जेरुसलेममधील एका प्राचीन भिंतीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील वातावरण तंग बनले आहे. ज्यू या भिंतीला पूजास्थान मानतात. मात्र, त्यांचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. या विधानामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. ताज्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे.या वर्षअखेर आम्ही पॅलेस्टाईन प्रश्नावर समझोता घडवून आणू असे आश्वासन इस्राइल आणि पॅलेस्टाईनच्या नेत्यांनी गेल्या वर्षअखेर अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांना दिले होते. ही मुदत संपायला आता एक महिना राहिला तरी त्या दिशेने प्रगती दिसत नाही. उलट जेरुसलेममधील एका खडकावरच्या एका प्राचीन भितीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील तंग वातावरण वाढत असल्याच्या बातम्या आहेत. पॅलेस्टाईनमधील ज्यू वसाहतींचा प्रश्नही अजून अनिर्णितच आहे. अमेरिका याबाबत इस्राइलवर प्रभावी दडपण आणू शकलेली नाही. इस्राइलबाबत अमेरिकेचे धोरण पाकिस्तानबरोबरच्या धोरणाप्रमाणेच बोटचेपे आहे. त्यामुळे पॅलेस्टाइन प्रश्नावर वर्षअखेर समझोता होण्याची शक्यता फार कमी आहे.
जेरुसलेममधील भिंतीवरून सध्या संघर्ष निर्माण झाला तो पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर या भिंतीसंबंधी प्रसिद्ध केलेल्या एका लेखामुळे. ही उद्ध्वस्त स्थितीतील भिंत जुन्या जेरुसलेम शहरातील एका खडकाला लागून आहे. ज्यू ते आपले पूजास्थान मानतात, पण ज्यूंचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा या लेखात करण्यात आला आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या लेखाचा निषेध केला असून या लेखामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त आणि अनिर्णित प्रश्न आहे. या भिंतीच्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे.
1967 च्या युद्धात इस्राइलने जेरुसलेम शहराचा पूर्व भाग जिंकून घेतला. तो जॉर्डनच्या ताब्यात होता. या भागातच जुने जेरुसलेम शहर आणि या भितीचा समावेश आहे. या भागावरील इस्राइलच्या ताब्यास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. पूर्व जेरुसलेमचा हा भाग इस्राइलने 1967 पासून विकसित केला असून तेथे सध्या दोन लाख ज्यूंची वस्ती आहे. 10 लाख पॅलेस्टिनी अरबांपैकी अडीच लाख या भागात राहतात. भावी पॅलेस्टाईन राज्याची राजधानी म्हणून पॅलेस्टिनी अरब पूर्व जेरुसलेमवर आपला हक्क सांगत आहेत. इस्राइलला ते मान्य नाही. ज्यूंचे पूजास्थान असलेली आणि गेल्या 43 वर्षात विकसित केलेली ही भूमी सोडण्याची त्यांची तयारी नाही. समझोत्यासाठी पॅलेस्टाईनने सुचवलेला तोडगा इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी फेटाळला.
ज्या भिंतीवरून हा वाद उपस्थित झाला ती अलास्का मशिदीची पश्चिमेकडची भिंत आहे असा दावा पॅलेस्टिनीचे माहिती मंत्रालयाचे एक अधिकारी अल मुतावाकेल ताहा यांनी वादग’स्त लेखात केला आहे. ही पहाडावरच्या मशिदीची संरक्षक भित असून, इस्राइलने 1967 च्या युद्धात बळकावली आणि ती ज्यूंची पवित्र भिंत असल्याचा खोटा दावा केला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कँप डेव्हिड येथे 2000 मध्ये इस्राइलचे त्यावेळचे पंतप्रधान एहुद ओल्मर्ट आणि पॅलेस्टिनी अॅथॉरिटीचे अध्यक्ष अब्बास यांच्याशी केलेल्या वाटघाटी फिसकटल्या. त्यानंतर या दोन नेत्यात 2008 मध्ये झालेल्या वाटाघाटीत ओल्मर्ट यांनी असा तोडगा सुचवला की जुन्या जेरुसलेम शहरातील आणि शहराभोवतीच्या पवित्र स्थानांचा कारभार आंतरराष्ट्रीय विश्वस्तांकडे सोपवावा. इस्राइल, पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि अमेरिका यांचे विश्वस्त मंडळ असावे. या तोडग्यास पॅलेस्टिनींकडून प्रतिसाद मिळाला नाही असे ऑल्मर्ट यांनी सांगितले. त्यांनी 2009 मध्ये राजीनामा दिला.
