अमरनाथ काश्मीर आणि अजून काही भाग पाहण्यासाठी आम्ही एका यात्रा कंपनीत पैसे भरून ठेवले होते. तीन दिवस राहिले होते. जाण्यासाठी म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. रोजच्या प्रमाणे हे पुजेला बसणार म्हणून मी खाली जाऊन अंगणातील पारिजातकाची फुले वेचली उठून चालायला सुरुवात केली तोच डाव्या मांडीत जोरात कळ आली.सरळ उभे राहता येईना म्हणून वाकून चालत चालत कशी बशी दारा पर्यंत गेले आणि प्रयत्न करुन बेल वाजवली. मी खाली अंगणात आहे म्हणून ते वरुनच चौकशी करायला जिन्यात आले आणि माझी अवस्था पाहून मला आधार देऊन वर नेले. मग काय दवाखान औषधं वगैरे अनेक गोष्टी झाल्या यात सहा महिने गेले. आणि यात्रा कंपनीने कळवले होते की पैसे परत देऊ शकत नाहीत पण पुढच्या यात्रेत सहभागी होता येईल आणि अधिक महिन्यात त्यांनी द्वारका वगैरे ठिकाणी यात्रा ठरवली होती पण आमचे ते धाम झाले होते म्हणून आम्ही आमच्या मोठ्या लेकीला व जावयाला ती संधी दिली…
पुढे काही दिवसांनी आमचे एक सहप्रवासी भेटले होते ते म्हणाले बर झाल तुम्ही आजारी पडलात आणि अमरनाथला आला नाहीत. नैसर्गिक आपत्ती. राजकिय सामाजिक सगळेच वातावरण चांगले नव्हते म्हणून आमचे खूपच हाल झाले. शिवाय अमरनाथ दर्शन झालेच नाही. त्या आधी मी स्वतःलाच नाही तर देवाला सुध्दा दोष दिला होता. पण यात दोन गोष्टी साध्य झाल्या एक. अधिक महिन्यात लेक जावयी यांना द्वारका दर्शन झाले अधिकमहिन्यात वाण दिल्याचे पुण्य आणि दुसरे म्हणजे आम्ही अमरनाथ यात्रेत गेलो नाही म्हणजे हा दैवी संकेत होता.. समजा तिथे गेल्यावर असे झाले असते तर काय झाले असते देव जाणे. एखादी घटना झाली की आपण पुढील स्वप्न रंगवतो आणि अशाच वेळी अघटित घडले की विचार भरकटतात. खचून जातो. देवाला दोष देतो पण त्या मागे देवाचा चांगला हेतू समजत नाही. त्यामुळे खचून न जाता जे होते ते चांगल्यासाठीच अशी मनोभूमिका घेऊन विश्वास व संयम ठेवावा. श्रद्धा आणि सबुरी हवी. तर पुढील वाटचालीसाठी खूप पूरक असते. पहा एकदा तपासून तुम्हाला असा अनुभव आला होता काय?
–सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply