मागे आपण म्हणालो होतो की विजय एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला की तिची मैत्रीण किंवा बहीण त्याच्या प्रेमात पडायची.सर्वांचा नाद सोडल्यावर विजय सुजाताच्या प्रेमात पडला होता. तिच्यासोबत अनिता नावाची एक मैत्रीण तिच्याच ऑफीसात कामाला होती. विजयची आणि त्यांची सकाळी कामाला जाण्याची आणि सुटण्याची वेळ एकच होती. सुजाता दिसायला सुंदर, गोरीपान तर होतीच पण सर्वात महत्वाचं तिच्याही गालावर तिळ होता. तिचे डोळे काळेभोर होते, केस कुरळे होते, मध्यम उंची, शरीरयष्टी गुबगुबीत आणि आवाज सौम्य पण गोड होता. पण ती रागीट होती याचा अनुभव विजयला एकदा आला होता पण तिच्या रागाची परीक्षा घेण्याचा विचारच खरंतर विजय आणि तिच्या प्रेमाच्या आड आला होता.
त्याचं काय झालं ते सांगतो! ते तिघे एकाच बसने प्रवास करत असत. येताना आणि जातानाही! जाताना त्या ज्या बसमध्ये चढत; विजयही त्याच बसमध्ये चढत असे. येतानाही तेच होत असे रोज! त्यामुळे विजय त्यांच्या मागे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. पण पुन्हा गडबड झाली, तो नक्की कोणाच्या मागे आहे हे त्या दोघींनाही कदाचित कळत नव्हते. असे बरेच महिने चालले होते. एके दिवशी विजयने तिला प्रपोज करण्याचा ठाम निश्चय केला होता नेमकी तेंव्हा त्याची तब्बेत बिघडली. एक दिवस बसमध्ये सुजाताच्या बाजूला एक माणूस उभा होता. त्याच्या बाजूला विजय उभा होता बसमध्ये गर्दी असल्यामुळे त्या माणसाचा तिला धक्का लागत होता. त्याच्यावर ती चिडली आणि सरळ उभा रहा वगैरे म्हणाली. दुसऱ्या दिवशी विजय तिच्या बाजूला उभा होता, त्याचाही तिला धक्का लागत होता. तर विजय त्याच्या शेजारच्या माणसाला म्हणाला ए! धक्का मारू नका! उगाच कोणाला लागला तर मला शिव्या खाव्या लागतील. त्यावर ती काही म्हणाली नाही. पण दुसऱ्या दिवशी बसमध्ये विजय जवळच असताना सुजाता अनिताला म्हणाली,” मी त्याला काल काही म्हणाली होती का? खरं तर तेंव्हा विजयच्या धार – धार शब्दांनी सुजाता दुखावली होती. एक दिवस सुजाता आणि अनिता बस स्टॉपवर उभ्या असताना विजयने रिक्षा केली असता त्यांना येता का म्हणून विचारले असता सुजाता नाही म्हणाली. दुसऱ्या वेळेस सुजाता नसताना अनिता एकटीच बस स्टॉपवर उभी असताना विजयने रिक्षा केली असता अनिताला आणि आणखी एका ओळखीच्या मुलीला येते का म्हणून विचारले तर अनिता आली. बोलता – बोलता कळले की अनिता विजयच्या आत्याच्या गावची आहे. त्यानंतर अनिता विजयशी नजरेने बोलुही लागली आणि हसूही लागली. विजयला सरावाने कळले होते कि अनिता त्याच्या प्रेमात पडली आहे. विजय तिला प्रतिसाद देत राहिला कारण त्याला सुजाता जवळ पोहचायचे होते. पण त्यांनतर विजयच्या कामाची वेळ बदलली आणि त्यांची भेट होणे अशक्य झाले अनिता दिसायची कधी – कधी त्याला पण सुजाता नाही दिसली. एकदा बसमध्ये दिसली पण एका तरुणासोबत गप्पा मारताना. त्यानंतर तो सुजाताला आणि अनितालाही विसरला कारण त्याच बस स्टॉप वर त्याच्या वेळेला एक दुसरी अतिशय सुंदर तरुणी त्याला दिसली होती. पुढे सुजाता आणि अनिताचे, काय झाले? ते विजयला माहीत नाही.पुढे त्या तरुणीच्या बाबतीत विजयचे तेच नाटक सुरू झाले. पण ती तरुणी विजयला काही गवत घालायला तयार नव्हती. शेवटी विजयने तिचाही नाद सोडला.पण एक दिवस विजयला अपघाताने तिचे घर सापडले आणि विजयला कळले की ती मुलगी त्याला बऱ्यापैकी ओळखत असावी म्हणूनच ती त्याच्या भानगडीत पडली नाही.
दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती. महत्वाचे म्हणजे ती कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलत असे. ती विजय सोबत विजयाच्या लग्नाला गावीही आली होती. त्यावेळी विजयाच्या लग्नाला समीर आला होता कारण विजया समीरच्याच क्लासमध्ये शिकायला होती. त्याच्या सोबत विजयचे ते डॉ. स्वाध्यायी मित्रही आले होते. लग्नात दिव्या सारखी विजयच्या मागे पुढे करत होती. इतकेच काय तर स्वतःच्या हातावर मेहंदीही तिने विजयकडून काढून घेतली होती. विजयच्या हातात आलेला तो तिसरा नाजूक हात होता. त्यांना पाहणाऱ्या सर्वाना वाटत होतं की त्याच्यात आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे.विजयच्याही मनात तिने घर केले होते. विजयाचे लग्न झाल्यावर ती मुंबईला निघून आली. विजय काही दिवस तिथेच थांबला. पण आल्यावर तो त्याच्या कामात व्यस्थ झाला त्यामुळे त्याची तिची भेट झाली नाही. म्हणजे ती नियतीने घडून दिली नाही. कारण त्यावेळीच अनामिका त्याच्या आयुष्यात चोरपावलांनी आली होती. दिव्याचे एका सामान्य दिसणाऱ्या तरुणासोबत लग्न ठरले होते. आणि महिन्याभरात ते झालेही. तिच्या नवऱ्यासोबत ती एकदा विजयला रस्त्यात भेटली. तेंव्हा अनोळखी झाली नाही. तिने तिच्या नवऱ्यासोबतही त्याची ओळख करून दिली. त्यानंतर तिची आणि त्याची कधीच भेट झाली नाही.आता ती तिच्या संसारात रमून एका सामान्य गृहिणीचे जीवन जगत असावी.
आज विजयने डायबीटीस वरील एक पुस्तक वाचून काढले. विजय तीनशे पृष्ठांचे पुस्तक असेल तरी ते एका दिवसात वाचून काढतो. आणि वाचलेल्या पुस्तकाला पुन्हा शक्यतो हात लावत नाही. म्हणूनच तो पुस्तकांचा फार संग्रह करत नाही. विजयला वाचनासाठी कोणतेही विषय वर्ज नाही. विजयने आजपर्यत शेकडो पुस्तके वाचली आहेत आणि ती पचवली आहेत. त्याच्या वाचनातून कोणताच विषय सुटला नाही म्हणूनच त्याला चौफेर ज्ञान आहे. म्हणूनच त्याच्याशी चर्चा करणारा त्याच्या प्रेमात पडतो. पण इतके असतानाही तो उत्तम श्रोता आहे. त्यामुळे सध्याचा गजर कीर्तनाचा तो ही त्याच्या कानावर पडला असता तो ते मनापासून श्रवण करतो. त्यामुळेच त्याने गीतेचे मराठी भाषांतर एका दिवसात वाचून काढले होते. कोणीही कोणत्याही विषयावरील पुस्तक त्याचा हातात द्यावे आणि त्याने ते न वाचता सोडावे असे कधी होत नाही. हल्ली त्याने वाचलेले ” शिवाजी दि मॅनेजमेंट गुरू ” हे पुस्तक त्याला प्रचंड आवडले. स्वामी समर्थांच्या आयुष्यावरील पुस्तकही त्याने एका दिवसात वाचले होते. पण त्याला आवडलेली पुस्तके म्हणजे ‘देह झाला चंदनाचा ” आणि ”कर्मयोग”! विजय जेंव्हा दिल्लीला गेला होता तेंव्हा येतानाच्या प्रवासात त्याने दिल्ली स्टेशनला एक हिंदी हॉट कादंबरी विकत घेतली होती. मुंबईला पोहचेपर्यत वीस एक तासात ती वाचून संपली होती.पण विजय ठरवून वाचतो ते रोजचे वर्तमानपत्र बाकी सारे अपघाताने आणि योगायोगाने वाचतो.
— निलेश बामणे.
Leave a Reply