पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अनेकांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्यातील काही…..
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम
माजी राष्ट्रपती मा.डॉ. अब्दुल कलाम यांना संशोधनाच्या क्षेत्रातील अडचणीच्या प्रसंगातून भीमसेन जोशी यांचे संगीत ऐकल्यानंतर मार्ग मिळायचा. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अशा एकापेक्षा सरस अभंगवाणीने बळ देण्याचे काम त्यांनी केले. हे स्व:ता डॉ. कलाम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
गौतम राजाध्यक्ष
मी पुण्याला चाललो होतो. फर्स्ट क्लासच्या डब्यातही बर्यापैकी गर्दी होती. दिवसभराच्या कामाने मी थकलेला होता. डोळे मिटून पडून राहावं, असा विचार करत असतानाच त्याच्या कानावर गाण्याचे सूर पडले. वरच्या बर्थवर सगळ्यांकडे पाठ करून आडवे पडलेले एक गृहस्थ स्वत:शीच गुणगुणत होते. ते सूर इतके अद्वितीय होते की, ‘‘मी माझा सगळा थकवा विसरलो आणि इतकं महान कोण गातंय, हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो.’’ लोणावळ्याला गाणी थांबली तसा मी डब्याच्या बाहेर लावलेली प्रवाशांची यादी पाहू लागलो. त्यावर नाव होतं- बी. जोशी. इतका वेळ आपण प्रत्यक्ष पंडीत भीमसेन जोशींचं गुणगुणणं ऐकत होतो, या विचाराने त्याला शहारा आला.तेव्हा माझी आणि पंडिंतजींची ओळख नव्हती. त्यांचे फोटो काढण्यासाठी त्यानंतर २१ वर्ष जावी लागली. आणि ते माझ्यासाठी भीमअण्णा झाले. फोटो काढताना मी नम्रपणे त्यांना गायची विनंती केली आणि त्या दुपारी ‘‘आसवानी तोडी’’ गाऊन त्यांनी ती पूर्णही केली.
सचिन तेंडूलकर
मी एकदा काही खाजगी कामाकरता मुंबई वरून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून मला म्हणाले,
“नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!”
त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की ‘मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!’
लता मंगेशकर
मला भारतरत्न मिळाल्यानंतर “या भारतरत्न’ असे नेहमी म्हणणारे… “अहो लताबाई, घरी या की एकदा. गरम थालिपीठ आणि त्यावर लोणी हा बेत करायला सांगतो’ असा आग्रह करणारे पं. भीमसेन जोशी… ‘त्यांचे नाव झाले नव्हते त्या वेळेपासून मी त्यांना ओळखत होते. अनेकदा आम्ही भेटत असू. त्यांच्या घरी माझे जाणे-येणे असे. ते प्रत्येक भेटीत दिवसभर संगीत आणि संगीताविषयीच बोलत असच. चित्रपट, शास्त्रीय संगीत हे त्यांच्या चर्चेचे विषय असत. इतर विषयांचा समावेशच त्यांच्या बोलण्यात कधी नसे. त्यांना भरधाव गाडी चालविण्याची सवय होती. नव्हे तर दूरवरचा प्रवास करून थकल्यानंतरही ते दुसऱ्या दिवशी गायनास बसत होते, हे विशेष!
पं. संजीव अभ्यंकर
१९८१ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी मी पहिल्यांदा कुंदगोळ येथे भरलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात प्रथम गायलो. पंडितजींच्या गुरू भगिनी गंगुबाई हनगल यांनी मला त्या महोत्सवासाठी निमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्थातच माझा आवाज सुटलेला नव्हता. मी त्या ठिकाणी काळी पाचमध्ये गायलो. गाणं संपल्यानंतर ग्रीन रूममध्ये पंडितजींनी पाठिवर कौतुकाची थाप मारली आणि मला आशीर्वाद दिले. त्यावेळी पंडितजींसोबत काढलेलं छायाचित्र आजही माझ्या संग्रही आहे. त्याच वर्षी एका खासगी कार्यक्रमात मी पंडितजींबरोबर गायलो. पंडितजींनी माझं गाणं ऐकलं आणि ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा ज्ञानदेवांच्या कुळातील मुलगा आहे.’ त्यांच्या या शब्दांमुळेच आई-वडिलांनी माझी संगीतक्षेत्रातील कारकीर्द निश्चित केली.या क्षेत्रात मी स्थान पक्कं करू शकलो यामागे पंडितजींनी त्यावेळी दिलेला आशीर्वाद आहे. १९९० च्या सवाई गंधर्व महोत्सवात ‘मोस्ट ब्राईट यंग आर्टिस्ट’ म्हणून माझा पंडितजींच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पंडितजींनी माझी आत्मियतेने चौकशी केली. त्यानंतर अनेकदा पंडितजींच्या भेटी होत राहिल्या. प्रत्येक भेटीत त्यांचा साधेपणा मनाला भावत राहिला. इतका मोठा, जागतिक किर्तीचा कलावंत असूनही पंडितजींच्या मनाला अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनीमी लहान असताना आई-वडिलांना माझ्या बाबतीत दलेले सल्ले फार मोलाचे ठरले. एकदा ते आई-वडिलांना म्हणाले, ‘हा मुलगा छान गातोच. पण, त्याच्या तब्येतीकडेही लक्ष द्या.’ पंडितजींनी दिलेला हा सल्ला मला फार मोलाचा वाटला. केव्हाही भेटले तरी त्यांच्याशी गप्पांची मैफल सहज जमून यायची. अशा वेळी त्यांना वयाचं, ज्येष्ठतेचं बंधन आड यायचं नाही.
संकलन – संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply