नवीन लेखन...

फिट टू वर्क

जुनियर रँक मध्ये असताना जहाजावर जायच्या पहिले ऑफिसमध्ये बोलावले जायचे मग कंपनीच्या डॉक्टरकडील क्लिनिकची चिट्ठी घेऊन मुंबईतील फाऊंटन जवळील क्लिनिक गाठायचं. तिथे जाऊन पर्सनल डाटा फॉर्म भरायचा. मग सुरु होतं वजन, उंची, छातीचा x- ray, डोळ्यांची नंबर आणि कलर ब्लाइंडनेस तपासणी, ब्लड सॅम्पल, युरीन सॅम्पल, ई सी ज़ी, ऑडिओ मेट्रि टेस्ट, फिजिकल बॉडी चेक अप. मग फॉर्म वर भरून दिलेली माहिती विचारली जाते, स्मोक करता का, ड्रिंक करता का, ऍक्सिडेन्ट झालाय का, कावीळ झाली होती का, डायबेटीस आहे का, कोणते ऑपरेशन झालय का बापरे बाप काय काय विचारतात. ते जे विचारतात त्याला सगळ्यांना नाय नो नेव्हर करून झाले की मग तिथून सोनोग्राफी सेन्टर मध्ये पाठवतात. सोनोग्राफी सेंटर मध्ये गर्दी नसली तर पंधरा वीस मिनिटात नंबर लागतो. पण जिथे आम्हाला सोनोग्राफीला पाठवतात तिथे आखाती देशातील अरेबियन बायका किंवा पुरुष मोठ्या प्रमाणावर सोनोग्राफी साठी आलेले नेहमी बघायला मिळतात. कॅन्सर किंवा ईतर आजारांवर आखाती देशांपेक्षा स्वस्त आणि चांगले उपचार भारतात मिळतात म्हणून ते मुंबईला येतात अशी माहिती तिथं एकाने दिली. मुंबईत अरबी लोकं फॉरेनर आणि बहुतेक त्यांच्याकडून चार्ज पण जास्त घेतला जात असावा कारण हे अरबी लोकं एका मागून एक आमच्या नंतर जरी आले तरी त्यांना पहिले प्रेफरन्स दिला जातो मग तोपर्यंत आम्हाला सांगतात की पाणी प्या भरपूर, युरीनरी ब्लॅडर पूर्ण भरलेला पाहिजे सोनोग्राफी साठी. पण नंतर नंतर जशी रँक वाढत गेली तसतस तिथं प्रेफरन्स सुद्धा लवकर मिळायला लागला. सोनोग्राफी झाल्यावर स्ट्रेस टेस्ट. जुनिअर रँक मध्ये असताना सगळे रिपोर्ट्स मिळेपर्यंत थांबावे लागे मग ते बंद लिफाफ्यातील रिपोर्ट्स आणि युनिफॉर्म, बॉयलर सूट व सेफ्टी शूज मुंबई GPO जवळील सप्लायर कडून सोबत घ्यायचे. हे सगळं घेऊन ऑफिसला पोहचायचं. सिनियर रँक मध्ये चिट्ठी परस्पर पाठवली जाते तसेच रिपोर्ट सुद्धा दुसऱ्यांकडून मागवले जातात. मेडिकल रिपोर्ट फिट टू वर्क असेल तरच जहाजावर पाठवले जाते. कोणाला ब्लड प्रेशर, किडनी स्टोन, लिव्हर मध्ये वगैरे काही डिटेक्ट झाले आणि गोळ्या औषधं घेऊन बरं होण्यासारखं असलं तर डॉक्टर तसं सांगून फिट टू वर्क शेरा देतो . नाहीतर पूर्णपणे बरा होऊन पुन्हा मेडिकल होईपर्यंत थांबावे लागते. मग फिट झाल्यावर सुद्धा कधी कधी जहाजावर व्हॅकंसी नसल्याने दोन ऐवजी चार महिने थांबावे लागते. कंपनीचा डॉक्टर हा भारत सरकारच्या नौवहन निदेशनालय म्हणजे DG शिपिंग किंवा डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग चा अप्रूव्ड आणि रजिस्टर्ड असलेला असतो. कंपनी मेडिकल पास झाले की जहाजावर पाठवले जाते. सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट किंवा ईतर सगळ्या चाचण्या घेऊन हे रिपोर्ट जहाज ज्या देशात रजिस्टर असेल त्या देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय फॉरमॅट ला फॉलो करून तयार केले जातात.
एकदा का ही मेडिकल केली की ती वर्षभर व्हॅलीड असते त्यामुळे कधी कधी एका मेडिकलवर एक जहाज करायला मिळतं तर कधी कधी दोन जहाजे. पण हे सगळं रँक आणि किती महिने कॉन्ट्रॅक्ट आहे त्यावर अवलंबून असतं. शिपिंग जॉईन झाल्यापासून वर्षातून एकदा तरी मेडिकल चेक अप होतच असतं. जहाजावर गेल्यावर व्यायाम करण्यासाठी जिमनेशियम असते, ट्रेडमिल, सायकल, वर्क आऊट इक्वीपमेन्ट, टेबल टेनिस अशी साधने जवळपास प्रत्येक जहाजावर असतातच. फिटनेस ठेवण्यासाठी कोणी फक्त उकडलेल्या भाज्या खातं तर कोणी डाएट च्या नावाने एक वेळा जेवून किंवा कमी खाऊन जहाजावर दिवस काढतात. एका अधिकाऱ्याला तर मीठ नसलेल्या अळणी भाज्या त्या पण फक्त उकडून खाताना तीन महिने पाहिलं आहे.

