यावर त्याची विल्हेवाट लावली जाते. अशी किंवा वेगळ्या प्रकारची यंत्रणा आपल्याला लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये करता आली तर लांबपल्ल्याच्या ट्रेनच्या शौचालयातून निचरा होणारं मल-मुत्र इतस्ततः पडणार नाही आणि त्यामुळे रोगराईला आळा बसेल. यासाठी प्रवाश्यांकडून अजूनही याही पेक्षा चांगल्या, कमी खर्चाच्या आणि कमीत कमी वेळात अमलात आणण्यासारख्या सूचना मागवाव्यात.
या पत्राद्वारे माननीय रेल्वे मंत्री श्री.सुरेश प्रभू यांना विनंती की वरील सूचनेची योग्य ती दाखल घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही होईल अशी समस्त भारतीय नागरिकांची अपेक्षा आहे. कारण हा फक्त मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नसून समस्त देशवासीयांच्या आरोग्याचा आणि स्वच्छ रेल्वे प्रशासनाच्या अस्मितेचा आणि उच्च दर्जाची सेवा देण्याचा आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply