नवीन लेखन...

एका व्यस्त दलालाची प्रेम-कथा

१.
हार्वे मॅक्सवेल, दलाल यांच्या ऑफीसमधे जेव्हा मालकाने, म्हणजे हार्वे मॅक्सवेलने, एका तरूण स्त्री स्टेनोग्राफरला बरोबर घेऊन जलद चालत ऑफीसमधे प्रवेश केला, तेव्हा तेथील खाजगी कारकून पिचर, ह्याच्या नेहमी कोऱ्या असणाऱ्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्य व थोडे कुतूहल क्षणभर चमकले. मॅक्सवेलला जणू कांही दारांतूनच आपल्या टेबलावर झेप घ्यायची होती, अशा चपळाईने तो टेबलापाशी पोहोचला आणि त्याची वाट पहाणाऱ्या टेबलावरील पत्रे, तारा, इ. च्या ढीगांत तो बुडून गेला. ती तरूण स्त्री गेलं एक वर्ष मॅक्सवेलची स्टेनोग्राफर होती. ती खूप सुंदर होती आणि कोणत्याही दृष्टीने स्टेनोग्राफर वाटत नव्हती. थाटमाट आणि मोहक केशरचना यांहून तिचं सौंदर्य वरच्या दर्जाचं होतं. तिने कुठलीही सांखळी, कडे, पदक, इ. घातलेलं नव्हतं आणि कुणी महागड्या हॉटेलांत जेवायचं आमंत्रण दिलं तर ‘मी तयारच आहे की’ हा भावही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. तिचा वेश साधा, करड्या रंगाचा होता पण तो तिच्या अंगाला इतका छान बसत होता की तिची देहयष्टी उठून दिसत होती तरीही त्यात विवेक दिसत होता. तिच्या डोक्यावरील गोल हॅटला लावलेली फीत एखाद्या सोनेरी-हिरव्या रंगाच्या सुंदर पोपटासारखी भासत होती. आज सकाळी ती नाजूक, लाजाळू आणि तेजस्वी वाटत होती. तिचे डोळे स्वप्नाळू पण चमकदार दिसत होते तर तिचे गाल पीच फळाच्या रंगासारखे दिसत होते आणि तिच्या चेहऱ्यावर चांगल्या आठवणींनी उमटणारे आनंदी भाव दिसत होते.

२.
पिचरला अजूनही थोडे कुतुहल वाटत होते. आज तिच्यात नक्की कांही बदल झालाय अशी त्याने नोंद घेतली. थेट आपल्या केबीनमधे, जिथे तिची खुर्ची होती, तिथे जाण्याआधी ती थोडी बाहेर ऑफीसमधेच रेंगाळली. एकदा ती मॅक्सवेलच्या केबीनमधील टेबलाजवळ त्याचं लक्ष जावं, इतकी जवळ गेली. तिथे बसलेलं यंत्र आता मानव राहिलं नव्हतं. तो आता न्यूयॉर्कचा एक व्यस्त दलाल होता. जणू चाकांनी आणि स्प्रिंगजनी फिरणारं यंत्र होतं ते.
मॅक्सवेलने तिला जरा जरबेच्या शब्दात विचारले, “काय? कांही काम आलंय कां?” त्याच्या टेबलावर आता त्याला आलेल्या पत्रांचा पसारा रस्त्यावर बर्फ पसरल्यासारखा विखुरला होता. उतावळेपणाने त्याने त्याची तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखली. “कांही नाही.” स्टेनोग्राफरने उत्तर दिले आणि मंद हंसत ती निघाली. ती खाजगी कारकूनाला म्हणाली, “मिस्टर पिचर, काल तुम्हाला दुसरी स्टेनोग्राफर घेण्याबद्दल मॅक्सवेल सर कांही बोलले कां?” पिचर म्हणाला, “ हो, त्यांनी काल मला दुसरी स्टेनोग्राफर घ्यायला सांगितलेय. मी एजन्सीला फोन करून कांही नमुने पाठवायला सांगितलेत. आतां पावणे दहा वाजायला आले आणि अजून एकही एखादी हॅटवाली शेंग किंवा एखादा गम चघळणारा अननस अजून उगवलेला नाही.” ती तरूणी म्हणाली, “ठीक आहे. मग कोणी तरी येईपर्यंत मी रोजच्यासारख माझं काम सुरू करते.” असं म्हणून ती आपल्या जागेवर गेली आणि तिची पोपटवाली हॅट तिने त्या ठराविक खिळ्यावर अडकवली.

३.
ज्याने मॅनहटनच्या व्यस्त दलालाला कामाच्या घाईच्या वेळी पाहिलेला नाही, असा माणूस मानववंशशास्त्राचा व्यवसाय करायला लायक ठरणार नाही. कवी कामाच्या व्यस्ततेतील गर्दीच्या एका तासावर कविता करेल पण दलालाचा फक्त तासच नव्हे, तर प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक सेकंद व्यग्रतेने गच्च भरून बाजाराच्या मंचाच्या मागच्या व पुढच्या बाजूंना लोंबकळत असतो. आजचा दिवस हा मॅक्सवेलसाठी जास्तच व्यस्ततेचा होता. टिक्करमधून कागदाची भेंडोळी अडकत अडकत, ढकलत खाली पडत होती. टेबलावरच्या फोनला खाली ठेवताच परत वाजायचा आजार झाला होता. माणसे ऑफीसमधे यायला लागली होती आणि रेलींगवरून आनंद, उत्साह, राग, त्वेश, इ. विविध भावना दर्शवत त्याच्याशी बोलत होती. शिपाई मुले मेसेजेस घेऊन आंत येत होती, बाहेर जात होती. ऑफीसमधले कारकून वादळात सापडलेल्या खलाशासारख्या उड्या मारत होते. अगदी पिचरचा कोरा चेहरा सुध्दा थोडा स्वस्थ होऊन हलतोय की काय असं वाटतं होतं.

४.
स्टॉक एक्स्चेंजवर त्या दिवशी चक्रीवादळ, भूकंप, हिमवर्षाव, भूस्खलन आणि ज्वालामुखीचा उद्रेक, असं सगळंच झालं होतं आणि त्याचे लहान, लहान धक्के सतत ब्रोकरच्या ऑफीसमधे पोहोचत होते. मॅक्सवेलने आपली खुर्ची भिंतीकडे ढकलून दिली होती आणि एखाद्या बॅले डान्सर प्रमाणे फक्त टांचावर नाचत तो आपले काम करत होता. तो टिक्करकडून फोनकडे आणि फोनकडून टिक्करकडे एखाद्या प्रशिक्षित चपळ विदूषकासारख्या उड्या मारत होता. हा अशा महत्त्वाच्या कामाचा ताण ब्रोकरवर सतत वाढत असतांना सोनेरी केसांची झालर असलेले, जाजमवर शहामृगाच्या पायाप्रमाणे हलणारे, सील माशांच्या त्वचेसारखे बनवलेले, द्राक्ष्यांप्रमाणे लोंबणारे आणि जमिनीपर्यंत असणारे, चंदेरी हृदयाचे, एक कांहीतरी आपल्या दिशेने येत आहे, असे मॅक्सवेलला दिसले. ह्या सगळ्या शोभेच्या वस्तूंना जोडलेली एक अहंमन्य स्त्री होती. पिचर तिला अडवायला हजर होताच. तिला तिथेच थांबवत तो मालकांना म्हणाला, “सर, जागा भरण्यासाठी ही एजन्सीकडून आलेली स्त्री आहे.” मॅक्सवेलने खुर्ची अर्धी फिरवली. त्याच्या दोन्ही हातांत कागद होते आणि टिक्करची टेपही होती. तो रागानेच म्हणाला, “कोणती जागा?” पिचर उत्तरला, “स्टेनोग्राफरची जागा. काल तुम्ही मला सांगितलंत की एजन्सीकडून कांही स्टेनोग्राफर्सना उद्या सकाळी बोलावून घे.” मॅक्सवेल म्हणाला, “पिचर, तू हल्ली विचित्र वागायला लागलायसं! मी तुला अशी सूचना कां बरं देईन? मिस लेस्लीने गेलं वर्षभर इथे असल्यापासून अगदी उत्तम काम केलेलं आहे आणि मी त्याबद्दल समाधानी आहे. जोपर्यंत ती इथे आहे, तोपर्यंत ही जागा तिचीच राहिलं. मॅडम इथे नोकरीची जागा रिकामी नाही. पिचर त्या एजन्सीला सांग की कोणी नकोय आम्हांला! आता आणखी कोणाला ऑफीसमधे बोलवू नकोस. ते चंदेरी हृदय पाय जाजमावर आणि हात फर्निचरवर आपटून शक्य तितकी खळखळ करत बाहेर निघून गेलं. पिचर बुककीपरला म्हणाला, “दिवसेंदिवस मालक जास्तच विसराळू होतायत.”

५.
कामाची गती सतत वाढतच जात होती. एक्सचेंजमधे पिचरच्या अनेक ग्राहकांचे शेअर्स कोसळून जमिनीवर येत होते. विका, घ्या, अशा ग्राहकांच्या सूचना भर्रकन् उडणाऱ्या चिमण्यांच्या वेगाने येत जात होत्या. मॅक्सवेलचे स्वत:चे कांही शेअर्स घसरत होते पण तो एखाद्या बळकट यंत्राच्या सर्वोच्च वेगाने अचूक, बिलकुल न डगमगता, पटापट निर्णय घेत होता आणि एखाद्या उत्तम घड्याळाच्या तत्परतेने काम करत होता. हे जग शेअर्स, कर्जरोखे, सरकारी बॉण्डज्, गहाणखते, रोखे, इ. नी बनलेलं होतं आणि ह्यांत माणसाला, निसर्गाला आंत यायला वाव नव्हता. जेव्हा लंचचा तास जवळ आला तशी कामाची गती थोडी कमी झाली व आवाज कमी झाले. मॅक्सवेल आपल्या टेबलापाशी उभा राहिला. त्याचे हात अजूनही, तारा, पत्रे, सूचनांचे कागद, इ. नी भरले होते. त्याचे पेन त्याच्या उजव्या कानावर लावलेले होते तर त्याच्या केसांच्या कांही चुकार बटा त्याच्या कपाळावर बेशिस्तपणे लोंबत होत्या. त्याची खिडकी उघडी होती आणि वसंत ऋतुतील उबदार वारा तेथील जागृत रजिस्टर्सना सुखावत होता. त्याच खिडकींतून मंद, नाजूक वाटणाऱ्या सुखद सुवासाची एक झुळुक आंत आली आणि ब्रोकरला क्षणभर स्तब्ध करून गेली. हा सुगंध नक्कीच मिस लेस्लीच्या आणि फक्त तिच्याच मालकीचा होता. त्या सुवासाने मिस लेस्लीची जणू प्रत्यक्ष मूर्तीच त्याच्या मनासमोर उभी राहिली. आर्थिक जग क्षणभर लयाला गेलं. मिस लेस्ली फक्त वीस पावले लांब बाजूच्याच केबीनमधे आहे, ह्याची त्याला आठवण झाली.

६.
तो स्वत:शीच म्हणाला, “बाय जॉर्ज, मी ते आताच करून टाकतो. मी तिला आताच विचारतो. खरं तर मी हें आधीच कां केलं नाही, ह्याचचं आश्चर्य वाटतय.” ज्या चपळाईने तो शेअर मार्केटमधील “शॉर्ट पोझीशन कव्हर” करत असे, त्याच चपळाईने तो घाईने त्या केबीनमधे गेला व जाऊन स्टेनोग्राफर मिस लेस्लीच्या टेबलाशी धडकला. तिने थोडं हंसत त्याच्याकडे वर पाहिलं. तिच्या गालांवर लाली पसरली. तिचे डोळे स्वच्छ आणि दयाळू वाटत होते. मॅक्सवेलने आपल्या एका हाताचं कोपर तिच्या टेबलावर टेकवलं व तो वांकला. दोन्ही हातांत ते कागद आणि कानाला पेन होतेच. “मिस लेस्ली,” त्याने घाईघाईने बोलायला सुरूवात केली. “माझ्याकडे फक्त दोन क्षणाचाच वेळ आहे. मला त्या वेळांत तुझ्याशी कांही बोलायचे आहे. तू माझी पत्नी होशील कां? बघ, माझ्याकडे सामान्य माणसांप्रमाणे तुझ्यावर प्रेम करायला वेळ नव्हता पण मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. बोल पटकन उत्तर दे. ते लोक तिकडे गटबाजी करून “युनियन ऑफ पॅसिफीकचे शेअर्स खाली आणतायत.”

७.
मिस लेस्ली उद्गारली, “ओहो! तुम्ही हें कशाबद्दल बोलताय?” ती उभी राहिली व त्याच्यावर तिने आपले सुंदर डोळे रोखले. तो म्हणाला, “तुला समजत नाही कां? माझ्याशी विवाह करायला तुझा होकार हवाय! त्यासाठी मी ह्या कामाच्या भाऊगर्दीतून थोडा ताण कमी होताच, जरासा दोन मिनिटांचा वेळ काढलाय. माझा फोन तिथे वाजतोयच. पिचर, त्यांना एक मिनिटं थाबायला सांग. मिस लेस्ली, करणार ना माझ्याशी विवाह?” ते ऐकून स्टेनोग्राफर फार विचित्र वागली. प्रथम ती आश्चर्यचकीत झालेली वाटली, मग तिच्या सुंदर डोळ्यांत पाणी तरळले. मग त्या डोळ्यात छानसं हंसू दिसू लागलं. तिने एक हात ब्रोकरच्या गळ्याभोवती नाजूकपणे टाकला आणि ती म्हणाली, “मला आता लक्षात येतय की ह्या तुझ्या जुन्या व्यवसायाने इतर सर्व गोष्टी तात्पुरत्या तुझ्या डोक्यातून काढून टाकल्यात. प्रथम मी घाबरलेच होते. डीयर हार्वे, तुला आठवत नाही कां? काल संध्याकाळी आठ वाजता इथून जवळच असलेल्या “लिटल चर्च”मधे आपला दोघांचा विवाह झाला.”

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द रोमान्स ऑफ ए बीझी ब्रोकर

मूळ लेखक – ओ हेन्री


तळटीप – चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.

ह्या कथेबरोबर ही “उत्तम इंग्रजी कथा-सार” ही मालिका समाप्त होत आहे. संक्षिप्त रूपांतरीत कथा व ह्या कथा मिळून जुन्या इंग्रजी साहित्यातील सर्वोत्तम शंभर कथा सादर केल्या.

आता नवीन काय लिहायचे, हा प्रश्न आहेच. पुढच्या गुरूवारसाठी मी ओ. हेनरीबद्दलच लिहायचं ठरवलंय. त्याचं व्यक्तीगत आयुष्यही कोणत्या कथेहून कमी रंजक नव्हतं.

वेळोवेळी व्हॉटसॲप, फेसबुक, युट्यूब, ह्या समाजमाध्यमांवर अभिप्राय कळवणाऱ्या व इतर सर्वच वाचकांना मन:पूर्वक धन्यवाद.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..