नवीन लेखन...

‘गणदेवी’ गावातील कर्पूरांगी ‘जानकी माता

तू माझी माऊली, तू माझी साऊली। पाहतो वाटुली, पांडुरंग।।”

संत श्री तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला अत्यंत आर्ततेने माऊली म्हटलं, तसं सर्वच संतांनी आपल्या आराध्य दैवताला ‘माऊली’ म्हणजे आईच्या नावाने विनवणी केलेली दिसून येते. कारण साऱ्या संसारात ‘आई’ हे एकमेव दैवत आहे की जिथे प्रेम, माया, वात्सल्य, पावित्र्य, मांगल्य आणि उपकार हे सारे शद्वांच्या चौकटीचे बाहेर असल्यामुळे त्याची परतफेड करणे कदापि अशक्य गोष्ट आहे. आईच्या अतुलनीय अशा श्रेष्ठ स्थानामुळे श्रुति-स्मृतिंनी देखील ‘मातृदेवो भव!’ असा पहिला मातेला नमस्कार सांगितला आहे.

आईची एवढी थोरवी, महती सर्वश्रुत असताना प्रत्येकालाच आपल्या आईविषयी नितांत आदर, श्रद्धा, प्रेम असणे साहजिकच आहे. माझे देखील तसेच आहे. माझ्या आईला आम्ही सहा लेकरं होतो पण तिच्या दृष्टीने साऱ्या संसारातील रंजलेली, गांजलेली माणसं तिची मुलंच होती. मग त्या मुलांचे कल्याण करण्यास प्राधान्य देणाऱ्या आमच्या आईचे आम्हा लेकरांकडे दुर्लक्ष्य होत असले तरी त्याची आम्हाला खंत वाटत नसे. उलट येणाऱ्यांचे आदरातिथ्य करणे हा आमचा धर्म मानून त्यात उणीव राहू नये याची आम्ही काळजी घेत होतो. कारण त्या अजाण वयात देखील आमची आई म्हणजे मानवरूपधारिणी जगदंबा असून तिचे सान्निध्य, सहवास आणि स्पर्श आम्हाला लाख मोलाचा होता. रात्री सर्व मंडळी निघून गेल्यावर आमच्या आईला आमच्याशी गप्पागोष्टी करण्यास निवांतपणा मिळायचा. तेव्हा मात्र मनुष्यापासून पशु, पक्षी, वृक्ष इत्यादींच्या सत्य जीवनवृत्तांतरूपी कथा ती रंगून सांगायची. त्यात मुख्यत: उपासना. आत्मज्ञान, भक्तिमार्ग इत्यादी बोध असत.

सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या इच्छा कदाचित आमच्या आईने पूर्ण केल्या नसतील पण तिने अशा काही असामान्य अपेक्षांची पूर्तता केली की ती अन्य मातांना साधणे जवळजवळ अशक्य होय. ‘आई, आम्हाला गंगा बघायचीय’ असा आम्ही दृढ धरताच आमच्या घराच्या अंगणात प्रत्यक्ष गंगामातेचे दर्शन तिने घडवून गंगेच्या पाण्याचा थंडगार सुखद स्पर्शही आम्हाला अनुभवास मिळाला. मग कधी कृष्णरूप तर कधी शिवरूप किंवा देवीरूप, अशी अनेक देवदेवतांची दर्शने घडून आमचे जीवन तिने समृद्ध, समर्थ आणि सार्थ केले. अशा या दुर्गा स्वरूपमातेचे चरित्र खरोखरीच अनुपमेय आहे. शद्वांना वास्तवतेची सोनेरी झालर लावून ते देदिप्यमान, दिव्य चरित्र वाचकांना सांगताना आनंदाने मन पुलकित होते.

साधारण १८९४-९५ च्या सुमारास महाड जिल्ह्यातील पोलादपूर येथे रामकृष्ण गणपत चित्रे यांच्या घरी माझ्या आईचा जन्म झाला. नाव तिचे दुर्गा ठेवले. परंतु प्रत्यक्षात ती कोमल हृदयाची, सोशिक होती. बालपणीच आईचे निधन झाल्यामुळे आजोळी मालुस्ते गावी आजी आजोबांनी आईचा सांभाळ करण्यासाठी नेले. खरं म्हणजे आजोबांची आर्थिक स्थिती यथातथाच होती. तरीही माझ्या आईचा त्यांना खूप लळा व प्रेम असल्याने त्यांनी तिचा स्वीकार केला. आईच्या अन्य भावंडांनाही कोणी कोणी आप्तांनी सांभाळण्यासाठी आपापल्या घरी नेले. त्यामुळे लहानपणीच आईची व तिच्या भावंडांची ताटातूट नियतीने केली.

