मिस्टर इंडिया चित्रपटातील मुख्य पात्र अदृश्य होऊन बोलते आणि कोणालाही ते पात्र दिसत नाही. जपानमध्ये हा प्रकार वास्तवात उतरला असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले एक अदृश्य पात्र तेथे अस्तित्वात आले आहे.
मध्य तोक्यो प्रांतात ‘‘शिबुया मिरई’’ याला शहराचा अधिकृत नागरिक बनविण्यात आले आहे. हे व्हर्चुअल पात्र सात वर्षाच्या बडबड्या मुलासारखे वाटते. ‘‘शिबुया मिरई’’ नावाचे हे बालक शारीरिकदृष्ट्या अस्तित्वात नाही, परंतु ‘लाईन’ या मेसेजिंग अॅपवर तो लोकांशी बोलू शकतो. तो संदेशांचे उत्तरही देऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तो तयार केला आहे.
शिबुया मिरई हा जपानमधील पहिला आणि जगातील कदाचित पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पात्र बनले आहे. वास्तविक जीवनात स्थानिक अभिलेखात त्याची नोंद करण्यात आली आहे. टोक्यो शहरातील शिबुया प्रभागाने या पात्राला विशेष रहिवाशाचे प्रमाणपत्र दिले आहे.
जपानी भाषेत मिरईचा अर्थ भविष्य असा होतो. तो प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेचा विद्यार्थी असल्याचे मानले जात आहे. “त्याला फोटो काढण्याचा आणि लोकांना पाहण्याचा छंद आहे, तसेच लोकांशी बोलणे आवडते. कृपया त्याच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारा,” असे शिबुया प्रभागाने मायक्रोसॉफ्टसोबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
— शेखर आगासकर
`अखंड महाराष्ट्र चळवळ’ या WhatsApp Group वरी माहितीच्या आधारे.
Leave a Reply