गजाननाचे मोदक (मुक्तक)
- गंधार करी अंधार गहन जगिं दूर
तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार
सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार
तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार ।
‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार
हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार ।।
–
ब) ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन
तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण
तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल
हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां बल ।।
–
क) तव ‘ग’कारातला गज, जग तोलत राही
तव ‘न’कार सार्या विघ्नां नकार देई
तव ‘प’कार सांगे, प्रथम तूंच विश्वात
तव ‘त’करातुनी, ‘तत् त्वम् असि’ चें सूक्त ।
गणपते, वसे ब्रह्मांड तुझ्या नामांत
तूं चिरशाश्वत, तुज आदि नसे, नच अंत ।।
– – –
(मोदक : आनंददायी, गोड)
–
– सुभाष स. नाईक
Leave a Reply