शरीरसंबंध ठेवताना अपत्यमार्गात कोरडेपणा असणे ही कित्येक स्त्रियांची तक्रार असते. विशेषतः नवविवाहित वा नुकतेच बाळंतपण झालेल्या महिलावर्गात ही तक्रार विशेषतः आढळते. या कोरडेपणामुळे शरीरसंबंध ठेवण्यास अडचण निर्माण होत असल्याने कित्येकांसाठी हा फार काळजीचा विषय असतो. आजही अशा विषयांबाबत उघडपणे बोलण्याची आपली मानसिकता नसल्याने या अडचणींवर एकतर काहीच उपाय न शोधणे वा स्वतःच्या बुद्धीने काही उपाय करत राहणे हे मार्ग अवलंबले जातात.
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की; अपत्यमार्गाचा कोरडेपणा हा प्रणयाशी (Foreplay) संबंधित आहे. योनीमार्गात स्रवला जाणारा द्रवपदार्थ हा कामेच्छे शी संबंधित असून प्रणयक्रियेमुळे योग्य प्रमाणात स्त्रवत असतो. त्यामुळे याविषयी तक्रार असणाऱ्या व्यक्तींच्या जोडीदाराने शरीरसंबंध ठेवताना प्रणयक्रिया योग्य कालावधीसाठी होईल याची काळजी घ्यावी. कित्येकदा या अडचणींवर उपाय म्हणून खोबरेल तेलाचा वापर जोडप्यांकडून केला जातो. मात्र; असा वापर करताना आपण निरोध वापरत असल्यास त्याला इजा पोहचण्याची शक्यता असते हे लक्षात घ्या. शिवाय आपण मूल व्हावे अशा प्रयत्नांत असाल तर तेलाच्या वापराने शुक्राणू मरतात ही गोष्ट कायम लक्षात असू द्या.
कित्येकदा यावरील उपाय म्हणून ल्युब्रिकंट्स चा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे ल्युब्रिकंट्स आज ऑनलाइनदेखील उपलब्ध आहेत. मात्र ते वापरण्यापूर्वी पुढील मुद्दे लक्षात घ्या. सर्वप्रथम तो ल्युब्रिकंट कोणत्या प्रकारचा आहे हे पाहणे महत्वाचे असते.
१. Oil based lubricants हे वर उल्लेख केल्याप्रमाणे निरोधासह वापरता येत नाहीत.
२. Water based lubricants हे निरोधासह वापरण्यास योग्य असतात.
३. Silicon based किंवा water based lubricants मध्ये कित्येकदा ग्लिसरीनचा उपयोग केलेला असतो. यामुळे योनीमार्गात संसर्ग होण्याची भीती असते.
४. Flavoured lubricants मध्ये अनेकदा sugars चा वापर होतो. यामुळेदेखील योनीमार्गात जंतूसंसर्ग होऊ शकतो.
वरील सर्व गोष्टी नीट लक्षात घेता; अपत्यमार्गातील कोरडेपणा या तक्रारीवर प्रणयाचा कालावधी वाढवणे हा उत्तम उपाय ठरेल. त्याने लाभ न झाल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा. व्यतिरिक्त क्वचित प्रसंगी ल्युब्रिकंट्स चा उपयोगदेखील करता येईल; मात्र तोदेखील वैद्यकीय सल्ल्यानेच!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचारतज्ज्ञ आणि विवाहपूर्व समुपदेशक
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
17 February 2017
Leave a Reply