( कृष्णजन्माष्टमी व गोपालकाला यानिमित्त)
आतुर होउन, शोधित मोहन, फिरते राधा धुंडित मधुवन
पडतां कानीं वेणूवादन, भान हरपलें, मोहरलें मन ।।
केशकलापीं पुष्पें गंधित
धुंद नाचते वेणी मंडित
पदिचें नूपुर कटी मेखला करिंचे कंकण करती गायन ।।
चंद्रकोर उजळिते ललाटा
नथ ऐटीनें चुंबी ओठां
हलतें हलकें, हलतां झळके, कानीं झुलणारे आभूषण ।।
काजळ खुलवी नयन टपोरे
बनले रक्तिम कपोल गोरे
शुभ्र दंतपाकळ्या उमलती हास्यफुलोरा मुखास देउन ।।
गळा कवळती मोहनमाळा
पदरावर खेळत हिंदोळा
डौल मिरविती बाहू कोमल, बाजुबंद चंदेरी बांधुन ।।
शोभिवंत, अंगुलीत एका
नील कोंदणीं ज़पत मुद्रिका
मृदुल गुलाबी तळहातांवर विलसे मेंदी नक्षी होउन ।।
कनकाहुन दीप्तिमान कांती
प्रभा खुलविती माणिकमोती
वस्त्र रेशमी, हेमकंचुकी, उटी चंदनी खुलवत यौवन ।।
ऊर धडधडे, वाढे हुरहुर
मधुर भावना करती काहुर
दिसतां कान्हा, आवेगानें मिठित झेपवे विश्वा विसरुन ।।
– सुभाष स. नाईक Subhash S. Naik
Leave a Reply