आज बऱ्याच दिवसांनी घरी पावभाजीचा बेत होता .
रविवार असल्यामुळे निवांतपणे दुपारच्या वेळेस होती मेजवानी ..
बायको भाजीची तयारी करायला लागली आणि तो पाव आणायला बाहेर पडला.
चार दिवसांपूर्वीच घराजवळ एका नवीन बेकरीचं उद्घाटन झालं होतं.
“ नेहमीच्या ठिकाणाहून न घेता तिकडून आणून बघूया यावेळेस !! ”.. असं ठरलं.
त्याने ‘हायफाय’ बेकरीतून मस्त प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक केलेले लादीपाव घेतले. घर अगदीच समोर असल्याने ते लगेच बायकोच्या ताब्यात दिले आणि हा बाकीची कामं करायला पुन्हा बाहेर पडला . तिथून आल्याआल्या बायको म्हणाली
“ पाव अगदी शिळे निघाले रे हे .. २-३ पाकीटं फोडून बघितली , सगळे तसेच . तुकडे पडतायत , अजिबात मऊ नाहीयेत .. जाऊ दे आता !!”
हा काहीही न सांगता तडक त्या बेकरीत गेला आणि तक्रारवजा अभिप्राय दिला.
ते ऐकून मालक सुद्धा आश्चर्याने आणि अगदी अदबीने ..
“काय सांगताय काय ? ताबडतोब सगळे परत द्या. मी लगेच कंपनीत पाठवतो . आणि होsss हे घ्या सगळे पैसे परत .. कारण नेमके दुसरे पाव नाहीयेत आत्ता बदलून द्यायला!! असं म्हणत प्रत्यक्ष पाव परत आणायच्या आधीच दुकानदाराने सगळे पैसे परत दिले.
दुकानदाराचा असा ग्राहकप्रेमी पवित्रा बघून हा सुद्धा थोडा मवाळ झाला.
“ अहो मी काही पैसे मागायला किंवा भांडायला वगैरे नाही आलो .. पण तुमचंही नवीन दुकान सुरू झालंय.. म्हंटलं फीडबॅक द्यावा लगेच !!”.
“ त्याबद्दल खरंच धन्यवाद सर .. पुढच्यावेळेस आम्ही नक्की काळजी घेऊ !!” अशी अनपेक्षित प्रतिक्रिया बघून तो काहीशा आनंदानेच घरी आला.
“ दे गं सगळे पाव परत ..पाकीट फोडलं असलं-नसलं तरी घेतायत ते .. पैसे सुद्धा दिले परत … ते देतो आणि आणतो आपल्या नेहमीच्या दुकानातून पाव ..
“ अरेsss मला काय माहिती तू लगेच तिकडे गेलास ते .. मी थोड्या पावांना बटर वगैरे लावलंय आत्ताच . तसे अगदी टाकाऊ नाहीयेत. फक्त कालचे वगैरे असतील!!.
“ बरं ss मग जे उरलेत तेव्हढे तर दे !! असं म्हणून तो पावाच्या उरलेल्या लाद्या घेऊन गेला.
“ काका .. हे घ्या इतकेच आहेत … थोडे ठेवले घरी.. हे त्याचे पैसे घ्या !!”
“ नको नको …सगळे नसले तरी काही हरकत नाही … आता पैसे नका देऊ .. ते पाव आणि सगळे पैसे राहू दे तुमच्याकडे … उलट तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी!!”
“ अहो ss … आम्ही खाऊ ते , टाकून देणार नाही.. तितके काही खराब नाहीत म्हणून जे खाणार तेव्हढ्याचे तर पैसे घ्या … असं नका करू!!”
अशी थोडावेळ चर्चा झाली पण मालकानी काही पैसे घेतले नाहीत आणि तो निघाला.
त्यांच्या बेकरीचा ब्रॅंड जपणं आणि नवीनच उघडलेल्या दुकानाचं नाव राखणं महत्वाचं असल्यामुळे असं केलं असेल त्यांनी ; पण तरीही अशा पद्धतीने अतिशय नम्रपणे आणि सौजन्यपूर्ण वातावरणात हे सगळं झाल्यामुळे त्याला एकीकडे खूप बरं वाटलं होतं पण आपण असं “पैसे न देता खायचं हे त्याच्या मनाला खात” होतं … एरव्ही गमतीत कितीही ‘फुकट ते पौष्टिक’ वगैरे म्हंटलं तरीही प्रत्यक्षात अशा वेळेस मात्र “कधीही कुणाकडून फुकट खाऊ नये , कुणाचेही अन्नाचे पैसे ठेवू नयेत” अशी शिकवणच आठवते . प्रश्न फक्त २०-३० रुपयांचा असला तरीही मनाला पटत नव्हतं .
अशाच द्विधा मनःस्थितीत तो नेहमीच्या दुकानात पाव आणायला गेला . समोरच्या बाजूला डोंबाऱ्याचा खेळ चालू होता . याने आत जाऊन घाईघाईत पाव वगैरे घेतले आणि स्कूटरवरून निघाला . तेवढ्यात ते डोंबारी बघून तो थांबला . नेहमी असे खेळ सुरू असतात तेव्हा भोवताली गर्दी जमलेली असते पण दुपारच्या उन्हामुळे आज फार कोणी नव्हतं.
आजूबाजूच्या दुकानांतले थोडेफार लोक बाहेर येऊन , वाकून बघत होते तेव्हढेच. तो लहान मुलगा बिचारा दोन वेळच्या पोटासाठी , जगण्यासाठी त्या टळटळीत उन्हात शब्दशः “ तारेवरची कसरत ” करत होता. याला काय वाटलं कुणास ठाऊक .. त्याने स्कूटर बाजूला घेतली … सावलीसाठी म्हणून काहीशा आडोशाला डोक्यावर पदर घेऊन बसलेल्या त्या मुलाच्या आईला खूण करून बोलावलं … मगाशी त्या बेकरी मालकाने दिलेले शर्टच्या वरच्या खिशात ठेवेलेले सगळे पैसे एकदम त्या माऊलीच्या हातात दिले …. तिचा काहीसा अचंबित पण तितकाच प्रसन्न आणि समाधानी चेहरा , रणरणत्या उन्हात एखाद्या वाऱ्याच्या झुळुकेसारखं वाटणारं तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू बघितलं .. आणि तो लगेच स्कूटर सुरू करून निघून गेला …
आता मात्र त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधान होतं … कसलंतरी आलेलं दडपण क्षणार्धात निघून गेल्यासारखं वाटलं . मोकळं मोकळं वाटत होतं . घरी आला , पावभाजीवर मनमुराद ताव मारला . जेवणानंतर बायकोला सगळा घटनाक्रम सांगितला.
“ बघ ना गं ss .. तसं म्हंटलं तर खूपच साधी घटना.. पण तुला अगदी प्रामाणिकपणे सांगतो ; जर त्या बेकरीत न जाता मी थेट नेहमीच्या दुकानात गेलो असतो तर कदाचित लांबूनच डोंबाऱ्यांचे खेळ बघून मीसुद्धा लगबगीने निघून गेलो असतो .. पण नुकत्याच घडलेल्या प्रसंगामुळे अंतर्मनात चाललेल्या विचारांनी अनाहुतपणे मला थांबवलं आणि आपसूक “अन्नाचे पैसे अन्नासाठी” दिले गेले . सार्थकी लागले. ते देईपर्यंत मात्र त्याचं खूप ओझं वाटत होतं मला .. अर्थात असं वाटण्याला त्या बेकरी मालकाचं वागणंही काही अंशी कारणीभूत आहे. कारण जर पावाची तक्रार त्यानी मान्यच केली नसती किंवा उद्धटपणे बोलले असते , बाचाबाची करून मला पैसे घ्यावे लागले असते तर कदाचित माझ्या मनाला इतकं खाल्लं नसतं. आता त्या बेकरी मालकाचं डोंबारी मुलाला ‘गेल्याजन्मीचं देणं’ असेल वगैरे वगैरे असे आध्यात्मिक, तात्विक तर्कवितर्क तुम्ही मांडाल तो भाग वेगळा पण वास्तवात या सगळ्या प्रकारात माझ्या आयुष्यातली काही मिनिटं सोडल्यास आपलं पदरचं काहीच गेलं नाही पण तरीही त्या गरीब परिवाराचं एकवेळेचं पोट भरलं आणि यासाठी मी ठरलो केवळ एक निमित्तमात्र “दुवा”!! ”
“बेकरीवाल्याचे पैसे विनाकारण ठेवून आपल्याला काहीच फरक पडला नसता पण त्या कुटुंबाला मात्र तेच पैसे खूप आनंद देऊन गेले. त्यांना ते दान मिळावं , माझ्यामार्फत पोचलं जावं म्हणूनच जसं काही नियतीने हे ‘पावनाट्य’ घडवलं. म्हणजे आपण सगळे वेळेला यथाशक्ती सगळं करतोच गं ss तरीही हे फक्त आत्तासारखं आर्थिक बाबतीपुरतंच नाही तर , “शिक्षण, ज्ञान, विचार, संस्कार, भावना, कष्ट” अशा कितीतरी गोष्टींबद्दल दरवेळेस आपण उचलूनच काही द्यायला पाहिजे असं नाही . “जिथे आहे” तिथून “जिथे नाही” तिथे पोचवलं तरीही बऱ्याच अंशी मदत होते .. आणि आपल्याला “दुवा” होण्याचं मानसिक समाधान मिळेल ते वेगळंच. जसं आज मला मिळालं !!…
या छोट्या प्रसंगात माझ्याकडून “प्रतिक्षिप्त क्रिया” घडली आणि मी “दुवा” होऊन गेलो पण एरव्हीसुद्धा आपल्याला बाकी काही शक्य नसलं तर कुणाच्या भल्यासाठी आपण किमान असा “दुवा” तर नक्कीच होऊ शकतो ..हांss .. पण ही “दुवा” होण्याची जाणीव मनात उत्पन्न होण्यासाठी , आधी एकमेकांची मनं जोडणारा एक अदृश्य “ दुवा ” प्रस्थापित होणं तितकंच गरजेचं आहे !!”
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply