डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला. त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात.
‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प, नाट्यीकरण प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवले होते. राज्य विश्वकोश मंडळाची अध्यक्षा म्हणून त्या काम बघत असताना त्यांनी तेव्हा सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे २० खंड माहितीच्या महाजालात (इंटरनेटवर) आणले. त्यामुळे १०५ देशातील लाखो वाचकांपर्यंत विश्वकोश पोहोचण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यातील शाळा-शाळांमधून ‘विश्वकोश वाचन स्पर्धा’ आयोजित केल्या. ‘बालकोश’, ‘कुमारकोश’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विश्वकोश, कुमार कोश ‘बोलका’ (ऑडिओ स्वरूपात) केला.
आपल्या मुली वाढविताना, दहावी आता बिनधास्त, निबंधरचना तंत्र आणि मंत्र, गप्पागोष्टी, घर अंगण, गृहविष्णू आणि इतर कथा, मनमोर, मी वेणू बोलतेय…, प्रिय हा भारत देश, सावित्रीच्या लेकी, सय, उत्तम शिक्षक होण्यासाठी…, विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर, झंप्या झिम्माडे, आपली माणसं, बाल निसर्गायन, बिट्टीच्या बारा बाता, छोटुली छोटुली गाणी, डॅनी डेंजर, ढ, दिव्याचे दिव्य, किंजल, क्षणिका, मनाची उभारी, निरभ्र आणि श्रीगणेशा, ओजू एंजल, टिंकू टिंकल, तिसरी घंटा, आपली मुलं, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड या त्यांच्या कन्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply