अलिकडे सर्रास लग्न, साखरपुडा, बारसं, वाढदिवस, यासारख्या असंख्य कौटुंबिक समारंभात जेवणावळी वा पंगत या हद्दपार होत असून बुफेने अलगद घुसखोरी केली आहे. बुफेचा उद्देश हा आवडीचं पण नेमकंच खाणं हा असला तरी बरेचदा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले अनेकविध पदार्थ आणि त्यांची मनमोहक रुपं यांच्या गोतावळ्यात बुफेचा गुंता हा वाढतोच. बुफेसाठी वास्तवात हवेशीर, मोकळी, मुबलक जागा हवी पण प्रत्यक्षात फारच थोड्यावेळी असे हॉल, लॉन उपलब्ध होतात. अपुर्या, कोंदट, छोट्या बंदिस्त ठिकाणी कुठेही एक टेबल लावून जेवणाची, ताटांची व्यवस्था करून बुफे म्हणजे या, घ्या अन् भरभर कसरत करून खा अन् फुटा असा काहीसा भाव या बुफे पद्धतीतून व्यक्त होत राहतो. वास्तवात कुठल्याही समारंभाला पाहुण्यांचे अगत्याने स्वागत अन् आग्रहाचे भोजन, आपुलकीने विचारपूस अन् परिचितांशी, हक्कांन ऐसपैस बसत झालेल्या गप्पागोष्टी या अपेक्षित असतात पण येथे नेमके उलटे होते.
बुफेत जेवणे ही एक कलाच आहे. मुलं, वयोवृद्ध यांची तर फारच पंचाईत हते. एका हातात अवाढव्य पदार्थांची रेलचेल असलेले ताट धरून, मिळेल त्या जागेत, उभ्याने जेवणे ही एक कसरत बनते.
पाश्चिमात्य जगात एकतर भारतीय जेवणाइतकी विविधता पदार्थात नाही. अन् जे पदार्थ बनतात ते जास्त करून एकाच प्रकारात येतात त्यामुळे ते पदार्थ एकाच डिशमध्ये घेवून खाणे सोपे असते.
या उलट आपले भारतीय जेवण चटणी, कोशिंबीर, पापड, भात, आमटी, सुकी ओली रस्सा भाजी, स्वीट म्हणून पक्वान्न त्यातही काही घट्ट काही पातळ काही मध्यम जसे श्रीखंड, पुरणपोळी, काला जामुन, गुलाबजाम, बासुंदी, रसमलाई, रसगुल्ला, जिलबी अशा अनेकासाठी ताटली (प्लेट), वाटी (बाऊल) असा सारा मामला एकत्र डिशमधे वाढून खाणं म्हणजे शुद्ध वेडेपणा होय.
मनुष्यस्वभाव हा अधिरा असतो. घरी प्रत्येक जण नेमकेच जेवतो. पण बाहेर समारंभाला बुफेत मात्र अनेकविध पदार्थांची आकर्षक रेलचेल, तत्सम साउथ इंडियन, पंजाबी तडका, गुजराथी, चाट, बंगाली स्वीट्स, राजस्थानी अशा पदार्थांसाठी स्टॉल लावलेले त्यामुळे त्यातील पाककृती बनताना पाहताच भुरळ पडते. मग काय खाऊ काय नको असं होणं स्वाभाविकच ! पण या ठिकाणी संयम हवा. भले आधी पूर्ण एक चक्कर मारावी. मेनुचा आपल्या आवडीचा ताळमेळ बघावा, मग कुठल्या प्रांताची सैर करायची हे ठरवून त्याप्रमाणे खाद्य मोहीम आखावी.
बुफे जेवताना आपली वर्तनशैली सुयोग्य हवी. सर्वसामान्यत: आपण भारतीय लग्न असेल वा अन्य समारंभ, यजमानांना भेटून, अभिनंदन करून, भेटवस्तू देऊन मग जेवणाकडे वळतो.
अशावेळी सर्वप्रथम प्रसाधनगृह वा तत्सम हात धुण्याच्या ठिकाणाचा शोध घेऊन हात स्वच्छ धुवावेत. कारण ते आपल्या हिताचे असते. नियोजित ठिकाणी जाईपर्यंत आपण अनेक ठिकाणी हात टेकवलेले असतात आणि अस्वच्छ हातानी पोटात काही जाणे म्हणजे अनारोग्य होय.
काही वेळेला आपल्या समवेत वा हॉलमध्ये अनोळखी, अपरिचित अशा अपंग, वयोवृद्ध व्यक्ती असतात. अशावेळी आपण वा अन्य तरुण मंडळींनी पुढाकार घेवून अशांची टेबलखुर्चीसाठी व्यवस्था करावी. टेबल नसेल तर किमान 2 खुर्च्या आमने सामने ठेवून मांडामांड करुन देत त्यांची बसण्याची, पर्यायाने जेवणाची त्यातल्यात्यात सुलभ व्यवस्था करून द्यावी.
अशा व्यक्तींना हात धरून प्रसाधनगृहात नेऊन वॉशबेसीनवर हात धुवून द्यावेत. अनेकदा चित्रविचित्र नळांमुळे या व्यक्तींचा गोंधळ होत असतो.
वयोवृद्धांच्या, अपंगांच्या आवडीनुसार पदार्थ वाढून आणावेत. सोबत पाण्याचा पेला ज्यामुळे त्यांना भोजनाचा आनंद घेता येतो.
त्यांचे भोजन झाल्यावर केटररच्या माणसांना सांगून त्यांचे खरकटे ताट धुण्याच्या टबात ठेवावे वा आपण स्वत: ठेऊन यावे.
बुफेत जेवतांना, पदार्थ वाढून घेतांना भले अनेकदा जावे लागले तरी चालेल पण एकदम सर्व काही पानात वाढून घेणे टाळावे ज्यामुळे बुफेतील अनेकविध पदार्थांचा मनमुराद आस्वाद सर्वजण सहजतेने घेऊ शकू.
मर्यादित वाढून घेतलेल्या पदार्थांमुळे तिखटाचे गोडात, भातात सांडलेली बासुंदी, ग्रेव्हीत भिजलेली भजी, पुरी असा सांडलवणपणा न होता एका हातात पेलवेल इतपतच जेवण जेवणे शक्य होईल. पदार्थाचा विचका होणार नाही पोटाला मानवेल आणि हातापायाला झेपेल अन् मानेवरही ताण येणार नाही.
सर्वात महत्वाचे, हॉलमध्ये फिरताना आपला पोशाख, इतरांचे पोशाख स्वच्छ राहतील. परस्परांच्या अंगाला खेटलो तरी ओशाळी परिस्थिती उद्भवून सॉरी म्हणण्याची तसदी पडणार नाही.
उन्हाळ्यात बेताने खावे. पदार्थ पानात अधाशाप्रमाणे वाढून न घेता चिमुकला वाढून चाखून बघावा. आवडला, मानवला तर भरपूर घ्यावा. अन्यथा अनेकदा नवनवे पदार्थ आकर्षित वाटले तरी चवीला, आपल्या स्वादाला, न भावणारे असल्याने मग पानात घेतलेत म्हणून खा वा सरळ टाका असा घोळ टाळण्यासाठी आधी थोडासा पदार्थ टेस्ट करा मग पानात घ्या. अन्नाची नासाडी ही टाळायला हवी. आजच्या भारतातील 30% हून अधिक जनता ही अर्धपोटी आहे याची जाणीव ठेवावी.बुफेत लहान मुलांना अनेकदा स्वतंत्र ताट दिलं जातं. वास्तवात त्याची काहीच गरज नाही. आपल्या घरच्याप्रमाणेच आपल्या ताटातून मुलांना भरवता येते. मुलांचे थोडेसे खाणे, त्यांच्या आवडीनिवडी, काही पदार्थांना हातही न लावणे, तिखट गोड आवडी, त्यांचा हट्टीपणा याची मोठ्यांना, त्यांच्या पाल्यांना जाणीव असते. अशावेळी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि यजमानांचा ताटाचा खर्च वाचण्यासाठी जागरुक रहावे.
बुफेसाठी वापरण्यात येणारी मेलॅमीन भांडी, यात ताटवाटी चमचे हे बहुतकरून ओशट, कळकट असतात त्यातून जेवणे म्हणजे हतबलता. यासाठी केटररला आधीच विश्वासात घेऊन स्वच्छतेची हमी घ्यायला लावावी. स्वादिष्ट, रुचकर पदार्थांचे गुणधर्म कायम राहण्यासाठी वेळप्रसंगी अधिक खर्चाची तरतूद ठेवावी. यासाठी केटररने सहकार्य करावे. स्टीलची ताटे ही पूर्वी पंगतीत असत पण तेव्हा ते ताट हातात धरून जेवायला लागत नसे. आता उभ्याने, मर्यादित जागेत भोजनाचा खटाटोप असल्याने एवढी जड ताटे हातात धरणे अशक्यच पण त्यासाठी तडा गेलेली,रंग उडालेली, मळकी घाणेरडी ताटे हा पर्याय होऊ शकत नाही.
स्वच्छतेसाठी प्रत्येकानेच आग्रही असायला हवे. खोलगट कप्प्याच्या पत्रावळी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. यातच पानांच्या वा पातळ प्लॅस्टिकच्या अशा प्रकारांचा स्वीकार झाला तर वापरा आणि टाका अशा सुलभ पद्धतीमुळे सुग्रास भोजनाचा चिंतामुक्त आनंद लुटता येईल. बुफेत सर्वसामान्यत: ‘घेशील किती दोन करांनी खात रहा एक तोंडानी’अशी स्थिती असते. अनेकविध पदार्थांची, मनमुराद लूट, ‘मर्यादित काही नाहीच अगडबंब सारे’ या न्यायाने अनेक बुफे पाटर्यांमधून वाजवीपेक्षा जास्त अन्नपदार्थ तयार होऊन ते अन्नाची नासधुस होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
भारतात आजच्या घडीला 23 कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही.
एकाच वेळी अनेक पदार्थांचे सेवन म्हणजे अपचन, पर्यायाने आजारपण अन् डॉक्टरला निमंत्रण !
आपल्या सर्व धर्मांमध्ये अन्नाचे किती आणि काय महत्व आणि सेवन यावर किती अन्न आवश्यक ते कथन केले आहे. वास्तविक आपले दोन तळ हात जोडले की जेवढा आकार होतो तेवढेच पोट असते. जैनमुनी किंवा बौद्ध यांच्या प्रमाणेच शंकराचार्यांनीही ‘करतल भिक्षा’ म्हणजेच आपण प्रत्येकाने किती खावं हे भाष्य केले आहे. ज्याचे पालन अशा सर्व बुफेच्या सणासमारंभातून सर्वांनी व्यक्तिगत सामुहिक स्तरावर केलं तर ते चांगलं होईल. ज्यामुळे जगातील कोणीही कुपोषित भुकेला न राहता सर्वांसाठी अन्न उपलब्ध राहील. घराबाहेरच्या जगात प्रत्येक माणूस कसा वागतो, राहतो, बोलतो हे महत्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र हा एक विषय असायचा. एक नागरिक म्हणून आपली काय कर्तव्ये आहेत, समाजात कसे रहावे, वावरावे याविषयीचे धडे त्यात असायचे. विषय सोपा, चांगले गुण मिळतात म्हणून त्यात प्राविण्य मिळवलं जायचं. कमी अभ्यासाचा पण जास्त फायद्याचा म्हणून त्याचा गवगवा असायचा. वास्तविक हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता माणूस हा कितीही मोठा झाला तरी आणि जगाच्या पाठीवर कुठेही फिरला तरी या विषयाचे आकलन आणि व्यवहारात त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण शिष्टाचार, तुमची वर्तनशैली यावरच देशाची प्रगति वा अधोगति होत असते. म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची वर्तणूक सभ्य आणि नियमबद्ध हवी.
अशा अनेक प्रकारच्या वर्तनशैलीचा आपण सर्वांनी विचार करून ती आत्मसात केली तर सार्वजनिक जीवनातला आपला वावर हा उपद्रवी न होता सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो.
समता गंधे
५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
गोरेगांव (पूर्व), मुंबई
४०००६३०२२-२८७४५६८१
Leave a Reply