नवीन लेखन...

ड्यूटी ऑफीसर

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या साच्यातून ” mould ” होऊन pass out झालेल्या पोलिस सब इन्स्पेक्टर चे बेसिक फिल्ड ट्रेनिंग झाले की त्याचा कस पाहणारी आणि त्याला पूर्णत्वाने “पोलिस ” म्हणून घडवणारी त्याची “स्टेशन हाऊस ऑफिसर ” ही ड्यूटी चालू होते. त्यालाच थोडक्यात ” ड्यूटी ऑफिसर ” म्हणतात . ही ड्यूटी सर्वसाधाणपणे सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशा दोन पाळ्यात चालते.
पोलिस सब इन्स्पेक्टर पोलिस स्टेशनमधे आल्या आल्या प्रथम “चार्जरूम”मधे नजर टाकून युनिफॉर्म चढवण्यासाठी Officer’s Room कडे जातो. आठ वाजण्या आधी काही मिनिटे तो पोलिस ठाण्यात हजर झालेला असतो . वेळेआधी पोहोचणे यात बराचसा शिस्तीचा भाग असला तरी त्या बरोबरच “ड्यूटी ऑफिसर ” म्हणून आपले प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी पोलिस ठाण्यात आलेल्या बाबी किंवा तक्रारी कोणत्या त्याची माहिती जाणून घेणे हाही त्याचा हेतू असतो. आधीच्या ड्यूटी ऑफिसरच्या वेळेत रिपोर्ट झालेल्या प्रत्येक बाबीचा निपटारा करण्याची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्याची असते.
आठच्या ठोक्याला आधीचा अधिकारी खुर्चीतून उठतो. दुसरा त्याच्याकडून चार्ज घेतो. ड्यूटी ऑफिसरच्या मदतीला एक हवालदार , तिन ते चार पोलिस शिपाई , एक दोन महिला पोलिस असा स्टाफ असतो. तो जिथे बसतो त्या दालनाला ,. ” चार्जरूम ” म्हणतात.
चार्ज घेताना अधिकारी मनोमन प्रार्थना करतो की दिवस शांत जाऊदे. या प्रार्थनेत बराच काही अर्थ असतो. दिवस शांत जाऊदे म्हणजे गडबड गोंधळ,गुन्हे, त्रासदायक घटना सेक्शन मधे नको होऊ देत . पोलिस परिभाषेत सेक्शन म्हणजे त्या पोलिस ठाण्याच्या हद्दित येणारा भाग.
ड्यूटी ऑफिसर, चार्ज घेण्याच्या वेळी पोलिस ठाणे लॉक अप मधे स्वतः जाऊन आरोपींची स्थिती पाहतो . त्यानंतर आरोपींची संख्या , पोलिस ठाण्यात असलेली हत्यारे, आरोपींना घालण्यात येणाऱ्या बेड्यांची संख्या इत्यादींबाबत अत्यंत महत्त्वाच्या ” स्टेशन डायरी” मधे तपशीलवार नोंद करतो.
” पोलिस स्टेशन डायरी ” ही पोलिस ठाण्याच्या कामकाजाचा आरसा असते असं म्हटलं तरी चालेल. त्यातील प्रत्येक नोंदीला न्यायालयात सुद्धा पुराव्याचे मोल असते.
पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो.
ड्यूटी ऑफिसर हा संपूर्ण वेळ खऱ्या अर्थाने दक्ष असतो. त्याला रहावेच लागते. याचे कारण पोलिस ठाण्यात कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारची बाब रिपोर्ट होते. एखादे ओळख पत्र हरवल्या बद्दल असेल , घरफोडी बद्दल तक्रार असेल , भीषण अपघात असेल , एखादी आत्महत्या किंवा एखाद्या खुनाबद्दल सुद्धा असेल, मूल हरवल्याबद्दल असेल किंवा रस्त्यावरील मारामारीबद्दल सुद्धा असेल. काहीही म्हणजे काहीही असेल.
पोलिस स्टेशनचा फोन वाजला की ” नमस्कार , xxxx पोलिस स्टेशन ” हे चार शब्द बोलण्यापूर्वी फोन उचलतानाचे केवळ तीन ते चार सेकंदसुद्धा ड्यूटी ऑफिसरच्या मनात शंकांचे काहूर माजवणारे ठरतात. त्यातून गुन्ह्याची वार्ता फोनवरून आली की पाठोपाठ बऱ्याच प्रमाणात लिखाण आणि तेही कायद्यांनी आणि विविध नियमांनी आखून दिलेल्या काटेकोर पद्धतीनेच करणे आले.
पोलिस कामकाजाच्या पद्धतीबद्दल जनमानसात प्रचंड गैरसमज आहेत . आणि ते वाढायला चंदेरी दुनियेकडून फार मोठी मदत झाली आहे. त्याचं कारण असं की एखादया चित्रपटातील नायक पोलिस ऑफिसर असेल तर खलनायक गुन्हेगार असणे , त्याचा डोळा नायिकेवर असणे , नायकाकरवी गुन्हेगार अटक होणे आणि त्याला कोर्टात शिक्षा होणे या तीन चारच गोष्टींना त्या चित्रपटाच्या कथानकात प्राधान्य असते. दीड दोन तासात ते आणखी तरी काय दाखवणार म्हणा ! परंतु बऱ्याचश्या चित्रपटात पोलिस म्हणजे निव्वळ विनोदाचा विषय दर्शवून पोलिसांचे विकृत चित्रण केले जाते आणि समाजाप्रती अत्यंत जबाबदारीने केल्या जाणाऱ्या या सेवेचे उथळ विडंबन केले जाते.
गुन्ह्याचे स्वरूप कोणतेही असो . प्रत्येक गुन्ह्याच्या बाबतीत घटनास्थळाचा पंचनामा , मुद्देमाल किंवा गुन्ह्यातील हत्यार ताब्यात घेतानाचा पंचनामा, आरोपी अटक करताना त्याचा अंगझडती पंचनामा, अटकेचे फॉर्म, साक्षीदारांचे जबाब , “गुन्हा नोंद रजिस्टर ” मधे नोंद करून गुन्हा दाखल करणे , केलेल्या कार्यवाहीचा विहित नमुन्यातील तपशिल उतरून काढणे , गुन्ह्याचा विशेष अहवाल नियंत्रण कक्षाला आणि वरिष्ठांना पाठवून देणे इत्यादी इत्यादी एक ना अनेक प्रकारचे लिखाण करणे ही ड्यूटी ऑफिसरची जबाबदारी असते. हे लिखाण अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. त्यातील उणीवा, शेवटी जेव्हां खटल्याची न्यायालयात सुनावणी होते तेव्हा आरोपीच्या पथ्यावर पडून तो दोषमुक्त ठरवला जाऊ शकतो. बरं असंही नाही की दिवसाकाठी एखादाच गुन्हा रिपोर्ट होईल. किती होतील याची शाश्वती नसते. अनेक गुन्हे एका ड्यूटी मधे रिपोर्ट होऊ शकतात. गुन्हा दाखल करताना ड्यूटी ऑफिसर हा ड्यूटी इन्स्पेक्टर आणि पोलिस स्टेशनच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टर यांना त्याबद्दल रिपोर्ट करतो. त्या गुन्ह्याच्या गांभीर्या प्रमाणे ते त्यांना पुढे वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना कळवतात.
गुन्हा घडला की त्याचे लेखी सोपस्कार करण्याबरोबरच तितकीच महत्त्वाची आणि अत्यावश्यक गोष्ट म्हणजे त्या गुन्ह्याचे पडसाद उलटून स्थानिक पातळीवर जनजीवन विस्कळीत होणाऱ्या घटनांत जर त्याची परिणीती होणार असेल , तर त्याबाबत तातडीने प्रतिबंधक उपाययोजना योजणे. त्याचीही जाण अधिकाऱ्याला आवश्यक असते . वानगी दाखल सांगायचं झालं तर एखाद्या तरुणाच्या मोटार सायकलला एस टी बसची धडक लागून त्यात त्याचा मृत्यू झाला की तिथले स्थानिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन “रस्ता रोको ” सारखी निदर्शने करतात. अशावेळी पोलिस ठाण्यातील सर्व उपलब्ध अधिकारी आणि त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांचे सगळे मनुष्यबळ तिकडे धावते. तिथे जाऊन वाहतूक सुरळीत करणे ही पहिली महत्त्वाची जबाबदारी असते. इतर एस टी बसेसवर प्रक्षुब्ध जमावाचा रोख जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यासाठी वाहतूक पोलिसांना कळविणे वगैरे तातडीच्या गोष्टींची पूर्तता आणि नोंदी ड्यूटी ऑफीसरने वेळोवेळी करणे अपेक्षित असते. हे आवाक्यात येतय न येतय तोवर मारामारीत डोकं फुटून घेतलेला , कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत असा एखादा इसम कोणाबरोबर तरी नाहीतर एकटा पोलिस ठाण्यात येऊन पोहोचतो. त्याची पटकन जुजबी चौकशी करून त्याला कोणी , कुठे आणि का मारलं हे जाणून त्याला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवावा लागतो. तो उपचार घेऊन परत आला की आणखी एक केस दाखल करणे आले . कधी कधी यानेच त्या मारामारीत डोके फुटण्यापूर्वी दुसऱ्याला बेदम मारलेले असते. तो दुसरा मार खालेल्ला इसम पोलिस ठाण्यात अवतरतो. पाठोपाठ दोघांच्या पाठीराख्यांची गर्दी पोलिस ठाण्यात येते . त्या दुसऱ्यालाही सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठवणे आणि आता एकाच्या जागी दोन परस्पर विरोधी केसेस दाखल होणे ड्यूटी ऑफिसरला दिसत असते.झालेली मारामारी स्थानिक लोकांमधील पूर्व वैमनस्यातून घडली असेल, त्याला काही राजकीय कड असेल किंवा वातावरण जरासं जरी तंग झालेलं असेल तर वरिष्ठांना कळवून शांतता प्रस्थापित होईपर्यंत तिथे बंदोबस्त ठेवणे आले. दोन्ही बाजूचे लोक सरकारी हॉस्पिटल मध्ये समोरासमोर आले की तिथेही हाणामारी होण्याची शक्यता असते. त्यासाठी हॉस्पिटल ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत असेल त्यांना हॉस्पिटल मधे बंदोबस्त पाठवण्याबद्दल कळवायचे भान ड्यूटी ऑफिसर ला ठेवावे लागते.
दोन तिन दिवसांवर पोलिस उपायुक्त यांची व्हीजीट येऊन ठेपलेली असते. अशा इन्स्पेक्शन व्हीजीटमधे हे वरिष्ठ अधिकारी , पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडे तपासावर प्रलंबित असलेल्या गुन्हे प्रकरणांचा , बजावण्यासाठी विविध न्यायालयाकडून प्राप्त झालेली प्रलंबित समन्स आणि वॉरंट आणि अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या प्रलंबित तक्रारी इ. इ च्या निर्गतीचा आढावा घेतात .
बरेचसे नागरिक , विशेषतः व्यावसायिक कंपन्या, गृहनिर्माण संस्था किंवा नागरिकांच्या सामूहिक तक्रारी या पोलिस स्टेशनमधे प्रत्यक्ष हजर राहून न देता तक्रारी अर्जाद्वारे पाठवून देतात. या प्रकारे प्राप्त झालेल्या अनेक तक्रारी अशा स्वरूपाच्या असतात की त्यांचे निराकरण करणे पोलिसांच्या अधिकारक्षेत्राबाहेरचे असते. अशा दिवाणी किंवा न्यायप्रविष्ठ बाबींशी संबंधित अर्ज बाजूला करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने अर्जदाराला त्याप्रमाणे लेखी कळवून ते दफ्तरी दाखल केले जातात. अर्थात त्याआधी या बहुतेक अर्जांच्या संदर्भात अर्जदाराला लेखी विनंतीपत्र पाठवून त्यांना बोलावून घेणे , त्यांचा जबाब घेणे , अहवाल लिहिणे या गोष्टी वेळखाऊ असल्या तरी क्रमप्राप्त असतात . त्याबरोबरच अर्जमार्फत आलेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी करून त्यात दखलपात्र गुन्हा निष्पन्न होत असेल तर वेळ न दवडता अर्जदाराला बोलावून घेऊन त्याच्या लेखी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून त्यातील आरोपींना अटक करणे आणि दोषारोपपत्र पाठवण्या पर्यंतचे बाकी सोपस्कार करणे इत्यादी कार्यवाही करणेही बंधनकारक असते . ही कामे ड्यूटी ऑफिसर म्हणून कर्तव्यावर असताना वेळे अभावी शक्य नसते. त्यामुळे रिलीफ ऑफिसर म्हणून ड्यूटी बजावताना, किंवा बीट चौकीमध्ये बसून त्या कागदपत्रांचा निपटारा करावा लागतो.