वयाच्या ५व्या वर्षापासून दुर्गा घरातील सगळी कामं करून रोज सकाळी मालुस्ते ग्रामदेवता मालजाई हिची पूजा करीत असे. पूजेसाठी जाईची फुले आणि नैवेद्याला दूध आपल्याबरोबर ती घेऊन जात असे. आजोबांना त्या छोट्या नातीचा भक्तिभाव पाहून कुतुहल निर्माण झाले. म्हणून तिच्या नकळत पाळत ठेवून मागोमाग ते मंदिरात गेले. दुर्गाने अत्यंत श्रद्धापूर्वक अंत:करणाने मालजाईला फुले अर्पण करून नैवेद्याचे दूध घेऊन बाहेरील पारापाशी असलेल्या शिवपिंडीपाशी गेली. तेथे फुले वाहून दूधाचा नैवेद्य दाखविताच एक भुजंग आला व दूध पिऊन निघून गेला. आजोबांना हे पाहून जरा भीती वाटली पण दुर्गा मात्र आनंदाने तेथून घरी परतली. दुर्गाचा हा रोजचाच नियम होता, आजोबांनी तिला भुजंगाची भीती वाटून समजावण्याचा प्रयत्न केला पण तो तेवढाच होता.

मालुस्ते गाव तसे फार काही संपन्न व मोठे नव्हते. पण निसर्ग सौंदर्य मात्र खूप होते. गावाच्या सीमेवर आळूचे झाड असून त्याला अतिशय मधुर अशी फळे येत. ती खाण्यासाठी म्हणून लपंडाव खेळण्याच्या निमित्ताने गावातील मुले जात. परंतु त्या झाडावर सर्प असल्याने मुलांची फळे खाण्याची इच्छा अपुरी राही. मात्र दुर्गा तेथे गेल्यावर झाडावरील सापाची पळापळ होऊन तेवढ्या वेळात झाडावरील सगळी फळं मुले तोडून घेत. त्या सापाच्या वास्तव्यामुळे मुलांना तेथे जाण्यासाठी प्रतिबंध करावा या हेतूने झाडाभोवती काटेरी कुंपण घालून तेथे भुतांची वस्ती आहे असा धाक दाखविला.

मोठ्या माणसांच्या सांगण्यानुसार मुले तेथे जायला टाळू लागली. पण नवरात्रातील सीमोल्लंघनासाठी सर्व मुले आळूच्या झाडापाशी ठरवून जमा झाली. यथेच्छ खेळून झाल्यावर सायंकाळच्या सावल्या सारा परिसर आपल्या कुशीत घेऊ लागल्यावर एकेक करून भयापोटी सर्व मुले घरी परतली. पण दुर्गाचा काही ठावठिकाणा लागेना. आजोबा, गावकरी कंदील, काठ्या घेऊन सर्वत्र दुर्गाचा शोध घेऊ लागले. पण तिचा कुठेच मागमूस लागला नाही. दु:खी अंत:करणाने सर्वजण घरी परतले. दुर्गाविना नवरात्र संपत आली, सगळ्यांचा उत्साहच मावळला होता. दसऱ्याच्या दिवशी एक गावकरी आला अन् सांगू लागला, कडाप्याच्या मंदिरात मी दुर्गाला पाहिले.’ त्याचे एवढे वाक्य पूर्ण होताच आजोबांसह सर्व गावकरी, मुले उत्साहाने त्या गावकऱ्यासोबत मंदिरापाशी गेले. पाहतात तो खरंच दुर्गा तेथे गाढ निद्रेत होती. आजोबांनी तिला आनंदाधुंनी घरी आणलं अन् ‘बये, तू इतके दिवस कुठे गेली होतीस?’ विचारले.

दुर्गा म्हणाली, ‘मी कुठे गेले होते ते माहीत नाही परंतु जिथे गेले होते तिथे देवतांशी खूप खूप खेळायला मिळाले, गरबा नाच केला, गीतं गायली, मिष्टान्न सेवन केली. खूप मजा केली. घरी परत येऊच नये असं वाटत होतं. खरं तर मी परत यायला देखील तयार नव्हते. मग देवांनी माझी समजूत काढून म्हणाल्या, ‘तुझे सुख-दुःख आम्ही सांभाळू. तू कीर्तीवंत, विजयी हो! आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच असू!’ एवढं सांगितल्यावर मी या देवळात आले ती गाढ निद्रेतच होते. दुर्गाचे बोलणे आजी-आजोबांच्या नीट ध्यानात आले नाही, पण ही कोणीतरी अलौकिक मुलगी आहे याची त्यांना खात्री पटली.

