चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यवसायिक रंगभूमी तसंच सिनेमा, दूरचित्रवाणी आणि लेखन अशा क्षेत्रांमध्ये आपला स्वत:चा ठसा दिलीप प्रभावळकरांनी उमटवला आहे. ‘वासूची सासू’, ‘संध्याछाया’, ‘जावई माझा भला’, ‘घर तिघांचे हवे’ या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या होत्या. . एक झूंज वाऱ्याशी, कलम ३०२ आणि नातीगोती यासारख्या नाटकांमधील गंभीर भूमिका प्रभावळकरांनी जीवंत केल्या. नाटकांसोबतच त्यांनी ‘चिमणराव’ या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. दिलीप प्रभावळकर यांनी नेहमीच आपल्या अभियाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी एक डाव भुताचा, एक होता विदुषक, आपली माणसं, पछाडलेला, छक्की माणसं, झपाटलेला असे अनेक चित्रपट मराठीत दिले आहेत. त्यांच्या “चौकट राजा’, “रात्र आरंभ’ या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
दिलीप प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. ‘गुगली’, ‘हसगत’ या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
http://www.dilipprabhavalkar.com
Leave a Reply