त्यानंतर गेल्या 14 नोव्हेंबरला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी इस्राइलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी बोलणी केली आणि ज्यूंच्या वसाहती बांधण्याचे काम थांबवण्यासाठी आपल्या सहकार्याचे मन वळवा, असे आवाहन केले. यापूर्वी नेतान्याहू यांनी वसाहतींचे बांधकाम 10 महिने स्थगित केले होते. 10 महिन्यांनंतर ते पुन्हा सुरू केले. ते त्यांनी पुन: थांबवावे असे आवाहन हिलरी क्लिंटन यांनी केले. नेतान्याहू यांना त्यांच्या संयुक्त मंत्रिमंडळातील उजव्या गटाच्या मंत्र्यांचा पाठिंबा मिळू न शकल्याने पॅलेस्टाईनचे नेते अब्बास यांच्याशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या बाबतीत प्रगती होऊ शकली नाही. मात्र अशा वाटाघाटी करण्यास ते मंत्रिमंडळातील सहकार्यांची संमती मिळवतील असे गृहीत धरून अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी त्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले होते, पण नेतान्याहू यांना याबबातीत यश आले नाही. इस्राइलने वसाहती बांधणे थांबवावे यासाठी अमेरिकेने इस्राइलला तीन अब्ज डॉलर किंमतीची 20 एफ-35 लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शवली. यूनोत इस्राइलची बाजू ठामपणे मांडण्याचे आणि स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची घोषणा करणारा ठराव मांडण्यात आला तर त्यावर नकाराधिकार वापरण्याचेही आश्वासनही अमेरिकेने दिले. तरीही पॅलेस्टाईनशी वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास आपल्या मंत्तिमंडळाची संमती नेतान्याहू मिळवू शकले नाहीत.
समझोत्यास ‘शास’ या कट्टर धार्मिक पक्षाचा विरोध आहे. या पक्षाचे नेते 90 वर्षाचे ओव्होडियायोसेफ यांनी मागणी केली आहे की वसाहती बांधण्याचे काम 90 दिवसांपुरतेच स्थगित ठेवावे आणि पूर्व जेरुसलेममधील वसाहतींचे मोठ्या बांधकामांना ही स्थगिती लागू करू नये. अमेरिकेने याबाबत लेखी आश्वासन द्यावे.
प्रथम पॅलेस्टाईन आणि इस्राइल यांच्यातील सीमा निश्चित करण्यात यावी असे अमेरिकेस वाटते. क्लिंटन आणि बुश या पूर्वीच्या अमेरिकन अध्यक्षांबरोबर झालेल्या वाटाघाटीत नव्या वसाहती बांधणे इस्रायलने स्थगित करावे असा समझोता सुचवण्यात आला होता, पण या वाटाघाटीनंतर इस्रायलने 1967 च्या सीमेलगतच दोन मोठ्या वसाहतींचे बांधकाम केले आणि तीन महिन्यापुरतेच ते स्थगित ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. कोणत्याही नव्या समझोत्यात हे बांधकाम कायम ठेवण्यात यावे अशी इस्राइलमधील उजव्या गटांची मागणी आहे ती मान्य केली नाही तर पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मंत्रिमंडळातून या गटांचे मंत्री बाहेर पडतील आणि त्यांचे सरकार अल्पमतात येऊन गडगडण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर आपली सत्ता
टिकवायची तर नेतान्याहू यांना उजव्या गटाच्या मंत्र्यांशी मिळते घ्यावे लागेल. तसे केले नाही तर हे गट आपला पाठिंबा काढून घेतील, अल्पमतामुळे सरकार गडगडेल आणि नव्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल. त्यातही त्यांना बहुमत मिळेलच अशी खात्री नाही कारण उजव्या गटांच्या पक्षांना ज्यू तरुणांचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणुकांचाही प्रश्न सुटण्याचा संभव नाही असा हा पेच आहे. त्यात जेरुसलेममधील भितीबद्दलच्या नव्या वादाची भर पडली आहे. इस्रायलबाबत अमेरिकेचे धोरण पाकिस्तानशी असलेल्या धोरणासारखेच असल्याने इस्राइलवर निर्बंध लादणे, लष्करी मदत थांबवणे यासारखे कडक उपाय अमेरिका योजण्याची शक्यता नाही. त्यामुळे पॅलेस्टाईनचा संघर्ष यापुढेही अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास हमास दहशतवादी इस्राइलवर पुन्हा हल्ले सुरू करतील आणि अस्थिरता व अशांतता अधिक वाढेल. एका किरकोळ मुद्द्यावरून इस्त्राइलमध्ये वाढीस लागलेला हा तणाव रामजन्मभूमी आंदोलनाची आठवण करून देणारा आहे.
(अद्वैत फीचर्स)
— वा. दा. रानडे
Leave a Reply