आज छायाचं लग्न होतं, त्यासाठी गणेश महिनाभर आधीच सुटी घेऊन अमेरिकेतून आला होता. छाया, ही त्याची मानलेली बहीण होती. विवाह समारंभ थाटात पार पडला. छाया आपल्या पतीसमवेत सासरी निघाली. जाण्यापूर्वी दोघांनीही आईला नमस्कार केला. वडिलांच्या फोटोला नमस्कार केला व ती गणेशकडे वळली. त्याला दोघेही नमस्कार करु लागले तेव्हा गणेश तिला म्हणाला, ‘ताई, या दोघांना तू नमस्कार केला तो मला पोहोचला.. मी आज जो काही आहे, ते या दोघांमुळेच.. आज बाबा असायला हवे होते.. पण तू काही काळजी करू नकोस, मी तुला कधीही काही कमी पडू देणार नाही..’ हे ऐकून छाया, गणेशच्या गळ्यात पडली व हमसून हमसून रडू लागली… तिला बारा वर्षांपूर्वीचा तो गणेश आगमनाचा दिवस आठवला…
ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे चिपळूणमधील गणेशच्या, डोंगरावरील घरावर दरड कोसळून त्याचे आई-वडील गेले. तो पेणला गेला होता म्हणून वाचला. पेणच्या काकांकडे त्याने शिक्षण घेता घेता गणपती करायचे शिकून घेतले. त्याने शहरात गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच, त्याची एक मूर्ती सोडून सर्व मूर्तींची विक्री झाली होती. त्याने स्टाॅल आवरायला घेतला, तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. त्यातून एक बारा वर्षांची मुलगी आपल्या वडिलांसह बाहेर आली व गणेशच्या पुढे उभी राहिली. तिला गणेशकडे राहिलेली, ती मूर्ती आवडली. तिच्या बाबांनी गणेशला मुर्तीची किंमत विचारली. गणेश म्हणाला, ‘साहेब, ही मूर्ती मी माझ्यासाठीच ठेवलेली आहे, आता घरी जाऊन मी तिची पूजा करणार आहे.’ त्या मुलीचे बाबा म्हणाले, ‘अरे राजा, या मूर्तीची पूजा तुझ्याकडे झाली काय किंवा माझ्याकडे झाली, त्यात फरक तो काय? तू आमच्या घरी ये आणि पूजेत सहभागी हो. माझ्या मुलीला ती मूर्ती आवडली आहे, तर तू समजून घे.’ गणेशने मूर्ती तिच्या हातात दिली. तिच्या बाबांनी त्याला घरचा पत्ता दिला व घरी यायला सांगितले.
संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं. तो सोफ्यावर बसला. समोरच त्यानं केलेला गणपती, सुंदर सजावटीमध्ये विसावला होता. त्याचे हात नकळत जोडले गेले.. तेवढ्यात त्या मुलीचे आई-वडील आले. त्यांनी गणेशची आस्थेने चौकशी केली. गणेशची आठवीपर्यंत शाळा झाली होती. दोघांनीही त्याला जेवणासाठी आग्रह केला. चौघेही एकत्र जेवले.
त्या मुलीचे नाव छाया होते, तिचे वडील बिझनेस काॅन्ट्रॅक्टर होते. आई गृहिणी होती. छायाच्या आई-बाबांनी विचार विनिमय करुन, अनाथ असलेल्या गणेशला शिक्षणासाठी आपल्या घरीच ठेवून घेण्याचा निर्णय घेतला.
गणेश लवकरच त्यांच्यात रुळला. सात वर्षांत तो पदवीधर झाला. अभ्यासात हुशार असल्याने गणेशला एका परदेशी कंपनीने चांगले पॅकेज ऑफर केले. ती नोकरी करताना त्याला परदेशात जाण्याची संधी आली. त्याने आई बाबांना विचारले व त्यांच्या संमतीनंतरच तो अमेरिकेत गेला.
चार वर्षांत गणेशने खूपच प्रगती केली. तो वर्षातून एकदा येऊन तिघांनाही भेटून जात होता. तिघांच्याही वाढदिवसाला शुभेच्छा देत होता. दरम्यान छायाच्या बाबांच्या व्यवसायात मंदी आली. त्यांना नैराश्याने ग्रासले..
एके दिवशी त्यांचं अपघाती निधन झालं. गणेशला कळताच तो त्वरेने आला. मुलाच्या नात्यानं त्यानं सर्व जबाबदारी पार पाडली. छाया शिक्षण पूर्ण करुन, नोकरी करीत होती. गणेश अमेरिकेत परतला.
वर्षभरातच छायाचं लग्न ठरलं. गणेशने सुट्टी काढून सर्व लग्नसोहळा पार पडला. छाया आता सासरी निघाली होती.. तिला एकच चिंता वाटत होती, आईकडं आता कोण पाहणार?
गणेशला न सांगताही ताईची चिंता कळून आली. त्याने कंपनीला मेल करुन अमेरिकेऐवजी इकडेच पोस्टींग करायला सांगितले.. आता तो आईसोबतच रहाणार होता.. आणि ताईची चिंता गणेशने कायमची दूर केली होती…
गणेश, सुखकर्ताही होता व दुःखहर्ताही होता..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-९-२१.
Leave a Reply