संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडल्यानंतर ५ जुलै १९१३ मध्ये ‘गंधर्व नाटक मंडळी’ची स्थापना केली होती. गणपतराव बोडस यांच्यासह इतरांचेही त्यांना सहकार्य लाभले होते. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम संगीत नाटकांची निर्मिती त्यांनी केली. चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली. साथीदार आणि वाद्यांची विशेष खबरदारी त्याकाळी घेतली जात होती. ‘किर्लोस्कर’च्या परंपरेनुसारच सादरीकरण करून प्रेक्षकांना वैभवशाली, भव्य, देखणी नाटके पाहण्याची सवय गंधर्व नाटक मंडळीने लावली होती. उत्तम संगीत आणि नाटक यासह अभिजात कलाकृती रंगमंचावरुन सादर करीत रसिकांचा कान घडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारी गंधर्व नाटक मंडळी ही नाट्यसंस्था काळाच्या ओघात बंद पडली असली, तरी संस्थेच्या आठवणी अजूनही रसिकांच्या मनामध्ये ताज्या आहेत.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply