१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री सेतु माधवराव पगडी यांनी लिहिलेला लेख
विद्यार्थी दशेपासूनच मला वाचनाचा सातत्याने नाद आहे. गेल्या पंचावन्न छपन्न वर्षात मी वाचून काढलेल्या पुस्तकांची संख्या पाच हजारापर्यंत जाईल. योगायोगाने मला दैनंदिनी ठेवण्याची सवय लहानपणा-पासूनच लागली. कोणतेही पुस्तक वाचून झाले की, मी पुस्तकाचे नाव, तारीख, विषय याची काळजीपूर्वक नोंदणीं लागलो. याबाबतीत माझी पहिली नोंद वयाच्या सोळाव्या वर्षी आहे.
कंटाळा न करता या नोंदी करण्याची लावून घेतली की ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या न्यायानेच कालांतराने आपण वाचलेल्या पुस्तकांची यादी किती डोळ्यात भरण्यासारखी आहे याची कल्पना येऊ लागली. इतके करूनही प्रवास, शासकीय सेवेतील दौरे, आजार इत्यादींमुळे काही पुस्तकांच्या नोंदी राहून गेल्या, हेही लक्षांत घ्यावे लागते.
आज इतक्या वर्षानंतर माझ्या दैनंदिनीचे गेल्या पंचावन्न वर्षांतील सातआठ खंड मी उडून पाहातो आणि पुस्तकांच्या यादीवरून नजर फिरवतो. तेव्हा मला पुनः प्रत्ययाचा अपूर्व आनंद लाभतो. इतकेच नव्हे तर ती यादी पाहिल्यावर अनेक पुस्तकांच्या संबंधी गोड आठवणी मनात पुन्हा जागृत होतात. एखादे विशिष्ट पुस्तक आपल्या हाती कसे पडले, कुणी दिले, ते वाचल्यानंतर आपल्याला काय वाटले, आपल्या ज्ञानात कशी वृद्धी झाली, विचारांच्या दिशा कशा रुंदावल्या अशा आठवणींचे जगच आपल्यासमोर उभे राहते. वाचनाच्या आठवणींचा इतिहासही माझ्या बाबतीत करमणूकीचा एक छंद बनला आहे. बऱ्याच भाषांचा अभ्यास मी केला असल्यामुळे माझ्या वाचनात इंग्रजी, मराठी, हिन्दी, संकृत, उर्दू, फारशी, बंगाली, कन्नड, आदिवासींच्या आणि क्वचित फ्रेन्च भाषेतील एकदोन पुस्तके असे ग्रंथ आहेत. मनुष्य कितीही बुद्धिमान असो आणि निरीक्षण कितीही सूक्ष्म असो. आधुनिक जगात ज्ञानाच्या वाढण्यास वाचनासारखे दुसरे साधन नाही. त्याला पर्यायच नाही. विषय कोणताही असो सतत वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याला एकदा वाचनाची सवय लागली म्हणजे तो कोठूनही धडपड करून ग्रंथ मिळविण्याच्या उद्योगास लागतो. अशावेळी ग्रंथालय, इतर मंडळी, प्राध्यापक आणि इतर अनेक बुद्धिमान माणसे यांच्या संपर्काचा उपयोग होतो. मला अनपेक्षितपणे कधीही न ऐकलेले आणि माहीत नसलेले ग्रंथ वाचण्याचा योग मुंबई विद्यापीठाचे ग्रंथपाल मार्शल, एन्डरसन, टिकेकर इत्यादींच्या मुळे येत गेला. अमकाच ग्रंथ पाहिजे असा मनाचा निश्चय नाही, पण वाचावे असे वाटावे अशा मनःस्थितीत एखादे चांगले पुस्तक हाती आल्यास बरे. हीच तेवढी इच्छा. त्यामुळे मिळाले ते पुस्तक वाचण्याची सवय लागली आणि विषयाची गोडी लागल्याने अनेक ग्रंथ अनपेक्षितपणे वाचून झाले. ह्याचे काही अनुभव निःसंशय उद्बोधक ठरतील. नुसती आत्मचरित्रे माझ्या वाचनात आली त्यांची संख्या अडीचशेच्यावर भरेल. त्यात पावणे दोनशे इंग्रजी, पन्नास मराठी, पंचवीस उर्दू, पाचसहा फारशी, इत्यादी भाषांतील ग्रंथ आहेत.