आजोळी आर्थिक परिस्थिती ओढग्रस्तच नव्हे तर दारिद्याचीच होती. त्यामुळे दुर्गाचे बालपण अतिशय कष्टात गेले. दुर्गाच्या वाढत्या वयाबरोबर आजोबांना तिची काळजी वाटू लागली. ती धुणीभांडी करीत असे, मैलोनमैल चालत जाऊन घराला लागणारे पाणी वाहून आणायची. लाज राखण्यापुरते तिच्या अंगावर एकच वस्त्र होते. तिची कोणतीच इच्छा पूर्ण झाली नाही. अशा गरीबीत तरुण दुर्गा कोणाकडे सोपवावी हा आजोबांपुढे प्रश्न होता. ती भाग्यवंत आहे याची प्रचिती आजोबांना आली होती. परंतु परिस्थितीमुळे ते हतबल होते. दुर्गाला बहिण-भाऊ होते. पण त्यांचाही सांभाळ कुणी कुणी नातेवाईक करीत असल्याने फारशी काही त्यासंबंधी माहिती नव्हती.

आजोबांचे दुर्गासाठी वरसंशोधन चालू असताना नाडसूर गावातील सुळे-देशमुख यांचा शांताराम हा बिजवर असल्याचे कळताच त्यांनी मुलगा बघितला. त्यांना तो पसंत पडल्यावर दुर्गाचे त्याच्याशी साधेपणाने लग्न लावून आजी-आजोबांनी दुर्गाच्या जबाबदारीतून स्वत:ला सोडवून घेतले. लग्नानंतर दुर्गाचे नाव जानकी ठेवले या व्यतिरिक्त तिच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. शांताराम अतिशय कोपिष्ट म्हणजे जणू जमदग्नीच होते. जानकीने पतीने त्याग केलेली पहिली पत्नी आणावी असे सुचविले परंतु त्यांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही.

शांतारामांना नोकरी नसल्याने व प्रपंचाची ओढग्रस्त स्थिती असल्यामुळे नोकरी शोधार्थ गुजरातमधील ‘गणदेवी’ गावात सर्व कुटुंब आले. तेथे तलाठी म्हणून नोकरी मिळाली तरी मिळणाऱ्या उत्पन्नात प्रपंच भागत नव्हता. सारांश ‘जानकी’ची अवस्था लग्नानंतर काही दिवस तरी आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. तिचा सोशिक, सात्विक, संवेदनाक्षम, स्वभाव असल्यामुळे त्याही स्थितीत कष्ट करून प्रपंचाचा गाडा ती ओढत होती. एका वस्त्रानिशी वर्षानुवर्ष काढून शिंप्याच्या दुकानातील चिंध्या गोळा करून त्याची चोळी शिवून वेळ व अब्रु भागवत होती. त्यात जानकीची नणंद अचानक वारली तेव्हा तिची मुले देखील सांभाळायला जानकीकडे आली. अति परिश्रम व उपासमार यामुळे जानकी वारंवार आजारी पडू लागली. औषधोपचार केवळ परमेश्वर नामच असायचा. पण एकदा मात्र तिची अत्यंत अत्यवस्थ अवस्था झाली. गावचे, बाहेरचे सगळे बघून हळहळ व्यक्त करीत असत. या अवस्थेत जानकीची चंपूमावशी तिला भेटायला आली व म्हणाली, उठ, उठ चंपावती. तुला काहीही आजार झाला नाही. सुखाने संसार कर.’ एवढे ऐकून जानकी उठून घुमू लागली. तेव्हापासून तिचे दैव बदलले.

जानकीचे पती (दादा) यांनी सुरू केलेला वाहन दलालीचा व्यवसाय चांगला चालून प्रपंच खर्च भागवून थोडीफार शेतजमीन घेतली. घरामध्ये आनंदी वातावरण पसरले. कधी कधी चिमूटभर पीठ नसता अचानक पाहुणे येत. तेव्हा जानकी रवा चाळणीत टाकून चाळत असता झरझरून पीठ बाहेर पडू लागले. काहीही शिक्षण नसलेली देखणी जानकी सुंदर आवाजात भक्तीगीतं म्हणू लागली व कोणत्याही भाषेत संवाद करू लागली. देवीची कृपादृष्टी होऊन दादांनी तिला सोन्याच्या पाटल्या केल्या. पण जानकीला भविष्य ज्ञात असल्याने, या पाटल्या किती दिवस राहतील!’ असे दादांना म्हणाली. दादांना तिच्या सहास्य बोलण्याचा संताप आला. तरी देखील ते शांत राहिले. थोड्याच दिवसात गावातील दरुवाड्यात एक प्रशस्त घर पाहिले व ते विकत घेण्यासाठी पाटल्या विकाव्या लागल्या. परंतु त्या घरासभोवती भुतांची वस्ती होती. दादा रहायला गेल्यावर पुन्हा आजारपण सुरू झाले. शेवटी जानकी संतापून तिच्यात संचार सुरू झाला. अन् सर्व भुतांना बांधून वेंगणीया नदीपलीकडे सोडले तेव्हा कुठे घरात शांतता स्थापिली.