मनभरून नसे ना पण पोटभर सुद्धा खाता न येणे आणि ते सुद्धा महिन्याला लाखांमध्ये पगार घेत असताना ह्याला दुर्दैव म्हणावं की काळजी . लोकं खाऊन पिऊन सुखी राहण्यासाठी मरमर कामं करतात. पण मरणाच्या भीतीने खाण्याची भूक आणि जिभेची चव मारणारे बघितले की हसायला येतं. जहाजावर मोठं कामं सुरु असताना जाणूनबुजून कल्टी मारणारे संध्याकाळी जिम मध्ये घाम गाळताना दिसतात. तसं पाहिलं तर असे लोकं फार कमी असतात पण क्वचित एखाद्या जहाजावर दिसतातच. खलाशी लोकांच मस्त असतं सगळे मस्तपैकी दाबून खात पीत असतात.

डाएट आणि खाण्यापिण्याची कौतुक जास्त करून अधिकारी वर्गातच बघायला मिळतात. काही कंपन्या अधिकाऱ्यांची सायकोमेट्रिक टेस्ट वगैरे पण घेतात कारण ताण तणावाच्या किंवा एखाद्या इमर्जन्सी मध्ये तो कसा रिऍक्ट होउन योग्य निर्णय घेऊ शकतो की नाही हे कंपनी, जहाज आणि काम करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे असते. मेडिकल मध्ये फिट असून सुद्धा जहाजावर हार्ट अटॅक किंवा तब्बेत बिघडल्याने मृत्यू होतात. जहाज बंदरात असेल तर त्वरित इलाज करण्याची व्यवस्था करण्यात येते. परंतु जर जहाज खोल समुद्रात असेल तर जहाजावर उपलब्ध असलेली औषधं आणि पुस्तकी उपचार किंवा फोनवर सल्ले घेऊन शक्य तेवढा इलाज करायचा प्रयत्न केला जातो. जहाजावर सेकंड मेट कडे मेडिसिन लॉकरची जवाबदारी असते त्यामध्ये असणारी गोळ्या औषधं आणि त्यांचा रेकॉर्ड तसेच एक्सपायरी वगैरे बघणं तसेच कंपाऊंडर सारखं किरकोळ आजारावर गोळ्या औषधं देणे ही त्याचीच जवाबदारी असते.

जहाजावर कोणाला अपघात झाला किंवा मृत्यू झाला तर जहाज बंदरात येईपर्यंत अपघात ग्रस्त व्यक्तीला किंवा मयताच्या प्रेताला सांभाळावे लागते. जहाजावर फिश आणि मीट रूम असल्याने प्रेतासाठी उणे पंधरा अंश असलेल्या मीट किंवा फिश रूम ह्या कोल्ड स्टोरेज प्रमाणेच असतात. मग जहाज चार दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी बंदरात गेल्यावर ज्या देशात जाऊ तिथल्या सोपस्कारानी मयत असेल तर पोस्ट मॉर्टेम, चौकशी, इन्वेस्टीगेशन अशा फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यावर प्रेत कुटुंबियांकडे पाठवले जाते. परदेशात हॉस्पिटलायझेशन किंवा इतर फॉर्मॅलिटी करण्याकरिता लागणारा खर्च, पैसा व जहाजाला खोळंबून राहावे लागल्याने बुडणारे उत्पन्न हे सगळे टाळण्यासाठी, प्रत्येक खलाशी व अधिकाऱ्यांची चांगल्या तसेच मान्यताप्राप्त डॉक्टर्स कडूनच मेडिकल केली जाते.

हेल्थ चेक अप किंवा फिजिकली फिट असल्यावर डॉक्टर कंपनीला फिट टू वर्क म्हणून रिपोर्ट देतो. जहाजावर जाणारा प्रत्येक खलाशी किंवा अधिकारी मानसिक दृष्ट्या किती कणखर असतो, किती भावनाप्रधान असतो, मनाने खचलेला असतो की समाधानी असतो हे ओळखायच्या टेस्ट अजूनपर्यंत केल्या जात नाहीत, नाहीतर कितीतरी लोकं या चाचण्यांमध्ये अनफिट होतील सांगता येणार नाही . फिट झाले तरी जहाजावर कामं करत असताना घडणारे प्रसंग, जहाजावरील ताण तणावासह घरचे प्रॉब्लेम, जवळच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायचे ओझे. ज्यांच्याशी काही नाते नसते अशा सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून राहताना आणि त्याच वेळी जवळच्या, रक्ताच्या व हक्काच्या माणसांपासून लांब राहून मेडिकली व मेंटली फिट राहिलो तरच कंपनी कडून या चॅलेंजिंग तसेच ऍडव्हेन्चरस नोकरी साठी पुन्हा पुन्हा मेडिकल करायची संधी मिळत राहते.

© प्रथम रामदास म्हात्रे 
मरीन इंजिनियर, 
B. E. (mech), DIM 
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..