दक्षिण भारतात शेवग्याची झाडे अधिक प्रमाणात पहायला मिळतात. साऊथ इंडियन “सांबार’मधे शेवग्याची शेंग हमखास घातलेली असते. नजीकच्या काळात आहारशास्त्रीय जगात शेवग्याला फार महत्त्व लाभले आहे. शेवग्याच्या शेंगेला “वंडर स्टीक’ तर झाडाला “ट्री फॉर लाईफ’ असे संबोधले जाते. कारण आहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व या झाडाची पाने हे पौष्टीकतेत अतिशय समृद्ध पातळीवर आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या पाल्यामधे संत्र्याच्या सातपटीने अधिक “क’ जीवनसत्त्व आहे, दुधाच्या चौपट कॅल्शियम आहे व केळ्याच्या तिप्पट पोटॅशियम आहे. दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून कितीतरी पटीने अधिक बेटाकेरोटीन यात आहे. शेवग्यास “पॉवर हाउस ऑफ मिनरल्स’ यासाठीच म्हटले जाते.
शेवग्याच्या शेंगेतही “क’ जीवनसत्त्व, केरोटीन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषणतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. ती रक्त शुद्ध करणारी आहे तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत व प्लीहा ह्यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. 100 ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ 0.1% चरबी असून चोथ्याचे प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक लाईफस्टाईल डिसिजेस मधे (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, गाऊट इ.) शेवगा पथ्यकारक ठरतो. 1 वाटी (50 ग्रॅम) शेवग्याच्या आमटीत 59 कॅलरीज, 0.8 ग्रॅम प्रोटिन्स व 2.2 ग्रॅम्स फॅट्स असतात. 1 वाटी सांबार मधे 87 कॅलरीज, 3.7 ग्रॅम प्रोटिन्स व 2.8 ग्रॅम फॅट्स असतात.
एकूणच भारतीय आहारात शेवग्याच्या शेंगेचं आपलं म्हणून एक स्थान आहे. शेवगा आहारात अगदी रोज वापरला तरी हरकत नाही, असं सांगितलं जातं. याचं मुख्य कारण आहे त्याचे औषधी गुणधर्म. शेवगा गरम, हलका, मधुर, तिखट, अग्निप्रदीपक, रुचकर, दाहकारक, वीर्यवर्धक, पित्त वरक्त प्रकोपक असून, शेवग्याची भाजी वातविकार दूर करणारी आहे. शेवग्याच्या मुळांचा रस काढून किंवा त्याच्या कढय़ात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात.
शेवग्याच्या फुलात ‘प्टेरोगोस्परमीन, पाल्मिकएसिड, स्टेईक अॅसिड, बेटेनिक अॅसिड,ओलेईक अॅसिड हे घटक असतात. तसंच टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रतिजैविक असतं. पानातील रसामध्ये जीवाणूनाशक तत्त्व असतं. खोडातून एक भु-या रंगाचा डिंक मिळतो. तसंच बियांमधून रंगरहिन तेल मिळतं. शेवग्यात मोठया प्रमाणात खनिजं आढळतात. शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’, ‘क’ आणि ‘ई’ तयार करतात. पाणी शुद्धीकरणात शेवग्याच्या बियांचा वापर होतो.
ही यादी खूप मोठी आहे. शेवग्याच्या पानांचा रस प्यायल्याने उचकी थांबते व धाप लागणं कमी होते. शेवग्याच्या पानांच्या रसात चमचाभर साखर घेऊन तो तीन दिवस प्यायल्याने वायूने आलेला गोळा नाहीसा होतो. शेवग्याच्या पानांच्या रसाने डोकं चोळलं असता डोक्यातील कोंडा निघून जातो. मस्तकशूळ झाला असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावावा. पोट फुगलं असल्यास शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा तयार करून त्यात हिंग व सुंठ घालून तो प्यावा.
शेवग्याच्या पानांच्या रसाचा काढा करून त्यात मिरे, संधव व पिंपळीचं चूर्ण घालून प्यायल्याने प्लिहोदर बरा होतो.
वायूचा प्रकोप होऊन शरीरात कुठंही दुखत असल्यास शेवग्याच्या काढय़ात सुंठ व हिंग घालून प्यायल्याने वेदना थांबते. शेवग्याच्या पानांच्या रसात मध घालून डोळ्यांत घातल्याने डोळे दुखणं थांबतं. मस्तकात वेदना होत असल्यास शेवग्याचा डिंक दुधात वाटावा आणि त्याचा लेप मस्तकावर लावावा. त्यामुळे वेदना कमी होतात. मिरपूड व शेवगा बारीक कुटून एकत्र करून हुंगल्यास शिंका येऊन डोकेदुखी दूर होते. गर्भवतीने आहारात शेवग्याच्या भाजीचा वापर केल्यास गर्भाची वाढ चांगली होते. शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ल्याने भूक लागते, तोंडाला चव येते. शेवग्याच्या शेंगांचा जेवणात वापर होत असल्याने त्यांना बाजारात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. शेवग्याने अनेक औषधी गुण पाहता त्यांना पौष्टिक कॅप्सुलच म्हणायला हवी.
आरोग्यम् धनसंपदा
Leave a Reply