थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ.
थोरला लहानपणापासूनच एकदम हुशार , कर्तबगार , शिस्तप्रिय.
व्यक्तिमत्व रुबाबदार आणि स्वभावाने व्यवहारी.
आपल्याच धुंदीत आणि विश्वात मग्न …
आजूबाजूच्या कशातच न अडकता अलिप्त राहणं जमायचं त्याला.
धाकटा मात्र त्याच्या अगदी विरुद्ध.
अभ्यासात जेमतेम असला तरीही स्वभावाने मनमिळाऊ.
माणसांत रमणारा , नर्मविनोदी स्वभावाचा आणि तितकाच भावनाप्रधान .
नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांच्या सुखदुःखात गुंतायचा तो.
आपलेपणाने कोणासाठीही काहीही करायला सदैव तयार.
मोठा भाऊ छोट्याला नेहमीच म्हणायचा …
“तू एक “ईमोशनल फूल” आहेस !!”..
“मोठं व्हायचं असेल तर असं राहून नाही चालत या जगात !!” .. वगैरे
तेच म्हणत-ऐकत दोघेही मोठे झाले . प्रपंचात गुरफटले.
आपापल्या कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या शहरात बस्तान बसवलं.
थोरल्याने अपेक्षेनुसार बक्कळ पैसाअडका कमावला.
यश , कीर्ती , मानमरातब सगळं मिळालं.
पण त्याच्या अशा स्वभावामुळे फारसं पटायचं नाही त्याचं कुणाशी .
बाकी जगाशी त्याला काही घेणं देणं नसायचं ..
आणि त्यात काही गैरही वाटायचं नाही.
त्याचमुळे मुलंही शिक्षणानंतर दूरवर स्थिरस्थावर झाली.
तिकडे धाकट्याची थोरल्याइतकी घोडदौड नव्हती .
पण गरजेपूरतं सगळं होतं .. व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी.
आजही थोरल्याच्या लेखी हा ‘ईमोशनल फूल’ होताच .
अनेकदा त्याला याची जाणीव करून द्यायचा तो.
कधी चेष्टेने , कधी रागाने तर कधी अधिकारवाणीने समजावत.
पण या ईमोशनल फूल भावाने माणसं मात्र खूप जोडली होती.
अनेक भावनिक नाती जिवापाड जपली होती.
आप्तेष्ट, सुहृदांकडे जाणं-येणं , संपर्क ठेवला होता.
अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा .
तसं कुठल्या मंगलकार्यात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात जायचे दोघेही.
पण तिथेही धाकटा सगळ्यांना हवाहवासा, आपलासा वाटायचा ,
तर ज्येष्ठ बंधूंचा कायम नुसता दरारा असायचा सगळीकडे ..
एकाचा दृष्टीकोन फार व्यवहारी तर दुसऱ्याच्या लेखी भावभावनांना प्राधान्य.
असं करत करत वार्धक्याकडे झुकले.
थोरल्याची पत्नी काही वर्षांपूर्वी जग सोडून गेली .
एके दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं.
शेजाऱ्यांनी कर्तव्य भावनेने लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं .
मुलांना आणि धाकट्या भावाला कळवलं .
हृदयविकराचा सौम्य झटका येऊन गेला होता.
भाऊ ताबडतोब निघाला आणि काही तासातच पोचला त्याच्याजवळ.
मुलंसुद्धा निघाली होती पण काकानी फोनवर परिस्थिती सांगितली .
बाबा आता बरे आहेत हे समजल्यावर त्यानीही येणं टाळलं.
बापलेकांच्या मनातला दुरावा हा भौगोलिक अंतरांपेक्षा जास्त होता.
आपण वर भोज्जाला शिवून आलो याची जाणीव एव्हाना थोरल्याला झाली.
दोघे बंधु हॉस्पिटलच्या खोलीत गप्पा मारत होते.
“ बघ रे !! खरं तर काही काही कमी नाही मला .. तरी सगळे दुरावले !”
“ बायको तर कायमची गेलीच … माझी मुलंही लांब गेली !” ..
“ पण त्यांना काय दोष देणार मी .. माझा स्वभावच कारणीभूत आहे !”
“ तू मात्र मागचं सगळं विसरून तडक आलास !!”
कधीनव्हे ते भावनिक झालेल्या भावाला बघून तो सुद्धा गहिवरला.
पलंगावर त्याच्या अगदी बाजूला जाऊन बसला.
“ अरे , असं काय म्हणतोस ?”
“ मी तिऱ्हाईतांसाठी सुद्धा करतो , तू तर माझा सख्खा मोठा भाऊ !! “
“ तू त्रासात आहेस म्हंटल्यावर मग येणारच ना मी धावत !!”
हे ऐकून धाकट्याचा हात अलगद आपल्या हातात घेत..
“ तुला आजवर इतकं बोलूनही प्रसंगी तूच धावत आलास !”
“ माझ्या ईमोशनल फूल भावा ss .. तू मात्र नातं जपलंस रे !!”..
बोलता बोलता आपसूक त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
मन मोकळं करत अक्षरशः ढसाढसा रडला.
धाकट्याचेही डोळे साहजिकंच पाणावले.
आपला भाऊ आधीच हृदयविकाराने आजारी आहे ,
आत्ता इतकं भावूक होणं तब्येतीसाठी चांगलं नाही ,
वातावरण हलकंफुलकं ठेवणं गरजेचं आहे याचं भान होतं त्याला.
त्याने समोरच असलेल्या फुलदाणीतलं एक प्रसन्न “गुलाबाचं फूल” काढलं
“ अरे ss ते सोड रे जूनं सगळं आता !!”
“ हे घे !! या ‘ईमोशनल फूल’ कडून तुला हे ‘ईमोशनल फूल’.. हा हा ss !!”
लहान भावाच्या मिश्किल बोलण्यामुळे चेहऱ्यावर आपोआपच हसू तरळलं.
बंधुप्रेमात मिठी अधिक घट्ट झाली.
आता पुढेही हे असंच निर्मळ नातं राहील का ?
मोठ्या भावात झालेला हा बदल कायमचा की तात्पुरता ?
विभिन्न स्वभावामुळे निर्माण झालेली भावाभावांमधली दरी कमी होईल का ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित काळच देईल.
पण आत्ता या क्षणाला हॉस्पिटलच्या त्या खोलीतलं वास्तव हेच की ,
नेहमीप्रमाणेच भावनिक झालेला धाकटा “ईमोशनल फूल” .
थोरल्याच्या हातात सकारात्मक उर्जेचं ते गुलाबाचं टवटवीत “ईमोशनल फूल”.
आणि वातावरण मात्र झालं होतं अगदीच “ईमोशनल फुल्लल्लल्ल “.
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply