विठ्ठल व्यंकटेश कामत यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९५३ रोजी मुंबई येथे झाला.
विठ्ठल कामत यांच नाव घेताच डोळ्यासमोर उभी रहातात “सत्कार“, “ऑर्कीड” आणि “सम्राट” सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृहे.
विठ्ठल कामत यांचा जन्म मुंबईतील ग्रॅंट रोड येथे वास्तव्यास असणा-या कामत या कुटुंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच परंतु कष्ट करुन पोट भरण्यावर कामत कुटुंबियांचा कल. विठ्ठल कामत यांच्या वडील व्यंकटेश यांचे हॉटेल व्यवसाय होता. विठ्ठल यांच्या आईचेही असेच म्हणने होते की, विठ्ठलनेही मोठे होऊन वडिलांचा व्यवसाय वाढवावा. परंतु, विठ्ठल कामत यांना हॉटेल व्यवसाय वेगळ्यापद्धतीने मोठा करायचा होता. आपला वडिलोपार्जित व्यवसायाचे नाव जगभरात करायचे होता. दरम्यान, विठ्ठल यांनी आपले इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
हॉटेल इंडस्ट्रीमधील बारकावे शिकण्यासाठी कूकचे काम केले… वडिलोपार्जित ‘सत्कार’ हे हॉटेल चांगले चालत होते. दरम्यान विठ्ठल यांनी आपल्या आयुष्यातील मोठा निर्णय घेतला आणि तो निर्णय त्यांनी आपल्या बाबांना सांगितला. मला जगभरातील हॉटेल्समध्ये काम करायचे आहे आणि मला हॉटेल व्यवसाय सुरु करण्यापूर्वी प्रॅक्टिकल ज्ञान घ्यायचे आहे. वडिलांनीही विठ्ठल यांच्या निर्णयाला होकार दिला. विठ्ठल कामत यांनी वेळ न दवडता लंडन गाठले आणि तिथल्या रेस्टॉरंटमध्ये कूक म्हणून नोकरीस रुजू झाले. या कामाचे विठ्ठल कामत यांना दर आठवड्याला ७५ पौंड मिळायचे. त्यांनी येथे कूकसहीत पडेल ते काम केले. जे काम जमत नव्हते त्याचे ज्ञान ग्रहण केले. आणि यातूनच त्यांना हॉटेल व्यवसायातील बारकावे कळत गेले.
हॉटेल एकट्याने कधीच चालत नाही. टीमवर्कचे चांगले उदाहरण म्हणजे हॉटेलिंग व्यवसाय. मुख्य शेफ, त्याच्या खाली काम करणारे कूक ते हॉटेलमध्ये साफसफाई करणा-या कर्मचा-याला कसे सांभाळणे, टीम कशी उभी करणे, मुख्य म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचे धडे कॉलेजमध्ये न घेता विठ्ठल कामत यांनी देश-विदेशातील हॉटेल्समध्ये काम करुन ते शिकले. आणि हा सर्व अनुभवानिशी पुन्हा भारतात आले. आणि आपला वडिलोपार्जित व्यवसाय वाढविण्याकरीता कामाला लागले.
भारतात येऊन विठ्ठल कामत यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय सुरु केला खरा. परंतु, त्यांना हा बिझनेस मोठा करायचे होते, त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरु केले. दरम्यान त्यांन कळाले की सांताक्रुझ एअरपोर्टनजीकचे ‘प्लाझ्मा’ हॉटेल विकायला काढले आहे. विठ्ठल कामत यांनी त्यात रस दाखविला. परंतु, हे हॉटेल विकत घेण्या इतपत आर्थिक बळ त्यांच्याकडे नव्हते. तेव्हा त्यांनी आर्थिक जमवाजमव करुन हे हॉटेल खरेदी केले. त्याच जागेवर देशातील पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल्स सुरु केले. आणि हॉटेलचे नाव ‘ऑर्किड’ असे ठेवले. याच व्यवहारानंतर विठ्ठल कामत यांचे मोठे हॉटेल उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले. याच दरम्यान एक साधारण मुंबईकरही हॉटेल व्यवसाय सुरु करु शकतो, हे सा-यांना कळून चुकले आणि विठ्ठल कामत प्रसिद्ध झाले.
देशात विठ्ठल कामत यांनी पहिले इको-टेल फाइव स्टार हॉटेल सुरु केल्यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आपल्या बिझनेसची वाढ फ्रॅन्चायझी पद्धतीने केली. आज देशातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठल कामत यांचे हॉटेल आहेत. एवढेच नव्हे तर देश-विदेशातील ४५० हून अधिक ठिकाणी या हॉटेल्सच्या बिझनेस विस्तारला आहे. आणि विठ्ठल कामत हे महाराष्ट्रातील आणि देशातील हॉटेलिंग व्यवसायातील प्रमुख नाव आहे.
विठ्ठल कामत हे “महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा” चे अध्यक्ष राहिले असून, “हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया” च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष होते; या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितींवर सल्लागार तसंच विविध पदांवर नियुक्त आहेत, त्यासोबतच “आय.आय.एम.” अहमदाबाद आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य कामत करत आहेत.
आत्तापर्यंत विठ्ठल कामत यांना शंभरापेक्षा ही जास्त राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यामध्ये “गोल्डन पिकॉक ॲवॉर्ड”, “पाटवा इंटरनॅशनल अचिवर ॲवॉर्ड”, “राजीव गांधी एन्वायर्मेंट ॲवॉर्ड”, तर “ऑर्किड” साठी “इकोटेल” हा किताब मिळवण्याचा बहुमान विठ्ठल कामतांना जातो.
हॉटेल उद्योग व्यतिरिक्त विठ्ठल कामतांनी पर्यावरणाला फायदेशीर ठरेल अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली आहे. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसंच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्यांचा मानस आहे. यासाठी “पाथरे गांव” सारख्या डोंगराळ भागात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवणं, आणि उल्लेख करावा अशा “फुलपाखरु उद्यानाची” समावेश करता येईल. “हरीण”, “कासव”, आणि दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. तसंच ओडिसा येथील “चिलिका तलाव” येथे “डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर” ची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कीड हॉटेल च्या परिसरामध्ये “राघु” आणि “चिऊ गल्ली” ची भारणी करुन वातावरणात अधिकाधिक नैसर्गिकता आणली आहे.
अनेक दुर्मिळ आणि प्राचीन वस्तु गोळा करण्याचा छंद असलेल्या विठ्ठल कामतांनी “मुंबई” आणि “जाधवगड” येथे “आई” या संग्रहालयाची उभारणी सुद्धा केलेली आहे, या संग्रहालयात “टाकाऊ पासून टिकाऊ” वस्तुंचा समावेश असून पर्यावरणाला पुरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी केला आहे.
विठ्ठल कामतांची “हॉटेल इंडस्ट्री” मधील कारकीर्द आणि “उद्योजक” म्हणून यशस्वी पणे वाटचाल केलेला प्रवास “उद्योजक होणारच मी” आणि “इडली ऑकिड आणि मी” या पुस्तकांमधुन वाचकांपर्यंत समोर आलेला ही दोन्ही पुस्तकं उद्योजक बनु इच्छिणार्या तरुणांसाठी, केटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील अशीच आहेत. विठ्ठल कामत यांची बिझनेस कहानी मराठी बिझनेसमन आणि मराठी नवउद्यमींसाठी प्रेरणादायक आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply