साधारण १९९१-९२ चा काळ… आम्ही ५ वी – ६ वीत असू… इराण इराक युद्ध, त्यानंतर एकदम भडकलेले पेट्रोलचे भाव, हर्षद मेहता शेअर बाजार घोटाळा, कुवेत मधल्या घडामोडी अशा सगळ्या बातम्या वर्तमानपत्रांच्या हेड लाईन्स…… तर टीव्ही वर चाणक्य, सुरभि सारखे दर्जेदार कार्यक्रम आणि रोजा, साजन, हीना असे सिनेमे चर्चेत असणारा तो काळ….. आजच्यासारखे भरमसाठ channels, सोशल मिडिया आणि हवं ते शोधायला गुगल नसलेला तो काळ.. वर्तमान पत्र, दिवसातून दोनदा लागणाऱ्या बातम्या आणि इतर वाचन हेच महितीचे प्रमुख स्त्रोत असणारा तो काळ…आणि याच काळातली आमच्या शाळेतल्या वर्गातली अशीच एक सकाळ…. आमच्या वर्गातल्या बाकांची रचना अशी होती की.. बाईंची खुर्ची ज्यावर ठेवतो तो जो थोडासा उंच platform असतो..त्याला लागून पुढचे दोन बेंच असायचे. कधीकधी उंचीप्रमाणे बसवलं तर आम्ही बुटकी मुलं त्या पुढच्या बाकांवर बसायचो आणि बाजूलाच खुर्चीवर बसायच्या.. “एकदम गोऱ्यापान आणि घाऱ्या डोळ्यांच्या,सात्विक चेहऱ्याच्या, काहीशा स्थूल पण कायम उत्साही, शिस्तप्रिय असल्या तरी तितक्याच प्रेमळ, नेहमी हसतमुख असणाऱ्या.. आमच्या सगळ्यांच्या लाडक्या वर्गशिक्षिका “सुनिता बर्वे बाई”…
बर्वे बाई शिकवायच्या तर छानच पण कधी कधी आम्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी मनमोकळ्या गप्पा ही मारायच्या… तर अशाच एका सकाळी… नक्की या गप्पांच्या ओघात…की शिकवताना पुस्तकातल्या कुठल्याश्या संदर्भावरून…ते नीटसं आठवत नाही पण “ तुम्हाला मोठेपणी कोण व्हायला आवडेल किंवा तुम्ही कोणाला तुमचा आदर्श मानाल?” अशा अर्थाचा काहीतरी विषय निघाला.. आणि माझ्या पुढे बसलेला एक मुलगा हळूच म्हणाला “हर्षद मेहता.“
खरं तर तो मुलगा खूप साधा भोळा, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा होता.मी आजही छातीठोक पणे सांगू शकतो की या सगळ्यामागची वाईट बाजू आणि गांभीर्य याची त्याला कल्पनाही नव्हती. अर्धवट काहीतरी वाचून-ऐकून किंवा हर्षद मेहताला मिळालेला पैसा आणि प्रसिद्धी वगैरे पाहून तो अगदी सहज, अतिशय निरागसपणे हे म्हणाला होता.(त्यावेळी ५ वी – ६ वीतली मुलं निरागस असायची ). पण अगदी बाजूलाच बसलेल्या बाईंच्या कानावर हे शब्द पडलेच. त्याच्या या दोन शब्दांनी बाई काही क्षण एकदम स्तब्ध झाल्या. त्या खूप रागावणार असं वाटत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावर रागापेक्षा काळजी जास्त दिसत होती… त्या अजिबात चिडचिड न करता, जोरजोरात बोलून, ओरडून पूर्ण वर्गाला ऐकू जाईल असं न बोलता.. अतिशय शांत पणे त्याला समजावू लागल्या की.. “ बाळा, असं का म्हणालास?? ती व्यक्ती चांगली नाही.. आपण इकडे चांगलं शिक्षण घ्यायला येतो, चांगल्या घरातली आणि एका चांगल्या शाळेत शिकणारी मुलं आहात तुम्ही सगळी, तुमचे आई वडील खूप कष्ट करून तुम्हाला शिकवतायत, तेव्हा त्यांना तुमचा अभिमान वाटला पाहिजे की नाही??.म्हणून तू मोठेपणी कोणाचा तरी आदर्श व्हायला पाहिजेस… तेव्हा चुकून सुद्धा पुन्हा असं कधीच मनात आणू नकोसं हं…. हा सगळं संवाद सुरु असताना प्रेमळ काळजी स्पष्टपणे बर्वे बाईंच्या चेहऱ्यावर दिसत होती… रागाचा लवलेशही नव्हता…उलट त्यांना खूप वाईट वाटलं होतं… बोलता बोलताच बाईंचे डोळे पाणावले होते… “आपला मुलगा जर चुकीचा वागला तर एखाद्या आईची जी अवस्था होईल ना अगदी तशीच त्यांची देहबोली होती “… डोळे भरून आल्यामुळे गोऱ्यापान बाईंचा लालबुंद झालेला चेहरा आजही मला स्पष्ट आठवतोय…. त्याला समजावून झाल्यावर बाई थोड्याश्या रडल्या पण वर्ग सुरु असल्याच भान त्यांना होतं.. त्यामुळे लगेच त्यांनी स्वतःला सावरलं, रुमालाने हळूच डोळे पुसत… फार काही झालंच नाही असं इतरांना भासवत वर्ग सुरू ठेवला… त्यामुळे नक्की काय झालं हे आम्ही पुढची ४-६ जण सोडलो तर इतर कोणाला काही समजलंच नाही…..
नुसतं अभ्यासक्रम शिकवणं एवढंच नाही तर त्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना आपलंस करत, त्यांच्या आनंद आणि दुखा:त समरस होणारे शिक्षक सध्याच्या व्यावहारिक आणि व्यावसायिक जगात खरंच दुर्मिळ आहेत. असे शिक्षक आम्हाला लाभले हे खरोखरच आमचं भाग्य…
अशा खेळीमेळीच्या वातावरणात आमचे शालेय दिवस पुढे सरकू लागले. काही महिन्यांनतर “तो मुलगा” मध्ये मध्ये गैरहजर राहू लागला. मग बरेच दिवस आलाच नाही.. तो शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेला, आजारी आहे, शहर सोडून गेला, अशा वेगवेगळ्या शक्यता बोलल्या जाऊ लागल्या. तेव्हा आजच्यासारख्या बातम्या लगेच पसरायच्या नाहीत… त्यामुळे एक दिवस न राहवून काही विद्यार्थ्यांनी बर्वे बाईंना त्याच्याबद्दल विचारलंच…. तेव्हा बाईंनी डोळे थोडे मोठे करत… अवंढा गिळत, काहीशा कापऱ्या आवाजात सांगितलं.. “काही दिवसांपूर्वीच कुठल्याश्या दुर्धर आजाराने तो हे जग सोडून गेला.. आता तो आपल्याल्या कधीच भेटणार नाही “… आज मात्र बाईंना अश्रू आवरलेच नाहीत… कदाचित बाईंना तो प्रसंग आठवला असेल… “मोठेपणी कोण होणार” यावरून घडलेला तो “भूतकाळातला” प्रसंग आणि “भविष्यात” तो मुलगा आता कधीच मोठा होऊ शकणार नाही या वास्तवाची “वर्तमानात” वाटणारी खंत आणि अगतिकता बाईंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती…. त्या वयात आमच्या भावभावनांचे पापुद्रे किती उलगडले होते ते नीटसं आठवत नाही पण आम्हाला देखील आमच्या एका हसतमुख, मनमिळाऊ मित्राला गमावल्याचं दुखः नक्कीच झालं होतं… शरीरानी नसला तरीही आम्हा प्रत्येकाच्या मनात “तो मित्र” आमच्या बरोबरीने मोठा झालाय…..
या घटनेला दोन दशकं उलटली… शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीच्या निमित्ताने पुन्हा एकदा शाळेच्या आणि जुन्या शिक्षकांच्या संपर्कात आलो…. त्यातच बातमी समजली की “सुनिता बर्वे” बाई सुद्धा काही महिन्यांपूर्वीच सगळ्यांना सोडून गेल्या… हे कळताच बर्वे बाईंचा हसरा चेहरा, तो मित्र, हा प्रसंग, डोळे पाणावलेल्या बाईंचा लालबुंद चेहरा..हे सगळं slide show सारखं माझ्या डोळ्यासमोरून फिरलं….. खरं तर तेव्हाच हे सगळं लिहावसं वाटलं होतं…पण ज्या दोन व्यक्तींशी संबंधित हा प्रसंग आहे त्या दोन्ही व्यक्ती आज हयात नाहीत… त्यामुळे त्यांच्या विषयी लिहू का नको या द्विधा मनस्थितीत होतो… म्हणूनच आताही त्या मित्राचं नाव मी उघड केलं नाहीये.. आणि माझ्या वर्गातल्या ज्यांना ही घटना माहिती आहे किंवा इतर वर्णनावरून ज्यांना त्याचं नाव समजलं आहे त्यांनीही ते सांगू नये अशी माझी अपेक्षा आहे..
अशा छोट्या छोट्या प्रसंगातल्या शिक्षकांच्या वागणुकीतूनच त्यांना आमच्या विषयी एवढी आपुलकी वाटते हे आम्हाला समजायचं…… हा प्रसंग जरी सुनिता बर्वे बाईंचा असला तरीही ज्यांनी ज्यांनी आमचं बालपण समृद्ध केलं त्या आमच्या “मुख्याध्यापकांपासून, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ते अगदी शिपाई काकांपर्यंत” सगळ्यांनीच आमच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना जे शक्य होतं ते दिलेलं सर्वंकष योगदान हे आमच्या पुढच्या आयुष्यात नक्कीच महत्वाचं ठरलं. आज आम्ही जे काही आहोत त्यात या सगळ्यांचा मोठा वाटा आहे हे आम्ही कोणी नाकारूच शकत नाही… त्यामुळे त्यांच्याबद्दल फक्त गुरुपौर्णिमा आणि शिक्षकदिनाला औपचारिकता म्हणून नाही तर आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी कायमचे कोरले गेलेले असे प्रसंग, आजही त्यांच्याविषयी वाटणारा आदर हीच त्यांच्याप्रती कायमस्वरूपी व्यक्त होणारी खरी कृतज्ञता आहे असं मला वाटतं…. कदाचित अनेकांना आज आपल्या शाळेतले असे वेगवेगळे प्रसंग आठवले असतील.. कुठेतरी दडलेली नक्कीच गवसली असेल……
एक आठवण……शाळेतली
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply