नवीन लेखन...

गाय आणि आपण : काल आणि आज

मे ९, २०१६ च्या लोकसत्ता, मुंबई एडिशनमधील ‘गोवंशप्रतिपालकांचा विजय’ हा लेख वाचला. उत्कृष्ट व्यंग. हे व्यंग आमच्यासारख्या वाचकांना समजलें, पण ज्यांना कळायला हवें, त्यांना तें कळलें असेल काय ? एनी वे, तें जें असेल तें असो, आपण यानिमित्तानें , ‘गाय’ या विषयाची थोडीशी चर्चा करूं या.

पुढें जाण्यापूर्वी, मला हें स्पष्ट करणें आवश्यक वाटतें की, एक म्हणजे, मी स्वत: शाकाहारी आहे , आणि दुसरें म्हणजे, माझा कुठल्याही राजकीय पक्षांशी किंवा धार्मिक संस्थांशी कसलाही संबंध नाहीं. हें स्पष्ट करण्याचें कारण असें की, मी ही चर्चा केवळ वैचारिक, तर्काधिष्ठित, दृष्टिकोनातून करत आहे ; माझा अन्य कांहीही उद्देश नाहीं. ( हें स्पष्ट न केल्यास, चर्चेला कुणी नसता-रंग देऊं शकतो, व त्यामुळे चर्चेला विनाकारण नको-ती दिशा मिळण्याचा धोका असतो. तो टाळायला हवा).

साधारणपणें १०,००० वर्षांपूर्वी मानवसमूह हा, Hunter-Gatherers, ( म्हणजे शिकार करणारे व फळफळावळ वगैरे गोळा करणारे ) या स्थितीपासून , Pastural-Agricultural (प्राणिपालन करणारे, शेती करणारे) या स्थितीला आला. जे प्राणी सर्वात आधी मानवानें माणसाळवले (domesticated) , त्यातील एक महत्वाचा प्राणी म्हणजे गाय. गायीचें महत्व दुधदुभत्यासाठी तर होतेंच , पण बैलाची माता म्हणूनही तिचें महत्व मानवाला कळून आलें. बैल हे, माल वहायला, शेतीसाठी नांगर ओढायला, प्रवासासाठी गाडी ओढायला, पाण्यासाठी विहिरीचा रहाट फिरवायला, असे विविध प्रकारें उपयोगी होते. त्यामुळे, तत्कालीन भारतीय समाजात गायीला अतिशय महत्व प्राप्त झालें, व ती पूज्य मानली गेली. महाभारतातही, घोषयात्रा, गोग्रहण वगैरे प्रसंगांवरून, त्या काळीं गायींना असलेलें महत्व दिसून येते. पांडव वनवासात असतांनाचा, कौरवांचा ‘घोषयात्रा’ प्रसंग घ्या. घोषयात्रा म्हणजे, ‘Cattle-Lifting expedition’ (संदर्भ : आर्. एन्. दांडेकर). तसेंच, पांडव अज्ञातवासात असतांनाचा कौरवांचा ‘गो-ग्रहण’ प्रसंग घ्या. कौरवांनी विराटाच्या राज्यावर आक्रमण केलें, तें त्याचें राज्य काबीज करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या गायींचें हरण करण्यासाठी ! पुरातन वाङमात ’कामधेनू’ च्या अपहरणासंबंधीच्या कथा आहेत, ज्या घटनेमुळे युद्धेंही उद्भवली. त्या जमान्यात गाय ही संपदाच मानली गेली होती. गो-धन, गो-दान, हे शब्द त्याचेंच द्योतक आहेत. पुरातन काळापासून गोमूत्र, व गोमय ( गायीचें शेण) यांना पवित्र मानलें गेलेलें आहे.

गो, गौ, धेनु इत्यादींशी संबंधित शब्द आपली संस्कृती व भाषा यांचें अविभाज्य अंग बनले आहेत. त्यांच्यावरून गाईचें तत्कालीन महत्व कळून येतें. उदा. गो-कुल, गो-प, गो-पी, गो-पाल, गो-विंद, गो-पती, गो-पुर, गो-त्र (cow-pen), गो-ष्ठ (cow-pen), गो-व्रज (cow-pen), गो-शाला (cow-stall), गो-कील (नांगर), गो-वर्धन (डोंगराचें नांव), गो-रज (मुहूर्त), गो-धूलि_वेला (संध्याकाळची वेळ) , गो-मुख, गो-ग्रास, गो-रस (दूध), गो-मय (शेण), गो-चर (उदा. दृग्गोचर), गो-मंत (ज्याप्रमाणें बुद्धिमंत, धीमंत, श्रीमंत, तसेंच) , गो-मेद (a type of precious stone), गो-खी (आंत हात घालून जप करण्यासाठी, जपमाळेची थैली), वगैरे वगैरे ; तसेच मराठीतील गुराखी (गौ-रक्षक), गो-वर्‍या (शेण्या), इत्यादी शब्द ; धेनुसूदन (बलराम), धेनुवल्लभ, गोरक्षनाथ (गोरखनाथ), गायधनी, गोकर्ण, गायतोंडे अशी व्यक्तिनामें व आडनांवें ; गुरखा (गौ-रक्षक) हें जमातीचें नांव; गो-कर्ण_महाबळेश्वर (एक तीर्थक्षेत्र), गो-रखपुर, गो-ध्रा, गो-हाटी, गांवाबाहेरील चरण्यासाठी राखून ठेवलेलें ‘गायरान’, ही शहरांची नांवें व स्थलनामें ; गो-मती हें नदीनाम ; सर्व गायीशी संबंधित आहेत. (संदर्भ : रोमिला थापर, व्ही.एस्. आपटे, इतर लेखक, व मी).

पण वैदिक काळ व महाभारत काळाला आता कांहीं सहस्रकें उलटून गेलेली आहेत, (म्हणजे, किमान ३००० ते ६००० वर्षें). याचाच अर्थ असा की, त्या काळानंतर, कमीत कमी १५० ते ३०० पिढ्या गेल्या आहेत. ( बाप रे! ) . आतां , विक्रम संवत् म्हणा, शालिवाहन शक म्हणा, किंवा इसवी सन म्हणा, या सर्वांचीही जवळपास २००० वर्षें उलटली आहेत ,( म्हणजे, १०० पिढ्या). आतां यंत्रयुग आहे. अजूनही, अगदी-खेडें असलेल्या कांहीं ठिकाणी बैल वापरतात, पण जवळजवळ सर्वत्र आतां शेतीसाठी लहनमोठी यंत्रें वापरली जातात. प्रवासासाठी बैलगाड्या नव्हेत, तर एस्. टी., मोटार, रेल्वेगाडी वगैरे साधनें आहेत. गो-पालन सुद्धा आतां , एक_गाय-दोन_गायी अशाप्रकारें न होतां, एक धंदा म्हणून अनेक गायी (व म्हशी) पाळून केलें जातें. त्यामुळें, गो-पूजन व गो-रक्षण य परंपरा खरें तर कालबाह्य झालेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत की, गाय हा फक्त एक उपयुक्त पशू आहे. सावरकर यांचे विचार नेहमीच विज्ञाननिष्ठ असत. त्यामुळे, त्यांचें गायीबद्दलचे कथन, हें कोणाही खोलवर-विचार-करणार्‍या माणसाला पटल्याशिवाय रहाणार नाहीं. मग, किती दिवस आपण हजारो वर्षें जुन्या, कालबाह्य परंपरेला धरून बसणार आहोत ?

दुसरी एक , आणि अधिक महत्वाची बाब. आणि ही तर अजिबात दुर्लक्षित करून चालणारच नाहीं. हा मुद्दा, ‘क्लब ऑफ रोम’ या multi-disciplined शास्त्रज्ञांच्या संघटनेनें , ‘Limits to Growth’ नामक त्यांच्या, इ.स. १९७० च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या, इंटरनॅशनल रिपोर्टमध्ये मांडलेला आहे. तो मुद्दा थोडक्यात असा की, मानववंश Exponential-progression प्रमाणें वाढत आहे, तर उत्पादन केलें जाणारें धान्य Arithmatic- progression प्रमाणें वाढत आहे , आणि त्यामुळे दोहोंमधील तफावत वाढत जाते आहे. म्हणून, कांहीं काळानें धान्याची सार्‍या जगात कमतरता होणार आहे. त्यातून, आणखी असें की, जगभरातील शेतीलायक-भूमीला कांहींतरी Limit, मर्यादा, आहे. म्हणजेच, एका विशिष्ट पातळीनंतर धान्य-उत्पादन फारसें वाढणें शक्य नाहीं. या सर्वाचा परिणाम असा की, लवकरच, सर्व जगातील धान्य-उत्पादन हें पृथ्वीवरील माणसांसाठी अपुरें पडणार आहे. म्हणजेच, या बाबतीत, Crisis नक्कीच येणार आहे, आणि ही स्थिती, दूरच्या-भविष्यात नव्हे तर, या २१ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतच येऊं शकेल !! भारताच्या दृष्टीनें, याला लागूनच एक उपविचार असा की, शाकाहारी असणें ही निश्चितच चांगली गोष्ट आहे, पण, जर सगळी मानवजातच शाकाहारी बनली, तर हा crisis कितीतरी-पटींनी वाढेल, आणि मग, त्याला अधिक-लवकर सामोरें जावें लागेल. म्हणूनच, सावरकर म्हणत की, मांसाहार करणें मानवजातीसाठी आवश्यक आहे. (आणि हें त्यांनी जवळजवळ ९०-१०० वर्षांपूर्वी , म्हणजे, १९२०-१९३० च्या दशकात म्हटलेलें आहे, हें ध्यानात घ्यावें). हें सांगतांना , सावरकारांना, जात आडवी नाहीं आली, धर्म आडवा नाहीं आला, सनातन परंपरेला ते चिकटून बसले नाहींत ; केवळ तर्काधिष्ठित व विज्ञाननिष्ठ विचारातून या निष्कर्षापर्यंत ते आले. आपणही, तेंच करायला नको कां ?

सावरकर इतके पुढारलेल्या विचारांचे असूनही , त्यांच्याभोवती सनातनी-विचारांच्या मंडळींचा जमाव गोळा झाला होता. लोकशाही राज्यप्रणालीचा एक drawback असा आहे की, मतांच्या माध्यमातून राज्य करायचें म्हणजे कोणालाच दूर लोटतां येत नाहीं. सध्याच्या राज्यकर्त्यांचेंही तेंच झालेलें आहे. त्यामुळे, त्यांना गो-प्रतिपालन, गो-रक्षण, या कालबाह्य गोष्टींचा अवलंब करावा लागत आहे, असें दिसतें.

पण , आपण जेव्हां फासळ्या वर आलेल्या, खंगलेल्या, अर्धमेल्या गाईंना पहातो, ज्यांना रहायला नीट, स्वच्छ, ऐसपैस जागा नाहीं, खायला पुरेसें मिळत नाहीं, तेव्हां आपल्याला त्यांचीच नव्हे, तर त्यांच्या मालकांचीही कणव येते ! मालकाला स्वत:लाच बिचार्‍याला पुरेसें खायला मिळत नाहीं, त्याचें पोट खपाटीला गेलें आहे, उद्याचें दूर, आजचाच दिवस कसा काढायचा हा त्याच्यापुढे प्रश्न आहे , तर मग तो गायींना काय कायला देणार ? ‘आई जेवूं घालीना, बाप भीक मागूं देईना’ अशी त्या गाईंचीच नव्हे तर त्यांच्या मालकांचीही स्थिती झालेली आहे.

अशा वेळी, १९ व्या शतकातील अमेरिकन (USA) West बद्दल वाचलेल्या माहितीची आठवण येते. त्यातून शिकण्यासारखें बरेंच आहे. हजारो गाईंचे (steers) कळपच्या कळप मैलोन् मैल चालवून एका भागातून दूरवर दुसर्‍या एकाद्या शहरापर्यंत न्यायचें , म्हणजे कांहींदा अपघात हे व्हायचेच. अशा वेळी जर एखाद्या steer चा किंवा घोड्याचा पाय मोडला तर, बरोबरचे काऊबॉईज् त्या जखमी जनावराच्या डोक्यात गोळी घालून त्याला मारत. असेंच एकदा एकानें आपल्या जायबंदी झालेल्या घोड्याला मारल्यावर, दुसर्‍या एका नवख्यानें त्याला विचारलें, ‘त्याला मारून टाकलेस, तुझें त्याच्यावर प्रेम नाहीं कां’ ? त्यावर तो उद्गारला की, ‘प्रेम आहे म्हणूनच तर डोक्यात गोळी घालून त्याला क्षणार्धात मारलें, नाहींतर तो खितपत पडला असता व अखेरीस जिवंतपणीच गिधाडांचें खाद्य झाला असता’. या गोष्टीवरून आपण कांहीं बोध घेणार आहोत कां ?

अर्धमेल्या गाईंना तसेंच अर्धमेल्या स्थितीत खितपत ठेवायचें की त्यांना त्यांच्या नरकातून मुक्ती द्यायची ?, हें शांत मनानें ठरवायला हवें, भावनांच्या किंवा परंपरांच्या आहारी जाऊन नव्हे. गाईंना खाद्य देणाच्या सरकारी योजनांबद्दल आपण बोलूंया नको, कारण त्या किती कागदावरच रहाणार आणि किती कृतीत उतरणार, हा प्रश्नच आहे. आणि, कितीही केलें तरी, फाटल्या आभाळाला सरकार ठिगळ लावूं शकणार आहे कां ? त्यातून पुढला प्रश्न, आणि तोही अतिशय महत्वाचा असा, की, अर्धमेल्या माणसांना जगविण्यासाठी कार्यक्रमांचे अवलंबन करायचें की अर्धमेल्या गाईंसाठी ? हें आपणच ठरवायचें आहे.

अखेरीस, असें म्हणावें लागेल की, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य आहे ; त्यामुळे, ज्यांना शाकाहारी रहायचें आहे, त्यांनी रहावें, पण मांसाशन करणार्‍यांवर दडपण आणूं नये, हेंच उचित होईल. समाजाच्या दृष्टीनें म्हणाल तर, दूरगामी विचार करून, मानवांसाठी खाद्याचा प्रश्न Long-term दृष्टीनें ध्यानात घेऊन, या विषयावर राज्यकर्त्यांनी dispassionately निर्णय घेणें, व जनतेला तो समजावून देणें, आवश्यक आहे. सूज्ञांस अधिक सांगणें नलगे.

– सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..