प्रत्येक पोलिस ठाण्याचे स्वरूप पोलिस दृष्टिकोनातून वेगवेगळे असते. पोलिस ठाण्याचे एकूण क्षेत्र , एकूण लोकवस्ती, तेथील लोकाचार, समाज संमिश्र आहे की एकाच प्रकारचा, त्याचा आर्थिक स्तर, निवासी भाग आणि व्यावसायिक आस्थापनांचे प्रमाण , गर्दीची ठिकाणे , प्रार्थनास्थळे अशा अनेक बाबी त्या त्या पोलिस ठाण्यातील काम कमीजास्त असण्यास कारणीभूत असतात. अर्थात त्या त्या प्रमाणात तेथील पोलिस अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची संख्या कमी जास्त असली तरी सातत्याने स्फोटक वातावरण असलेल्या काही पोलिस ठाण्याच्या सर्वच अधिकाऱ्यांना उसंत मिळणे कधीही शक्य नसते.
अशा व्यस्त मन:स्थितीत ड्यूटी ऑफिसर, एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळत कर्तव्य बजावत असतो. तेवढ्यात , कंट्रोल रूम कडून वायरलेस मेसेजने आलेल्या आदेशाप्रमाणे पोलिस स्टेशनच्या गस्ती वाहनाने ठराविक जागी धाव घेऊन भर रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या एखादया दारुड्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणलेले असते. तो नशेत असल्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून आणल्यावर त्याला नजरेसमोर बसून ठेवावे लागते. त्याचा तोंडाचा पट्टा अखंड चालू असल्यामुळे चार्जरूम मधील आवाजात भर पडते.
ड्यूटी ऑफिसर मघाच्या आलेल्या मारमारीच्या प्रकरणातील फिर्यादी घेण्यात मग्न असतो. फिर्याद लिहून घेताना , तक्रारदार नको असलेलाही तपशील सांगत असतो. त्यातील पुराव्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी ठेऊन आणि बाकीचा वगळून आणि घटनाक्रम जोडणारा धागा अखंड ठेवत फिर्याद लिहून घ्यावी लागते. फौजदारी प्रक्रिया अधिनियमाच्या ज्या कलम १५४ नुसार फिर्याद घेतली जाते , त्यात स्पष्ट म्हटले आहे की ” Every information relating to the commission of cognizable offence ,given orally , shall be reduced to writting by the officer “…….. इथे ” reduced to writting ” चा असा अर्थ अभिप्रेत असतो.
एखाद्या फिर्यादीत आरोपी अनोळखी असल्यास त्याचे वर्णन , मालमत्ता विषयक गुन्हा असेल तर मालमत्तेचे तपशीलवार वर्णन, साक्षीदार असतील तर त्यांचे गुन्हा घडतेवेळीं गुन्ह्याच्या जागेपासून अंतर , रात्रीची वेळ असेल तर प्रकाशाची काय सोय होती त्याबद्दल तपशील अशा एक ना अनेक बाबींचा उल्लेख फिर्यादीत आणि पंचनाम्यात करावा लागतो.
हे सगळं सांगण्याचा हेतू हा की ड्यूटी
ऑफिसर जे जे लिहितो , तो प्रत्येक शब्द त्याला जपून लिहावा लागतो. आता सगळेच “कॉम्प्युटर प्रशिक्षित ” असतात. त्यामुळे हे काम काही प्रमाणात सुकर झाले आहे. गुन्हा दाखल झाला की इतर सोपस्कारांसोबत रोजच्या रोज तपासाचे इतिवृत्त लिहावे लागते.
इतकी सारी कामे करताना , या महिन्याची ” मोहोल्ला कमिटी मीटिंग” घेणे अजूनही बाकी आहे हे त्याला आठवते. तो पोलिस ठाण्याच्या ” गोपनीय स्टाफ ” ला बोलावून बीट चौकी मधे दोन दिवसांनी संध्याकाळच्या वेळी घ्यावयाच्या मीटिंग साठी ” मोहोल्ला कमिटी मेंबर्स ” ना उपस्थित राहण्या बद्दल कळविण्यास सांगतो. त्यांनी तसे फोन करून कळविल्या बद्दल सांगितल्यावर त्याप्रमाणे स्टेशन डायरीत नोंद करतो.
मधेच त्याचे सहाय्यक असलेले जुने जाणते वयस्क हवालदार , ” दोन घास खाऊन घ्या साहेब , तिन वाजायला आले ” असं म्हणून त्याला जेवायची आठवण करून देतात. तो नुसतच हो हो करतो.
” गोपनीय स्टाफ ” हे पथक सेक्शनची नस ओळखून असणाऱ्या निवडक तिन चार पोलिस अंमलदारांचं असतं. पोलिस ठाणे हद्दीतील राजकीय हालचाली पासून सेक्शनमधे कुठे काय धुमसतंय याची बित्तंबातमी गुप्तपणे गोळा करून ती वरिष्ठांना सादर करणे हे त्यांचं काम.
ही कामं करता करता त्या दारू प्यायलेल्या माणसाची वैद्यकीय तपासणी करून घेतल्याबद्दल , कोर्टातून रिमांड घेऊन आणलेले आरोपी लॉक अप मधे जमा करून झाले की त्याबद्दल , स्वतः बजावलेल्या समन्स कोर्टाला परत करताना त्याबरोबर पाठवायचा अहवाल लेखन , कोणी जामीनावर सुटलेला आणि कोर्टाच्या आदेशाने पोलिस स्टेशन हजेरीला आलेल्या आरोपीबद्दल , एखादे पोलिस पथक तपसकामी बाहेर रवाना झाल्याबद्दल अशा अनेक प्रकारच्या नोंदीही स्टेशन डायरी मधे करत असतो.
दाखल केलेल्या गुन्ह्यातील सील केलेला मुद्देमाल तो, ” मुद्देमाल रजिस्टर” मधे नोंद करून , “मुद्देमाल कारकून ” म्हणून काम करणाऱ्या जबाबदार हवालदारांकडे सुपूर्द करतो. त्या नोंदीचा क्रमांक साध्या कागदावर लिहून घेतो. कारण त्याचा उल्लेख त्याला पुढे तपास इतिवृत्तात करायचा असतो.
ड्यूटी ऑफिसरला सहकाऱ्यांशी गप्पा , थट्टा मस्करी करायला काडीचीही उसंत नसते. तो पूर्णपणे कामात बुडालेला असतो. .
पोलिस सब इन्स्पेक्टर भविष्यात बढत्यांच्या पायऱ्या चढू लागला की त्याबरोबर त्याच्या जबाबदाऱ्याही वाढत जातात. अनेक बाबी एकावेळी हाताळण्याचे कसब असल्याशिवाय तो यशस्वी पोलिस अधिकारी होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला ” अष्टावधानी ” बनवण्याचे महत्त्वाचे कार्य , हीच ” स्टेशन हाऊस ऑफिसर ” नावाची ड्यूटी करत असते.
ड्यूटी संपत आली की त्याचा शेवटचा तास उत्कंठेत जातो. संध्याकाळची वेळ असते. सगळीकडे जबरदस्त ट्रॅफिक असतो . समजा एखादा अपघात रिपोर्ट झालाच की जखमी जवळच्या हॉस्पिटलमधे अँडमिट असतो. त्याचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवणे आले. जागेचा पंचनामा, साक्षीदारांचे जबाब , आर टी ओ ला गाडीच्या तांत्रिक तपासणीसाठी निरोप , गुन्ह्याचे इतिवृत्त लिहिणे या सगळ्यात चार ते पाच तास जातातच. समजा , असा प्रसंग घडलाच तर घरी पोहोचण्यासाठी मध्यरात्र उलटून जाते
तोपर्यंत दुसऱ्या दिवशीच्या ड्यूटीबद्दलचे ” ऑर्डर बुक” अँडमीन साहेबांनी म्हणजेच पोलिस निरीक्षक ( प्रशासन) यांनी लिहून ठेवलेले असते . ड्यूटी ऑफिसरला शिरस्त्या प्रमाणे उद्या रात्रपाळीची स्टेशन हाऊस ड्यूटी असते . मात्र उद्याच्या पहिल्या अर्ध्या दिवसात ,आज अटक केलेल्या आरोपींना कोर्टात सकाळी अकरा वाजता रिमांडसाठी नेण्याची ड्यूटीही त्यालाच असते. त्यातच उद्या सकाळी सात वाजता एखाद्या कंपनीच्या गेटवर तेथील कामगारांच्या युनियनने दोन तास निदर्शने करण्याचे योजलेले असते. तिथे या ऑफिसरला सकाळी सहा वाजता इतर अधिकाऱ्यांसह बंदोबस्तासाठी रिपोर्ट करायचा असतो.
