नवीन लेखन...

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी झाला.

वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या जवळपासच्या देवळांमध्ये ‘भक्तिसंगीत’ म्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’ प्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या ‘शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासाला’ सुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते…

साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला ‘शास्त्रीय संगीत’ शिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या ‘श्रीराम संगीत विद्यालय’मध्ये प्रवेश मिळवून ‘शास्त्रीय संगीत’ हा त्यांचा ’ऐतिहासिक प्रवास’ खऱ्या अर्थाने सुरू झाला.

वसंतराव देशपांडे यांनी ‘हिंदी चित्रपट संगीत’ फारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची ‘गायनकला’ जाणून ‘भालजी पेंढारकर’ यांनी ‘कालियामर्दन’ या त्यांच्या चित्रपटात ‘कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण’ करण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकार’ म्हणून ते गाजले.

बेगम अख्तर त्यांना आदराने ‘गुरुजी’ संबोधित करत, यातच त्यांची ‘यशस्वी कारकीर्द’ दिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत ‘गझल व ठुमरी’ या संगीत प्रकारातील ‘एक प्रस्थापित गायक’ ही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ‘ख्याल गायकीची संधी’ त्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!

‘ग्वालियर घराण्याचे’ अधिकृत शिक्षण घेत असतानाच ‘किराणा व भेंडीबजार’ या घराण्याच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण चीजा’ वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, पु.ल. देशपांडे यांनीच ‘अनेक उस्ताद’ असणार्या. या ‘शागीर्द’ला ‘एकलव्य’ ही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायक’ हा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या ‘उस्तादांच्या कृपेने’ त्या प्रत्येकाच्या ‘घराण्याच्या गायकीतील सत्व’ आपल्या गळ्यात उतरवून ‘स्वत:च्या खास अशा गायकीला’ जन्म दिला. ‘पंडित दीनानाथ मंगेशकर’ यांच्या ‘संगीत नाटकांचा’ तो काळ होता. त्यांची ‘स्टाईल’ वसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळत’ त्यांनी आपल्या गायकीमध्ये ‘दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना ‘सार्थ अभिमान’ होता, हेही विशेषच!
वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले.

लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी ‘आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळा’ या संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात ‘अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना’ यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे ‘गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉं’ या बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ‘ठुमरी व गझल’ या गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केला. याच काळात त्यांना ‘असद अली खॉं’ नामे एका फकिराच्या गाण्याने मोहित केले. ते एका जमान्यात ‘पतियाळा घराण्याचे गायक’ असल्याची माहिती मिळताच वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. मग जवळपास सहा महिने केवळ ‘मारवॉं’ हा एकच राग त्यांच्यापाशी शिकले.

१९४२ मध्ये लाहोरहून परतल्यावर मग त्यांनी अर्थार्जनासाठी पुण्यात ‘मिलिटरी अकौंटस’ खात्यात नोकरी व संगीतसाधनेसाठी ‘पंडित सुरेशबाबू माने’ यांचे शिष्यत्व (१९४२-१९५२) पत्करले. मग त्यांना ‘भेंडीबजार घराण्याच्या उस्ताद अमजद अली खान’ यांचे मार्गदर्शन लाभले. याच काळात त्यांनी जवळपास ‘८० मराठी व २ हिंदी’ चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. पुण्यातील वास्तव्यात त्यांना ‘पु.ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पंडित भीमसेन जोशी व बेगम अख्तर’ या दिग्गजांचा सहवास लाभला व शेवटपर्यंत हेच त्यांचं ‘अत्यंत जवळचं व लाडकं मित्रमंडळ’ राहिलं! ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकाने ‘पंडित वसंतराव देशपांडे व अभिजात संगीत’ यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर आणले व याच नाटकाच्या माध्यमातून त्यांना ‘अमाप प्रसिद्धी व रसिकाश्रय’ लाभला.

१९६७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि ‘नाटक, नाट्यसंगीत व अभिजात संगीत’ रसिकांनी हे नाटक अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. यातील ‘खानसाहेब ही व्यक्तिरेखा’ रसिकांच्या मनात इतकी ‘भरली, ठसली व सामावली’ की त्यांना पु.ल. देशपांडे यांनी बहाल केलेली ‘वसंतखॉं देशपांडे’ ही पदवी ‘खुशीखुशी व आनंदे’ ‘स्वीकारली, रुजवली व संबोधली’, असे उदाहरण एकमेव! या नाटकातील ‘खानसाहेब’ या व्यक्तिरेखेच्या पदांना चाली लावताना ‘पंडित जितेंद्र अभिषेकी’ यांच्या मनात ‘पंडित वसंतराव देशपांडे ही व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाईल’ होती, हे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही! १९६७ ते १९८१ या १४ वर्षांच्या कालावधीत या नाटकाचे जवळपास ५२७ प्रयोग झाले यावरूनच ‘वसंतरावांच्या गायकीची जादू व रसिकाश्रय’ याची प्रचीती येते. यासोबतच दूरदर्शनसाठी त्यांनी गायलेली ‘अवीट गोडीची भजने व सुगम संगीत’ रसिकांच्या ओठांवर रुळलेले होतेच.

‘अष्टविनायक’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी ‘आजही गणेशोत्सवात’ आपलं अस्तित्व टिकवून आहेत. कारण त्या तोडीची अवीट ‘गणेशवंदना’ आजतागायत तयार झालीच नाही, हेच खरं. किंबहुना म्हणूनच ‘नाटक, चित्रपट व संगीत रसिक’ व रसिकोत्तर सामान्यांच्याही हृदयात वसंतरावांचं अढळपद चिरंतर आहे. १९६५ साली त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं उर्वरित आयष्य ‘भारतीय शास्त्रीय संगीत’ सेवेला वाहून टाकलं! १०६७ ते १९७७ हा दहा वर्षांचा अतिशय मोठा कालावधी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने व्यापून टाकल्याने रसिकांना वसंतरावांच्या ‘शास्त्रीय संगीत साधना’ याचा हवा तेवढा लाभ मिळू शकला नाही, ही खंत आजही आहे. परंतु ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ सोबतच त्यांच्या या त्यांच्या ‘ऑडिओ सीडी व डीव्हीडी’ बंदिस्त ‘रागदारी मैफली’ रसिकांच्या संग्रही असून त्यांची ‘अभिजात संगीताची’ भूक, मन व कान’ तृप्त करत आहे.

१९८३ मध्ये वसंतराव देशपांडे यांना संगीत कला अकादमी पुरस्कार’ प्राप्त झाला. वसंतराव देशपांडे यांचे नातू ‘राहुल देशपांडे’ यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या यशस्वी सादरीकरणानंतर ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक पुनश्चश रंगभूमीवर सादर केले आहे, त्या मुळे पुन्हा संगीत नाटकांना पुनश्चय चांगले दिवस येत आहेत. वसंतराव देशपांडे यांचे ३० जुलै १९८३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ नितीन देशपांडे

वसंतराव देशपांडे यांचे गायन.




संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..