लाडू-करंज्या-शंकरपाळी-उटणं-मोती साबण आणि दिवाळी अंक एवढ्या भांडवलावर मराठी मध्यमवर्गीयांची दिवाळी हमखास आनंदातच जायची.दिवाळी अंक वाचणारे लोक ‘सांस्कृतिक’ समजले जायचे. बऱ्याच अंशी ते खरंही होतं. दिवाळी अंक काढणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना किमान ‘समज होती. आता कुणीही उठून चार जाहिराती, हौशी बोरुबहाद्दरांचा मजकूर जमवतो आणि संपादक अमुक तमुक, असं बिरुद मिरवत दिवाळी अंक काढतो. महाराष्ट्रात आजमितीला वेगवेगळ्या विष्यांवरचे सुमारे 350 दिवाळी अंक निघतात; पण अशा अंकांचं शास्त्रशुद्ध सर्वेक्षण आजतागायत कुणी केलेलं नाही. यंदा मराठी दिवाळी अंकाच्या जन्माला 102 वर्षे पूर्ण झाली. खरोखर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो एवढं त्याचं महत्त्व आहे. 1909 सालच्या दिवाळीत 192 पृष्ठांचा ‘मनोरंजन’ हा पहिला मराठी दिवाळी अंक निघाला. का. र. मित्र (मूळचे आजगावकर) हे या बहुगुणी अंकाचे संपादक होते. या अंकाची किंमत 1 रुपया ठेवण्यात आली होती. श्रीमण्महाराणी चिमणाबाई साहेब, डॉ.रा. गो. भांडारकर, गोपाळ कृष्ण गोखले, लक्ष्मीबाई टिळक, बालकवी अशा मातब्बर मंडळींनी या अंकासाठी लेखन केलं होतं. ‘लोटस सोप डेपोकडे हे कूपन घेऊन येणाऱ्या इसमास लोटस साबणाची एक वडी बक्षीस मिळेल,’ अशा प्रकारच्या ‘फीड बॅक’ आजमावणाऱ्या छोट्या जाहिराती अंकात होत्या. लेख, कविता, चुटके, कोडी, प्रहसन, चित्रमालिका असा भरगच्च ऐवज असलेल्या पहिल्याच दिवाळी अंकास तुफान प्रतिसाद मिळाला. संपादकांना हुरूप आणि ते एकामागोमाग एक दिवाळी अंक काढत गेले. 2011 साली 190 ते 200 पृष्ठोपर्यंतच्या दिवाळी अंकाची किंमत 100 ते 130 रुपयांपर्यंत गेली आहे. 100 वर्षांपूर्वी संपादकांची, लेखकांची, जाहिरातदारांची आणि वाचकांची तीच रडगाणी आणि तोच उत्साह आजही कायम आहे. दिवाळी अंकांच्या या धंद्यात अकलेचे दिवे लावणारे आहेत आणि ज्ञान-संस्कृतीचा प्रकाश तेवत ठेवणारेही आहेत. सगळे जग गुण्यागोविंदाने मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेला पुढे नेत आहेत.
— डॉ. महेश केळुसकर
(अनघा प्रकाशनच्या खिरमट या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च 2017 मध्ये प्रकाशित झाले.)
Leave a Reply