नवीन लेखन...

फ्लोटिंग आईस – तरंगणारा बर्फ

एखाद्या मोठ्या तळ्यामध्ये पाणी जस स्थिर असतं अगदी तसच शांत असलेल्या समुद्रातील स्थिर पाण्यावर जहाज फुल अहेड स्पीड वर चालू होतं करंटमुळे जवळपास 16 क्नॉट्स चा स्पीड मिळत होता.

डेड स्लो, स्लो,हाफ व फुल्ल स्पीड अशाप्रकारे अहेड म्हणजे पुढे जाण्यासाठी आणि अस्टर्न म्हणजे मागे जाण्यासाठी जहाजाच्या मेन इंजिनला स्पीड कमी जास्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचना असतात.

जहाज फक्त चार वर्षे जुने असल्याने सर्व ऑटोमशन व्यवस्थित काम करत होत, त्यामुळे अन अटेंडेड मशीनरी स्पेस (यू .एम .एस.) म्हणजे जहाजावरील इंजिने 8 तासापेक्षा कमी वेळेपर्यंत निर्मनुष्य अवस्थेत चालू राहू शकतात.

थोडक्यात 8 तासांपर्यंत जहाजावरील इंजिने माणसाने न बघता सतत चालू राहू शकतात. अर्थात सगळ्या इंजिनांसाठी सुरक्षेकरिता अलार्म आणि ट्रिप ची सोय केलेली असते त्यामुळे काही बिघाड किंवा गडबड झाली की लगेच अलार्म वाजतो किंवा ते इंजिन आपोआप बंद होऊन जातं.

यू. एम. एस. मोड मध्ये असल्याने इंजिन रुम मध्ये कोणीही नसते,सकाळी 8 पासून सगळे इंजिनीयर आणि मोटरमन येतात आणि दुपारी 12 वाजता सगळे जेवायला वर जातात आणि तासाभराने 1 वाजता सगळे पुन्हा खाली जातात ते 5 वाजेपर्यंत. पुन्हा मग रात्री 11 ते 12 वाजता तासाभराचा राऊंड घेऊन ड्युटी इंजिनियर सकाळी 6 वाजेपर्यंत यू. एम.एस. मोड मध्ये जहाज चालू ठेवतो काही अलार्म आलाच तर तो फक्त त्या दिवशी ज्याची ड्युटी असेल त्या इंजिनियरच्या केबिन मध्ये वाजतो मग तो इंजिनीयर अलार्म रिसेट करण्यासारखा असेल तर स्वतः करून पुन्हा झोपायला जातो, नाहीतर वरीष्ठांना आणि सहकारयांना बोलावून मदत त्यांचीसुद्धा मदत घेतो.

सगळं व्यवस्थित आणि सुरळीत सुरु असताना आम्ही दुपारी सगळे जेवायला बसलो असताना खाली इंजिन रुम मध्ये मोठा आवाज झाला, धडाम धूम आणि त्या अवाजासोबत अलार्म वाजायला लागले मेस रूम मध्ये आम्ही जेवढे इंजिनीयर जेवत होतो सर्व जण जेवण अर्धवट टाकून खाली पळत सुटलो. अलार्मच्या आवाजात मेस रूमच्या फोनची बेल ऐकल्यामुळे पळता पळता मी फोन उचलला होता नेव्हिगेशनल ब्रिजवरून सेकंड ऑफीसर बोलत होता की मेन इंजिन स्लो डाउन झाल्याचा अलार्म आहे आणि इंजिन स्पीड 98 rpm वरून एकदम 30 rpm वर आले आहे. ठीक आहे एवढंच बोलून मी सुद्धा पळत पळत इंजिन कंट्रोल रूम गाठली तोपर्यंत सेकंड आणि चीफ इंजिनीयरने मेन इंजिन पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आणि इंजिन बंद केले.

भर समुद्रात अत्यंत स्थिर पाण्यावर शांतपणे फुल स्पीड मध्ये जाणाऱ्या आमच्या जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जरच्या बेरिंग गेल्यामुळे धडाम धूम असा आवाज झाला होता व त्यामुळेच स्लो डाउन झाले आणि इंजिन बंद करायला लागले होते.

स्पेन ला डीसचार्जिंग आटोपून नायजेरियाला लोंडिंग साठी चाललो असताना हा प्रकार घडला होता. नायजेरिया जवळचा भाग हा त्यावेळी समुद्री चाच्यांमुळे हाय रिस्क एरिआ म्हणून घोषित होता आणि त्याहीपेक्षा जास्त भीती त्याकाळात नायजेरिया मध्ये थैमान घातलेल्या इ बोला या महाभयंकर आणि जीवघेण्या व्हायरस च्या वाढत्या प्रसाराने.

जहाज हाय रिस्क एरिया मध्ये संध्याकाळी जाणार होतं, पण दुपारी इंजिन बंद पडल्यामुळे त्यापासून थोडे लांबच होतो. स्पेर पार्टस अभावी इंजिन पुन्हा फुल स्पीड मध्ये चालू होणे शक्य नसल्याने कंपनीला कळवून कसंबसं डेड स्लो मध्ये चालू केलं दुपारी जेवण अर्धवट टाकून आलेलो आम्ही सर्वजण रात्री अकरा नंतर एक एक करून जेवायला गेलो. जहाज आता ज्याप्रमाणे एखादी आलिशान फोर व्हीलर जशी पहिल्या गियर मध्ये चालवण्याची वेळ येते त्याप्रमाणे डेड स्लो मध्ये चालवल जात होत. ज्या लोड पोर्ट वर आम्ही 18 तासात पोचणार होतो त्या नायजेरियातील पोर्टवर न जाता जहाजाचे काम करून घेण्याकरिता कॅमेरून देशाच्या एका लहानशा पोर्ट मध्ये जाण्याची सूचना कंपनीने केली. त्यामुळे पुढील 42 तास डेड स्लो मध्ये समुद्री चाच्यांचा वावर असणाऱ्या हाय रिस्क एरियातून जीव मुठीत घेऊन जात होतो. मध्येच व्ही एच एफ रेडिओ वर कुठल्यातरी अमुक एक जहाजाचा चाच्यांनी पाठलाग सुरु केल्याच्या बातम्या ऐकायला येत होत्या. खरं म्हणजे हाय रिस्क एरिया मध्ये जहाज फुल स्पीड मध्ये चालवतात जेणेकरून चाच्यांना त्या स्पीड मध्ये जहाजावर चढायला अडचणी निर्माण होतील.

कसंबसं कॅमेरून देशातील पोर्ट वर पोहोचलो तर तिथे गेल्यावर असं कळलं की इंजिनाची दुरुस्ती साठी लागणारे स्पेयर पार्टस आणि तंत्रज्ञ वगैरे येता येता महिनाभर वेळ जाईल. जहाजावरील खाण्यापिण्याचे प्रोविजन फक्त 12 ते 13 दिवसांचे होते कारण नायजेरियाला लोड करून अमेरिकेला परत यायचा प्लॅन होता. कॅमेरुन मध्ये लिंबे पोर्टमध्ये खाण्यापिण्याचे सामान उपलब्ध होत आणि सप्लायरसुद्धा होता पण इ बोला व्हायरस ची दहशत एवढी होती की भाजीपाला अंडी चिकन मटण आणि इतर सामान घेऊन त्यासोबत इ बोला व्हायरस आला जहाजावर कि संपलं सगळं.
जहाजावर कॅप्टन ने सगळ्यांची मीटिंग बोलावली आणि काय मार्ग काढावा ते विचारलं परंतु खाण्यापिण्याचे सामान घेण्याशिवाय कोणताच मार्ग नव्हता.

साधारण सव्वा महिन्यानंतर इंजिनची ट्रायल घेऊन आम्ही पुन्हा एकदा फुल स्पीड ने निघालो होतो. नायजेरियात ब्रास टर्मिनल ला लोड करून अमेरिकेत पोर्टलॅंड येथे कार्गो डीसचार्ज केला. पुढील फेरी कॅनडातील विफेनहेड ते अमेरिकेतील फिलाडेल्फिया अशी होती.

फिलाडेल्फिया ला कार्गो घेऊन पोचलो होतो फुल लोडेड. जहाज जॉईन करून जवळपास 4 महिने झाले होते. एक महिना होऊन गेला फिलाडेल्फियाच्या अँकरेज वर येऊन कच्च्या तेलाच्या किंमतीनी त्याकाळात नीचांक गाठला होता त्यामुळे तेल कंपन्या पुरेसा साठा असल्याने नवीन तेल खरेदी करत नव्हत्या. पाच महिने झाल्यामुळे रिलिव्हर अरेंज करून घरी पाठवावे यासाठी वन मंथ नोटीस आणि रिलीफ रिक्वेस्ट केली होती.

प्रिया आणि सान्वी दोघींशी अमेरीकेतील लोकल सिमकार्ड जहाजावर मिळाल्याने जवळपास रोज मनसोक्त बोलणं व्हायचं.

जहाजावर वाय फाय, सॅट v, इंटरनेट आणि सिमकार्ड यासारख्या सोयी आल्यावर 10 वर्षांपूर्वी ब्राझीलमधून सॅटेलाईट फोनवरून एक यू एस डॉलर मध्ये फक्त एक मिनिट आणि शनिवार रविवार असेल तर 80 सेंट मध्ये एक मिनिट हे आठवल्याशिवाय रहात नाही. सॅटेलाईट फोनवर तर टाईम लॅग एवढा असायचा कि बोलल्यानंतर आवाज पोचायला 4 ते 5 सेकंद जायची पण आता गेले ते दिवस आणि गेला तो काळ असच म्हणायला लागेल.

दीड महिना झाला होता फिलाडेल्फियाला येऊन समोर काही मैलांवर किनारा दिसत होता पण अमेरिकेत असल्याने शोर लिव्ह मिळत नव्हती इमिग्रेशन, परमिशन आणि बोट चा खर्च वगैरे बरीचशी कारण असतात. जहाजावर लाईफ बोट आणि रेस्क्यू बोट असते पण ती खाली पाण्यात उतरवून किनाऱ्यावर नाही जात येत. हळू हळू थंडी वाढत चालली होती.
यापूर्वी युरोपमध्ये 3 जहाजांवर काम केलं होत, पण नेहमी उन्हाळ्यातच जायचो त्यामुळे बर्फ वृष्टी कधी पाहायला नव्हती मिळाली. युरोपमध्ये थंडीचा अनुभव मिळाला होता. बर्फ आणि बर्फवृष्टी युरोपच काय पण इतर कुठेही पाहायला आणि अनुभवायला मिळाली नव्हती.

फिलाडेल्फीया मध्ये पारा खाली खाली येत होता खूप खूप थंडी वाढत चालली होती.

सकाळी उठल्यावर सहज पोर्ट होल मधून बाहेर पाहिलं तर एकदम आश्चर्याचा धक्काच बसला. पांढरा शुभ्र बर्फ संपूर्ण जहाजावर पसरला होता. बाहेर दिसणारे विहंगम दृश्य पहिल्यांदाच पहात होतो. जहाजावर पसरलेला बर्फ पाहून जेवढा धक्का बसला होता त्यापेक्षा जास्त आश्चर्याचा धक्का समुद्रात तरंगणाऱ्या बर्फाला बघून बसला होता.
समुद्रात नजर जाईल तिथपर्यंत तरंगणारा बर्फच बर्फ दिसत होता.पांढऱ्या शुभ्र बर्फाने समुद्राला झाकले होते.
सगळे जण फोटो आणि सेल्फी काढत होते 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अकोमोडेशनच्या बाहेर थांबता येत नव्हतं थंडीमुळे. सुमारे -17℃ तापमानाचा अनुभव मिळाला होता.

फिलाडेल्फियाला येऊन अडीच महिने झाले होते बर्फ आणि बर्फ वृष्टीचा मनसोक्त आनंद घेता घेता साइन ऑफ म्हणजे घरी जायची वेळ आली.

जहाजावरून उतरून बोट मधून किनाऱ्यापर्यंत आणि गाडीतून फिलाडेल्फिया विमनतळापर्यंतचा प्रवास म्हणजे एखाद्या न पडलेल्या स्वप्नासारखाच होता.

पांढरे पांढरे शुभ्र गालिचे थंड थंड हिमवृष्टीचे.

©प्रथम रामदास म्हात्रे.
मरिन इंजिनीयर,
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..