जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जोडपं “गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन” बघण्यासाठी गेलं. तसं पूर्वी जाणं व्हायचं बरेचदा तेव्हा त्याचं इतकं काही कौतुक वाटायचं नाही पण या मधल्या सगळ्या कोरोना प्रकरणामुळे चार माणसांत फिरायला जाणं दुर्लभ झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाला जाण्याचा आज एक वेगळाच उत्साह होता. त्याच आनंदात दोघेही आत शिरले. सगळे तसेच पूर्वीसारखे स्टॉल. तीच लगबग. अनेक महिन्यांनी जुनं चित्र डोळ्यासमोर बघून दोघांनाही खूप बरं वाटलं. स्टॉलच्या दोन रांगांमधलं किंचितसं वाढलेलं अंतर आणि काही जणांच्या चेहऱ्यावर मास्क या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळं पूर्वीसारखंच .. बायको सुद्धा अगदी त्याच पूर्वीच्या उत्साहात सुरवातीलाच असलेल्या कानातल्या-गळ्यातल्यांच्या स्टॉलवर घुसली आणि नवरोबा दोन रांगांमधल्या दोरीपाशी जाऊन उभा राहिला. उभ्या उभ्या तिथून लांबवर नजर टाकली. सगळे आपापले स्टॉल सांभाळण्यात व्यस्त होते. त्या त्या वस्तूंचे स्टॉल साधारण त्याच ठिकाणी होते .. नेहमी असायचे तसेच. काही मोजके नवीन स्टॉल वगळता बरेचसे चेहरे ओळखीचेच होते. दोन वर्षात काहीच बदललं नाही असं वाटू लागलं. “गतवैभव प्राप्त झालं” वगैरे असे मोठे मोठे शब्द त्याला सुचू लागले आणि तेवढ्यात त्या विचारांना आवरतं घ्यायला लावणारी एक पिशवी त्याच्या हातात येऊन पडली. “न्यू नॉर्मल” नंतरच्या पहिल्या वहिल्या प्रदर्शनात बायकोने केलेल्या खरेदीची पिशवी.
या शुभारंभानंतर “खरेदी थोडी अन् चिकित्सा फार” या तत्वावर पुन्हा प्रदर्शनाचा प्रवास सुरू झाला. काही स्टॉलच्या बाहेर दोरीपाशी उभे असलेले बिचारे समदुःखी नवरे बघून याला उगाच बळ मिळायचं. कोणी मित्रमंडळी अनेक दिवसांनी भेटले म्हणून थोडं थांबून गप्पाही झाल्या. काही स्टॉलवर लीलया विजय मिळवत , नको असलेल्या वस्तूंच्या स्टॉलना सोडून देत तर काही ठिकाणी तह करत जोडपं एकेक स्टॉल पादाक्रांत करत होतं. इतक्यात ती रांग संपून वळण आलं. त्यांनी “यू टर्न” घेतला. पुढचा स्टॉल आपल्या कामाचा नाही हे बघून तो पुढे चालू लागला पण त्या स्टॉलवरचा एक माणूस झडप घातल्यासारखा त्याच्या अंगावरच आला. नो पार्किंग मधलं वाहन बघून टोईंग व्हॅन कर्मचारी ज्या “आत्मियतेने” धावत येतात ना अगदी तसंच. बरं आला तर आला ss पण एक माहितीपत्रक त्याच्या हातात थोपवत आणि त्याच्या पोटाकडे बोट दाखवत म्हणाला ..
“ सर सर .. हे घ्या ..हे सुटलेलं पोट एकदम कमी होणार , सगळे फॅट जळून जाणार .. आपली फूल गॅरंटी !!..
हे ‘मनोबल खच्ची करणारं’ वाक्य ऐकून याला साक्षात्कार झाला की “कहानी सिनेमा संपता संपता विद्या बालनच्या पोटाकडे प्रेक्षक जितक्या साशंक नजरेने बघतात ना तसा हा गृहस्थ आपण बाजूच्या रांगेत असतानापासून आपल्या पोटाकडे निरखून बघत होता. सावज हेरून ठेवत होता. याचं सुटलेलं पोट त्याच्या नजरेतून काही सुटलं नाही.
नको नको म्हणत त्याने तिथून पळ तर काढला पण इतका वेळ मनात सुरू असलेल्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि दोन वर्षात नेमकं काय बदललं याची त्याला चांगलीच प्रचिती आली. आता हा गडी प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकू लागला. पुढे कुठला स्टॉल आहे हे आधी लांबूनच बघायचा मग स्वारी पुढे जायची. थोड्या अंतराने एक सौंदर्य प्रसाधनांचा स्टॉल होता. खरं तर महिलांचा होता पण परवाच भांग पडताना केसांत पांढऱ्या केसांचा पुंजका नजरेस पडला होता. बर्फीवर चांदीचा वर्ख लावावा तसा. त्या स्टॉलवरच्या एखाद्या सोन्यासारख्या युवतीसमोर आपलं हे पितळ उघडं पडेल आणि त्या केसांच्या चांदीचं लोखंडं करण्यासाठी ती एखादा रंग गळ्यात मारेल हा संभाव्य धोका लक्षात घेत त्याने फोन आल्याचं नाटक केलं आणि पुढे सटकला. बायकोला सुद्धा हळूच पुढे बोलावून घेतलं. आता त्या प्रदर्शनातली खरेदी म्हणजे त्याच्यासाठी अशी अडथळ्याची शर्यत झाली होती.
असंच स्टॉल न्याहाळता न्याहाळता पुढचा एक स्टॉल बघून त्याला गेल्या महिन्यातला एक प्रसंग आठवला. घरी आपल्या मुलाशी बोलताना आजोबांना पडलेल्या टकलावरून विषय निघाला तेव्हा या प्रकारचं आजूबाजूला केस आणि मध्यभागी टक्कल असेल तर त्याला आम्ही लहानपणी “चिवड्यात लाडू” म्हणायचो असं सांगून मुलाच्या ज्ञानात भर पाडली होती. त्याच क्षणी स्मार्ट चिरंजीवांनी त्याच्या स्मार्ट फोन मधल्या कॅमेऱ्याचा ड्रोन कॅमेरसारखा उपयोग करत याच्या डोक्याचा टॉप व्ह्यू फोटो काढला आणि केसांच्या मध्यभागी लाडू तयार होत आहे याची वर्णी देत त्यालाच चांगला आरसा दाखवला. हे आठवायचं कारण म्हणजे मगाचच्या पोटवाल्या काकांसारखेच एक टक्कलवाले काका हातात माहितीपत्रक घेऊन टक्कल घालवण्याचं तेल-औषधं विकत होते. आजूबाजूच्या गर्दीचा फायदा घेत मोठ्या शिताफीने आपला डोक्यावरचा लाडू लपवत त्याने पोबारा केला.
अखेर थोडे साबण, धूप-उदबत्त्या, खादीचे शर्ट, बायकोने टॉप , ३-४ कर्णफुलं, कोकण मेवा, नळाला लावायची तोटी, सरबतं, मेतकूट, चटण्या , डासांची बॅट, , मुंग्यांचं औषध, अत्तर .. वगैरे वगैरे अशी “किरकोळ” खरेदी करून जोडपं आता प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात पोचलं. बायको अशाच एका महिला विशेष स्टॉलमध्ये गुरफटली म्हणून हा परत बाहेर दोरीपाशी थांबला. त्याच्या बाजूच्या स्टॉलवर कुणीच ग्राहक नसल्याने त्या काकू त्यांच्या वस्तु नीट लावून ठेवत होत्या आणि त्यांचा शाळकरी मुलगा पेटीतल्या नोटा आणि नाणी व्यवस्थित रचून ठेवत एका वहीत काही लिहीत होता. इतक्यात त्या स्टॉलवरच्या काकूंची मैत्रीण तिथे आली म्हणून काकू बाहेर आल्या आणि याच्याच शेजारी गप्पा मारत उभ्या राहिल्या. दोघी बहुतेक बऱ्याच महिन्यांनी भेटत होत्या. त्यातले काही संवाद याच्या कानावर पडले
“ अगं फार पूर्वी सुद्धा लावायचे स्टॉल प्रदर्शनात पण अगदीच कधीतरी. वेळ मिळेल तेव्हा हौस म्हणून. पण गेल्या वर्षी दुसऱ्या लाटेत माझे मिस्टर आणि सासू-सासरे तिघेही गेले. खूप एकटी पडले !!
“ बाप रे !! काहीच कल्पना नाही गं !!”
“ पण आता सावरायला तर हवंच ना .. या लेकरासाठी !”.
त्या मुलाकडे प्रेमाने बघत काकू पुढे सांगत होत्या.
“ आता आर्थिक गरज आणि जबाबदारी दोन्ही वाढलंय. म्हणून सुरू केलं आता परत स्टॉल लावणं. हेच साधन आता उत्पन्नाचं. एरवी घरूनच करते सगळं. त्याची शाळा नाहीये सध्या म्हणून येतो कधीतरी मदत करायला. नाहीतरी घरी एकटाच बसणार. तेवढंच लहान वयात जरा बाहेरचं जग सुद्धा कळेल !”.
हे सगळं ऐकून त्याचं मन तर हेलावून गेलंच पण काकूंची दया येणं , सहानुभूती वाटणं यापेक्षा इतक्या कठीण परिस्थितिनंतर सुद्धा त्यांच्या धैर्याला, त्यांच्या सकारात्मकतेला सलाम ठोकावासा वाटला. त्या काकूंकडून त्यांनी काही वस्तु घेतल्या आणि ते निघाले पण गेल्या दोन वर्षात काय गमावलं, काय बदललं याचा इतका वेळ मांडलेला लेखाजोखा किती वरवरचा होता याची जाणीव झाली. तिथे उपस्थित सगळेच मग तो स्टॉलधारक असो , ग्राहक किंवा अन्य कोणीही ; सगळ्यांकडे बघून अगदी पहिल्यासारखं वातावरण वाटत असलं तरी त्यातल्या अनेकांच्या बाबतीत असे प्रसंग घडले असतील कदाचित. पुन्हा सर्वकाही पूर्ववत झालंय या “आनंदाच्या हिरवळीखाली” असे कितीतरी “दुःखांचे डोंगर” गाडले गेले असतील. पण तरीही त्या भूतकाळाला मागे सारत सगळ्यांचीच पुन्हा नव्याने उभं रहाण्याची, मनोबल उंचावणारी ही जिद्द नक्कीच उल्लेखनीय होती.
शेवटी बाहेर पडता पडता त्याने मागे वळून पुन्हा एकदा त्या संपूर्ण प्रदर्शन स्थळावरून नजर फिरवली. काही सेकंदं थांबून ती वर्दळ, तो उत्साह डोळ्यात आणि मनात साठवून घेतला. नेहमी यायचे तेव्हा केवळ “गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन” असायचं पण यावेळेस मात्र त्यांनी अनुभवलं होतं कायम स्मरणात राहील आणि “आयुष्यभर उपयोगी” पडेल अशा “सकारात्मक उर्जेचं प्रदर्शन” .
–– क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply