नवीन लेखन...

“फराळ … The “Fast” “food”

फराळ … The “Fast” food असं शीर्षक बघून “बाहुबली .. The Beginning” किंवा “दाग … The Fire” वगैरे अशा हिंदी सिनेमाचं title आठवलं असेल .. पण असं लिहिण्याची दोन कारणं आहेत .. पहिलं म्हणजे.. Style असते ती … असं लिहिलं की “उगीच” काहीतरी भारी वाटतं .. आणि दुसरं म्हणजे विषय काय आहे ते समजतं …. बघा ना ss… फराळ म्हंटलं की दिवाळीतला वाटू शकतो .. तर हाss “तो फराळ” नाही .. पण मग हा फराळ “फास्ट फूड” चा कुठला प्रकार ?? …. तर हे ss “ते फास्ट फूड” नाही … वर्षभर आपण पिझ्झा-पास्ता-नूडल्स किंवा असे फास्ट फूडचे कितीही प्रकार खाऊन आपल्या जिभेचे चोचले पुरवले तरीही वर्षातल्या काही ठराविक दिवशी .. काही विशिष्ट पदार्थ खाण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत असतो ते म्हणजे “सार्वजनिक” उपासाच्या दिवशी केले जाणारे उपासाचे/उपवासाचे पदार्थ … अर्थात “Fast” Food …

साप्ताहिक , मासिक किंवा अन्य नियमित उपास करणारे वगळता आषाढी-कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री असे काही मोजके उपास करणाऱ्यांचे तीन प्रकार आहेत .. पहिला – धार्मिक भावनेने उपवास धरणारे , दुसरा – सगळेच करतात किंवा वर्षानुवर्ष करतोय किंवा घरचे सक्ती करतात म्हणून करणारे .. आणि तिसऱ्या प्रकारातले माझ्यासारखे अनेक जण हे केवळ उपवासाचे पदार्थ “अधिकृत”पणे मनसोक्त खाता यावेत यासाठी करणारे … शिवाय घरच्या सगळ्यांचाच उपास असला की “उगाच माझ्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला नको” हा “उदात्त हेतू” त्यामागे असल्याचं सुद्धा नीट “भासवता” येतं … घरी त्या दिवशी “उपास” हाच “एक कलमी” कार्यक्रम असल्याने विविध पदार्थांची रेलचेल असते ..तो बोनस …. त्यात सुद्धा काही उपास सकाळी धरून रात्री सोडायचे असतात त्यामुळे एकाच फराळात समाधान मानावं लागतं … पण दोन्ही वेळेस करायचा उपास असला की मग रेंज वाढल्यामुळे पदार्थांची व्हरायटी सुद्धा वाढते … आणि वेगवेगळे पदार्थ दोन वेळेत विभागून घेता येतात .

काही वेळेस उपासाला कुठले पदार्थ चालतात यात स्थलपरत्वे मतभिन्नता असते . काही ठिकाणी काकडी खातात तर काही जण नाही ..वगैरे .. पण या वादात न पडता सर्वसमावेशक जिन्नस वापरून सुद्धा अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात . काही जण अगदी मोजकं खाऊन किंवा निर्जळी उपवास वगैरे करतात .. ते “आर्ट फिल्म” सारखं झालं .. सगळं अगदी परफेक्ट , नियमाला धरून, “क्रिटिक्स अवॉर्ड”ही मिळतं… पण मोजक्या लोकांसाठी सीमित… “Class” साठी … …. तर दुसरीकडे असतो हा “Mass” …. कुठल्याही तिथीचा उपास असला तरी “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण कायम लागू होणारा… त्यांच्यासाठी खास सगळा मसाला , भावना , व्यंजनं असलेला , बॉक्स ऑफिस वर दाणादाण उडवणारा “फराळ” नावाचा हिट पिक्चर …….. पार “तडस” लागेस्तो फराळ करून उपास करण्याची एक वेगळीच मजा असते … सकाळी “साबुदाण्याचं थालीपीठ तर संध्याकाळी वरीचे तांदूळ .. म्हणजेच भगर” ….नुसती केळी ……अशी वर्गवारी करता येते … पण हे सगळे पदार्थ म्हणजे “तीन स्टार” मिळालेल्या सिनेमासारखे…. चांगले असतात पण एक दोन आठवडे झाले की टीव्हीवर ….. “बटाट्याचा कीस , रताळ्याचा कीस” हे म्हणजे “अक्षय कुमार” किंवा “विद्या बालन ” सारखे … त्यानी वर्षातून कितीही सिनेमे केले तरी बघावेसे वाटतात ..तसंच हे पदार्थही कधीही केले तरी चालतात…. याशिवाय त्यातल्या “कीस” या शब्दाचा इंग्रजी शब्दाशी असलेल्या साधर्म्यामुळे “विनोदनिर्मिती” करण्यासाठी सुद्धा या डिशचा बराच वापर होतो …

कधी कधी बाहेरून आणलेली “उपवास कचोरी , बटाट्याचा चिवडा , उपास मिसळ” वगैरे असे “पाहुणे कलाकार” त्यांची छाप पाडून जातात….. “तळलेले” नको म्हणत कायम “टाळलेले” “साबुदाणे वडे” कधीतरी कुठल्याश्या उपासाला नकळत तळले जातात आणि “रजनीकांत”च्या एखाद्या सुमडीत आलेल्या सुपरहिट सिनेमासारखा भाव खाऊन जातात . जिऱ्याची फोडणी दिलेली “बटाट्याची भाजी” म्हणजे तर एखाद्या “चरित्र अभिनेत्यासारखी” ….. वर्षानुवर्ष त्याच भक्तिभावाने खायची … दिवसेंदिवस आदर वाढतच जावा आणि दरवेळेस अधिकाधिक आवडत जावी आणि परिपक्व होत जावी अशी ….
….पण…. असे कितीही पदार्थ आले आणि गेले तरीही पदार्थांच्या मैदानातला “Star Player” , या “Fast” food च्या मांदियाळीतला “अमिताभ बच्चन” , पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे One & Only… “साबुदाण्याची खिचडी”… वेगवेगळ्या घरी तिची अनेक रूपं आपल्याला बघायला मिळतात .. कोणी तिखट घालून केलेली लालसर रंगाची , कोणाकडे दाण्याचं कुट जास्त घातलेली तपकिरी रंगाची , कधी मोकळी ,कधी चिकट , कधी कोरडी तर कधी तुपानी थबथबलेली , तर कधी फडफडीत , कधी ढेकूळ असलेली, कधी मऊ सुत तर कधी खरपूस ..आणि अनेक … पण कुठल्याही रुपात तिला एक अनन्य साधारण महत्व आहे . तिचे चाहतेही बरेच आहेत आणि तिच्यासाठी काहीही करायला ते तयार असतात . मध्यंतरी साबुदाणा कसा तयार होतो याचे “चित्रविचित्र” व्हिडियो सोशल मिडियावर यायचे… तेव्हा काही दिवस या खिचडीपासून अनेकांनी घटस्फोट घेतला खरं …. पण निस्सीम प्रेम असलेला एव्हढा मोठा Fan Club फार दिवस काही हा विरह सहन करू शकला नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा खिचडीवरचं आपलं प्रेम मान्य करत तिला जवळ केलं … काही जण “पित्त” होतं म्हणून खिचडी खाणं टाळतात पण छान खोबरं-कोथिंबीर भुरभूरवलेल्या मनमोहक खिचडीची प्लेट समोर आली की ती बघून त्यांची “कितीही होऊ दे पित्त , आता थाऱ्यावर नाही चित्त” अशी गत होते…. साबुदाण्याची खिचडी न आवडणारा माणूस विरळाच ..सध्या काही वर्षांपासून साबुदाण्याचा एक वेगळाच प्रकार अस्तित्वात आला आहे. तो मूळ साबुदाण्यापेक्षा आकाराने फारच छोटा असतो. अनेक जण त्याचीही खिचडी करतात. नावाला ती खिचडी असली तरीही खऱ्याखुऱ्या टपोऱ्या साबुदाण्याच्या खिचडीची सर त्याला नक्कीच नाही … हे म्हणजे कौतुकानी “शोले” पिक्चर बघायला जायचं आणि बघून यायचा “रामगढ के शोले” … सगळंच डुप्लिकेट ….

सिनेसृष्टीत “मनोज वाजपेयी , के के , बोमन इराणी” असे अनेक अष्टपैलू कलाकार आहेत. हे अशा प्रकारातले सगळे कलाकार खूप मेहनती आणि टॅलेंटेड असतात . अनेक सिनेमात उल्लेखनीय अभिनय केलेला असतो, अनेक सुपरहिट दिलेले असतात , लोकांनाही ते आवडतात पण तरीही ते अमिताभ बच्चन होऊ शकत नाहीत किंवा इतर कलाकारांसमोर काहीसे झाकोळले जातात. तसाच एक पदार्थ जो अतिशय चविष्ट असूनही दुर्लक्षित राहतो तो म्हणजे “दाण्याची आमटी” . दुसरा कुठलाच पदार्थ याच्या जवळपास सुद्धा नाही इतकी याची वैशिष्ट्यपूर्ण अशी चव. .. टॅलेंट असूनही स्पर्धेत मागे पडलेला पदार्थ … याचं कारण बहुदा तिला वऱ्याचे तांदूळ किंवा खिचडी अशा कुठल्या तरी इतर मुख्य पदार्थाबरोबर दिलं जातं … सहकलाकाराला कसं नेहमीच मुख्य हिरोसमोर दुय्यम स्थान असतं तसं … तेही अनेकदा मुख्य हिरो होण्याची पात्रता असून …… पण त्यामुळे त्या मुख्य पदार्थाची लज्जत खूपच वाढते याचा बरेचदा विसर पडतो … अगदी आजकाल प्रसिद्ध असलेल्या उपासाच्या मिसळीत सुद्धा अतिमहत्वाच्या “तर्रीची” भूमिका हीच आमटी बजावते …. म्हणूनच मला वाटतं की मोठाल्ल्या रेस्तराँमध्ये ही दाण्याची आमटी “Exotic Groundnut Shorba” किंवा Special Peanut Soup” वगैरे नावानी त्यांच्या मेनुकार्ड मध्ये दाखल केली तर नक्कीच नावारूपाला येईल. (आधीच कुठे असं मिळत असेल तर योगायोग समजावा …पण हे वाचून जर कोणी हा प्रयोग केला तर तेव्हढं Royalty चं काय ते बघा बरं का !! ) … फ्राईड नुडल्स ऐवजी फ्रेंच फ्राईज सारख्या बटाट्याच्या चार सळ्या द्यायच्या की सोबत …. तेव्हढीच जरा Value Addition ….

नवनवीन प्रयोग करताना उपासाच्या “इडल्या , डोसे , पॅटीस, आप्पे, बर्गर, ढोकळा , गुलाबजाम” असे अनेक “नवोदित” कलाकार आपलं नशीब आजमावत या “उपासाच्या” दुनियेत “पदार्पण” करतात , त्यातला एखादा पसंतीस उतरतो आणि “बेस्ट डेब्यू” चं अवार्ड पटकावतो .. “साबुदाण्याचं थालीपीठ-दही , भगर-आमटी , साबुदाणा वडा-गोड दही” अशी काही Combination म्हणजे “रोहित शेट्टी- अजय देवगण” जोडी सारखी … हमखास गल्ला जमवणारी … “रताळ्याचे काप , केळी पाक , साबुदाणा किंवा शेंगदाण्याचे लाडू” अशा सगळ्या स्वीट डीश म्हणजे एक से एक “देखण्या अभिनेत्री” …. त्यात सगळ्यात उच्च स्थानावर असलेलं.. काहीसं दुर्मिळ म्हणजे … “फ्रुट सॅलाड”….अगदी “रेखा” किंवा आपल्या “माधुरी” सारखं ….. नुसत्या दर्शनानी सुद्धा प्रसन्न वाटावं असं … याशिवाय, “लिंबाचं लोणचं” आणि तत्सम चमचमीत तोंडी लावणारे “Side Artist” त्यांचं काम चोख बजावतात आणि रंगत आणतात …“चिकवड्या”सारखे “बालकलाकार” स्मरणात राहतात … आणि …… सरतेशेवटी “The End” ची पाटी येत … शेवट गोड करत पुढ्यात येणारं थंडगार “ताक” … आहाहा sss … तृप्त ढेकर देत “उपासाच्या सेलेब्रेशन” ची सांगता…. …….. असा “पोटभर उपास करणं“… किंबहुना उपासासारखी गोष्ट सुद्धा “साजरी” करणं हे फक्त “उत्सव प्रिय” अशा मनुष्य प्राण्यालाच जमू शकतं ….

तर …स्वतःला Maintain ठेवण्यासाठी गरजेचं असलेल्या या “हलक्या फुलक्या” “Fast” फूडचे “सगळे कोर्सेस” मनसोक्त खाण्यासाठी, आता पुढच्या उपासाची वाट मात्र बघावी लागेल ….

— क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..