एकदा एक ज्योतिषी जानकीचे भविष्य सांगायला आला. त्याने हात दाखविण्याची विनंती करता जानकीने बोट दाखवून लवकर भविष्य सांगण्याची विनंती केली. त्याबरोबर त्या ज्योतिषाला अवतीभवती असंख्य भुते दिसून त्याला घाम फुटला. बोबडी वळली अन् जानकीला ‘हे, सर्व आवर, आवर’ असे विनवून पळून गेला. आषाढ महिन्यात प्रचंड पाऊस पडून वेंगणीया नदीला पूर आला. सर्वत्र पुराचे पाणी व त्यातून असंख्य साप वळवळू लागले. घराबाहेर पडायलाही भीती वाटायची. अखेरीस दरुवाड्यातील बायका जानकीपाशी येऊन ‘रक्षण करा’ असे विनवू लागल्या. जीनकीने हातात तीर्थ घेतले व सगळ्याजणींना आपल्याबरोबर त्या पाण्यातून सात पावले यायला सांगितले. पाण्यातील कळवळणारे साप पाहून बायकांना भीती वाटली पण जानकी पुढे जात तिने ते तीर्थ पाण्यात ओतून, गंगे, तू शांत हो, आता त्वरित गुप्त हो! सर्व भुते-प्रेते मुक्त होऊ दे!’ म्हणताच पाणी ओसरले व सर्व साप गुप्त झाले. गावकऱ्यांना हा चमत्कार पाहून आश्चर्यच वाटले. हळूहळू जानकीची कीर्ती पसरु लागली.

कोणीही सुवासिनी जानकीला भेटायला आल्यावर जानकी कोनाड्यातील नारळाने तिची ओटी भरत असे. तो नारळ उचलला की कोनाड्यात दुसरा नारळ येई. त्यामुळे देवाजवळचा कोनाडा म्हणजे जणू काही कल्पवृक्षाचे स्थान होते. एके दिवशी दादा देवाला वंदन करीत असता कोनाड्याकडे त्यांचे लक्ष गेले. तेथे नारळ पाहून त्यांना राग आला व त्यांनी तो नारळ उचलून बाहेर ठेवला. त्याबरोबर दुसरा नारळ त्या जागी दिसला. तोही टाकता एकामागून एक नारळ त्या जागी आपोआप आले. दादांनीही दमछाक होईपर्यंत नारळ बाहेर ठेवण्याचा सपाटा चालू ठेवला अखेरीस दमून गेल्याने बाहेरील नारळांचा ढीग मोजला असता एक हजार नारळ भरला. जानकीची शक्ती पाहून दादांनी तिची क्षमा मागितली व पुन्हा दादांनी तिला अडवले नाही.

नवरात्रात जानकीने गायिलेली गीते, ओव्या ऐकून सर्वजण मंत्रमुग्ध झाली. झोपाळ्यावर बसून देवींची वर्णने असलेली गीते अतिशय श्रवणीय असत. त्या दिवसात सुवासिनींचे पूजन चालले असता मंजुळ स्वरात संगीत ऐकू येई. जवळच कुणीतरी म्हणत असल्याचा भास होई. त्यावेळी जानकी सगळ्यांना खुणेने शांत रहाण्यास सांगे. कारण तेथे देवता येऊन खेळत व त्यांची कुंकवाने परिपूर्ण अशी पदकमले उमटत. देवीचे पूजन संपल्यावर सुवासिनींना जानकी आपल्या ओटीतून प्रत्येकीला प्रसाद म्हणून कुंकू व खडीसाखर काढून आशीर्वाद देत असे.

जानकीचे मन भक्तीने उचंबळून येऊन हृदय हेलावून जाई. स्वतः दारिद्र्याचे चटके सहन केले असल्यामुळे परिस्थिती बदलल्यावर सदैव दुसऱ्यांना तिचा मदतीचा हात पुढे असे. नांदत्या गोकुळात गायी-म्हशी आल्याने दूध-तूप भरपूर असे. गाई-वासरांशी ती मायेने हात फिरवून संवाद करी. जानकीचे दर्शन घडताच मुकी जनावरे हंबरडा फोडून तिचे स्वागत करीत. दादा सकाळी उठून गाई-वासरांची निगा राखत. तापट स्वभावामुळे गुरांना मारल्यावर गुरे शांत रहात पण वळ मात्र जानकीच्या पाठीवर उमटत तेव्हा ते वळ पाहून दादा वरमून शांत बसत. प्लेगची साथ गावात आली असता जानकीने आपल्या हातात पीठ घेऊन ते सीमेवर टाकले व प्लेगची साथ सीमेवरच रोखली. गावात मेलेले उंदीर स्वत: उचलून बाहेर टाकून दिले. जर कोणाला लागण झाली असेल तर जानकी कबुतराची विष्ठा आणून स्वहस्ते ती रोग्याला लावून रोग्याची सेवा करीत असे. लहान मुलांना गोळा करून जानकी वेगवेगळ्या संतांच्या गोष्टी सांगत तेव्हा हातात उदबत्ती धरून त्याच्या धुरात मुलांना साईबाबांचे, द्वारकामाईचे, कृष्ण लीला, रासक्रिडा, इत्यादी प्रत्यक्ष दर्शन घडवित असे. तिची ही लीला ऐकून लांबून-लांबून लोक तिच्या दर्शनाला येत. परंतु क्रोधी दादा तिला कुठेही जाऊ देत नसत. ते म्हणायचे आज तुझे वंदन करतात तेवढ्या निंदा करून अपकीर्ती होईल. पण जानकीला मानापमानाचे काहीच नव्हते. तिच्या कर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. वेंगणीया नदीच्या तीरावर गणदेवी गावात शिवजीचे मंदिर होते. तेथे गावातील स्त्री-पुरुष फेर धरून रास-गरबा खेळत असत. दादांनी जानकीला तेथे जाण्यास मनाई विरोध करून खोलीत कोंडतो व बाहेरून कुलुप लावून स्वत: ओट्यावर झोपून रात्रभर पहारा करीत बसले. परंतु गावातून कुणी आले की दादांना सांगत, इथे कशाला जागरण करीत बसलात, शिवजी मंदिरात जानकी बघा गरब्यात सुंदर गाणे म्हणून फेर धरीत आहे. सारा गाव तेथे जमला आहे.’ हे ऐकून दादा संतापून म्हणाले, ती खोलीत आहे, मग जाईल कशी?’ तेव्हा मित्र उत्तरले, तुम्ही स्वत:च बघून खात्री करा.’ दादांनी खोलीत डोकावून बघितले तर जानकी निद्रिस्त होती. मित्रांचे म्हणणे बघण्यासाठी दादा शिवमंदिराच्या प्रांगणात गेले नि ते डोळे चोळून पाहू लागले. जानकी खरंच खड्या सुरात गात होती. मग ती घरी आणि इथे कशी काय? त्यावेळी दादांना तिची अद्भुत शक्ती कळली.

जिथे नि:स्वार्थ भक्ती असते तेथेच देवीचा वास असतो, देवी साहाय्यासाठी धावून जाते. नवसारी गावात ताम्हाणे या भक्ताच्या मुलाला देवी आल्या. संपूर्ण शरीरभर फोड टरटरले म्हणून त्या मुलांच्या आई-वडीलांनी डॉक्टरला बोलाविले. ते फोड बघून डॉक्टर घाबरले व उद्या येतो म्हणून निघून गेले. मुलाची तगमग व गंभीर स्थिती पाहून ताम्हाणे कुटुंबियांनी जानकीचा धावा सुरू केला. ‘माझ्या या कुलदिपकाचे रक्षण कर!’ अशी आर्ततापूर्वक आळवणी केली. ताम्हाणे दांपत्याची हाक ऐकून जानकी रात्री नवसारीला आली. मुलाची स्थिती पाहून तिने त्याच्या अंगावरून हात फिरविला व स्वहस्ते प्रसाद दिला! रात्रभर देवदेवतांची आरती करून पहाटे जानकी गणदेवीस जायला निघाली. सकाळी डॉक्टर चिंताग्रस्त होऊन आले अन् त्या मुलाला बघताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलाचे फाड सुकले अन् मुलाला जीवदान लाभले.

गौरी-लक्ष्मी-सरस्वती अशा सर्व देवता जानकी रूपात वावरत होत्या. जानकीला वंदन करायला बिलिमोरा-नवसारी येथून रोज कोणी ना कोणी येत असत. एकदा त्रिंबकराजे आपल्या चंद्रकांतासह आंघोळीसाठी नदीवर गेले होते. जानकी त्यावेळी देवखोलीत मुलींबरोबर गप्पा मारण्यात रंगली होती. तोच ती क्षणभर थांबली अन् देवापुढे ध्यान लावून बसली असता ओलीचिंब झाली. ते पाहून मुलींनी विचारले, इतका घाम कसा आला?’ तेव्हा जानकी उत्तरली, ‘त्रिंबकराजे नदी पाण्यात बुडत होता, त्याला वाचविले.’ आणि खरोखर त्रिंबकराजे नदी पाण्यात बुडत असता जानकीचा धावा करीत होते. मग काठावर ढकलत आणल्यावर लोकांनी त्यांच्या पोटातील पाणी काढून घरी पोचविले.

श्रावण महिन्यातील प्रसंग आहे. श्रावणधारांच्या बरोबरीने मेघांचा गडगडाट आणि वीजेचा थयथयाट चालला होता. मुले त्या पावसात भिजली होती. वर लखलखणाऱ्या वीजांचीही त्यांना गंमत वाटत होती. तरी पण मनातून भ्यायले असल्याने जानकीबाईंना बिलगून बसली होती. तेवढ्यात मालूने वीजेचा झोत कसा गेला त्याचे वर्णन केले. आजूबाजूला काही गावकरी मंडळी देखील बसली होती. आणि (जानकी) म्हणाली, थांब, मी वीज दाखविते.’ वीज कडकडत असता जानकीने स्वहस्ते थांबायची खूण केली. वीज खरंच नागमोडी आकारात आकाशामध्ये स्थिर झाली. मुलांनी, गावकऱ्यांनी पाहिले वीज आकाशात स्थिर आहे. अन् जानकीने हात खाली करताच निमिषात वीज अदृश्य झाली. बघणाऱ्या मंडळींच्या तोंडावर आश्चर्याने ‘आ’ उमटला तो बराचवेळ तसाच राहिला.

ज्यांना सर्वत्र ईश्वर दिसतो ते पशु-पक्षी-नर इत्यादी सर्वांवर सारखेच प्रेम करतात. जानकीच्या गो-शाळेत एक धिप्पाड रेडा होता. बघणाऱ्याला त्याची भीती वाटत असे. पूर्वजन्मात तो बंधु होता असे ती सांगायची. रोज रात्री झोपण्यापूर्वी जानकी ओट्यावर बसली की, रेडा तिच्या मांडीवर डोके ठेवून आडवा होई. मग जानकी त्याला थोपटायची. जानकीच्या प्रत्येक आज्ञेचे तो पालन करी. एकदा गणदेवी गावात देवीचा आडदांड, दणकट रेडा गोंधळ घालून फिरत होता. शेतीची नासधूस करायचा, पण तो देवीचा असल्याने कोणी त्याला मारत नसे. गावात त्याने उन्माद माजविला होता. तो फिरत फिरत मस्तीमध्ये जानकीच्या घरापुढे झुंज द्यायला उभा राहला. दादांचा रेडा शांत होता. दादांना वाटले देवीचा रेडा आपल्या रेड्याला मारून टाकील म्हणून त्यांनी जानकीकडे कु-हाड मागून स्वहस्ते रेडा मारावयास तयार झाले. तेवढ्यात जानकी धावत येऊन रेड्यासमोर थांबली. खालची माती उचलून मस्तवाल रेड्याच्या दिशेने टाकत, निघून जा’ म्हणाली. क्रोधाने पेटलेला रेडा भयापोटी तेथून पळाला तो परत गावातही आला नाही.

घरामध्ये चिचुंद्रा फिरत होत्या. त्या लक्ष्मीचं चिन्ह मानल्यामुळे त्यांना कोणी मारण्याच्या भानगडीत पडत नसत. एकदा जानकी म्हणाली, त्या सात चिचुंद्रा सुपाखाली झाकून ठेवा. त्या सुपावर वस्त्र टाकून रात्रभर चिचुंद्री सुपाखाली होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र बाजूला सारून टोपली उचलून पाहता चिचुंद्रीच्या ऐवजी तेथे सुंदर सात गुलाबाची फुले होती. जणू काही लक्ष्मीच अवतरली असे सर्वांना वाटले. दादा समोरून आले. त्यांनाही ती सुंदर फुले दाखविली. जानकी पूजा करीत ती फुले हातात घ्यावी म्हणून आनंदाने नाचू लागली. तिने ती फुले उपस्थितांवर उधळली तर फुलांची जागा चांदीच्या रुपयांनी घेतली. पाणेऱ्याजवळ तीन चिंबोऱ्या होत्या. जानकीने त्यांनाही टोपलीखाली झाकून ठेवायला सांगितले. सकाळी बघतात तर त्यांची तीन शिवलिंगे झाली. असे बघता बघता अनेक चमत्कार करायची. कधी ती अबूला जायची तर क्षणात पावागडावरील महाकालीचे दर्शन व प्रसाद घेऊन येत असे. काला (मुलगी) हिच्या इच्छेनुसार तिला बसल्याजागी अष्टभुजा महाकालीचे विश्वरूप दर्शन घडविले.

एक दिवस प्रांगणात बसून सगळे गप्पा मारीत असता दूर कुठून तरी सनईचे मंजुळ स्वर येत होते. सगळ्यांनी जानकी आईला विचारले हे काय आहे? तेव्हा ती म्हणाली, स्वर्गात इंद्र यज्ञं करीत असून गणपती मला त्यासाठी आमंत्रण द्यायला येत आहे. असे म्हणत तिने हात पुढे करताच शेंदराचा खडा हातावर पडून त्याची गणेशमूर्ती झाली. आईने ती मूर्ती पंधरा दिवस पाहुणे म्हणून राहणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे देवघरात ठेवून तिची पुजाअर्चा सुरू केली. ती शेंदराची गणेशमूर्ती बरोबर पंधराव्या दिवशी अदृष्य झाली.

एकुलता एक मुलगा बापू मुंबईत केईएम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी दाखल असता रक्ताची धार लागली. सहा वेळा टाके घालूनही उपयोग झाला नाही. डॉक्टर हताश झाले. बापूतर्फे दादा-आईला भेटण्यास बोलाविले. जानकीने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर, नर्सेससमोर रक्त येणाऱ्या बापूच्या पोटापाशी हात फिरविला. तेथे गुलाबाचे फूल प्रकटलेले पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटलेच पण रक्तही थांबले. डॉक्टरांनी ती किमया पाहून जानकीचे पाय धरले. डॉक्टरांनी त्या वॉर्डात जानकीचा फोटो लावला.

मुंबईच्या वास्तव्यात जानकी मुलीबरोबर महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेली. परंतु दुपार झाल्याने त्या मंदिरात पोचेपर्यंत आजूबाजूची दुकाने बंद होती व पुजारीही मंदिर बंद करून भोजनासाठी घरी चालला होता. मनात निराशा झाल्याने एवढ्या लांबून शीण करून आलो पण दर्शन होत नाही अस म्हणेपर्यंत पुजाऱ्याने दार उघडून चटकन् दर्शन घेण्यास सांगितले रिक्त हस्ते आत शिरलेल्या जानकीने महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आपला पदर पसरला अन् त्यातून निघालेले नारळ, फुले आणि खण पुजाऱ्याला दिले. तेथेच जानकीच्या कपाळाला आपोआप मळवट भरून ते कुंकू वाढू लागले. पुजारी व कन्या काला विस्मयचकित होऊन पाहात राहिले. जानकीने हे चमत्कार केले तसेच त्या काळानुसार गांधींची अहिंसा चळवळ, हत्त्या, टिळकांचे गीतारहस्य, भारतीय स्वातंत्र्य याविषयांवर देखील तिने वक्तव्य केली होती ते सारे तसेच घडले.

जानकीच्या नात्यातील गुप्ते कुटुंबात मुलगा जन्माला आला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. परंतु दहा दिवसांनी बाळाला उजेडात आणल्यावर कळले की ते दृष्टिहीन आहे. संपूर्ण परिवार घाबरून गेला. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासून सांगितले की तेथे फक्त खाचा आहेत, त्यावर काहीही इलाज नाही. गुप्ते दांपत्याने देवाचा धावा सुरू केला. त्यात जानकीचे प्रथम स्मरण केले. गुप्ते दांपत्यांनी जानकीला आपल्या घरी येण्यास विनविले. जानकीने घरी येऊन त्या बाळाला मांडीवर घेतले व त्याच्या अंगावर हात फिरवून ‘काशिनाथा लवकर लोचन उघड’ म्हणून विनविले. सगळी मंडळी मोठ्या उत्सुकतेने बघत होती. जानकीने शब्द उच्चारताच बाळाला दृष्टी येऊन ते टकमक बघू लागले. जानकीचा जयजयकार करीत सर्वत्र आनंदी वातावरण पसरले.

अशीच हिरा नामक गर्भवती गरगरीत होती. पण तिला दृष्ट लागून ती खंगत गेली व लुळे बाळ जन्माला आले. हिराने आर्ततापूर्वक जानकीचे स्मरण करताच जानकी आली. तिने बाळाचे कपडे उतरवून ते खड्ड्यात पुरुन टाकायला सांगत बाळाला आंघोळ घालून आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या अंगावर हात फिरवून उंच उंच उडवत हिरेच्या ओटीत फेकले व ‘बाळ सुदृढ आहे, सांभाळ’ असे सांगितले. प्रत्यक्षात बाळाचा पांगुळपणा जाऊन ते खरेच सुदृढ झाले.

आत्माराम खोपकर या आपल्या सुभक्ताचे जानकीने आयुष्यभराचे कोटकल्याण केले. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरातील बोटीवर झालेल्या स्फोटप्रसंगी फोटो काढण्यासाठी गेलेल्या खोपकरांच्या खांद्याला सोन्याची वीट घासून ते वाचले परंतु जखम मात्र जानकीला झाली. असे असंख्य चमत्कार करीत अनेक कुटुंबाचा उद्धार करून आपल्या भक्तांच्या संकटाचे निराकरण जानकीने करताना आपल्या दिव्यत्वाची प्रचिती दिली.

जानकी आईला आपल्या मृत्युची पूर्व व पूर्ण कल्पना नक्कीच होती. म्हणूनच कुसुमचे लग्न झाल्यावर अंगणात गप्पागोष्टी करीत असता सुवासिनीला मृत्यु आल्यास काय काय करायचे याबद्दल सविस्तर कल्पना तिने देऊन ठेवली. जेठालाल पुराणी हा मांत्रिक जानकीला भेटायला आला असता त्याचाही उद्धार शुद्ध अष्टमी हा त्याच्यासाठी शुभ दिन असल्याचे सांगत पुढील चैत्र नवमीला भर दुपारचे वेळी आपण कैलासाला जाणार असल्याचे सांगितले. चैत्राच्या उत्सवात जानकीचे दर्शन घेण्यासाठी गणदेवीत दूरदूरच्या गावातील असंख्य भक्त जमा झाले. जेठालालच्या हातून ठरल्यानुसार अष्टमीला यज्ञामध्ये जानकीने त्याची विद्या विसर्जित केली. यज्ञाची पूर्णाहुति होऊन सर्वांनी प्रसाद भोजन घेतले.

बरोबर एक वर्षाने रामनवमीचा दिवस उजाडला. जानकीचे मात्र मुख म्लान दिसत होते. चित्त दूरवर कुठेतरी भिरभिरत होते. ज्याची वाट पाहात होती ते ईश्वरी दूत नवमीला बरोबर दुपारी हजर झाले. चौसष्ट योगिनींनी तिला ओवाळले. त्यावेळी जगदंबा स्वत: उपस्थित होती. जानकीने संसार माया आवरली. राम मंदिरातून प्रभु रामचंद्रांच्या जन्माची किर्तनं आणि रामनामाचा गजर चालला असता गणदेवी गावातील दुर्गाने रूप धारण केलेली जानकी स्वर्गारोहणासाठी सिद्ध झाली.

त्यावेळी तिच्याजवळ फक्त दादा होते. स्वत:ला बरं वाटत नाही म्हणून जानकी संतरजीवर झोपली अन् रामजन्माची वेळ गाठून आपली अद्भूत यात्रा शांतपणे संपविली. गावोगावची मंडळी, आप्तेष्ट दु:खी अंत:करणाने गणदेवीकडे लोटले होते. डोळ्यांतील अश्रु आणि हुंदके याखेरीज सारे कसे निरामय होते. जानकीने सुवासिनीचे निधन प्रसंगी करावयास सांगितलेले सर्व विधी कुसुमच्या स्मरणात आले नि सर्व पूर्ण झाल्यावर जानकीच्या कपाळावर लावलेले कुंकू झरू लागले. अनेकांनी ते कुंकू प्रसाद म्हणून घेतले. संध्याकाळी अश्रूंच्या महापुरात चंदनाच्या चितेवर जानकीचा जयजयकार करीत देह ठेवून सगळ्यांनी श्रद्धांजलि अर्पण करीत अग्नी दिला. दुसऱ्या दिवशी स्मशानात जानकीच्या अस्थि गोळा करायला गेलेल्या मंडळींना पुन्हा चमत्काराचा प्रत्यय आला. जेथे जानकी आईची चिता चंदनाच्या लाकडांनी जाळली होती तेथे अस्थिंचा तर मागमूस नव्हताच उलट मिळाले ते कर्पुराचे खडे! धन्य ती जानकी!!

आजही जानकीच्या चमत्कारांची प्रचिती अनेक भक्तांना येत आहे.

सौ. प्रणोति (सुरेखा) हेमंत कुलकर्णी
परमपूज्य जानकी आईची नात

(श्री. मधुकर गजानन सुळे, बडोदा यांच्या ‘सावली’ पोथी ग्रंथाद्वारे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..