दोनशे इंग्रजी नाटके वाचून झाली. त्यामुळे नाटकांचा अभ्यास, नाटककरांची चरित्रे, युरोपिअन रंगभूमी हे विषय हातात आले. तोच प्रकार जागतिक राजकारण, युरोपा दिखंडांचे इतिहास, भारतीय संस्कृती इत्यादीवरील ग्रंथांच्या वाचनाचा अनुभव मला आला आहे. माझ्या स्वतःच्या बाबतीत वाचनाच्या सवयीमुळे बौद्धिक आत्मविश्वास निर्माण झाल्याचा नेहमी प्रत्यय मला येतो. चारचौघात बसलात आणि आपण वाचलेल्या ग्रंथावरून आपण माहिती सहजपणे देऊ लागलो की, श्रोत्यांच्यावर प्रभाव पडल्याशिवाय रहात नाही.
आता मराठी नाटकांचाच मी जेव्हा विचार करतो. तेव्हा अपुऱ्या माहितीमुळे मराठी रंगभूमीवर आलेली पूर्वीची नाटके किती तौटकी ठरत गेली याची कल्पना येऊ लागते. ऐतिहासिक नाटकेच घ्या. मराठीत आतापर्यंत रंगभूमीवर आलेली ऐतिहासिक नाटके सातआठशे तरी असतील. पण त्यापैकी आठवणीत राहणारी आठ दहा नाटके काय ती शिल्लक आहेत; बाकीचा ‘कचरा’ काळाने फस्त करून टाकला. हे असे का घडले? तर त्याचे उत्तर एकच, चार संवाद टाकले की नाटक यशस्वी होते, असे समजून लिहिणारे आणि सतत अभ्यास आणि ज्ञानवृद्धीकडे लक्ष देणारे नाटककार मराठी रंगभूमीला काही अपवाद वगळता मिळाले नाहीत. रंगभूमी खुजी का? तर नाटककार खुजे म्हणून आणि तो खुजा का तर त्याला वाचनाची किंवा ज्ञानसंपादनाची आवड नाही म्हणून. सगळा आनंदच होता. एकट्या संभाजीवर मराठीत चाळीस नाटके लिहिली गेली. त्यापैकी आज एकही नाटक कोणाच्याही आठवणीत नाही. शिवाजी महाराजांचा आपण एवढा जयजयकार करतो पण ज्या नाटकात शिवाजी महाराज नायक आहेत अशी दहा नाटके कुणीतरी दाखवून द्यावीत. ही खरी शोकांतिका आहे.
पण आता काळ पालटला आहे. आजचा नाटककार हे जाणून आहे की अभ्यासाला दुसरा पर्याय नाही. या पिढीतील नाटककार आज सुशिक्षित आहे, अभ्यासू आहे. भारतात तर त्याने चौफेर प्रवास केलाच आहे. त्याबरोबरच त्याने जगभर प्रवास केला आहे. परक्या संस्कृतीचाही त्यांनी अभ्यास केला आहे. अशांच्या हातून बाहेर पडणारे मराठी वाङ्मय तुलनेने पाहता पूर्वीच्या पिढीच्या साहित्याच्या मानाने किती विविध, किती आकर्षक, किती उद्बोधक बनले आहे याची कल्पना येईल. महाराष्ट्राच्या आधुनिक लेखकात अशीच सरस नावे कितीतरी सांगता येतील. पु. ल. देशपांडे, प्रभाकर पाध्ये, गंगाधर गाडगीळ, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, अशी एक की दोन मराठी साहित्याला आणि त्यातल्यात्यात रंगभूमीला अभ्यासू लोकांची परंपरा लाभली हे मोठे आशादायक लक्षण आहे. माझे प्रिय मित्र वसंतराव कानेटकर यांची ऐतिहासिक नाटके माझ्या वाचनात आणि पाहण्यात अनेकदा येतात. त्यांच्या नाटकातील कलेला जे गुण हवेत ते तर त्यांच्यापाशी आहेतच. पण नाट्यतंत्रामध्ये संवाद बसवत असताना वसंतरावांच्या सखोल अभ्यासाचा जागोजाग प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. मराठी रंगभूमीला त्यांनी शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, ताराबाई, इत्यादी एकाहून एक सरस अशी पात्रनिर्मिती करून भरघोस देणगी दिली. त्यांनी उभा केलेला औरंगजेब तर दीर्घ अभ्यासावर उभारलेला आहे. समकालिनांनी लिहिलेले इतिहास, शासकीय पत्रव्यवहार, चरित्रे, आत्मचरित्रे, मोगल दरबारच्या दैनंदिन्या, साप्ताहिक वृत्ते इत्यादी प्रचंड साधनांचा त्यांनी केलेला अभ्यास मनावर ठसा उमटवून जातो.
समर्थ नाटककार म्हणजे समर्थ रंगभूमीची पहिली पायरी होय. समाज प्रबोधनाच्या एका एका अंगाचा विचार करताना आपल्याला वाचनाच्याद्वारे ज्ञानसाधना हे किती प्रभावी शस्त्र आहे याची कल्पना आली तर सगळा समाज वर आणावयाचा तर ही साधने वाढीस लागतील अशी व्यवस्था होणे अगत्याचे आहे. महाराष्ट्रात साक्षरता आज शेकडा तीस आहे. तिचा प्रसार होऊन सगळा महाराष्ट्र साक्षर झाला आणि बोलू, वाचू-लिहू लागला तर समाजात किती आमूलाग्र बदल होईल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. त्या क्रांतीच्या दिशेने आपल्या देशाची पावले निश्चितच पडत आहेत. ज्ञानोपासनेच्या या यज्ञात सगळेच सहभागी आहेत. त्याचे एक प्रतीक म्हणजे संमेलन आणि या संमेलनाच्या पाठिशी उभे राहिलेले साहित्यसेवक हे होत.
वसंतराव कानेटकरांच्या एकंदरीत साहित्यसेवेचा आढावा इतर लोक घेतील पण मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांच्या साहित्य-सेवेची बैठक ही वरवरची आणि उडत उडत केलेल्या प्रयत्नांवर आधारलेली नसून ती सखोल अभ्यासातून आणि जाणीवपूर्वक केलेल्या ज्ञानोपासनेवर अधिष्ठित आहे ही होय. अशा या तडफदार आणि रसिक साहित्यिकाच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते. कानेटकर कुटुंबाशी माझे संबंध आजचे नाहीत. १९२२ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी मी पुण्याच्या नानावाड्याच्या शाळेत शिकत असता शाळेच्या वसतिगृहात मी तीन वर्षे होतो. वसतिगृहाचे संचालक थोर पंडित कवी आणि रविकिरण मंडळाचे सदस्य कै. माधवराव पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन हे होते. ह्याच मंडळाचे सदस्य कवी शंकरराव कानेटकर उर्फ गिरीश म्हणजे वसंतरावांचे वडील होत. त्यावेळी गिरीशांचे काव्य वाचन मी अनेक वेळा ऐकले आहे. वसंतरावांना मी ते दोन अडीच वर्षीचे असताना पाहिल्याचे आठवते. अशा रितीने कानेटकरांच्या दोन पिढ्या माझ्या नजरेसमोर आहेत. माझ्या या तरुण मित्राच्या हातून यापुढेही भरघोस साहित्य सेवा घडत राहो ही याप्रसंगी शुभेच्छा.
— सेतु माधवराव पगडी
तत्कालिन पत्ता : ‘वसुधा’, बाबा पदमसिंग रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ८१.
१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री सेतु माधवराव पगडी यांनी लिहिलेला लेख
Leave a Reply