आठ वाजतात . रात्रपाळीचा ड्यूटी ऑफिसर चार्ज घ्यायला सज्ज असतो. ज्याची ड्यूटी संपलेली असते तो आळोखे पिळोखे देऊन उठतो. रात्रपाळीच्या ऑफीसरला दिवसभरातील घडामोडींची थोडक्यात माहिती देतो. काही डायरी एन्ट्री करायची राहिली तर नाही याची मनाशी उजळणी करतो . उठताना समोरची गुन्हे तपासाची कागदपत्रे जुळवून उचलतो. आणि ऑफिसर्स रूम कडे जातो. तिथे आरोपी स्टेटमेंट पासून गुन्हे इतिवृत्तापर्यंत त्याने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या कागदपत्रांचे लिखाण पूर्ण करून , रोजच्या रोज सकाळी वरिष्ठांच्या समोर जाणाऱ्या एका ठराविक ट्रे मधे ठेवतो. कमरेचे रिव्हॉल्व्हर पोलिस स्टेशनच्या सेफ मधे जमा करतो. युनिफॉर्म काढून सिव्हिल ड्रेस घालतो . साडेदहा वाजलेले असतात. त्या रात्री, ड्यूटीवर उपस्थित असलेल्या क्राईम साहेबांना म्हणजे पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) यांना सांगून तो घरी जायला निघतो.
दिवस अशा तऱ्हेने पूर्ण व्यस्त जातो. महिला पोलिस अधिकारीही या कार्यचक्राला अपवाद नसतात . त्यासुद्धा या सर्व गोष्टी अंगवळणी पाडून घेतात. त्यांना तर आई , पत्नी ,सून याही भूमिका घरी निभावयाच्या असतात. खऱ्या अर्थाने त्या रणरागिणी असतात .
तासाभरात घर जवळ येते तेव्हा पत्नीने सकाळी त्याच्या वडिलांसाठी गावी पाठवायची औषधं आणायला सांगितल्याचे त्याला आठवते. पण तोपर्यंत औषधांची दुकाने बंद झालेली असतात. ” उद्या बघू ” .. तो मनाशी म्हणतो .
तो घरी पोहोचतो. पत्नी डोळे चोळत दार उघडते. आत पाऊल टाकल्या टाकल्या तो पत्नीला सांगतो ” चारचा अलार्म लाव . मला पाचला निघायचे आहे. “
एरवी त्याच्या मोटार सायकलचा आवाज ऐकला की गॅलरीत धावणारा त्याचा लहानगा बाबांची वाट पाहून गाढ झोपलेला असतो. बाळाला बाबांकडून फार काही नको असते. बाबा आल्यावर त्यांच्याबरोबर मोटार सायकलच्या टाकीवर बसून एक लहानशी चक्कर आणि त्यावेळी हॉर्न वाजवायला मिळणे . घरात येताना बाबांच्या कडेवर बसून येणे. बस्स .
तो शॉवर घेऊन येईपर्यंत पत्नी जेवण गरम करून वाढते . जेवून तो गादीवर अंग टाकतो .
पत्नी कामं आवरून येता येता त्याला म्हणते ” उद्या परत सकाळी लवकर निघणार . आजसुद्धा नाश्ता न करताच निघून गेलात . “
त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं . दुपारी दाखल केलेल्या मारामारीच्या क्रॉस केसेस मधील अजून फरार असलेले दोन आरोपी डीटेक्शन स्टाफला आज रात्रीच सापडले तर बरं होईल , असा विचार करता करता त्याला झोप लागलेली असते .
–अजित देशमुख.
( नि )अप्पर पोलीस उपायुक्त.
9892944007.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..